Amrapali Gan: Only fansच्या प्रमुखपदी निवड झालेली 'ही' भारतीय वंशाची महिला कोण आहे?

फोटो स्रोत, ONLYFANS
कंटेंट स्बस्क्रिप्शन वेबसाईट OnlyFans च्या सीईओ पदाची जबाबदारी आता नव्या महिला बॉसकडे सोपवली जात आहे.
आम्रपाली गान या सध्या OnlyFans बेवसाईटच्या मार्केटिंग हेड आहेत. त्यांना ही नवी जबाबदारी मिळत आहे. अॅडल्ट कंटेंटसाठी ही वेबवसाईट प्रसिद्ध आहे. कोरोना साथीच्या काळात या वेबसाईटच्या वापरामध्ये वाढ झाली होती.
टिम स्टोकली यांनी 2016 मध्ये या कंपनीची सुरुवात केली. पण आता नवं काहीतरी करण्यासाठी या पदावरून पायउतार होत असल्याचं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून स्पष्ट केलं.
गान या ही जबाबदारी सांभाळण्यास योग्य असल्याचं ते म्हणाले.
"मी आता ही जबाबदारी अशा मित्र आणि सहकाऱ्याकडे सोपवत आहे ज्यांच्याकडे संस्थेला प्रचंड क्षमतेपर्यंत पोहोचवण्याची ऊर्जा आणि नवी दृष्टी आहे," असं स्टोकली यांनी इन्स्टाग्रामवर म्हटलं आहे.
"मला ही जबाबदारी मिळाल्याचा अभिमान आहे. आमच्यासाठी कंटेंट तयार करणाऱ्यांना अधिकाधिक संधी मिळावी आणि त्यांना त्यांच्या कंटेंटचा मोबादला मिळावा यासाठी, काम करण्यास उत्सुक आहे," असं गान यांनी म्हटलं.
आम्रपाली गान कोण आहेत?
आम्रपाली गान या मूळच्या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला आहे. आम्रपाली यांचं शिक्षण अमेरिकेतील कॅलिफोर्नियात झालं. त्या आजही त्याच भागात राहतात.
आम्रपाली यांनी FIDM मधून मर्कंडाईज मार्केटिंगमध्ये असोसिएट्स ऑफ आर्ट्स ही पदवी मिळवलीय. तसंच, जनसंपर्क आणि संघटनात्मक संवाद या विषयात कॉलिफोर्निया स्टेट यूनिव्हर्सिटीतून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. शिवाय, हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये इंटरप्रेन्योरशिपचा ऑनलाईन अभ्यास करून प्रमाणपत्र मिळवलं आहे.
आम्रपाली गान या आता 36 वर्षांच्या असून, त्या अविवाहित आहेत. अर्केड एजन्सीसोबत त्या गेल्या काही वर्षांपासून सल्लागार म्हणून जोडल्या आहेत.
कंपनी आणि टीका
OnlyFans या कंपनीनं कंटेट तयार करणारे आणि फॅन्स यांना एक अनोखा अनुभव देऊ केला आहे. जगातील सर्वांत सुरक्षित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्यास कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं.
कंपनीचे संस्थापक स्टोकली यांनी भविष्यातील त्यांच्या योजनांबाबत काहीही सांगितलं नाही. मात्र हा बदल होत असताना ते सल्लागाराच्या भूमिकेत राहतील हे स्पष्ट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
कोव्हिड लॉकडाऊनच्या काळामध्ये OnlyFans च्या यूझर्सच्या संख्येमध्ये मोठी वाढ दिसून आली होती.
या बेवसाईटचे जगभरातील 18 कोटी नोंदणी असलेले यूझर्स असून जवळपास 20 लाख कंटेंट तयार करणारे क्रिएटर्स आहेत. पाच वर्षांपूर्वी सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत कंटेंट क्रिएटर्सना 5 अब्ज डॉलर एवढा मोबदला दिला असल्याचं, कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
मात्र, अल्पवयीन यूझर्सना आक्षेपार्ह कंटेंट विक्री करताना पुरेशी काळजी घेतली जात नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांना मोठ्या टीकेचा सामनाही करावा लागला आहे.
बँकिंग भागीदारांच्या दबावामुळं सर्व प्रकारचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडिओ ऑक्टोबरपासून ब्लॉक केले जाणार असल्याचं कंपनीनं ऑगस्ट महिन्यात सांगितलं होतं.
मात्र, यूझर्सकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर OnlyFans नं एका आठवड्यानंतर त्यांचा हा निर्णय रद्द केला होता.
ही वेबसाईट संगीतकार, फिटनेस ट्रेनर आणि सेलिब्रिटीज यांना त्यांच्या फॉलोअर्सकडून पैशाच्या मोबदल्यात व्हिज्युअल कंटेंट उपलब्ध करून देण्याची सेवा देते.
मात्र, पॉर्न स्टार्स आणि सेक्स वर्कर्स यांना आक्षेपार्ह फोटो-व्हीडिओ यूझर्ससाठी उपलब्ध करून देण्यासाठी ही बेवसाईट अधिक प्रसिद्ध आहे.
कंटेंट क्रिएटर्सना मिळणाऱ्या पैशातून 20% कमिशन OnlyFans ला मिळतं.
कंपनीच्या विकासासाठी आणि कंटेंट क्रिएटर्सना अधिक बळ देत नव्या ध्येयानं कंपनीची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गान यांची नियुक्ती करण्यात आल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
कंपनी OFTV या त्यांच्या फ्री स्ट्रिमिंग अॅपसाठी गुंतवणूक वाढवणार असून क्रिएटर्ससाठीही नवीन गोष्टी आणणार असल्याचं गान यांनी सांगितलं.
गान यांनी रेड बुल, क्वेस्ट न्युट्रिशन आणि लॉस एंजल्समधील कॅनबिज कॅफेमध्ये काम केल्यानंतर 2020 मध्ये OnlyFans मध्ये कामाला सुरुवात केली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























