ओमिक्रॉनबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवावरून आपण काय शिकायला हवं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेचल श्रेयरर आणि पीटर मवाई
- Role, बीबीसी रिअॅलिटी चेक
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरीएंट प्रामुख्यानं सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला होता. त्यानंतर या व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वेगानं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
यानंतर जगभरातील इतर देशांमध्येही अशीच स्थिती पाहायला मिळाली. यापूर्वीच्या व्हेरीएंटच्या तुलनेत हा प्रचंड वेगानं पसरत असल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)म्हटलं.
दक्षिण आफ्रिकेतील सर्वच प्रांतांमध्ये कोव्हिडसाठी रुग्णालयात भरती होणाऱ्यांचं प्रमाण वेगानं वाढत असल्याचं, रुग्णालयांतून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.
मात्र, समोर येणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या पाहता, अपेक्षेएवढ्या वेगानं त्यात वाढ होत नसल्याचं दिसत आहे. फार कमी लोकांना ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरची गरज भासत आहेत. तसंच रुग्णांना कमी काळासाठी रुग्णालयात दाखल राहावं लागत आहे.
याठिकाणी आरोग्य सुविधा पुरवणाऱ्यांपैकी महत्त्वाच्या अशा डिस्कव्हरी हेल्थनं याबाबत अभ्यास केला आहे. त्यानुसार दक्षिण आफ्रिकेत पहिल्या लाटेमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याच्या प्रमाणाच्या तुलनेत ओमिक्रॉनच्या रुग्णांना दाखल करावं लागण्याचं प्रमाण अंदाजे 30 टक्क्यांनी कमी असल्याचं म्हटलं आहे.
पण असं असलं तरी कोरोनाचा हा व्हेरिएंट अधिक सौम्य आहे, असं यावरून दिसत नाही असं दक्षिण आफ्रिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
यापूर्वीच्या कोरोनाच्या लाटांशी तुलना करता प्रामुख्यानं लसीकरणाचं प्रमाण आणि लोकसंख्येमधील नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती याचा मोठा फरत आहे.
लसीचे दोन डोस आणि यापूर्वीच्या कोराना संसर्गामुळे मिळालेली रोगप्रतिकार क्षमता यामुळं लोकांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण होण्यापासून संरक्षण मिळत नसलं, तरी त्यामुळं गंभीर आजाराचा धोका मात्र कमी होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. विकी बेल्ली या जोहान्सबर्ग येथील ख्रिस हानी बार्ग्वनाथ हॉस्पिटल येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, लोकांमध्ये असलेली उच्च रोगप्रतिकारक्षमता हे रुग्णालयात भरतीचं प्रमाण कमी असण्याचं कारण आहे. "मात्र, हे म्युटेशन कमी धोकादायक असल्याचा काहीही पुरावा नाही," असं त्या म्हणाल्या.
रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. तसंच रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं 40 पेक्षा कमी वय असलेले आहेत. त्यामुळं ते गंभीर आजारी पडण्याचा धोकाही कमी असतो. या सर्वाचा परिणाम म्हणून हा व्हेरिएंट सौम्य आहे असं चित्र समोर येत असल्याचा इशारा WHO नं दिला आहे.
कदाचित काही जण इतर कारणांसाठी रुग्णालयात गेले असतील. पण दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या सर्वांचीच चाचणी केली जात आहे. त्यामुळं अनेक सौम्य प्रकरणं समोर येत आहेत.
यामागंच आणखी एक कारण म्हणजे, दक्षिण आफ्रिकेतील सरासरी लोकसंख्येच्या तुलनेत याठिकाणी 60 पेक्षा अधिक वय असलेल्यांचं लसीकरण होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळं त्यांचं गंभीर आजारांपासून संरक्षण होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण आफ्रिकेमध्ये तरुण लोकसंख्या आहे. युकेच्या 40.4 च्या तुलनेत याठिकाणी सरासरी वय हे 27.6 एवढं आहे. त्यामुळं जास्त सरासरी वय असलेल्या इतर देशांच्या तुलनेत याठिकाणी ओमिक्रॉनचा धोका तसाच असू शकत नाही.
मुलं आजारी पडण्याचं प्रमाण अधिक आहे का?
दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा सर्वाधिक फटका बसलेल्या गौतेंग प्रांताबरोबरच इतर भागांमध्ये रुग्णालयांत मुलांचं दाखल होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
काही जणांनी याकडे लक्ष वेधले असून, हा व्हेरिएंट तरुणांसाठी किंवा कमी वय असलेल्यांसाठी अधिक धोकादायक ठरू शकतो, असं म्हटलं आहे.
पण हा अंदाज फार कमी आकड्यांवरून लावला जात आहे. कारण प्रौढांप्रमाणेच कोव्हिडमुळं रुग्णालयात दाखल झालेली मुलं आणि इतर कारणांसाठी दाखल झालेल्या मुलांना नंतर झालेली लागण यात फरक केला जात नाही, असं जोहान्सबर्ग येथील विटवॉटरस्रँड विद्यापीठातील प्राध्यापिका हेलेन रीस म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. बेल्ली यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, त्यांच्या रुग्णालयात दाखल असलेल्या मुलांची संख्या कमी आहे. कारण कोव्हिडमुळं त्यांना अगदी सौम्य त्रास झाला आणि ते दोन ते तीन दिवसांत पूर्ण बरे झाले.
ही सर्व मुले गरीब भागातील असल्यामुळं ती कुपोषितही असू शकतात. त्यामुळं त्यांना सरासरीच्या तुलनेच विषाणूपासून अधिक धोका असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
गौतेंगमध्ये कोव्हिडमुळं लहान मुलं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही पहिल्या आठवड्यातील 14 टक्क्यांच्या तुलनेत तिसऱ्या आठवड्यात घटून 8 टक्के झालं आहे.
ओमिक्रॉन विरोधात लसीकरणाची भूमिका काय?
दक्षिण आफ्रिकेमध्ये तुलनेनं लसीकरणाचं प्रमाण कमी आहे. याठिकाणी एकूण लोकंख्येच्या 26 टक्के नागरिकांचं पूर्णपणे लसीकरण झालं आहे. त्यामुळे त्यांचे आकडे आणि अधिक प्रमाणात लसीकरण झालेल्या देशांच्या आकड्यांची थेट तुलना करणंही योग्य ठरणार नाही. मात्र, याठिकाणी नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमता अधिक आहे.
लसीकरणामुळं इतरांना संसर्ग होण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्याचं कारण म्हणजे, लसीकरणामुळं लोक कमी कालावधीसाठी आजारी पडतात आणि लवकर बरे होतात. त्यामुळं संसर्गासाठी मिळणारी संधीही कमी असते, असं सेंट अँड्र्युज विद्यापीठातील डॉ. म्युज सेल्विक यांनी म्हटलं.
पण तरीही या व्हेरिएंटचा प्रसार वेगानं होत आहे हे स्पष्ट आहे. लसीकरणाचं प्रमाण अधिक असलेल्या लोकसंख्येतही त्याचा प्रसार होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काही लशी संसर्ग पूर्णपणे थांबवू शकतात. मात्र गंभीर आजार टाळण्याबाबतचा विचार करता प्रचंड म्युटेशननंतरही लसीकरणाचा सकारात्मक प्रभाव असल्याचे पुरावे समोर आले आहेत.
मात्र त्याचं नेमकं प्रमाण किती हे स्पष्ट झालेलं नाही.
दक्षिण आफ्रिकेतील प्राथमिक अभ्यासावरून हे लक्षात येतं की, फायझरच्या लसीमुळं दोन डोस झाल्यानंतर काही महिन्यांनीही रुग्णालयात दाखल होण्यापासून जवळपास 70 टक्के संरक्षण मिळतं. तिसऱ्या बूस्टर डोसनंतर तर हे प्रमाण 90 टक्के पर्यंत पोहोचतं असं सांगितलं जात आहे.
मात्र, दक्षिण आफ्रिकेमध्ये इतरही अनेक लसींचा वापर केला जात आहे. अनेक जण जॉन्सन अँड जॉन्सच्या लशींचे डोस घेत आहेत. त्यामुळं विविध वयातील लोकांवर या वेगवेगळ्या लसी किती परिणामकारक आहे, हे पाहण्यासाठी आणखी अभ्यास करावा लागणार आहे.
(रिपोर्टिंग - निकोला मॉरीसन, बीबीसी मॉनिटरींग)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























