BBC 100 विमेन 2021: यावर्षीच्या यादीमध्ये या महिलांचा समावेश

100 women banner
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बीबीसीने 2021 या वर्षासाठी सर्वाधिक प्रेरक आणि प्रभावशाली 100 महिलांची यादी जाहीर केली आहे.

जगभरात रिसेट म्हणजे आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचं बटण दाबणाऱ्या महिलांचा यात समावेश केला आहे. जगभरात महिला समाज आणि संस्कृतीला नव्याने बदलण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

या यादीमध्ये नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई, सामोआच्या पहिल्या महिला पंतप्रधान फियामे नाओमी माताफा, व्हॅक्सिन कॉन्फिडन्स प्रकल्पाच्या प्रमुख प्रा. हेयडी जे लॉर्सन, प्रसिद्ध लेखिका चिमामंडा नगोजी अडिची यांचा समावेश आहे.

यावर्षी मंजुला प्रदीप आणि मुग्धा कालरा या दोन भारतीय महिलांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांना या यादीत स्थान का मिळालं हे बीबीसीच्या बातम्यांमधून तुम्हाला समजेलच.

या यादीत अर्धी संख्या अफगाणिस्तानी महिलांची दिसेल. यातील काहींची खरी नावं आम्ही प्रकाशित केलेली नाहीत. संरक्षणाच्या कारणास्तव काही महिलांची छायाचित्रंही वापरलेली नाहीत.

2021मध्ये अफगाणिस्तानात तालिबान परतल्यामुळे तिथल्या लाखो महिलांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. तालिबानच्या प्रशासनाने मुलींचं माध्यमिक शिक्षण बंद केलं आहे.

महिला कल्याण मंत्रालय बंद केलं आहे तसेच अनेक ठिकाणी महिलांच्या कामावर बंदी घातली आहे. या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी साध्य केलेल्या ध्येयाचे कौतुक करण्यासाठी यादीत समावेश करण्यात आला आहे.

Short presentational grey line

बीबीसीच्या 2021 मधल्या 100 Women

  • लिमा आफशिद

    अफगानिस्तान कवयित्री

    पुरस्कारविजेच्या लेखिका आणि कवयित्री असलेल्या लिमा यांचे लेख आणि कविता अफगाणिस्तानातील पितृसत्ताक परंपरेला आव्हान देणाऱ्या आहेत.

    पत्रकारितेच्या शिक्षणानंतर लिमा आफशिद यांनी मुक्त पत्रकार आणि सामाजिक भाष्यकार म्हणून पाच वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलं.

    काबूल विद्यापीठामधील कवींची संघटना शेर-ए-दानेशगाहच्या देखील त्या सदस्या आहेत. कोरोनाच्या काळात 200 सदस्यांना समाजाबाबत जाणीव राहावी म्हणून त्यांनी ऑनलाईन कवितांच्या सत्रांचं आयोजनही केलं.

    *सध्याची अफगाणिस्तानातील स्थिती ही 20 वर्षे ज्यातून बाहेर निघण्यासाठी लागली, त्याच चिखलात पुन्हा अडकण्यासारखी आहे. पण तरीही, जंगलाच्या अंधारातून प्रकाशाकडे वाट काढणाऱ्या फांदीप्रमाणे आम्हीही पुन्हा प्रकाशाकडे झेप घेऊ, अशी मला आशा आहे.

  • हलिमा एडन

    केनिया मानवतावादी कार्यकर्ती आणि पूर्वाश्रमीच्या मॉडेल

    हिजाब परिधान करणाऱ्या पहिल्या सुपरमॉडेल ठरलेल्या हलिमा एडन या सोमाली वंशाच्या आहेत पण त्यांचा जन्म केनियातल्या रेफ्युजी कँपमध्ये झाला होता. IMG मॉडेल्स या जगातल्या सर्वात मोठ्या मॉडेलिंग एजन्सीसोबत त्यांनी 2017मध्ये करार केला. मॉडेलिंग करताना आपण हिजाब काढणार नाही अशी अट त्यांनी त्यांच्या काँट्रॅक्टमध्ये घातली होती.

    ब्रिटीश वोग, अ‍ॅल्युअर आणि स्पोर्टस इलस्ट्रेटेडच्या स्विमसूट एडिशनच्या कव्हरवर हिजाब परिधान करून झळकणाऱ्या त्या पहिल्या मॉडेल होत्या. मुस्लिम महिलांचे प्रश्न आणि परिस्थिती याविषयीची जागृती करण्याचं काम एडन करतात. त्या लहान मुलांच्या हक्कांसाठीच्या युनिसेफच्या अ‍ॅम्बेसेडरही होत्या.

    मॉडेलिंग आपल्या मुस्लिम धर्मातल्या श्रद्धांशी जुळत नसल्याने त्यांनी 2020मध्ये मॉडेलिंग करणं थांबवलं. पण तरीही त्या फॅशन इंडस्ट्री आणि त्यापलिकडच्या जगातही त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे.

    *जागतिक साथीच्या या काळात फ्रंटलाईन वर्कर्सनी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक धोके पत्करून काम केलंय. आणि आपण त्यांच्या या कामाची जाणीव ठेवली पाहिली. कृतज्ञतेची भावना मनात ठेवून या जगाची आपल्याला नवीन सुरुवात करता येईल.

  • ऑलुयेमी अदेतिबा-ओरिजा

    हेडफोर्ट फाऊंडेशनच्या संस्थापिका

    गुन्हेगारी वकील आणि हेडफोर्ट फाऊंडेशन या सर्व महिला वकील सदस्यांच्या संस्थेच्या अध्यक्ष आणि संस्थापिका असलेल्या ऑलुयेमी गरजुंना कायदेशीर मदत पुरवतात.

    लागोसमध्ये असेलील चार सदस्यांचं कायदे पथक तुरुंगात भेटी देऊन त्याठिकाणी असलेल्या गरीब आणि चुकीच्या गुन्ह्यांत अडकलेल्या जामीन मिळण्यात अडचणी येणाऱ्यांना मदत करतात. त्याचबरोबर खटला सुरू होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील नागरिकांना (नायजेरियातील तुरुंगांमध्ये अशी लोकसंख्या जवळपास 70 टक्के आहे) मदत केली जाते. ऑलुयेमी आणि त्यांचे सहकारी अल्पवयीन आरोपी किंवा दोषींवर लक्ष केंद्रीत करून त्यांना एक संधी मिळावी म्हणून प्रयत्न करतात.

    2018 मध्ये याची सुरुवात झाली तेव्हापासून या संस्थेनं 125 पेक्षा अधिक लोकांना मदत केली आहे.

    *जगात बदल घडवून आणण्यासाठी आपल्या सर्वांना भूमिका बजावावी लागेल. चांगल्या गोष्टींना पाठिंबा द्या आणि जगात स्वातंत्र्य आणि सुरक्षेची खात्री द्या.

  • मकदसा अहमजझई

    अफगाणिस्तान सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या

    मकदसा यांनी पूर्व अफघाणिस्तानात असलेल्या नानगरहार प्रांतातीस 400 तरुण महिला कार्यकर्त्यांचं एक जाळं तयार केलं. शेजारील जिल्ह्यांमध्ये जाऊन त्याठिकाणी कौटुंबीक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्यांना मदत करण्यासाठी त्यांनी त्यांची मदत घेतली.

    कोव्हिड 19 च्या काळामध्ये महिलांना आणि समाजातील घटकांना मदत करण्याची जबाबदारी मकदसा यांनी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या म्हणून स्वीकारली. अफगाणिस्तानच्या यूथ पार्लामेंटच्या त्या माजी सदस्य आहेत. त्याठिकाणी त्यांनी महिला आणि बालकांच्या हक्कांसाठी भूमिका मांडली होती.आवाज उठवला होता.

    2018 मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला जाणारा शांतता पुरस्कार (N-Peace) देण्यात आला. शांतता निर्मिती आणि समाजातील समस्यांवर केलेल्या उपाययोजनांसाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

    *मला अचानक असा अनुभव जाणवलाच नाही. जणू याआधीही सरकारच नव्हतं. आता आमची आशा केवळ तरुण पिढीकडून आहे. त्यांनी पोकळी भरून काढत मजबूत यंत्रणा उभी करावी. मात्र आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय ते शक्य नाही.

  • रादा अकबर

    अफगाणिस्तान कलाकार

    महिलांवरील अत्याचार आणि दडपशाही हे अफगाणिस्तानच्या कलाकार रादा अकबर यांच्या कलाकृतीचा गाभा असतात. रादा यांनी कायम त्यांच्या कलेचा वापर महिलांबाबत प्रश्न मांडण्यासाठी आणि त्या समाजात काय मिळवण्यासाठी पात्र आहेत, हे दर्शवण्यासाठी केला आहे.

    2019 पासून त्या जागतिक महिला दिनी म्हणजे 8 मार्च रोजी 'सुपरविमेन' (अबरझनान) या वार्षिक प्रदर्शनाचं आयोजन करतात. देशाच्या इतिहासात महिलांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचा उत्सव त्या याद्वारे साजरा करतात. काही जदिवसांपूर्वीपर्यंत त्या काबूल किंवा इतर कुठेतरी महिलांच्या इतिहासावर संग्रहालय उभारण्यासाठी काम करत होत्या.

    सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक मूल्यांवरून महिलांवर टीका करणाऱ्या सामाजिक नियमांचा निषेध करण्यासाठी त्यांची कला त्यांना मदत करते, असं रादा मानतात.

    *अफगाणिस्तान आणि येथील नागरिकांवर कट्टरतावादी आणि जागतिक नेत्यांनी अनेक दशकं अत्याचार केले आहेत. पण तरीही आम्ही कधीही प्रगतीशील देश बनण्याच्या दिशेनं काम करणं थांबवलं नाही. आम्ही पुन्हा एकदा नक्कीच स्वतंत्र आणि समृद्ध अफगाणिस्तान पाहू.

  • आबिया अक्रम

    पाकिस्तान अपंग व्यक्तींच्या हक्कांसाठीच्या कार्यकर्त्या

    स्वतः शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या आबिया अक्रम या 1997पासून अंपगांसाठी काम करत आहेत. विद्यार्थीदशेतच त्यांनी स्पेशल टॅलेंट एक्सचेंज प्रोग्राम (STEP) सुरू केला होता.

    कॉमनवेल्थच्या यंग डिसेबल्ड पीपल्स फोरमसाठी कोऑर्डिनेटर म्हणून नेमणूक होणाऱ्या त्या पहिल्या पाकिस्तानी महिला होत्या. अक्रम यांनी नॅशनल फोरम ऑफ विमेन विथ डिसअ‍ॅबिलिटीजची स्थापना केली असून UNने सांगितलेले अपंगांसाठीचे हक्क मिळावेत आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्या प्रयत्न करतात.

    2030च्या UNच्या धोरणांमध्ये आणि शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये अपंगत्वाचा समावेश व्हावा यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.

    *कोव्हिड 19च्या साथीच्या नंतरच्या जगाची एक नवी सुरुवात करण्यासाठी आपण समाजातील गोष्टींमध्ये सुधारणा करून त्यावर 'न्यू नॉर्मल' ची निर्मिती केली जावी. असं केलं तर आपल्याला सर्वसमावेशक विकास होताना पहायला मिळेल.

  • लीना आलम

    अफगानिस्तान अभिनेत्री

    पुरस्कार विजेत्या टिव्ही, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री तसंच मानवाधिकार कार्यकर्त्या लीना आलम या अफगाणिस्तानातील शाहीन आणि किलिंग ऑफ फरखुंदा असा महिला केंद्रीत टिव्ही शोसाठी ओळखल्या जातात. यात एका अशा अफगाण महिलेच्या जीवनाबाबत कथा मांडण्यात आली आहे, जिच्यावर कुरआण जाळल्याचा आरोप करून संतप्त पुरुषांचा जमाव तिला मारतो.

    अफगाणिस्तान 1980 मध्ये अफगाणिस्तानातून निघून गेल्या. त्या आता अमेरिकेत राहतात मात्र, त्यांच्या मायभूमीतील कथाच त्या सादर करतात.

    संंयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानातील मोहीमेदरम्यान 2009 मध्ये त्यांची शांतता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

    *प्रचंड रक्तपात आणि बलिदानानंतर देशाची नव्यानं निर्मिती करण्यासाठी आम्हाला एवढी वर्ष लागली. हे सर्व जमीनदोस्त होताना पाहणं हे काळीज पिळवटून टाकणारं आहे. पण लढा सुरुच राहायला हवा. यावेळी त्यासाठी अधिक मजबूत पाया रचण्याची गरज आहे.

  • डॉ. आलेमा

    अफगाणिस्तान तत्वज्ञ आणि कार्यकर्त्या

    सामाजिक शास्त्र आणि तत्वज्ञानाच्या प्रसिद्ध अभ्यासक असलेल्या डॉ. आलेमा या शांतता मंत्रालयाच्या मनवाधिकार आणि नागरी समाजाच्या उपमंत्री होत्या. त्या प्रसिद्ध महिला हक्क कार्यकर्त्या आणि इंडिपेंडंट विमेन्स पॉलिटिकल पार्टिसिपेशनच्या संस्थापिकाही आहेत.

    जर्मनीतील तत्वज्ञानात पीएचडी मिळवलेल्या डॉ.आलेमा यांना सामाजिक क्षेत्रात कामाचा (कॉनफ्लिक्ट अॅनालिसिस) 20 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे.

    त्यांनी जर्मनी आणि अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय संबंध आणि महिला सबलीकरण अशा विषयांवर पुस्तकं लिहिली आहेत. तसंच त्या मानवतावादी कायद्यांसंदर्भातील प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहे. प्रामुख्यानं निर्वासित, स्थलांतरीत आणि स्थानबद्ध लोकांना त्या मार्गदर्शन करतात.

    *आधुनिक राज्यघटनेनुसार नागरी हक्कांचं संरक्षण केलं जाईल, अशा स्वतंत्र आणि लोकशाही असलेला अफगाणिस्तान हे माझं स्वप्न आहे. महिलांना त्याठिकाणी समान नागरीक असल्याच्या अधिकारासह सर्व क्षेत्रात समान संधी उपलब्ध होतील.

  • सेवदा अल्तुनोलक

    तुर्कस्तान व्यावसायिक गोलबॉल प्लेयर

    जन्मापासून दृष्टीहीन असलेल्या सेवदा अल्तुनोलक या व्यावसायिक गोलबॉलपटू आहेत. (या खेळात 3 दृष्टीहीन किंवा डोळे बांधलेल्या खेळाडुंचा संघ घंटी बांधलेला बॉल विरोधी संघाच्या जाळीत फेकण्याचा प्रयत्न करतात.)

    जगातील सर्वोत्तम गोलबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवदा यांची 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीनं अॅथलिट ऑफ द मंथ म्हणून निवड केली. दोन पॅरालिम्पिकबरोबरच, दोन वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि चार युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये त्या सर्वाधिक स्कोरर होत्या. तुर्कस्तानच्या महिला संघाला रिओमध्ये 2016 मध्ये आणि टोकियोत 2020 मध्ये सुवर्ण पदक मिळून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

    अॅनाटोलिया येथील टोकातमध्ये जन्मल्यानंतर त्यांना अंकारामध्ये शारीरिक शिक्षण विषयात पदवी पूर्ण केली.

    *शारीरिक व्यंगाकडे अडथळा म्हणून न पाहता स्वतःला सिद्ध करण्याची संधी म्हणून पाहायला हवं.

  • वहिदा आमिरी

    अफगाणिस्तान ग्रंथपाल आणि कार्यकर्त्या

    ग्रंथपाल आणि पुस्तकांची आवड असलेल्या वाहिदा आमिरी या कायद्याच्या पदवीधर आणि आंदोलक आहेत. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर, त्या त्यांच्या लायब्ररीत काम करत राहण्याऐवजी काबूलच्या रस्त्यावर उतरल्या आणि अफगाणिस्तानातील महिलांच्या शिक्षण आणि काम करण्याच्या हक्कासाठी लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या आंदोलनामध्ये त्या सहभागी झाल्या.

    तालिबाननं आंदोलनांवर बंदी घातल्यानं आमिरी या इतर महिलांच्या साथीनं चर्चा घडवून आणत आहेत आणि वाचनाचा प्रचार करत आहेत.

    त्यांचं ग्रंथालय 2017 पासून सुरू असून पुस्तकांशिवाय माझी काहीही ओळख नाही, असं त्या म्हणतात.

    *जगानं मानव म्हणून आपला आदर केला नाही. मात्र, अफगाणिस्तान विनाशाच्या मार्गावर असताना आम्ही आंदोलन आणि न्यायाची मागणी करण्याबरोबरच वाचनाला प्रोत्साहन देत आशा पल्लवित करत आहोत.

  • मोनिका अराया

    कोस्टा रिका प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या समर्थक

    मोनिका अराया या एक हवामान तज्ज्ञ आहेत आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीकडे सर्वांनी लवकरात लवकर वळावं असा त्यांचा प्रयत्न आहे. अमेरिका आणि युरोपातल्या शाश्वत विकासासाठीच्या अनेक मोहिमांसाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सोबतच 'कोस्टा रिका लिम्पिया' या त्यांच्या देशातल्या लोकांनी सुरू केलेल्या चळवळीतही त्या होत्या. याच मोहिमेमुळे कोस्टा रिकाने अपारंपरिक ऊर्जेबाबत जगात आघाडी घेतलेली आहे.

    UN च्या हवामान बदल आणि वाहतूक विषयक मोहिमांसाठीच्या त्या उच्च पातळीवरील सल्लागार आहेत. याशिवाय त्या झिरो - एमिशन मोबिलिटी चळवळ असणाऱ्या RouteZero च्याही सल्लागार आहेत. क्लायमेट वर्क्स फाऊंडेशनच्या त्या फेलो आहेत.

    त्यांच्या सगळ्या टेड टॉक्सना मिळून जवळपास 40 लाख व्ह्यूज आहेत आणि आतापर्यंत 31 भाषांमध्ये त्यांचा अनुवाद करण्यात आलाय. 2016मध्ये अंटार्क्टिला गेलेल्या सर्व महिला सदस्यांच्या जगातल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मोहिमेत अराया यांचाही सहभाग होता.

    *आपण ज्याला 'नॉर्मल' म्हणतो, अशा गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपली पेट्रोल-डिझेलची मागणी कमी करणं महत्त्वाचं आहे. सोबतच समाजातल्या इतर बदलांसाठी राजकीय पाठबळ आणि इच्छाशक्ती निर्माण करणंही गरजेचं आहे.

  • नताशा असघर

    युनायटेड किंग्डम वेल्स संसदेच्या सदस्य

    सेनेड किंवा वेल्शच्या संसदेत निवडून येत त्यांनी यावर्षी इतिहास घडवला. 1999 मध्ये संसदेची स्थापना झाल्यापासून निवडून येणाऱ्या त्या पहिल्या अश्वेत महिला आहेत.

    कझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्य आणि दक्षिण-पूर्व वेल्सच्या संसदेच्या स्थानिक सदस्य नताशा असघर या वाहतूक आणि तंत्रज्ञान खात्याच्या शॅडो मिनिस्टर आहेत. इंधन आर्थिक विकासासाठी वेल्समधील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी ट्रॅव्हल कार्ड लाँच करण्याची त्यांना आशा आहे.

    राजकारणात प्रवेशापूर्वी त्यांनी बँकर, टिव्ही प्रेझेंटर आणि रेडिओ डीजे म्हणून काम केलं आहे. तसंच त्यांनी दोन पुस्तकंही लिहिली आहेत.

    *सर्व काही पुन्हा सुरळीत होण्यासाठी आपण कठीण मार्गावर मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. यापुढं जगण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धतीला अनुकुल अशा मार्गावर पुढं जावं लागेल.

  • झुहाल अत्मार

    अफगाणिस्तान उद्योजिका,गुल-ए-मरसल, पुनर्वापर कारखाना

    अफगाणिस्तानातील टाकाऊ कागदांवर प्रक्रिया करणारा पहिला कारखाना गुल-ए-मरसल हा उद्योजिका झुहाल अत्मार यांनी सुरू केला होता. अर्थशास्त्र आणि व्यवसाय याची पार्श्वभूमी असल्यानं त्यांनी 2016 काबूलमध्ये महिलांच्या नेतृत्वात हा कारखाना सुरू केला. त्यातून 100 रोजगारांची निर्मिती झाली. त्यापैकी 30 टक्के महिलांना स्थान देण्यात आलं. त्यात कारखान्यातील कामापासून मार्केटिंगपर्यंतचा सहभाग होता.

    हा कारखाना सामाजिक संस्थांच्या माध्यमातून टाकाऊ आणि गोपनीय नसलेली कागदपत्रे स्वीकारुन आठवज्याला 35 टन कागदावर इथं प्रक्रिया केली जाते. त्यावेळी देशभरात विक्री होणारा टॉयलेटपेपर त्यापासून तयार केले जात होते.

    अफगाणिस्तानाात व्यवसाय सुरू करायचा असेल तर महिलांना आर्थिक सहकार्य मिळण्यात किती अडचणी येतात, याबत अत्मार स्पष्टपणे भूमिका मांडतात.

    *आता भविष्य कसे दिसते? तरुण आणि महिलांची स्वप्ने, ध्येयं, आशा सर्वकाही धुळीस मिळालं आहे.

  • मार्सेलिना बौटिस्टा

    मेक्सिको केंद्रीय नेत्या

    स्वतः घरकाम केलेल्या मार्सेलिना बौटिस्टा या मेक्सिकोमध्ये घरकाम करणाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी सिरी केलेल्या सेंटरच्या (CACEH) संचालिका आहेत. त्यांना 21 वर्षांपूर्वी याची स्थापना केली होती. योग्य वेतन, आजारपणाची रजा, कामगारांना आनंद आणि सामाजिक दर्जा यासाठी त्या मोहीम राबवतात

    त्यांच्या उपक्रमात मजुरांसाठी, मालकांसाठी आणि समाजासाठीही प्रशिक्षणाचा समावेश आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळं मेक्सिकोच्या सरकारला आंतरराष्ट्रीय कामगार करार करावा लागला. त्यामुळं घरकाम करणाऱ्यांचं शोषण रोखून, हिंसाचार आणि असुरक्षित अटींसह काम करण्यातून त्यांची सुटका झाली.

    जर्मनीतील फ्रेडरीच एबर्ट स्टिफ्टंगतर्फे 2010 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार मिळाला.

    *जग बदलण्याचा अर्थ म्हणजे लाखो घरकाम करणाऱ्यांचं जीवनमान बदलणे होय. त्यातही बहुतांश महिला असतात, ज्या इतरांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी घरात काम करतात. ही सामाजिक असमानता केवळ घरकाम करणाऱ्यांना त्यांच्या हक्काचं स्थान मिळाल्यानंतरच कमी होईल.

  • क्रिस्टल बायत

    कार्यकर्त्या

    तालिबाननं 2021 मध्ये ताबा मिळवल्यानंतर केलेल्या आंदोलनांसाठी सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या क्रिस्टल बायत यांना ओळखलं जातं.

    अफगाणिस्तानात स्वातंत्र्यदिनी 19 ऑगस्टला काबूलमध्ये झालेल्या आंदोलनातील सात महिलांपैकी त्या एक होत्या. त्यांनी या आंदोलनासाठी मदतही केली होती. बयात यांनी यावर्षी राजकीय व्यवस्थापन विषयात पीएचडी सुरू केली, पण तालिबाननं ताबा घेतल्यानंतर ते अर्धवट राहिलं आहे.

    सध्या त्या अमेरिकेत असून तिथून त्या अफगाणिस्तानातील नागरिकांच्या मानवाधिकारांसाठी लढत आहेत. लवकरच पीएचडी पूर्ण करून पुस्तक लिहिण्याची त्यांना अपेक्षा आहे.

    *अफगाणिस्तानात होणाऱ्या भविष्यातील कोणत्याही लोकशाही बदलांचा मला भाग व्हायचं आहे. संयुक्त राष्ट्रांसमोर बोलायचं माझं स्वप्न आहे. कारण, खऱ्या अफगाणिंना आणि विशेषतः महिलांना काय म्हणायचं आहे, ते जगानं ऐकणं गरजेचं आहे.

  • राझिया बराकजाई

    अफगाणिस्तान आंदोलक

    राझिया बराकजाई या अफगाण सरकारसाठी त्यांच्या अध्यक्षीय महालात काम करत. अनेक वर्षं त्यांनी विविध पदं भूषवली. पण तालिबानने अफगाणिस्तानातली सत्ता काबीज केली आणि रझियांची नोकरी गेली.

    तेव्हापासून त्यांचा काबूलमध्ये होणाऱ्या मोर्चांमध्ये सक्रिय सहभाग आहे. नोकरी आणि शिक्षणाच्या हक्काच्या मागणीसाठी अनेक महिला काबूलच्या रस्त्यांवर उतरत आहेत. #AfghanWomenExist हा नारा देणाऱ्यांपैकी त्याही एक हत्या. अफगाण महिला भीतीपायी सोशल मीडियापासून दूर जात असल्याचं सांगणारा हा नारा आहे.

    बराकजाई या कायदा आणि राज्यशास्त्राच्या पदवीधर आणि MBA आहेत. आंदोलनाचे त्यांचे अनुभव सांगणारं एक पत्र त्यांनी बीबीसीला लिहिलं. यात त्या म्हणतात, "गुलामीत राहण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढताना मेलेलं चांगलं."

    *अफगाणिस्तानातल्या सुशिक्षित आणि तरूण विशेषतः शूर आणि लढवय्या महिला एक दिवस देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आघाडीवर असतील. रस्त्यांवर रोज होणाऱ्या निदर्शनांतून मला हेच चित्र दिसतंय.

  • नीलोफर बायत

    अफगाणिस्तान व्हीलचेअर बास्केटबॉलपटू

    राष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल संघाच्या कर्णधार आणि दिव्यांग महिलांसाठी काम करणाऱ्या नीलोफर बायत या तालिबानपासून बचाव व्हावा म्हणून अफगाणिस्तानातून पळून गेल्या. त्या आणि व्हीलचेअर बास्केटबॉलपटूच असलेले त्यांचे पती हे दोघंही इंटरनॅशनल रेड क्रॉसचे कर्मचारी आहेत.

    त्या दोन वर्षांच्या असताना एक रॉकेट त्यांच्या घरावर आदळलं होतं. त्यात त्यांच्या भावाचा मृत्यू झाला होता, तर नीलोफर यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. बायत यांनी त्यांचा पहिला सामना काबूलच्या मध्यवर्ती भागातील एका ओपन कोर्टवर खेळला होता, अफगाणिस्तानातील महिलांसाठी तो एक महत्त्वाचा क्षण होता. देश सोडून जाणाऱ्या निर्वासितांच्या त्या आवाज बनल्या. तसंच त्यांनी अफगाण महिलांसाठी एक संघटनाही स्थापन केली.

    बायत यांना पुन्हा बास्केटबॉल खेळता येईल अशी आशा आहे.

    *अफगाणिस्तानातील खेळ आता संपुष्टात आला आहे, अशी मला आशा आहे. आपल्याला पुन्हा एकदा युद्ध परवडणार नाही. माझ्या लोकांच्या चेहऱ्यावर मला पुन्हा एकदा हसू पाहायला मिळेल अशी आशा आहे.

  • जॉस बॉईस

    युके आर्किटेक्ट

    द डिसऑर्डिनरी ऑर्किटेक्ट प्रोजेक्टच्या सहसंचालक. आपल्या अवतीभवतीच्या बांधकामांच्या संरचनांमध्ये विकलांगांसाठीचा अ‍ॅक्सेस आणि सर्वसमावेशक रचना करण्यासाठी हा गट अपंग आर्टिस्टना नवीन कल्पना मांडण्यास प्रोत्साहन देतो.

    जॉस बॉईस यांनी त्यांचं आर्किटेक्ट म्हणून काम आणि समाजकार्य यांची सांगड घालत 80च्या दशकात द मेट्रिक्स फेमिनिस्ट डिझाईन कलेक्टिव्हची स्थापना केली. मेकिंग स्पेस : विमेन आणि द मॅन मेड एन्व्हायर्नमेन्ट च्या लेखकांपैकी त्या एक आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये संशोधन केलं आहे, ज्यात त्या महिलांच्या दृष्टीने जागेच्या वापराबद्दल स्थापत्यशास्त्रात असलेल्या अनेक समजुतींना छेद / आव्हान देताना दिसतात.

    दररोजच्या सामाजिक आणि भौतिक व्यवहारांद्वारे अपंगाना सहकार्य कसं करता येईल याविषयी त्यांनी त्यांच्या 40 वर्षांच्या कारकीर्दीदरम्यान जागरूकता निर्माण केली.

    *गेल्या वर्षभरातले अपंग आणि उपेक्षितांचे विविध अनुभव आपण गोळा करणं गरजेचं आहे. यांच्याकडे नवीन काहीतरी निर्माण करण्यासाठीचे मार्ग म्हणून पहावं आणि मग आपल्या आजूबाजूच्या जागांमध्ये सर्वांची काळजी घेतली जाईल आणि सगळ्यांना एकमेकांची मदत होईल अशाप्रकारे नवनिर्मिती करावी.

  • कॅथरीन कोर्लेस

    आयर्लंड स्थानिक इतिहासकार

    इतिहासकार कॅथरीन यांनी गॅलवे येथील बॉन सेकर्स मदर अँड बेबी होममधील 796 मुलांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केला. त्यांनी केलेल्या अनेक वर्षांच्या परिश्रमपूर्वक संशोधनातून पूर्वीच्याअविवाहित महिलांसाठीच्या आयरिश संस्थेच्या सार्वजनिक कबरीचा शोध लावण्यात मदत झाली. याठिकाणी 1920 ते 1950 च्या दरम्यान शेकडो नवजाल अर्भकं पुरण्यात आली होती.

    यावर्षी प्रामुख्यानं नन चालवत असलेल्या या संस्थांच्या संदर्भातील बहुप्रतिक्षित अहवालात विविध आजारांमुळं भयावह असे बालमृत्यू झाल्याचं आढळून आल्याचं स्पष्ट झालं. त्यामुलं आयरिश सरकारला माफीही मागावी लागली.

    कोर्लेस यांना बार ऑफ आयर्लंड हा मानवाधिकारांशी संबंधित पुरस्कार मिळाला आहे. मानवाधिकारांशी संबंधित उत्तम काम केल्याबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

    *मला जग बदलण्याची संधी मिळाली तर लाज हा शब्द मी काढून टाकेन. या शब्दाचा शब्दकोषातील अर्थ "वेदनादायी भावना, तुमच्यात काहीतरी गैर आहे, अशी भावना" असा आहे.

  • फैझा दरखानी

    अफगाणिस्तान पर्यावरणवादी

    अफगाणिस्तानात हवामान बदलाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी फैझा एक आहेत. त्या सहायक प्राध्यापिका आणि बदाखशान प्रांतातील राष्ट्रीय हवामान संरक्षण संसथेच्या माजी संचालिकाही आहेत. महिला हक्कांसाठीही त्या काम करतात.

    दरखानी यांनी मलेशियाच्या पुत्रा विद्यापीठातून लँडस्केप आर्किटेक्चरची पदवी घेतली आहे. त्यांनी शहरी भागातील लँडस्केप मॅनेजमेंट या विषयावर सोधनिबंध लिहून लोकंख्येची घनता अधिक असलेल्या भागात अन्नधान्य उत्पादनासाठी उभ्या शेतीसारख्या नवनवीन कल्पना मांडल्या आहेत.

    पर्यावर संरक्षणाबाबत जनजागृती आणि महिलांचा अधिक सहभाग असलेल्या शाश्वत उपक्रम राबवण्यावर त्यांचा विश्वास आहे.

    *गर्दीपेक्षा वेगळं उभं राहणं धाडसी निर्णय असतो. तुम्ही स्वप्नांचा पाठलाग करून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नक्की प्रयत्न करायला हवा. माझं स्वप्न हे स्वच्छ आणि सुरक्षित हवामान निर्मिती असून त्यात युद्ध आणि प्रदूषणाला स्थान नसेल.

  • अझ्मिना धरोडिया

    कॅनडा सेफ्टी पॉलिसी लीड - बंबल

    मानवाधिकार, टेक्नॉलॉजी आणि लिंगभाव यामधल्या आघाडीच्या तज्ज्ञ असणाऱ्या अझ्मिना धरोडिया या बंबल या डेटिंग अ‍ॅपच्या सेफ्टी पॉलिसी प्रमुख म्हणून काम करत आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावर ठोस पावलं उचलण्यात यावी असं आवाहन करणारं एक खुलं पत्र त्यांनी जुलै 2021मध्ये लिहीलं होतं. त्यावर 200 पेक्षा अधिक उच्चपदस्थ महिलांनी सह्या केल्या होत्या.

    टॉक्सिक ट्विटर : व्हायोलन्स अँड अब्यूज अगेन्स्ट विमेन ऑनलाईन या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लिंग, वर्ग आणि जात यानुसार होणाऱ्या अवमानाविषयीचा हा रिपोर्ट आहे.

    धरोडिया यांनी यापूर्वी वर्ल्ड वाईड वेब फाऊंडेशनसाठी जेंडर आणि डेटा राईट्सच्या मुद्द्यावर काम केलं आहे. सोबतच महिला आणि वंचित समाजांसाठी सुरक्षित ऑनलाईन वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी टेक कंपन्यांसोबतही काम केलेलं आहे.

    *मला एक असं जग हवंय जिथे ऑनलाईन जगतामध्ये नवीन गोष्टींची निर्मिती करताना महिलांचा विचार करण्यात आलेला आहे. असं जग जिथे महिलांना विशेषतः अशा महिला ज्यांच्याबाबत धर्म, जात यागोष्टीही लाग होतात, त्यांनाही ऑनलाईन जगात इतरांप्रमाणेच समानतेने, मुक्तपणे आणि भीतीशिवाय वावरता येईल.

  • पश्ताना दुर्राणी

    अफगाणिस्तान शिक्षिका, LEARN अफगाणिस्तान

    पश्ताना दुर्राणी या शिक्षिका असून मुलींच्या अधिकारांसह शिक्षणात काहीतरी नवीन करण्यासाठी त्या काम करतात. LEARN या संस्थेच्या त्या संस्थापिका आणि कार्यकारी संचालकही आहेत. LEARN च्या माध्यमातून कंदहारमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या. तसंच शिक्षकांना प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही या माध्यमातून करण्यात येतं.

    ही संघटना रुमी अॅपच्या (Rumie App - ज्याद्वारे मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 6 मिनिटांमध्ये विविध धडे दिले जातात) माध्यमातून मुलींना व्हीडिओ आणि शैक्षणिक गेमद्वारे शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देते. ग्रामीण भागातील महिलांना सुईणीचं प्रशिक्षणदेखील त्या देत आहेत.

    दुर्राणी या संयुक्त राष्ट्रांतील अफगाणिस्तानच्या तरुणांच्या प्रतिनिधी असून अफगाणिस्तानात मुलींना शिक्षण मिळावं यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचा मलाला फंड चॅम्पियन पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे.

    *आम्ही कोण आहोत यावरून जगात आम्हाला दाबण्याचा किती प्रयत्न होतो हे आश्चर्यकारक आहे. पण आम्ही कितीही जखमी, घाबरलेल्या आणि दुखावलेल्या असलो तरी कितीही दूर जावं लागलं तरी यातून बाहेर पडू.

  • नजला अलमंगुश

    युनायटेड किंग्डम परराष्ट्र खात्याच्या लिबियन मंत्री

    लिबियाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री म्हणून या वर्षी नियुक्ती झाली असून त्या राजदूत आणि वकीलही आहेत. 2011 मध्ये लिबियातील क्रांतीदरम्यान नजला अलमंगुश या नॅशनल ट्रान्झिशनल काऊन्सिलच्या सदस्य होत्या आणि त्यांनी नागरी समाजाशी संबंध जोडण्यासाठी काम केलं.

    अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ पीसमध्ये त्या लिबियाच्या प्रतिनिधी होत्या आणि त्यांनी जागतिक धार्मिक, राजनायिक आणि इतर समस्यांच्या निराकरणासाठी शांतता निर्मिती आणि कायद्याशी संबंधिक उपक्रमात काम केलं. राजकीय संघर्षामुळं अलमंगुश यांना राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसंच त्यांच्यावर नुकतीच प्रवासाची बंदीही घालण्यात आली आहे.

    त्यांनी बेंगाझी विद्यापीठातून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तसंच कॉन्फ्लिक्ट अॅनालिसिस अँड रेझोल्युशनमध्ये जॉर्ज मेसन विद्यापीठातून पीएचडी केली आहे.

    *2021 मध्ये जग मोठ्या प्रमाणावर विकसित झालं आहे. जगानं नव्यानं सुरुवात करून आमच्या जगण्याला अर्थ आणवा आणि मानवतेची सेवा करावी अशी मला आशा आहे.

  • शीला इन्सानदोस्त

    अफगाणिस्तान शिक्षिका

    अफगाणिस्तानातील शिक्षिका शीला इन्सानदोस्त यांच्यासाठी महिला आणि मुलींच्या शिक्षणाच्या अधिकाराबाबत जनजागृती सर्वात महत्त्वाची आहे. त्यांना धार्मिक विषयात पदवी घेतली असून, त्यांनी शाळांमध्ये शिकवलंही आहे.

    राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात महिलांच्या भूमिकेसाठी त्यांनी सक्रिय प्रचार केला आहे. महिलांच्या शिक्षण आणि कामाच्या अधिकारासंदर्भात अफगाणिस्तानातील माध्यमांसमोरही त्यांनी मतं मांडली आहेत. इन्सानदोस्त यांनी काबूलमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला होता. त्यात त्यांनी देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला विरोध दर्शवत कफनासारखे पांढऱ्या रंगाचं कापड गुंडाळलं होतं.

    शिक्षिका असण्याबरोबर त्या अफगाणिस्तानातील विविध महिला संघटनेच्या सदस्यही आहेत.

    *महिलांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात सहभागी करून घेतलेलं पाहायचं आहे. महिलांचा शिक्षणाचा अधिकार अबाधित राहावा आणि महिला तसेच अल्पसंख्याकांबाबतची असमानता आणि हिंसाचार बंद व्हायला हवा.

  • सईदा ईतबारी

    अफगाणिस्तान ज्वेलरी डिझायनर

    मातृभूमी अफगाणिस्तानच्या परंपरांपासून प्रेरित असलेल्या त्यांच्या दागिन्यांचं प्रदर्शन वॉशिंग्टन डीसीच्या स्मिथसोनियनमध्ये भरवण्यात आलं होतं. या दागिन्यांमध्ये स्थानिक मोती आणि रत्नांचा वापर करण्यात आला आहे.

    सईदा इतबारी या उद्योजिका आणि आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या प्रसिद्ध दागिन्यांच्या डिझायनर आणि उत्पादक आहेत.

    एका वर्षाच्या असताना निर्वासितांच्या छावणीत मेंदूज्वराचा परिणाम झ्लायनं त्या मूकबधीर झाल्या. मूकबधिरांच्या शाळेतून त्यांनी पदवी मिळवली. त्यांच्या वडिलांनी ही शाळा सुरू करण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर इतबारी यांनी टरक्वाईज माऊंटेन इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड आर्किटेक्चरमधून ज्वेलरी डिझाईनमध्ये शिक्षण घेतलं.

    *सध्या महिला बरोजगार असून केवळ पुरुष काम करू शकतात. आता परिस्थिती आणखी बदलली असून वेगळ्या अफघाणिस्तानची माझी स्वप्नंही धुळीस मिळाली आहेत.

  • सहर फेत्रात

    अफगाणिस्तान स्त्रीवादी कार्यकर्त्या

    स्त्रीवादी कार्यकर्त्या सहर फेत्रात तरुण असताना तालिबानच्या पहिल्या राजवटीच्या काळात इराणि आणि पाकिस्तानात निर्वासित म्हणून राहिल्या. लैंगिक विषमते विरोधातील अनेक लढ्यांत त्यांचा सहभाग असतो. 2006 मध्ये त्या काबूलला परतल्या आणि तरुण वयातच त्यांनी स्त्री हक्कांसाठीचा लढा सुरू केला.

    डू नॉट ट्रस्ट माय सायलेन्स या माहितपटाच्या माध्यमातून 2013 मध्ये त्यांनी लेखन आणि चित्रपटांच्या माध्यमांतून कथा मांडत स्त्रीवादी दृष्टीकोन जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. फेत्रात यांनी UNESCO च्या शिक्षण विभागाबरोबर काम केलं आहे. तसंच ह्युमन राईट वॉचबरोबरही त्यांनी काम केलं आहे.

    सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी क्रिटिक जेंडर स्टडीज विषयात मास्टर्स केलं आहे. तर सध्या त्या लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये युद्ध अभ्यास विभागात शिक्षण घेत आहेत.

    *मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करावा न लागता, तो त्यांचा मूलभूत अधिकार असेल, असा दिवस पाहण्याची मला आशा आहे. अफगाणिस्तानातील महिला मातृभूमीतील पर्वतांपेक्षा मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडताना पाहण्याची मला आशा आहे.

  • मेलिंडा फ्रेंच गेट्स

    अमेरिका गरीबांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या आणि उद्योजिका

    मेेलिंडा गेट्स या गरीबांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या आणि उद्योजिका तसंच जागतिक पातळीवर महिला आणि मुलींसाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. गरीबांसाठी काम करणारी जगातील सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक असलेल्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सहअध्यक्षा असून संस्थेची दिशा आणि प्राधान्यक्रम ठरवण्याचं काम त्या करतात.

    त्या महिला आणि कुटुंबांच्या सामाजिक विकासासाठी काम करणाऱ्या पिव्होटल व्हेंचर्स या गुंतवणूक कंपनीच्याही संस्थापिका आहेत. तसंच द मोमेंट ऑफ लिफ्ट या बेस्ट सेलिंग पुस्तकाच्या त्या लेखिकाही आहेत.

    फ्रेंच गेेट्स कंप्युटर सायन्सच्या पदवीधर असून त्यांनी ड्युक विद्यापीठातून एमबीएदेखील केलं आहे. कुटुंब आणि समाजकार्यासाठी कंपनी सोडण्यापूर्वी त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये जवळपास दहा वर्षे मल्टीमीडिया उत्पादनांच्या निर्मितीचं काम केलं.

    *कोव्हिड 19 च्या साथीमुळं जगात खोलवर रुजलेली असमानता समोर आली. यादिशेनं मदत करताना महिला आणि मुलींना केंद्रस्थानी ठेवून करत असलेल्या कामामुळं त्यांचं वर्तमानातील दुःख कमी होईल आणि भविष्यासाठी मजबूत पाया रचला जाईल.

  • फातिमा गैलानी

    अफगाणिस्तान शांततेच्या पुरस्कर्त्या

    फातिमा गैलानी या 2020 मध्ये तालिबान बरोबर झालेल्या शांतता चर्चेत सहभागी असलेल्या चार महिलांपैकी एक होत्या. चर्चेतून योग्य राजकीय तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. फातिमा या प्रसिद्ध राजकीय नेत्या आणि कार्यकर्त्या आहेत. जवळपास 43 वर्षांपासून त्या मानवाधिकारांच काम करत आहेत.

    1980 मध्ये सोव्हिएतच्या सत्तेदरम्यान अफगाणिस्तानातील संघर्ष करणाऱ्या प्रमुख चेहऱ्यांपैकी त्या एक होत्या. त्याचबरोबर लंडनमधून त्या अफगाण मुजादीहीच्या प्रवक्त्या म्हणूनही काम करत होत्या. तालिबानची सत्ता गेल्यानंतर 2001 मध्ये त्या अफगाणिस्तानात परतल्या. अफगाणिस्तानची नवी राज्यघटना लिहिण्यासाठी त्यांनी मदत केली.

    2005 ते 2016 दरम्यान त्या अफगाण रेड क्रेसेंट सोसायटीच्या अध्यक्षा होत्या. अजूनही पदाधिकाऱ्यांत त्यांचा सहभाग आहे.

    *खऱ्या अर्थानं राष्ट्र उभारणीसाठी उपयोगी ठरले अशा अर्थपूर्ण चर्चेची मला आशा आहे.

  • कॅरोलिना गार्सिया

    अर्जेंटिना संचालक - नेटफ्लिक्स

    नेटफ्लिक्स या स्ट्रिमिंग कंपनीच्या ओरिजिनल सीरिज विभागाच्या संचालक कॅरोलिना गार्सिया यांचा जन्म अर्जेंटिनाचा पण कॅलिफोर्नियात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. नृत्य आणि गायनाचं शिक्षण घेतलेल्या गार्सिया यांनी 'ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स' कंपनीत इंटर्न म्हणून कामाला सुरुवात करत मनोरंजन क्षेत्रामध्ये वरची झेप घेतली.

    क्रिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी स्ट्रेंजर थिंग्स, द चिलिंग अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ सब्रिना, 13 रीझन्स व्हाय, एटिपिकल आणि रेझिंग डिऑन अशा अनेक हिट सीरिजचं काम पाहिलं.

    हॉलिवुडमध्ये वरच्या पदावर असणाऱ्या मोजक्या लॅटिन लोकांपैकी त्या एक आहेत. लॅटिन वंशाच्या लोकांचं पडद्यावरील चित्रण वाढावं, त्यांच्या कहाण्यांना स्थान मिळावं यासाठी गार्सिया प्रयत्न करतात. अमेरिकेच्या लोकसंख्येमध्ये पाचपैकी एक व्यक्ती लॅटिन आहे.

    *या गेल्या काही वर्षांनी आपल्या सगळ्यांनाच धक्क दिले आहेत. आयुष्य छोटं आहे. मग असा बहुमूल्य काळ घाबरून का घालवायचा? आयुष्य जगलं पाहिजे असं माझी आजी सांगायची आणि ते अंमलात आणायची आता वेळ आलेली आहे.

  • साघी घहरेमन

    इराण कवियित्री

    साघी या इराणी आणि कॅनडियन लेखिका आणि इराणी क्वीर संघटना (IRQO) च्या अध्यक्षा आहेत.

    टोरंटोमध्ये असलेली ही संघटना इराणमध्ये राहणाऱ्या किंवा स्थरांतरासाठी दबाव टाकण्यात येणाऱ्या गे, लेस्बियन, बायसेक्श्युअल आणि ट्रान्सजेंडरच्या हक्कांसाठी काम करते. तसंच इराणमध्ये समलैंगिकांच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावरही ही संघटना नियंत्रण ठेवते.

    गहरामन यांनी 2010 मध्ये राणी क्वीर साहित्याला केंद्रस्थानी ठेवत गिल्गामिशन बूक्सची स्थापना केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवलेल्या गहरामन यांच्या कवितांचे चार संग्रह आलेले आहेत. तसंच त्यांचे अनेक लेखही प्रकाशित झालेले आहेत. गहरामन यांचं साहित्य आव्हानात्मक विषयांसाठी ओळखलं जातं. विशेषतः लैंगिक विषयांबाबत.

    *संपूर्ण जग पूर्वपदावर येईल तेव्हा त्यात आपल्यापैकी प्रत्येकाचा समावेश असायला हवा. जर त्यात क्वीर समुदायातील लोकांचा समावेश नसेल तर कोव्हिड मुक्त जग पूर्ण नसेल. LGBTQIA+ समुदयातील लोकांना गृहित धरू नये.

  • घावघा

    अफगाणिस्तान म्युझिशियन

    अत्यंत गुणी अशा गायिका, गीतकार आणि संगीतकार असलेल्या घावघा या संगीत क्षेत्रात पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. प्रामुख्यानं अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींबाबत असलेल्या त्यांच्या गाण्यांचा एक खास चाहता वर्ग असून, त्यांच्या गाण्यांच्या शब्दांतून सद्यस्थितीचा विरोध दिसून येतो.

    2019 मध्ये त्यांनी रामीन मझहर यांच्या ‘I kiss you amid the Taliban’ या कवितेचं गाणं तयार केलं. ते प्रचंड व्हायरल झालं. त्यांचं ताजं तबस्सूम हे गाणं युद्धामुळं स्वप्न गमावलेल्या चिमुकल्यांना समर्पित केलेलं होतं.

    "माझ्या देशातलं कधीही न संपणारं युद्ध मला कधीही शांतता मिळू देणार नाही," असं घावघा त्यांच्या संगीताबद्दल सांगतात. त्यांच्या शब्दांतून त्यांच्या वेदना झळकतात.

    *रंगीबेरंगी पतंगाने आकाश सजतं तसं माझ्या मायभूमीचं आकाश क्षेपणास्त्रांनी सजलं आहे. मी प्रत्येक क्षणाला माझ्या लोकांचा आणि प्रामुख्यानं महिला आणि मुलांचा विचार करत असते. त्यांच्या सुरक्षेबाबतची भीती कायम माझ्या मनात असते.

  • अँजेला घेयोर

    अफगाणिस्तान शिक्षिका आणि ऑनलाईन शाळेच्या संस्थापिका

    अँजेला घेयोर यांनी सुरू केलेल्या हेरात ऑनलाईन स्कूलमध्ये जवळपास 1000 विद्यार्थी आणि 400 पेक्षा अधिक स्वयंसेवक शिक्षक आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानातील मुली आणि तरुणींना घरीच राहण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी काहीतरी करायचं ठरवलं. आता त्यांच्या ऑनलाईन स्कूलच्या माध्यमातून टेलिग्राम आणि स्काईपद्वारे जवळपास 170 विविध प्रकारचे क्लास घेतले जातात. त्यात गणित, संगीत यापासून ते कुकिंग आणि पेंटिंगही शिकवलं जातं.

    घेयोर स्वतः गृहयुद्धाच्या कारणामुळं 1992 मध्ये हेरातहून इराणला गेल्या होत्या, त्यावेळी कुटुंबाच्या व्हिसाच्या कारणामुळं त्यांना पाच वर्षे शाळेपासून दूर राहावं लागलं होतं.

    त्यानंतर त्या माध्यमिक शिक्षिका बनल्या. त्यांना अनेक वेळा स्थळांतर करावं लागलं आणि सध्या त्या युकेमध्ये स्थायिक झाल्या आहेत.

    *अशा प्रकारच्या वाईट वृत्तीची गरज असल्याचं मला मान्य नाही. तालिबान किंवा अशा प्रकारच्या वाईट वृत्तीला स्वीकारणं जेव्हा बंद होईल, तेव्हाच खऱ्या अर्थानं शाश्वत आनंदाचा अनुभव घेता येईल.

  • जमिला गॉर्डन

    सोमालिया मुख्य कार्यकारी अधिकारी - लुमाचेन

    जमिला गॉर्डन या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातल्या जगातल्या आघाडीच्या लोकांपैकी एक आहेत. त्या लुमाचेन या कंपनीच्या त्या संस्थापक आहेत. AI चा वापर करून जागतिक अन्न पुरवठा साखळीमधल्या उणीवा भरून काढणारा हा जगातला पहिला प्लॅटफॉर्म आहे.

    सोमालियामधल्या एका गावात जन्म झालेल्या जमिला टीनएजर असताना देशातल्या यादवी युद्धापासून पळ काढत केनियात विस्थापित म्हणून आल्या. त्यानंतर त्या ऑस्ट्रेलियाला गेल्या. तिथेच त्यांची टेक्नॉलॉजीशी ओळख झाली. लुमाचेनला सुरुवात करण्यापूर्वी गॉर्डन या IBM च्या ग्लोबल एक्झिक्युटिव्ह आणि क्वांटस समूहाच्या चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर होत्या.

    2018च्या मायक्रॉसॉफ्ट इंटरनॅशनल विमेन्स आंत्रप्रुनरशिप चॅलेंजच्या त्या जागतिक विजेत्या होत्या आणि 2021 च्या AI क्षेत्रातल्या 'इन्होव्हेटर ऑफ द इयर' म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने त्यांचा सन्मान केला.

    *उपेक्षित स्तरातल्या लोकांना समाजातलं त्यांचं योग्य स्थान मिळवून देण्याची ताकद आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आहे यावर माझा विश्वास आहे. याच्यामदतीने त्यांना त्यांच्या उद्योगांनाही बळ देता येईल.

  • नजला हबिब्यार

    अफगानिस्तान उद्यमी

    नजला हबिब्यार यांनी अफगाणिस्तानातील महिलांसाठी विणकामाचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांच्या तयार केलेल्या वस्तू कोणत्याही मध्यस्थाशिवाय विदेशात विक्री केल्या. ब्लू ट्रेजरर इंक आणि आर्क ग्रुप याची त्यांनी त्यासाठी स्थापना केली. त्यांनी USAID आणि जागतिक बँकेसाठीच्या काही प्रकल्पांचं नेतृत्वही केलं. महिला सबलीकरण आणि व्यवसायाच्या दृष्टीनं हवामान बदल यासंदर्भातील ते प्रकल्प होते.

    2012 ते 2015 दरम्यान हबिब्यार यांनी सरकारी निर्यात प्रचार संस्थेच सीईओ म्हणून काम केलं. जगभरात अफगाणिस्तानातून निर्यात वाढवण्यासाठी त्यांनी मदत केली.

    त्यांनी 13 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम केलं. त्यात मुलींच्या शिक्षणासाठी मदत, आणि निवारा नसलेल्या अफगाणिस्तानी कुटुंबांसाठी मदतीचं काम केलं.

    *एक महिला म्हणून अनुभवलेल्या दुःखांचा विचार न करता मी पुढच्या पिढीला युद्धाचा वारसा मिळू नये म्हणून योगदान देऊ शकेल अशी मला आशा आहे.

  • लैला हैदरी

    पाकिस्तान मदर कॅम्पच्या संस्थापिका

    अफगाणिस्तानात ड्रग्जच्या वापर निषिद्ध मानला जातो. असं असलं तरी लैला हैदरी यांच्या मदर कॅम्प या अंमली पदार्थ पुनवर्सन केंद्राने 2010 पासून आतापर्यंत 6,400 अफगाण नागरिकांना मदत केली आहे. स्वतः साठवलेल्या पैशांतून त्यांनी हे केंद्र सुरू केलं आणि एक रेस्टॉरंट उघडत त्या उत्पन्नातून केंद्र चालवलं. व्यसनमुक्त झालेल्या व्यक्ती चालवत असलेलं हे रेस्टॉरंट काबूल पडल्यानंतर बंद करावं लागलं.

    हैदरी यांचं कुटुंब मूळचं बामयानमधील आहे. मात्र त्यांचा स्वतःचा जन्म पाकिस्तानात निर्वासित म्हणून झाला होता. 12 व्या वर्षी त्यांचा बालविवाह झाला होता. मात्र त्या स्वतः आता महिला अधिकारांसाठी लढा देतात.

    धमक्या आणि प्रचंड विरोधानंतरही मदर कॅम्प सुरू ठेवण्यासाठीच्या त्यांच्या संघर्षावर लैला अ‍ॅट द ब्रिज या डॉक्युमेंटरीद्वारे त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

    *जागरुकता पसरून अधिक नैतिकता आणि माणुसकी असलेलं जग निर्माण व्हावं अशी मला आला आहे. आपण परस्परांशी जोडल्या गेलेल्या अशा विश्वात राहत आहोत, जिथं अमेरिकेच्या नागरिकाचं मत हे अफगाणिस्तानचं नशीब पालटवू शकतं.

  • झरलाश्त हलाईमझई

    अफगाणिस्तान रिफ्युजी ट्रॉमा इनिशिएटिव्हच्या सीईओ

    मूळच्या अफगाणिस्तानच्या आणि निर्वासित असलेल्या झरलाश्त हलाईमझई या रिफ्युटी ट्रॉमा इनिशिएटिव्ह (RTI) च्या सहसंस्थापिका आणि सीईओ आहेत. या संस्थेमार्फत स्थलांतर आणि हिंसाचार यामुळं धक्का बसलेल्यांना मानसिक आधार देण्याचं काम केलं जातं.

    RTI सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी सिरियाच्या सीमेवर तुर्कस्तानबरोबर काम केलं. येथील असुरक्षित मुलांना शिक्षण मिळावं यासाठी सामाजिक संस्थांनी निर्वासितांच्या शिक्षणाचं काम करावं म्हणून सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

    ओबामा फाऊंडेशनच्या 2018 मधील पहिल्या 20 जागतिक नेत्यांच्या गटातील सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी यासाठी मदत केली होती.

    *अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या जीवनावर कायम आघात करणाऱ्या हिंसाचाराचं चक्र थांबून भविष्यात शांतता नांदावी अशी माझी आशा आहे.

  • शम्सिया हस्सानी

    इराण स्ट्रीट आर्टिस्ट

    शम्सिया अफगाणिस्तानातील पहिल्या ग्राफिटी आणि स्ट्रीट आर्टिस्ट आहेत. संघर्षामुळं उध्वस्त झालेल्या शहरात नवे रंग भरण्याचं काम त्या करत आहेत. महिलांमधील आत्मविश्वास, शक्ती आणि आकांक्षा दर्शवण्यासाठी त्या काबूलमधूल उध्वस्त इमारतींचा वापर विविध आकर्षक मुराल तयार करण्यासाठी करत आहेत.

    इराणमध्ये अफगाणी कुटुंबामध्ये जन्मलेल्या हस्सानी यांनी काबूलमध्ये व्हिज्युअल आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं. त्यांनी काबूल विद्यापीठात शिकवण्याचं कामही केलं असून, 15 पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांनी म्युरल तयार केले आहेत. फॉरेन पॉलिसी मॅगझिननं 100 जागतिक विचारवंतांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला होता. तसंच बेस्ट सेलिंग ठरलेल्या रिबेल गर्ल्स 2 मध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा समावेश करण्यात आला आहे.

    तालिबाननं सत्ता मिळवल्यानंतरही हस्सानी यांनी त्यांच्या कलाकृतींच्या पोस्ट करणं सुरू ठेवलं आहे.

    *गेल्या 15 वर्षांमध्ये जेव्हाही मला देशाबद्दल आशा निर्माण झाली तेव्हा परिस्थिती अधिक वाईट बनली. मला आता अफगाणिस्तानबाबत फारशी काही आशा नाही. नैराश्य हाती येण्यापेक्षा आशा न ठेवणं कधीही चांगलं.

  • नसरीन हुसैनी

    अफगाणिस्तान प्राण्यांच्या डॉक्टर

    काबूल विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण सुरू असताना 75 विद्यार्थी असलेल्या वर्गात केवळ दोन मुली होत्या. त्यांच्यापैकी एक म्हणजे नसरीन हुसैनी. इराणमध्ये निर्वासित म्हणून त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण त्यानंतर शिक्षणासाठी त्या अफगाणिस्तानला परत आल्या. त्यानंतर शिष्यवृत्ती मिळवून शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ गल्पमध्ये प्राण्यांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यासाठी गेल्या.

    हुसैनी सध्या इम्युनॉलॉजी लॅबमध्ये काम करतात. फावल्या वेळेमध्ये त्या कॅनडियन हजारा ह्युमॅनटेरियन सर्व्हीसेस या सामाजिक संस्थेत मदत म्हणून काम करतात. या संस्थेमार्फत हजारा आणि अफगाणिस्तानातील इतर समुदायातील लोकांच्या कॅनडात पुनर्वसन करण्यासाठी मदत केली जाते.

    अफगाणिस्तानच्या मुलांमध्ये वाचन आणि कथाकथन याला प्रोत्साहन देणाऱ्या बुकीज या उपक्रमातही त्या मदत करतात

    *अफगाणिस्तानातील महिला आणि मुली या सध्या भेदरलेल्या स्थितीत आहे. सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे, मात्र प्रत्येक संकटात मार्ग असतोच. बॉब मार्ले यांनी म्हटल्या प्रमाणे,"तुम्हा जोपर्यंत मजबूत बनण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमची नेमकी शक्ती कळत नाही."

  • मोमिना इब्राहिमी

    अफगाणिस्तान पोलिस कर्मचारी

    मोमिना इब्राहिमी यांना मोमेना कार्बलयी म्हणूनही ओळखलं जातं. पोलिस दलात सहभागी झाल्यानंतर तीन वर्षांनी त्यांना वरिष्ठाकडून लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला. त्यामुळं त्यांनी या अऩुभवाबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबरच अफगाणि पोलिसांबाबतच्या इतर आरोपांबाबतही बोलण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

    तेव्हापासून अनेक प्रकारच्या धमक्या मिळूनही त्या त्यांना स्वतःला न्याय मिळावा म्हणून आणि इतर बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या पीडितांसाठी लढा देत आहेत. यावर कोणीतरी बोलायला पाहिजे आणि ती व्यक्ती मी आहे, असं मला वाटलं. मला त्यासाठी जीव द्यावा लागला तरी हरकत नाही, असं त्या बीबीसी बरोबर बोलताना म्हणाल्या.

    तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर ऑगस्ट महिन्यात युकेला स्थलांतरीत करण्यात आलेल्या हजारो नागरिकांमध्ये इब्राहिमी यांचा समावेश आहे.

    *ज्या महिलांनी अनेक वर्ष संघर्ष केला आणि अभ्यास करून करिअर घडवलं त्यांनी काम करायला हवं, अशी माझी इच्छा आहे. तसंच लोकांच्या विरोधात बळाचा वापर करणाऱ्या लोकांपासून त्यांनी स्वतःला मुक्त ठेवावं.

  • मुग्धा कालरा

    भारत सहसंस्थापिका-नॉट दॅट डिफरंट

    ऑटिझमग्रस्तांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या आणि 12 वर्षे वयाचं अपत्य असलेल्या मुग्धा कालरा यांनी नॉट दॅट डिफरंट या संस्थेची स्थापना केली. न्यूरोडायव्हर्सिटीला समजून घेणं आणि त्याला सर्वसमावेशक बनवणं अशी ही बालनेतृत्वात चालणारी चळवळ आहे. मुलांना ऑटिझमबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत व्हावी आणि त्यांनी अशा विशेष मुलांचे मित्र बनावे यासाठी तयार केलेल्या विशिष्ट कॉमिक स्ट्रिप ही त्यांचीच संकल्पना आहे.

    कालरा या टिव्ही प्रेझेंटर असून डॉक्युमेंटरी फिल्म रायटिंग आणि डायव्हर्सिटी तसेच इनक्लुजन कोच या क्षेत्रात त्यांना दोन दशकांपेेक्षा अधिकचा अनुभव आहे.

    चर्चेचं स्वरुप असलेलं लाईव्ह पॉडकास्टींग अॅप बॅकस्टेजमध्ये त्या चीफ कंटेट स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही काम पाहतात.

    *कोरोनाच्या साथीनं सात अब्ज लोकांना एकाच वास्तवात जगण्यास भाग पाडलं. ते सगळे आपापल्या जगात एकटे असले तरी सारख्याच अडचणींमुळं एकमेकांशा जोडलेले होते. मानवाप्रती अधिक सहानुभुती या अनुभवातून निर्माण व्हावी असं मला वाटतं.

  • फ्रेशता करीम

    चार्मग्झ मोबाईल लायब्ररीच्या संस्थापिका

    काबूलमधील सामाजिक संस्था चार्मग्ड यांनी बसचं रुपांतर मोबाईल लायब्ररीमध्ये करून शेजारच्या गावांमधील शेकडो मुलांना पुस्तकं आणि कलेच्या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी दौरे केले.

    ऑक्सफर्ड विद्यापीठातून पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर्स डीग्री मिळवल्यानंतर बाल हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या फ्रेश्ता करीम यांनी 2018 मध्ये चार्मग्झची स्थापना केली होती.

    टिव्हीवर मुलांचा कार्यक्रम होस्ट करून आणि अफगाणिस्तानातील मुलांच्या हक्कांच्या स्थितीचं वर्णन करणारा रिपोर्ट तयार करून त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून त्या याच क्षेत्रात करत आहेत.

    *मुले अफगाणिस्तानसाठी नकोसं असणारं चक्र तोडणारी ठरू शकतात म्हणून मी त्यांच्यासाठी काम करते. दडपशाही आणि हिसांचाराचं चक्र मोडून नवी उमेद आणि नवं स्थान निर्माण करत, राजकारणाची नवी दिशा ते ठरवू शकता.

  • आमिना करिम्यान

    खगोलशास्त्रज्ञ

    इंजीनीअर आणि हेरात टेक्निकल स्कूल याठिकाणी प्रशिक्षक असलेल्या आमिना करिम्यान या देशात खगोल शास्त्राचा वितास व्हावा यावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या अफगाणिस्तानातील पहिल्या महिलांपैकी एक आहेत.

    2018 मध्ये सुरू करण्यात आलेल्या कायहाना अॅस्ट्रोनॉमिकल ग्रुपच्या त्या संस्थापिका आणि सीईओ आहेत. या मार्फत तरुणांना खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.

    जुलै 2021 मध्ये करिम्यान आणि त्यांच्या संपूर्ण मुलींचा सहभाग असलेल्या खगोलशास्त्रीय ग्रुपने पोलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र स्पर्धेत वर्ल्ड अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन पुरस्कार जिंकला होता. 50 देशांच्या 255 संघांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता.

    *तालिबाननं मुलींच्या शिक्षणावर बंदी घातल्यानं आम्हाला आता पूर्वीपेक्षा जास्त संपर्कात राहावं लागेल. त्यामुळं काहयाना अॅस्ट्रोनॉमिकल ग्रुप रोज सायंकाळी ऑनलाईट एकत्र येतो. माझ्या देशातील तरुणाला मार्ग मिळावा हीच माझी एकमेव आशा आहे.

  • आलिया काझिमी

    अफगाणिस्तान सामाजिक कार्यकर्त्या

    तालिबाननं काबूलवर ताबा मिळवण्यापूर्वी आलिया काझमी या प्रामुख्यानं मानवाधिकार आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी वेळ देत होत्या. त्यांनी तीन वर्ष रेड क्रॉसबरोबर स्वयंसेविका म्हणून काम केलं. त्यांनी महिलांसाठी बेकरी आणि मिठाईचा उद्योग सुरू केला आणि 2020 मध्ये बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलं. त्यांनी विद्यापीठात शिकवण्याचं कामही केलं त्यांना प्राध्यापिका बनायचं होतं.

    तालिबाननं 2021 मध्ये सत्ता मिळवली तेव्हा त्या अमेरिकेला स्थलांतरीत झाल्या आणि आता पीएचडी करण्याची तयारी करत आहे.

    त्यांनी बीबीसीला लिहिलेल्या एका पत्रामध्ये महिलांच्या निवडीच्या स्वातंत्र्याबाबत अत्यंत उत्साहाने लिहिलं आहे. विशेषतः महिलांच्या कपडे परिधान करण्याच्या संदर्भात.

    *अफगाणिस्तानसाठी मला केवळ शांततेची आशा आहे. आपल्याला सध्या शांततेचीच सर्वाधिक आवश्यकता आहे.

  • बारोनेस हेलेना केनडी QC

    युनायटेड किंग्डम आंतरराष्ट्रीय बार असोसिएशनच्या मानवाधिकार संस्थेच्या संचालिका

    महिला आणि अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी लढा देणाऱ्या अशा ओळख असलेल्या बारोनेस हेलेना केनडी QC या स्कॉटिश बॅरिस्टर अशून 40 वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात वकिली करत आहेत. आंतरराष्ट्रीय बार असोसिएशनच्या मानवाधिकार संस्थेच्या त्या संचालिका आहेत. या संस्थेनं नुकतीच अफगाणिस्तानात धोक्यात असलेल्या महिलांना मदत पुरवण्याचं काम केलं.

    ऑक्सफर्ड विद्यापीठाकील मॅन्सफिल्ड कॉलेडच्या त्या काही वर्षे प्राचार्या होत्या. बोनावेरो मानवाधिकार संस्था सुरू करण्याची जबाबदारी याठिकाणी त्यांच्यावर होती.

    न्यायपालिकेचा महिलांवर होणारा परिणाम या विषयावर बारोनेस यांनी विविधं पुस्तकं लिहिली आहेत. 1997 मध्ये त्यांना हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये लेबर पीअरची जबाबदारी देण्यात आली.

    *जोपर्यंत आपल्या खटल्यांमध्ये युक्तीवादासाठी वकील नसतील आणि स्वतंत्र महिला तसेच पुरुष न्यायाधीश नसतील तोपर्यंत आपले मानवाधिकार हे निरर्थक आहेत.

  • हुदा खामुश

    इराण मासिक पाळीबाबत जनजागृती करणाऱ्या महिला हक्क कार्यकर्त्या

    महिला हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या हुदा खामुश या अफगाणिस्तानातील शाळांमध्ये 'मासिक पाळी निषिद्ध नाही' हा उपक्रम राबवतात. मासिक पाळीबाबत खुलेपणानं चर्चा व्हावी यासाठी जनजागृती म्हणून हा उपक्रम त्या राबवत आहेत.

    इराणमध्ये विस्थापित म्हणून आलेल्या अफगाण कुटुंबात जन्मानंतर त्या बालपणी अफगाणिस्तानला परतल्या. रुढीवादी विचारसरणीचं कुटुंब असूनही त्यांच्या आईनं शिक्षणासाठी त्यांना पाठिंबा दिला. कवी आणि पत्रकार असलेल्या खामीश 2015 मध्ये रेडिओ प्रझेंटर बनल्या. त्यांनी महिलांवरील अन्यायाचा मुद्दा उचलला. तसंच त्यांच्या गावामध्ये महिलांसाठी साक्षरता कार्यक्रमही सुरू केला.

    तालिबाननं सत्ता मिळवल्यापासून शाळेत जाऊन शिक्षणाची परवानगी नसलेल्या सातव्या वर्गापेक्षा वरच्या वर्गातील मुलींना शिक्षण देण्याचं काम त्या करतात.

    *भोवताली प्रचंड काळोख असूनही 2021 या वर्षामध्ये महिलांनी त्यांचे हक्क हिरावून घेणाऱ्यांना विरोध केला आणि बंदुकीच्या गोळ्या आणि चाबकांच्या विरोधात उभं राहत त्यांच्याकडून हक्क परत मिळवण्यासाठी संघर्ष केला. या वर्षाला मी नव्या आशेचं वर्ष असं म्हणेन.

  • मिया क्रिस्ना पत्रातिवी

    इंडोनेशिया पर्यावरणवादी

    पर्यावरणवादी असलेल्या मिया या ग्रिया लुहू या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बाली बेटावर प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी काम करतात. स्थानिकांच्या मगतीनं त्यांच्या संघटनेनं अॅपवर आधारित डिजिटल वेस्ट बँक की यंत्रणा तयार केली आहे. कचरा अधिक चांगल्या पद्धतीनं गोळा करता यावा आणि त्यावर प्रक्रिया करता यावी तसंच भविष्यात कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं माहिती गोळा व्हावी म्हणून याची त्यांना मदत होते.

    बांडुंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधून इनव्हायर्नमेंट इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी पदवी घेतली आहे. मिया क्रिस्ना या एका स्थानिक कचरा बँकेत ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून दैनंदिन कामकाज पाहतात.

    त्या इंडोनेशियातील डेनपसार शहरात असलेल्या पर्यावरण संस्थेमध्ये पर्यावरण विश्लेषक म्हणूनही काम पाहतात.

    *बालीमधील त्रि हित कारन या तत्वज्ञानानुसार आपण भूमातेचं संतुलन राखून तिचं वैभव पुन्हा परत आणुया. कदाचित प्रदूषणाच्या समस्येसाठी आपणच कारणीभूत आहोत. पण आपणच त्यावर तोडगाही काढू शकतो.

  • हैडी ज. लार्सन

    अमेरिका संचालक - द व्हॅक्सिन कॉन्फिडन्स प्रोजेक्ट

    हैडी लार्सन या द लंडन स्कूल ऑफ हायजीन अँण्ड ट्रॉपिकल मेडसिनमधल्या द व्हॅक्सिन कॉन्फिडंट प्रोजेक्टच्या संचालक आणि अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत. आरोग्य व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या सामाजिक आणि राजकीय कारणांचा अभ्यास प्रा. हैडी लार्सन करतात. लशींवर लोकांचा विश्वास वाढावा यासाठी काय करता येईल, यातले धोके आणि अफवा यामुळे पसरणारे गैरसमज कसे कमी करता येतील याविषयी त्या सध्या काम करत आहेत.

    स्टक : हाऊ व्हॅक्सिन रूमर्स स्टार्ट अँड व्हाय दे डोन्ट गो अवे या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. प्रेगन्सी काळात लसीकरणाचा स्वीकार याविषयीच्या जागतिक अभ्यासात त्या प्रमुख संशोधक आहेत.

    डॉ. लार्सन यांनी चुकीची माहिती कशी पसरते याविषयी केलेल्या शास्त्रीय संशोधनाबद्दल 2021मध्ये त्यांना एडिंबर्ग मेडल देण्यात आलं.

    *आधीच ध्रुवीकरण झालेल्या या जगात एका रोगाची जागतिक साथ आली. आपल्यामध्ये दुफळी निर्माण करणाऱ्या मुद्द्यापासून आपल्याला कोणतीही लस वाचवू शकणार नाही. एक व्यक्ती म्हणून, समाज म्हणून किंवा लहान - मोठ्या गटांचे नेते म्हणून आपण काय करतो, यानेच या जगात एक नवी सुरुवात करता येईल.

  • इमान लै कैरे

    इजिप्त ट्रान्स अस्लियासच्या संस्थापिका

    कैरो ओपेरा हाऊसमधल्या कंटेम्पररी डान्सर आणि कोरिओग्राफर असलेल्या इमान ले कैरे यांना LGBTQ+ समुदायातील असल्यानं पोलिस कारवाईमुळं इजिप्त सोडून जावं लागलं. त्या 2008 मध्ये अमेरिकेला स्थलांतरीत झाल्या. त्याठिकाणी त्यांना आश्रय देण्यात आला आणि सध्या त्या न्यूयॉर्कमध्ये राहत असून कलाकार, नृत्यांगणा, अभिनेत्री आणि LGBTQ+ चळवळीतील कार्यकर्त्या म्हणून काम करतात.

    ले कैरे या ट्रान्स इमिग्रेट संस्थेच्या अरेबिक रिलेशन्स मॅनेजर आणि संचालक मंडळाच्या सदस्य आहेत. ही संस्था सुरक्षित देशांमध्ये स्थलांतरीत होणाऱ्या ट्रान्सजेंडरर्सना मदत देण्याचं काम करते.

    मार्च 2021 मध्ये त्यांनी ट्रान्स एलियास नावाने स्वतः एका फाऊंडेशनची सुरुवात केली. ट्रान्सजेंडर समुदायातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी मदत करणे आणि भावनिक आधार देणे असे काम ही संस्था करते.

    *आधीच पृथ्वीवर सर्वाधिक त्रासाचा सामना करावा लागत असलेल्या ट्रान्सजेंडर समुदायाला कोरोनाच्या साथीमुळं अधिक धोक्यात टाकलं आहे. कोरोनाच्या संकटामुळं अपमान सहन करत त्यांना कुटुंबातच राहण्यास भाग पाडलं आहे. संपूर्ण जग थांबल्यानं मदतीसाठीचा त्यांचा आवाज हृदयद्रावक बनला आहे. आता जगानं त्यांचं संरक्षण करून त्यांना या जखमांच्या धक्क्यातून सावरण्यासाठी मदत करायला हवी.

  • सेविदझेम अर्नस्टीन लीकेकी

    कॅमेरून पर्यावरण कार्यकर्त्या

    सेविदझेम अर्नस्टीन या वणवे रोखण्यासाठी मधमाशी पालनाचा पर्याय वापरतात. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेने आजवर 2 हजारांपेक्षा जास्त मधमाशी पालक शेतकऱ्यांना मध उत्पादन, क्वालिटी कंट्रोल आणि त्यापासून बीवॅक्स कसा काढायचा, याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. सोबतच त्यांनी जंगलांची संख्या वाढवण्यासाठी मधमाश्यांना आवडणारी अशी 86 हजारांपेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत.

    कॅमेरून जेंडर अँड एन्व्हार्यन्मेंट वॉच संस्थेच्या लीकेकी या संस्थापक सदस्य आहेत. देशातले पर्यावरणविषयक मुद्दे आणि त्यातल्या महिलांच्या भूमिकेविषयी ही संस्था काम करते.

    समाजाने मिळून प्रयत्न केले तर जंगलं वाचवता येतील असा त्यांना विश्वास आहे. देशाच्या वायव्येला असलेल्या 20 हजार हेक्टरवरच्या किलमलजिम जंगलात असा प्रकल्प राबवण्यात आला आहे.

    *मला असं जग हवंय जिथे महिलांच्या जंगल संवर्धन आणि उपजीविका विषयक हक्कांचा पर्यावरणाच्या आणि सामाजिक व आर्थिक अंगांनीही विचार केला जातो.

  • एलिसा लंकन अँटिलिओ

    चिली अध्यक्ष-कॉनस्टिट्युशनल कनव्हेंशन

    2021 मध्ये नवीन चिलीची नवी राज्यघटना लिहिण्यासाठी निवडून आलेल्या 17 स्थानिक प्रतिनिधींमध्ये एलिसा यांचा समावेश होता. त्या शिक्षिका, भाषातज्ज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या आहेत. कॉनस्टिट्युशनल कनव्हेंशन (घटनात्मक अधिवेशन)चं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. प्रथमच चिलीच्या स्थानिकांना देशाच्या सार्वजनिक सभागृहात प्रवेश मिळाला आहे.

    लंकन या देशातील सर्वात मोठा रहिवासी समुदाय मापुशेशी संलग्न असून त्या बहुराज्य संकल्पनेच्या पुरस्कर्त्या आहेत. त्यामुळं स्वदेशी समुदायाला स्वायत्तता आणि अधिकार मिळतो आणि त्यांच्या संस्कृती आणि भाषेला ओळख प्राप्त होते.

    गरीबीतील बालपण आणि वांशिक भेदभावाचा सामना करावा लागूनही त्यांनी मानवतेच्या विषयात पीएचडी केली आहे. तसंच त्या सध्या सँटियागो विद्यापीठात प्राध्यापिकाही आहेत.

    *कोरोनाच्या काळात मृत्यूला अगदी जवळून अनुभवल्यानंतर मानव आणि मानवेतर सर्वांना समान हक्काची हमी देणं अत्यंत गरजेचं आहे. मातृभूमीच्या साधनांवर आपलं जीवन अवलंबून आहे. पाणी, जंगल यापासून ते मधमाशा आणि मुंग्यांचाही त्यात समावेश आहे.

  • क्लोई लोपेस गोम्स

    फ्रान्स बॅले डान्सर

    क्लोई लोपेस गोम्स यांनी 2018मध्ये प्रतिष्ठित स्टाट्स बॅले बर्लिनसोबत त्यांच्या पहिल्या कृष्णवर्णीय बॅलेरिना म्हणून काम करायला सुरुवात केली. मॉस्कोच्या बोलशॉय अकादमीच्या माजी विद्यार्थिनी असणाऱ्या क्लोई यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. बॅलेच्या जगातील अनेक प्रथा या बंधनं घालणाऱ्या आणि उच्चवर्णीयांसाठीच्या असल्याचं म्हणत त्यांनी त्या झुगारून लावल्या.

    त्यांनी जाहीरपणे हे आरोप केल्यानंतर मिश्र वंशाच्या आणि कृष्णवर्णीय बॅले डान्सर्सनी त्यांना पाठिंबा दिला होता.

    2020 मध्ये स्टाट्स बॅले कंपनीने लोपेस गोम्स यांचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केला नाही. त्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात केला. परिणामी या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये वर्णभेद करण्यात येतोय का याबद्दलची अंतर्गत चौकशी सुरू केली, गोम्स यांची माफी मागितली आणि मोबदला देत त्यांच्यासोबत कोर्टाबाहेर तडजोड करण्याची तयारी दाखवली.

    *दुर्दैवानं आपण सगळे या जगात समान पातळीवर जन्माला आलो नाही. आपल्याला मिळणाऱ्या संधी आणि यश हे सामाजिक दर्जा आणि आपले वंशज यावर अबलंबून असतं. प्रत्येकाला आपली पूर्ण क्षमता वापरता येईल अशा संधी मिळणाऱ्या जगात मला राहायचं आहे.

  • माहिरा

    अफगाणिस्तान डॉक्टर

    डॉ. माहिरा या सध्यादेखील त्या काम करत असलेल्या स्त्रीरोग रुग्णालयात रुग्णांना तपासण्यात व्यस्त आहेत.

    तालिबाननं ताबा घेतल्यापासून ज्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा बंद आहेत, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी गरजू रुग्णांना सेवा गरजेचं झालं आहे.

    यापूर्वी त्या लैंगिक हिंसारातील पीडितांसाठी कम करत होत्या, मात्र तालिबान सत्तेत आल्यानंतर त्यांना ते काम थांबवावं लागलं.

    *आता फार काही आशा नसल तरी, अफगाणिस्तानातील महिला आता 20 वर्षांपूर्वीच्या महिलांसारख्या नाहीत. त्यामुळं एका पातळीपर्यंत त्या स्वतःच्या हक्कांचं संरक्षण करू शकतात. माझी मोठी काळजी ही आहे की, महिलांसाठी आता शाळा कायमच्या बंद असतील.

  • मराल

    अफगाणिस्तान महिला हक्क कार्यकर्त्या

    मराल यांनी महिला हक्क चळवळीमध्ये किंवा सामाजिक संघटनांच्या कामात सहभागी होऊ नये अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. महिला असल्यानं त्यांन बाहेर पडू नये असं त्यांचं मत होतं. पण तरीही त्यांनी ते केलं.

    2004 पासून मराल या स्थानिक महिलांना विविध उपक्रमांत सहभागी करून घेत आहेत. तसंच महिलांनी स्वतःचे हक्क जाणून घ्यावे आणि कामासाठी बाहेर पडून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावं, यासाठी त्या महिलांना प्रोत्साहन देतात.

    कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडलेल्या ग्रामीण भागातील महिलांसाठीही त्या काम करतात. निवारा आणि न्याय मिळण्यासाठी त्या अशा महिलांना मदत करतात.

    *आपण सर्वकाही गमावलं असा विचार येतो आणि मी हताश होते. मात्र, जेव्हा मला आपण काय केलं आहे त्या सर्वाचं स्मरण होतं, तेव्हा मला पुन्हा पुढे चालत राहण्याचा धीर मिळतो. मग मी हार मानत नाही. भविष्यकाळ हा शांतता आणि मानवता हवी असणाऱ्यांचाच आहे.

  • मासुमा

    अफगाणिस्तान सरकारी वकील

    सरकारी वकील म्हणून मासुमा* यांनी अफगाणिस्तानात न्यायपालिकेत पुरावे गोळा करणं, कायदेशीर खटले यांचं काम केलं. मसौमा या गेल्या 20 वर्षात शिक्षण घेतलेल्या अनेक महिलांपैकी एक असून, त्यांनी वकिलीची पदवी घेतली आहे. त्यांनी जवळपास पाच वर्षांपेक्षा अधिक काळ अ‍ॅटर्नी जनरलच्या ऑफिसमध्ये काम केलं. देशातील लोकांची सेवा केल्याचा त्यांना अभिमान होता.

    तालिबाननं देशात सत्ता मिळवल्यानंतर अनेक कैद्यांची सुटका केली. त्यात हजारो गुन्हेगार आणि मुस्लीम कट्टरतावाद्यांचा समावेश होता. तालिबाननं सरकारी कर्मचाऱ्यांना माफी दिल्याचं जाहीर करुनही, न्यायपालिकेशी संबंधित अनेकांच्या हत्या झाल्याचं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघनांच्या अहवालातून समोर आलं.

    मासुमा सध्या भूमिगत असून भविष्यात काय होणार हेही त्यांना माहिती नाही.

    *जगाच्या लोकसंख्येपैकी निम्म्या या महिला आणि तरुणी आहेत. त्यांना जर संधी देण्यात आली तर पुरुषांप्रमाणेच महिलाही लोकांची आणि देशाची सेवा करू शकतात.

  • फियामे नाओमी मटाफा

    समोआ पंतप्रधान

    समोआच्या पंतप्रधान आणि फाटुअट्वा ल अटुआ समोआ वा तासी पक्षाच्या नेत्या. फियामे नाओमी मटाफा यांनी वयाच्या 27 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला आणि देशाच्या उप पंतप्रधान

    समोआमध्ये राजकारणात येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या महिलांसाठी त्या प्रेरणास्थानी आहेत.

    त्यांची धोरणं पर्यावरणावर लक्ष केंद्रित करणारी आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका सर्वात जास्त बसणाऱ्या जगातल्या काही जागांपैकी समोआ एक आहे.

    *जिथे एकी असेल, तिथे पुढच्या पिढ्यांसाठी आशा असेल.

  • सलिमा मझारी

    इराण नेत्या आणि माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर

    अफगाणिस्तानातील केवळ तीन महिला डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपैकी एक असलेल्या सलिमा मझारी या काही दिवसांपूर्वी निर्भय नेत्या म्हणून माध्यमांत झळकल्या. तालिबानविरोधात त्यांना आघाडीवर राहत लढा दिला.

    अफगाणिस्तानला पोहचण्यापूर्वी इराणमध्ये निर्वासित असताना मझारी यांनी पदवी मिळवली. 2018 मध्ये त्या बाल्ख प्रांतातील चार्किंट जिल्ह्याच्या गव्हर्नर बनल्या. त्याठिकाणी त्यांनी तालिबानच्या 100 सदस्यांशी चर्चा करून त्यांना शरणागती पत्करायला लावली. 2021 मध्ये झालेल्या संघर्षात त्यांच्या जिल्ह्यानं तालिबानला प्रखर विरोध केला. काबूलवर ताबा मिळेपर्यंत तालिबानच्या ताब्यात न गेलेल्या काही मोजक्या जिल्ह्यांपैकी हा एक जिल्हा होता.

    त्यांना पकडण्यात आलं असा अंदाज वर्तवला जात होता. पण त्या पळून जाण्यात यशस्वी झाल्या. सध्या तिथं त्या पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.

    *मला आशा आहे की एक दिवस असा नक्की येईल जेव्हा एक महिला, हजारा, शिया आणि पर्शियन बोलणारी अशी ओळख माझ्या देशात गुन्हा ठरणार नाही.

  • डिप्लीशा थॉमस मॅकग्रूडर

    अमेरिका संस्थापक : मॉम्स ऑफ ब्लॅक बॉईज लिमिटेड

    संपूर्ण अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय मुलग्याच्या मातांना त्यांची संघटना एकत्र आणते. डीप्लीशा थॉमस मॅकग्रूडर मॉम्स ऑफ ब्लॅक बॉईज युनायटेड या संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.धोरणांमध्ये बदल घडवून आणत समाजात बदल घडवणं, कृष्णवर्णीय मुलगे आणि पुरुषांना कायदा विषयक यंत्रणांकडून ज्या समजांतून वेगळी वागणूक दिली जाते, त्याविषयीची जागरूकता ही संस्था निर्माण करते.

    त्या सध्या फोर्ड फाऊंडेशच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि खजिनदार म्हणून काम करतात.

    मॅकग्रूडर यांनी मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात 20 वर्षं काम केलंय. ब्रॉडकास्ट जर्नलिस्ट म्हणून आणि MTV आणि ब्लॅक एंटरटेन्मेट टीव्हीच्या वरिष्ठ अधिकारी म्हणूनही काम केलेलं आहे.

    *या जागतिक साथीतून बाहेर पडत असलेलं जग हे अधिक संवदेनशील असेल, आपण एकमेकांवर किती अवलंबून आहोत याची लोकांना जाणीव होईल आणि ते इतरांच्या परिस्थितीविषयी आणि आव्हानांविषयी संवेदनशील होतील अशी मला आशा आहे.

  • मुलु मेफसिन

    इथयोपिया नर्स

    10 वर्षांपेक्षा अधिक काळ परिचारिका म्हणून काम केलेल्या मुलु मेफसिन सध्या इथियोपियातील संकटग्रस्त टिग्रे प्रांताची राजधानी मेकेलेमध्ये वन स्टॉप सेंटरमध्ये काम करतात. या सेंटरद्वारे लैंगिक शोषण आणि हिंसाचारातील पीडितांना वैद्यकीय, मानसिक आणि कायदेशीर मदत पुरवली जाते.

    तीन वर्षांपूर्वी मेफसिन यांनी टिगरे येथील तरुण मुलींच्या विरोधातील हिंसाचार थांबवण्यासाठी मोहीम सुरू केली होती. सध्या सुरू असलेला संघर्ष सुरू झाला तेव्हापासून म्हणजे 2020 च्या अखेरीपासून हा मुद्दा याठिकाणी गंभीर होत चालला होता.

    स्वत: संघर्षाचा सामना करुनही परिचारिका असलेल्या मेसफिन यांनी एक दिवस शांतता स्थापित होईल या आशेनं काम सुरू ठेवलं.

    *मला जगातील सर्व वाद संपून नव्यानं सुरुवात व्हावी असं वाटतं. जगातील देशांनी शस्त्रांच्या व्यवहारांऐवजी शांततेसाठी काम करायला हवं. बलात्कार करणारे आणि महिला तसंच मुलींवर अत्याचार करणारे यांना शिक्षा होण्यासाठी कायदा तयार होणं गरजेचं आहे.

  • मोहदीज मिरझई

    अफगाणिस्तान पायलट

    अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला व्यावसायिक पायलट असलेल्या मोहदीज मिरझई यांनी यावर्षीच्या सुरुवातीला काम एअरच्या बोईंग 737 च्या संपूर्ण महिला क्रू असलेल्या ऐतिहासिक विमान उड्डाणाचं नेतृत्वं केलं होतं. सप्टेंबर 2020 मध्ये व्यावसायिक पायलट बनसल्यानंतर त्यांनी तुर्कस्तान, सौदी अरेबिया आणि भारतात उड्डाणं केली होती.

    तालिबाननं काबूलवर ताबा घेतला तेव्हा मिरझई विमानतळावर उड्डाणाची तयारी करत होत्या. पण त्या विमानानं उड्डाण केलंच नाही. उलट प्रवासी म्हणून विमान प्रवास करत त्या देश सोडून गेल्या. "समाजात महिला आणि पुरुष बरोबरीनं काम करू शकतील, अशी समानता असावी," असं मिरझई याचं मत आहे.

    लवकरच पुन्हा उड्डाण घेता येईल अशी त्यांना आशा आहे.

    *कुणाची वाट पाहू नका! तुम्ही स्वतःच मजबूत नसाल तर तुम्हाला उडण्यासाठी कोणी पंख आणून देणार नाही. मी स्वतःसाठी झगडले, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी झगडा, आपण एकत्र आलो तर कोणीही आपल्याला अडवू शकणार नाही.

  • फाहिमा मिरझई

    अफगाणिस्तान दर्विश नृत्यांगणा

    सुफी इस्लामिक परंपरेमध्ये समा सोहळ्याचा एक भाग असलेल्या दर्विश नृत्य करणाऱ्या फाहिमा या अफगाणिस्तानातील पहिल्या आणि एकमेव नृत्यांगणा आहेत. फाहिमा मिरझई यांनी महिला आणि पुरुष दोघांचा समावेस असलेल्या एका सुफी डान्स आणि परफॉर्मिंग आर्ट ग्रुपची स्थापना केली आहे. शोहूद कल्चरल अँड मिस्टिकल ऑर्गनायझेशन असं त्याचं नाव आहे. गूढ गोष्टींचे ज्ञान असा त्याचा अर्थ आहे.

    महिला आणि पुरुषांनी एकत्रितपणे सादरीकरण करणं हे अजूनही चुकीचं मानलं जात असलेल्या अत्यंत पारंपरिक आणि धार्मिक रुढीवादी समाजात स्वतः स्थान निर्माण करण्याचं माध्यम म्हणून त्या नृत्याकडे पाहतात. देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्याद्वारे सहिष्णुतेचा प्रसार करण्याची त्यांना आशा आहे.

    2021 मध्ये त्यांना देश सोडावा लागला. त्यामागचं कारण म्हणजे तालिबानच्या मते सुफी दर्विश नृत्य इस्लाम विरोधी आहे.

    *माझा अध्यात्मिकतेवर विश्वास आहे. आपल्याला आधी स्वतःमध्ये शांतता शोधणं गरजेचं आहे. त्याद्वारेच आपण विश्वास शांतता पसरवू शकतो.

  • ट्लालेंग मोफोकेंग

    दक्षिण आफ्रिका आरोग्यविषयक अधिकारांबद्दलच्या UNच्या प्रतिनिधी

    ट्लालेंग यांना प्रेमाने डॉ. टी म्हटलं जातं. त्या एक डॉक्टर आहेत आणि महिलांचं लैंगिक आणि प्रजननविषयक आरोग्य, हक्क यांविषयीही काम करतात. सगळ्यांना आरोग्य सुविधा, HIV वरचे उपचार आणि कुटुंब नियोजन सेवा मिळाव्यात यासाठी त्या काम करतात.

    डॉ. ट्लालेंग मोफोकेंग या सध्या युनायटेड नेशन्ससच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यसेवाविषयक हक्कांसाठीच्या विशेष प्रतिनिधी आहेत. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला, पहिल्या आफ्रिकन आणि सर्वात तरूण व्यक्ती आहेत. डॉ. टी : अ गाईड टू सेक्शुअल हेल्थ अँड प्लेजर या बेस्टसेलर पुस्तकाच्या त्या लेखिकाही आहेत.

    2016 मधल्या 40 वर्षांखालील 120 महिलांमध्ये त्यांचा कुटुंब नियोजनाच्या पुरस्कर्त्या म्हणून मोफोकेंग यांचा बिल अँड मेलिंदा गेट्स इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन अँड रीप्रोडक्टिव्ह हेल्थकडून सत्कार करण्यात आला.

    *मला जग रीसेट कसं करायचं आहे? समाजाबद्दलची काळजी म्हणून स्वतची काळजी घेऊन.

  • तान्या मुझिंदा

    झिम्बाब्वे मोटोक्रॉस अॅथलिट

    पुरुषांचं वर्चस्व असलेल्या मोटोक्रॉस किंवा ऑफ रोड मोटरसायकल रेसिंगमध्ये यश मिळवत तान्या मुझिंदा या त्यांच्या देशातील ऑफ रोड सर्किट चॅम्पियन बनल्या. 1957 पासून सुरुवात झाल्यापासून मोटोक्रॉस चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या त्या झिम्बाब्वेतील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

    वडील बाईकर असल्यानं वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. सध्या 17 वर्षीय असलेल्या मुझिंदा यांना महिलांच्या मोटोक्रॉस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवणाऱ्या पहिला कृष्णवर्णीय महिला बनण्याची आशा आहे. 2018 मध्ये त्या आफ्रिकन युनियनमधील ज्युनियर स्पोर्ट्सवुमन आफ द इअर ठरल्या होत्या.

    मोटोक्रॉस शर्यतींमधून मिळणाऱ्या पैशातून त्या सामाजिक कार्य करतात. हरारे येथील जवळपास 100 मुलांच्या शाळेची फीस त्या भरतात.

    *मला जगात पुन्हा बदल करण्याची गरज वाटत नाही. ते अगदी परफेक्ट कधीच नव्हतं. प्रत्येकवेळी काहीतरी चांगलं किंवा काहीतरी वाईट असतं. आपण वर्तमानकाळ उत्तम बनवला तर भविष्यात आपल्या पिढ्यांना पुन्हा यासाठीच संघर्ष करावा लागणार नाही.

  • चिमंमंदा न्गोजी एडिची

    नायजेरिया लेखिका

    प्रथितयश लेखिका आणि महिला हक्कांसाठी लढणाऱ्या आघाडीच्या कार्यकर्त्या. त्यांच्या पुस्तकांचा 30 पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे. चिमंमंदा न्गोजी एडिची या 19 वर्षांच्या असताना कम्युनिकेशन्स आणि पोलिटिकल सायन्समधली डिग्री करण्यासाठी अमेरिकेला गेल्या.

    पर्पल हिबिस्कस ही त्यांची पहिली कादंबरी 2003 मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीला कॉमनवेल्थ रायटर्स पुरस्कार मिळाला. 2013मध्ये अमेरिकाना या त्यांच्या कादंबरीचा समावेश न्यूयॉर्क टाईम्सच्या टॉप 0 पुस्तकांत करण्यात आला होता.

    एडिची यांनी 2012 मध्ये दिलेल्या - वी शुड ऑल बी फेमिनिस्ट या प्रसिद्ध टेडटॉकनंतर जगभरात फेमिनिझमबद्दलची चर्चा सुरू झाली. 2014मध्ये पुस्तक स्वरूपात याचं प्रकाशन करण्यात आलं. नोट्स ऑन ग्रीफ (2021) ही त्यांची नवीन कादंबरी आहे. वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतरचे हे अनुभव आहेत.

    *आरोग्यसेवा हा पृथ्वीवरील प्रत्येकाचा मानवी हक्क आहे असा विचार करायला सुरुवात करूयात. जिवंत असणाऱ्या प्रत्येकाला हा हक्क असायला हवा. फक्त ज्याला परवडतंय त्यालाच नव्हे.

  • लिन न्गुगी

    केनिया पत्रकार

    पुरस्कार विजेत्या पत्रकार लिन न्गुगी या टुको डिजीटल न्यूजच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामासाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेक प्रेरणादायी कहाण्या लोकांसमोर आणल्या.

    कॅन्सर रुग्णांची काळजी घेणाऱ्या स्वयंसेवक म्हणून त्यांनी सुरुवातीला काम केलं. त्यानंतर 2011मध्ये किवो फिल्म्सद्वारे त्यांनी माध्यम क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर कतार फाऊंडेशनसोबतही काम केलं. न्गुगी यांना त्यांच्या देशात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि लोकप्रिय माध्यमकर्मी मानलं जातं.

    2020मध्ये त्यांना कॅफे न्गोमा मानवतावादी पत्रकार पुरस्कार देण्यात आला. तर 2021मध्ये त्यांना आयचेंज नेशन्स कम्युनिटी अॅम्बॅसेडर पुरस्कार देण्यात आला.

    *मला एक असं जग हवंय जिथे प्रत्येकाला सुरक्षित वाटेल.

  • अमांडा न्गुयेन

    अमेरिका सामाजिक उद्योजक

    Rise या बलात्कार वा लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या अमांडा या प्रमुख आहेत.

    नागरी हक्क आणि सामाजिक हेतू असणाऱ्या उद्योजक असलेल्या अमांडा न्गुयेन यांच्यावर 2013 मध्ये त्या हार्वड विद्यापीठात शिकत असताना बलात्कार करण्यात आला. त्यांनी सहा महिन्यांमध्ये तक्रार दाखल केली नाही तर पुरावे नष्ट करण्यात येतील असं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांनी राईज या संस्थेची स्थापना केली. लैंगिक हल्ला झालेल्या व्यक्तीचे हक्क सांगणारा कायदा आखण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. हा कायदा पुरावे जपून ठेवण्याचा बळी पडलेल्या व्यक्तीचा हक्क अबाधित ठेवतो.

    2021मध्ये त्यांचा आशियन लोकांविरोधातील द्वेषातून घडणाऱ्या गुन्हांबद्दलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. आशियाई लोकांचा तिरस्कार थांबवण्यासाठीच्या मोहीमेतला हा एक महत्त्वाचा क्षण होता.

    *आपण एकत्र आलो तर कोणीही कमजोर राहणार नाही. आपण मिळून प्रयत्न केले तर कोणाकडेही दुर्लक्ष होणार नाही.

  • बसिरा पैगाम

    अफगाणिस्तान लैंगिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या

    अफगाणिस्तानात LGBTQ+ समुदायाच्या हक्कांसाठी लढणं हे प्रचंड अडचणी असणारं आहे. पण ही आव्हानं असूनही बसिरा पैगाम गेल्या आठ वर्षांपासून लैंगिक समानता आणि लैंगिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून काम करत आहे.

    त्यांनी लैंगिकतेबाबत जागरुकता पसरवण्यासाठी कार्यशाळेद्वारे मार्गदर्शनाबरोबर सहकाऱ्यांच्या मदतीनं LGBTQ+ समुदायातील सदस्य आणि अत्याचार पीडित यांच्यासाठी वैद्यकीय उपचार आणि मार्गदर्शनासह आर्थिक मदत पुरवण्याचं कामही केलं आहे. ते अत्यंत वाईट स्थिती असलेल्या आणि आत्महत्या करण्याचा धोका असलेल्या LGBTQ+ समुदायातील लोकांना मानसोपचाराची मदत मिळवून देण्याचाही प्रयत्न करतात.

    सध्या त्या आयर्लंडमध्ये राहत असून तिथूनही त्या अफगाणिस्तानातील LGBTQ+ समुदायाला ओळख मिळावी आणि त्यांचं स्वातंत्र्य आणि मानवाधिकार यासाठी आवाज उठवत आहेत.

    *अफगाणिस्तानातील लोकांना त्यांचा धर्म किंवा लैंगिक ओळख याचा विचार न करता मोकळा श्वास घेता येईल, अशी मला आशाआहे. आम्ही शांत बसणार नाही, शक्य ते सगळे प्रयत्न करत लोकांचं मत बदलण्यात आम्ही यश मिळवू.

  • नटालिया पेस्टरनॅक टॅशनर

    ब्राझील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि विज्ञान संवादक

    कोव्हिड 19 च्या काळात त्यांनी त्यांच्या स्तंभ लिखाण, रेडिओ आणि टिव्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून ब्राझीलमधील लाखो लोकांना अत्यंत महत्त्वाची अशी माहिती पुरवली. त्यातून लोकांना प्रचंड फायदा झाला.

    नटालिया पेस्टरनॅक या विज्ञानाविषयक लिखाण करणाऱ्या लेखिका आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी साओ पाओलो विद्यापीठातून बॅक्टेरियल जेनेटिक्स विषयात पीएचडी केली आहेत. त्यांच्या कामामुळं प्रभावित झाल्यानं त्यांना न्यू यॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातील जगप्रसिद्ध न्युरोसाइंटिस्ट आणि विज्ञानविषयक लेखिक असलेल्या स्टुअर्ट फायरस्टेन यांनी आमंत्रित केलं होतं.

    त्यांनी सार्वजनिक धोरणांच्या वैज्ञानिक पुराव्यांबाबत प्रचार करण्यासाठी Instituto Questão de Ciência म्हणजेच Question of Science Institute ची स्थापना केली होती. त्याच्या त्या अध्यक्षाही आहेत.

    *होलोकास्टममधील मृतांची नात असल्यामुळं हुकूमशाही सरकार काय करू शकतं हे मला माहिती आहे. कोरोनाच्या काळात ब्राझीलमध्ये विज्ञानाच्या विषयावर बोलणं हे माझ्यासाठी कायम जीवंत राहण्यासारखं आहे.

  • मोनिका पॉलस

    पापुआ न्यू गिनी अंधश्रद्धेतून घडणाऱ्या हिंसेबद्दल जागरूकता घडवणाऱ्या कार्यकर्त्या

    जादूटोणा करण्याचा आरोप झालेल्या आणि त्यातून घडलेल्या हिंसेला बळी पडणाऱ्यांना मदत करण्यासाठी मानवी हक्क कार्यकर्त्या असणाऱ्या मोनिका पॉलस यांनी हायलँड्स विमेन ह्युमन राईट्स डिफेंडर्स नेटवर्कची स्थापना केली. जादूटोणा करण्याचा आरोप झालेल्या महिलांना ही संस्था रहायला जागा देते आणि UN आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना या प्रकरणांची माहिती देते.

    त्यांच्या प्रयत्नांमुळे पापुआ सरकारने जादूटोणा संबंधी हिंसाविषयी समित्यांची स्थापना केली आहे.

    युनाटेड नेशन्सच्या 2015च्या विमेन ऑफ अचिव्हमेंटमध्ये पॉलस यांचाही समावेश होता. त्यांच्या धाडसासाठी त्यांना महिलांसाठीचा प्राईड ऑफ पापुआ न्यू गिनी पुरस्कारही देण्यात आलाय. जगातल्या सर्वात शूर महिलांपैकी एक असं अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ऑस्ट्रेलियाने त्यांचं वर्णन केलंय.

    *आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवत एक नवी सुरुवात केली पाहिजे की आपण सगळे एकाच मानवजातीचा भाग आहोत आणि लिंगामुळे कोणावरही मर्यादा येऊ नयेत वा कोणासोबत शत्रुत्त्वंही येऊ नये.

  • रेहाना पोपल

    अफगाणिस्तान बॅरिस्टर

    रेहाना पोपल या स्थलांतर आणि नागरी कायदेतज्ज्ञ आहेत. सध्या त्या अफगाणिस्तानातून सैन्यानं माघार गेतल्यानंतर मागे राहिलेले अफगाण दुभाषक, भाषांतरकार आणि इतरांना सहकार्य करण्याचं काम करत आहेत.

    इंग्लंड आणि वेल्समध्ये बॅरिस्टर म्हणून काम करणाऱ्या रेहाना या पहिल्या अफगाण महिला होत्या. बालपणी वयाच्या पाचव्या वर्षी त्या निर्वासित म्हणून युकेमध्ये आल्या होत्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि वकिलीचा अभ्यास केला. सध्या त्या मानवाधिकार क्षेत्रात काम करत आहे.

    2019 मध्ये कायदा क्षेत्रातील प्रेरणादायी महिलांच्या पुरस्कारांमध्ये त्यांना बॅरिस्टर ऑफ द इअरचा पुरस्कार मिळाला.

    *भविष्यात अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींना शिक्षण घेणं, काम करणं आणि भयमुक्त जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल, अशी मला आशा आहे.

  • मंजुला प्रदीप

    भारत मानवी हक्क कार्यकर्त्या

    भारतातल्या अत्यंत उपेक्षित समाजातल्या लोकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या वकील आणि कार्यकर्त्या. गुजरातमधल्या दलित कुटुंबात जन्मलेल्या मंजुला प्रदीप या त्यांनी जात आणि लिंगभेदाविरोधी केलेल्या कामामुळे ओळखल्या जातात. नवसर्जन ट्रस्ट या दलित हक्कांसाठी लढणाऱ्या सर्वात मोठ्या संघटनेच्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे.

    यावर्षी त्यांनी द नॅशनल काऊन्सिल ऑफ विमेन लीडर्सची सहस्थापना केली. त्यांनी वाईज अॅक्ट ऑफ यूथ व्हिजनिंग अँड एन्गेजमेंटचीही स्थापना केली आहे. उपेक्षित समाजातल्या तरुणांना ही संस्था मदत करते.

    इंटरनॅशनल दलित सॉलिडॅरिटी नेटवर्कच्या त्या सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्णद्वेष विरोधी कॉन्फरन्समध्ये त्यांनी दलित हक्कांबद्दलची मतं मांडलेली आहेत.

    *मला असं एक नवीन जग हवंय जिथे एकमेकांसाठी सहवेदना आणि प्रेम आहे, जिथे उपेक्षित समाजातल्या महिला या समाजाला शांततापूर्ण आणि न्याय्य भविष्याकडे नेत आहेत.

  • राझमा

    अफगाणिस्तान संगीतकार

    प्रथितयश संगीतकार असलेल्या राझमा ते वाद्य वाजवतात जे सहसा पुरुषांसाठी राखून ठेवलेलं असतं. संगीताचा वारसा असलेल्या कुटुंबातील आणि संगीत तसंच कलेची पदवी घेतलेल्या राझमा यांनी अफगाणिस्तान आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख कलाकाराबरोबर सादरीकरण केलेलं आहे.

    संगीताच्या माध्यमातून जगाला अफगाणिस्तानचा एक नवा चेहरा दाखवण्याची आशा होती. पण त्याउलट अफगाण महिलांसाठी हे अत्यंत वाईट वर्ष ठरलं. एक संगीतकार म्हणून आपल्याला गाता वा इतरांबरोबर सादरीकरण करता येणार नाही, हे प्रचंड धक्कादायक आहे, असं राझमा म्हणतात.

    1996 ते 2001 दरम्यान तालिबानची सत्ता होती त्यावेळी संगीतावर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा अफगाणिस्तानातील संगीतकारांसाठी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती राझमा यांना आहे.

    *संगीत आणि गाणं नसलेल्या समाजाचा विचार केला तरी मला प्रचंड नैराश्य येतं. आपल्या देशातील महिलांच्या या दबलेल्या आवाजाला प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे.

  • रोहिला

    अफगाणिस्तान शालेय विद्यार्थिनी

    अफगाणिस्तानात तालिबाननं माध्यमिक शाळांमध्ये मुलींच्या शिक्षणावर बंदी घातल्याचा फटका रोहिला या विद्यार्थिनीलाही बसला. विज्ञान आणि इंग्रजी हे तिचे आवडते विषय होते. रोज सकाळी भावांप्रमाणेच तिलाही शाळेत जाण्याची प्रचंड इच्छा असते.

    रोहिला हिच्या मैत्रिणींपैकी फार मोजक्या मुलींना इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे, असं ती सांगते. शिक्षकांशिवाय शिकणं कठिण असल्याचं ती म्हणते.

    मानसशास्त्राचा अभ्यास करून विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवण्याचं तिचं स्वप्न आहे.

    *अफगाणिस्तान सध्या जगापासून फार लांब गेलं आहे. त्यामुळं माझं शित्रणाचं स्वप्न मला कठीण दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय आम्हाला विसरणार नाही आणि आम्ही परिश्रम केलेली वर्ष वाया जाणार नाहीत, अशी मला आशा आहे.

  • अल्बा रुएडा

    अर्जेंटिना ट्रान्स कार्यकर्त्या

    देशात वरिष्ठ सरकारी पद मिळवणाऱ्या अल्बा या पहिल्या ट्रान्सजेंडर आहेत. महिला, लिंग आणि विविधता मंत्रालयातील विविधता धोरणांच्या त्या अंडर सेक्रेटरी आहेत.

    कार्यकर्त्या आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असलेल्या अल्बा या ट्रान्स विमेन अर्जेंटिना या संघटनेचा चेहरा आहेत. या संघटनेनं ट्रान्स लेबर कोटा विधेयकाचा प्रचार केला होता. त्यामुळं ट्रान्सजेंडर आणि ट्रान्सव्हेसाईट लोकांना सार्वजनिक क्षेत्रात नोकरीत 1% जागा राखीव ठेवण्यात आल्या.

    2019 मध्ये रुएडा यांनी त्यांची राष्ट्रीय ओळखपत्रांशी संबंधित नाव आणि लिंह यासंबंधी माहिती जुळण्यासाठी चर्चमधील नोंदीमध्ये बदल करण्यास नकार देणाऱ्या कॅथलिक आर्च बिशप यांच्यावर खटला दाखल केला होता.

    *2021 या वर्षात आर्थिक धोरणांचा असमानतेच्या पुनरुत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचं दाखवून दिलं.आपण स्त्रीवादी दृष्टीकोनातून धोरणांचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यामुळं वेगळ्या प्रकारचे नातेसंबंध जोडण्यासाठी आणि एकत्रितपणे समाजाच्या विकासासाठी मदत मिळू शकते.

  • रुख्साना

    अफगाणिसतान सर्जन

    डॉ. रुख्साना सर्जन आणि सहायक प्राध्यापिका आहे. संघर्षामुळं अफगाणिस्तानातील इतर प्रांतातून विस्थापित झालेल्यांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या संघटनेच्या त्या संस्थापिका आहेत.

    संघर्षाच्या काळामध्ये अथ्यंत कठिण परिस्थितीत त्यांनी लोकांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम केलं आहे. राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रमात त्या स्वयंसेविका म्हणून सहभागी आहेत. सध्या त्या स्तनांच्या कॅन्सरबाबत जनजागृती करत आहेत.

    सर्जन म्हणून करत असलेल्या कामाबाबत त्यांना प्रचंड उत्साह आहे. अफगाणिस्तानातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांसाठी प्रेरणा बनावं अशी त्यांची इच्छा आहे.

    *कोणताही मोठा बदल हा नेत्याच्या वचनबद्धतेमुळं आणि समर्पणातून घडत असतो. मी कदाचित नेता बनणार नाही, पण याठिकाणी बिनकामी आणि भ्रष्टाचार असलेल्या आरोग्य यंत्रणेत बदल घडवण्यासाठी मी अफगाणिस्तानातच राहील.

  • हलिमा सदाफ करिमी

    अफगाणिस्तान नेत्या आणि माजी खासदार

    नेत्या आणि अफगाणिस्तानच्या संसदेच्या माजी सदस्या असलेल्या हलिमा सदाफ करिमी या अनेक वर्षांचा राजकारणाचा अनुभव असलेल्या नेत्या आहेत. त्या उत्तर जोझ्जान प्रातांच्या खासदार होत्या.

    देशातील 70 महिला खासदारांपैकी त्या एक होत्या. उझ्बेक या अल्पसंख्याक समुदायातील त्या एकमेव महिला सदस्य होत्या. त्याच्या समुदासाठी त्या लढा देत होत्या. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात त्यांनी शिक्षण घेतलं आहे. महिला हक्कांसाठी लढणाऱ्या हलिमा यांना तालिबानकडून अनेकदा धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळं त्यांना अनेकवेळा घर सोडावं लागलं.

    2020 मध्ये तालिबाननं विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या लहान भावाची हत्या केली होती.

    *स्वार्थी राजवटीला नेहमीच लवकर अपयश पाहावं लागतं. अफगाणिस्तानच्या महिलांनी राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक सर्वच क्षेत्रात प्रवेश करत त्यांचे अधिका मिळवावेत, अशी मला आशा आहे. त्यातून मानवाधिकारांचं संकट दूर करता येऊ शकतं.

  • रोया सादत

    अफगाणिस्तान चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शिका

    दोन दशकांच्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीत त्यांनी ऑस्करच्या नॉमिनेशनपर्यंत मजल मारली. तालिबानच्या काळातून समोर आलेल्या रोया सादत या अफगाणिस्तानातील पहिल्या महिला दिग्दर्शिका आहेत. त्यांच्या चित्रपटांत अफगाणि महिलांचे प्रश्न, त्यांचं जीवन आणि त्यांच्यावर लावलेली बंधनं यावर भाष्य पाहायला मिळतं.

    2017 मध्ये 90 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये त्यांचा 'अ लेटर टू द प्रेसिडेंट' हा चित्रपट अफगाणिस्तानातून सर्वोत्तम विदेशी भाषांतील चित्रपटांच्या स्पर्धेत पाठवण्यात आला होता.

    सादत या रोया फिल्म हाऊस या चित्रपट कंपनीच्या अध्यक्ष आणि सहसंस्थापिका आहेत. अफगाणिस्तानात आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव सुरू करण्याचं श्रेय त्यांनाच जातं. त्याच्याही त्या अधघ्यक्षा राहिलेल्या आहेत.

    *तालिबानच्या पहिल्या राजवटीच्या काळामध्ये पुन्हा एकदा शाळेची दारं माझ्यासाठी खुली होतील, अशी मला आशा होती. आजही मला विश्वास आहे की, लोक स्वातंत्र्यासाठी आवाज उठवतील आणि त्यांचा विजय होईल.

  • शगुफ्ता साफी

    अफगाणिस्तान ऑर्केस्ट्रा कंडक्टर

    झोहरा हा फक्त महिलांचा समावेश असलेला अफगाणिस्तानातला पहिला ऑर्केस्ट्रा आहे. झोहरा या ऑर्केस्ट्राच्या कंडक्टर म्हणून शगुफ्ता साफी या 13 ते 20 वयोगटातील संगीताशी निगडीत तरुणींच्या गटाचं नेतृत्न करतात. विशेष म्हणजे यापैकी अनेक तरुणी अत्यंत गरीब किंवा अनाथ आहेत.

    पर्शियातील संगीताच्या देवीच्या नावावरून झोहरा हे नाव समूहाला देण्यात आलं आहे. हा ग्रूप पारंपरिक अफगाण आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताचं मिश्रण करून सादर करतो. 2014 पासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या सादरीकरण करत आहेत.

    तालिबाननं सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक (ANIM) बंद झाली. साफी यापूर्वी तिथं सराव करायच्या. साफी आणि त्यांच्या ग्रुपमधील काही सद्स्य असलेल्या तरुणी दोहाला निघून जाण्यात यशस्वी ठरल्या. मात्र त्यांची संगीत वाद्यं मात्र त्यांना अफगाणिस्तानातच सोडावी लागली. आपण पुन्हा एकत्र येत संगीताचा आनंद घेऊ अशी त्यांना आशा आहे.

    *आशा अधीही अपयशी ठरत नाही. कितीही अंध:कार असला, तरीही माझी मशाल अफगाणिस्तानसाठी प्रकाशाचा किरण ठरेल असा मला विश्वास आहे.

  • सहर

    अफगाणिस्तान फुटबॉलपटू

    फुटबॉल खेळण्याची इच्छा असलेल्या अफगाणिस्तानातील अनेक तरुणींपैकी सहर या एक आहेत. पण तालिबानच्या राजवटीत सध्या ते शक्य नाही. सहर गेली काही वर्ष स्थानिक फुटबॉल टीममध्ये खेळल्या आहेत. यादरम्यान खेळामुळं त्यांना अनेक नवे मित्रही मिळाले.

    तालिबाननं यावर्षी ताबा घेतला तेव्हा त्या कुटुंबासह आधी लपून राहिल्या आणि नंतर निसटून दुसऱ्या देशात गेल्या.

    त्यांना अजूनही अफगाणिस्तानात राहिलेल्या त्यांच्या इतर सहकारी महिला फुटबॉलपटुंची काळजी वाटते. मात्र आता त्यांना पुन्हा एकदा फुटबॉलच्या मैदानावर उतरून स्वप्नं पूर्ण करता येईल, अशी आशाही आहे.

    *मला माझं शिक्षण सुरू ठेवायचं असून, मला आणि माझ्या कुटुंबाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्यासाठी प्रचंड परिश्रम करायचे आहेत. मला असं यश मिळवायचं आहे की, कोणीही मुली फुटबॉल खेळू शकत नाही असं म्हणता कामा नये.

  • सोमा सारा

    युके संस्थापक - एव्हरीवन्स इन्व्हायटेड

    एव्हरीवन्स इनव्हायटेड ही वेबसाईट आणि त्यांचा व्हायरल इन्स्टाग्राम अकाऊंट हे लैंगिक अत्याच्यारांना बळी पडलेल्यांसाठीचं व्यासपीठ आहे. सोमा सारा यांनी जून 2020मध्ये याची स्थापना केली. आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल ओळख उघड न करता इथे लोकांना बोलता येत. युकेमधल्या शाळा आणि विद्यापीठांमधील लैंगिक भेदभाव दूर करणं आणि इथलं 'रेप कल्चर' नष्ट करणं हा त्यांचा हेतू आहे.

    या प्रोजेक्टला सुरुवात झाल्यापासून त्यांनी 50 हजारांपेक्षा अधिक लोकांचे अनुभव गोळा केले आहेत. लंडनच्या रस्त्यावरून मार्च 2021मध्ये अपहरण करून खून करण्यात आलेल्या सारा एव्हरार्ड प्रकरणानंतर या वेबसाईटला अजून महत्त्वं प्राप्त झालं.

    सारा यांना त्यांची ही मोहीम शैक्षणिक संस्थांच्या पलिकडे नेत त्याचा विस्तार करायचा आहे.

    *मला असं जग हवंय जे लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्यांचं म्हणणं ऐकून घेईल, त्यांना साथ देईल आणि त्यांच्यावर विश्वास ठेवेल.

  • महबूबा सिराज

    अफगाणिस्तान महिला हक्क कार्यकर्त्या

    अमेरिकेत 26 वर्ष निर्वासित म्हणून राहिल्यानंतर महबूबा सिराज 2003 मध्ये मायदेशी अफगाणिस्तानला परतल्या. त्यांना काही जणांच्या साथीनं महिला आणि बालकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अनेक संघटनांची अफगाणिस्तानात स्थापना केली. त्यात देशात महिला चळवळीचं केंद्र ठरलेल्या अफगाण वुमन्स नेटवर्क (AWN) या नावाजलेल्या संघटनेचा समावेश आहे.

    कौटुंबिक हिंसाचारातील पीडितांच्या सबलीकरणाबरोबरच बालकांचे आरोग्य आणि शिक्षण आणि भ्रष्टाचाराविरोधात लढ्यात त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. 2021 मध्ये तालिबाननं सत्ता मिळवली तेव्हा त्या अफगाणिस्तानातच राहिल्या आणि अत्यंत धाडसानं त्यांनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर अफगाणिस्तानच्या महिलांच्या अधिकारांबाबत आवाज उठवला.

    टाईम मॅगझिननं त्यांचा समावेश 2021 च्या जगातील सर्वात प्रभावी 100 व्यक्तिमत्वांच्या यादीत केला आहे.

    *शांतता ही माझ्या देशासाठी माझी सर्वात पहिली इच्छाआहे. आता खूप झालं! मला माझ्या बहिणी आणि मुलींच्या डोळ्यात एका अज्ञात भविष्याबाबतची भाती आणि दहशत पाहायची नाही.

  • एलिफ शफाक

    फ्रान्स कादंबरीकार

    पुरस्कार विजेत्या तुर्की - ब्रिटीश लेखिका आणि महिला - LGBTQ+ हक्कांच्या पुरस्कर्त्या

    एलिफ शफाक यांची आजवर 19 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. यामध्ये 10 मिनिट्स 38 सेकंड्स इन दिस स्ट्रेंज वर्ल्ड या बुकर पुरस्कासाठी नामांकित पुस्तकाचाही समावेश आहे. यासोबतच द फॉर्टी रूल्स ऑफ लव्ह या पुस्तकाची निवड जगाला आकार देणाऱ्या 100 पुस्तकांपैकी एक म्हणून बीबीसीद्वारे करण्यात आली होती. त्यांच्या लेखनाचा आजवर 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे.

    शफाक यांनी राज्यशास्त्रात पीएचडी केली असून तुर्की, अमेरिका आणि युकेच्या विद्यापीठांत शिकवलेलं आहे. 2021मध्ये त्यांना हलडॉर लॅक्सनेस इंटरनॅशनल लिटररी पुरस्कार देण्यात आला आहे.

    *पूर्व असो वा पश्चिम, आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. जुनं जग आता उरलेलं नाही. त्यामुळे तिथे परत जाण्याचा प्रयत्न करत राहण्यापेक्षा आपण एक असं चांगलं जग उभारू जिथे कोणीही मागे राहणार नाही.

  • अनिसा शाहीद

    अफगाणिस्तान पत्रकार

    अनिसा शाहीद या अफगाणिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार आहेत. गेल्या दशकभरात त्यांनी मानवाधिकारांचं उल्लंघन, राजकारण, भ्रष्टाचार अशा विषयांवर अनेक स्टोरीज कव्हर केल्या आहेत. त्यांनी TOLO न्यूजसाठी काम केलं आहे. ही देशातील प्रसिद्ध आणि प्रभाव असणारी वाहिनी आहे.

    शाहीद यांना महिला पत्रकार असल्यामुळं थेट धमक्या देण्यात आल्या होत्या, त्यामुळं 15 ऑगस्टला तालिबाननं ताबा घेतल्यानंतर त्यांनी अफगाणिस्तान सोडलं. 2020 मध्ये रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर या संघटनेनं त्यांच्या कोरोनाच्या काळातील वार्तांकनाची दखल घेत त्यांचा गौरव केला होता.

    2021 मध्ये अफगाणिस्तानच्या फ्री स्पीच हब नेटवर्कद्वारे त्यांना वर्षातील सर्वोत्तम पत्रकाराचा पुरस्कार देण्यात आला. तसंच त्यांना 'फेस ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच हा किताब'ही देण्यात आला.

    *विस्थापन आणि नैराश्येच्या शिखरावर असतानाही मला अफगाणिस्तानात शांततेची आशा आहे. मला सर्व महिला मुलींचं हास्य परतण्याची आशा आहे. तसंच मला माझ्या घरी परत जाऊन माझं काम करता येईल, अशी आशा आहे.

  • मीना स्मॉलमन

    युके धर्मगुरू आणि शिक्षक

    मीन स्मॉलमन या 2013मध्ये चर्च ऑफ इंग्लंडच्या कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक समाजाची पार्श्वभूमी असणाऱ्या पहिल्या महिला धर्मगुरू (Archdeacon) बनल्या. आता त्या अँजेलिकन प्रीस्ट आणि शाळा शिक्षक म्हणून निवृत्त झाल्या असून युकेतले रस्ते सर्वांसाठी सुरक्षित करण्यासाठी आणि पोलिस व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी काम करतात.

    2020मध्ये त्यांच्या मुलींपैकी दोघींचा निकोल स्मॉलमन आणि बिबा हेन्री यांचा लंडन पार्कमध्ये एका 19 वर्षांच्या तरुणाने भोसकून खून केला. या दोघी बेपत्ता असल्याच्या तक्रारींकडे पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं असा स्मॉलमन यांचा आरोप आहे. आपल्या दोन मुली कदाचित वर्णद्वेषातून घडलेल्या हिंसाचाराला बळी पडल्या असाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे.

    आपण आपल्या मुलींच्या मारेकऱ्याला माफ केलं असल्याचं त्या सांगतात : "आपण ज्यावेळी कोणाचा द्वेष करतो त्यावेळी आपण फक्त त्यांनाच ओलिस धरत नाही तर स्वतःलाही धरतो आणि आपल्या विचारांवर बदल्याची भावना वरचढ ठरते. मी त्याला माझ्यावर असा काबू मिळवू देणार नाही."

    *एक शिक्षिका आणि धर्मगुरू म्हणून मी माझं आयुष्य अशा मुलामुलींना वाढवण्यात घालवलं ज्यांच्याकडे लोक तुच्छतेने पाहतात. मला तुमच्यातल्या प्रत्येकाला आवाहन आहे - तुम्हाला भेदभाव दिसल्यास त्याबद्दल आवाज उठवा. आपण बदल घडवून आणू शकतो.

  • बार्बरा स्मोलिन्स्का

    पोलंड संस्थापिका-रिबॉर्न शुगर बेबीज

    अगदी वास्तववादी वाटणाऱ्या 'रिबॉर्न' डॉल (बाहुल्या) या गर्भपात झालेल्या किंवा बाळ गमावलेल्या महिलांना भावनिक आधार देण्याचं काम करतात. काही प्रकरणांत त्या महिलांना अस्वस्थपणा, नैराश्य आणि प्रजनाशी संबंधित समस्या हाताळण्यासही मदत करतात. पोलंडमधील कलाकार बार्बरा स्मोलिन्सका या अशा बाहुल्या डिझाईन आणि तयार करतात. अगदी खऱ्या बाळासारख्या या बाहुल्यांच्या माध्यमातून उपचारांचं काम केलं जातं.

    पूर्वी संगीत क्षेत्रात रमलेल्या बार्बरा यांनी कॉस्मेटॉलॉजीचं प्रशिक्षण घेतलं आणि रिबॉर्न शुगर बेबीज ही कंपनी सुरू केली. त्यांनी हातानं तयार केलेल्या बाहुल्या वैद्यकीय संस्थांमध्ये चित्रपटांमध्ये आणि डॉक्टरांच्या तसेच नर्स आणि आयांच्या प्रशिक्षणासाठीही वापरल्या जातात.

    स्मोलिन्सा या त्यांच्या कलेबाबत अत्यंत उत्साही असून, त्यांच्या कलाकृती महिलांना आशा देतात आणि त्यांचं मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

    *लोकांनी अधिक

  • इन सोई मे

    म्यानमार लोकशाहीवादी कार्यकर्त्या

    म्यानमारच्या मिलिट्री जंताने अटक केल्यानंतर इन सोई मे (बदललेलं नाव) या सहा महिने तुरुंगात होत्या. नुकीतच त्यांची सुटका करण्यात आली. लष्कराच्या अनेक इंटरोगेशन म्हणजे उलटतपासणीसाठीच्या केंद्रांमध्ये आणि कुप्रसिद्ध इनसिन तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं होतं. कोठडीतला हा काळ अतिशय कठीण होता असं त्या सांगतात. या दरम्यान त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.

    विद्यार्थी दशेपासूनच तरुण वयातच त्यांनी अनेक चळवळींमध्ये आणि प्राथमिक पातळीवरुन कामाची सुरुवात केली. 1 फेब्रुवारीला लष्करानं सत्ता हाती घेतल्यानंतर लष्कराच्या विरोधात झालेल्या आंदोलनांत त्या सहभागी झाल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यातील पॉट्स अँड पॅन प्रोटेस्ट आणि मार्च महिन्यातील सायलेन्स स्ट्राईक या आंदोलनांत त्यांनी सहभाग घेतला होता.

    तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा राजकीय कामाला सुरुवात केली आहे.

    *जग पुन्हा पूर्वीप्रमाणं करता आलं, तर आम्हाला साथीवर यशस्वीरित्या मात करून शांतता असलेला समाज स्थापित करायचा आहे. जगातील सर्व हुकूमशाही मोडीत काढून शांतता नांदणारी लोकशाही स्थापन व्हायला हवी.

  • पायपर स्टेज नेल्सन

    अमेरिका सार्वजनिक धोरण अधिकारी-द सेफ अलियान्स

    टेक्सासच्या ऑस्टिनमधील द सेफ अलायन्समध्ये मुख्य सार्वजनिक अधिकारी असलेल्या पायपर स्टेज नेल्सन या बालकांचं लैंगिक शोषण, लैंगिर अत्याचार, कौटुंबीक हिंसाचार आणि सेक्स ट्राफिकिंग हे रोखण्यासाठी काम करतात.

    बलात्कारामुळं गर्भवती राहिलेल्या मात्र गर्भपाताची परवानगी नसलेल्या महिलांचं समुपदेशन करण्याचं काम ही संघटना करते. नवीन कायद्यामुळं गर्भपातावर काही बंधनं घालण्यात आलेली आहेत.

    स्टेज नेल्सन यांनी महिला आणि मुलींच्या अधिकारांसाठी जवीन खर्ची घालण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मिशेल ओबामा यांच्या लेट्स गर्ल्स लर्न या उपक्रमात आणि अॅनि लिस्ट यांच्या राजकारणात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून सुरू केलेल्या उपक्रमात काम केलं आहे.

    *कोव्हिड 19 मुळं बराच सामाजिक बदल घडवून आणला आहे. लोकांना काय महत्त्वाचं आहे, ते बोलण्याची शक्ती मिळाली आहे. आता प्रत्येक पुरुष, महिला आणि बालकाला शारीरिक स्वायत्ता आणि संमती याबाबत मार्गदर्शन करणं गरजेचं आहे.

  • फातिमा सुल्तानी

    अफगाणिस्तान गिर्यारोहक

    2019 मध्ये छंद म्हणून गिर्यारोहण सुरू केल्यानंतर फातिमा सुल्तानी यांनी अफगाणिस्तानातील मुलींचा याकडे ओढा वाढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

    वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी अफगाणिस्तानच्या सर्वात उंच असलेल्या हिंद कुश पर्वत रांगामधील समिट ऑफ नोशाखवर 7492 मीटरपर्यंत चढाई करत विक्रम रचला. अशी कामगिरी करणाऱ्या त्या सर्वात तरुण महिला होत्या. अफगाणिस्तानातील नऊ तरुण गिर्यारोहकांच्या पथकातील त्या सदस्य होत्या. त्या पथकात एकूण तीन महिला होत्या.

    खेळामध्ये आवड असलेल्या सुल्तानी या गेल्या सात वर्षांपासून बॉक्सिंग, तायक्वांदो आणि जिऊ जित्सूच्या राष्ट्रीय संघांच्या सदस्या आहेत.

    *अफगाणिस्तानातील महिला त्यांच्या स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी 20 वर्षे लढा दिला आहे. त्यांनी मोठी शिखरं पादाक्रांत करत स्वतःचं नाव तयार केलं आहे. त्यांना पुन्हा देशात आणि देशाबाहेर अशी शिखरं सर करण्याचं स्वातंत्र्य मिळेल, अशी आशा आहे.

  • अॅडलेड लाला टॅम

    चीन डिझायनर

    आर्टिस्ट आणि फूड डिझायनर. सध्याच्या आधुनिक काळात आपलं अन्नासोबत असलेलं नातं, आपल्या आवडीनिवडी याविषयी अॅडलेड लाला काम करतात.

    चीनमध्ये जन्म झालेल्या अॅडलेड नंतर हाँगकाँगमध्ये कायमच्या रहिवासी झाल्या. सध्या त्या नेदरलँड्समध्ये राहतात आणि काम करतात. त्यांच्या कामाद्वारे त्या इंडस्ट्रियल फूड प्रॉडक्शनची पाहणी करतात. आपण काय खातो याचा लोकांनी विचार करावा आणि अशाप्रकारने घाऊक तयार होणाऱ्या अन्नाबाबतची भूमिका ठरवावी असं आवाहन त्या करतात.

    2018च्या फ्युचर फूड्स डिझाईन अवॉर्डसमध्ये त्यांना परीक्षक आणि लोकं अशी दोन्हींकडून बक्षिसं मिळाली. यावेळी त्यांनी गायींच्या कत्तलीविषयी सांगणारं एक इन्स्टॉलेशन तयार केलं होतं. गॅस्ट्रोनॉमी म्हणजे अन्न तयार करण्याच्या शास्त्राला नवीन परिभाषा देऊ शकणाऱ्या 50 लोकांच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जातं.

    *2021मध्ये जगात खूप काही बदललंय. आता मला असं जग हवंय जिथे आपण काय खातोय आणि ते आपल्या टेबलापर्यंत कसं येतं, याविषयी लोकांना जाणीव आहे

  • सिस्टर अॅन रोझ नु त्वांग

    म्यानमार कॅथलिक नन

    लष्करानं सत्ता काबीज केल्यानंतर या ननने आंदोलकांचा बचाव करण्यासाठी पोलिसांसमोर गुडघे टेकले त्यामुळं त्या म्यानमारमधील आंदोलनाचं प्रतिक बनल्या. या आंदोलकांना त्यांच्या चर्चमध्ये आसरा घेतला होता.

    मार्च 2021 मध्ये प्रचंड पोलिसांच्या ताफ्यासमोर दोन्ही हात पसरलेला त्यांचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता, त्यांचं खूप कौतुकही झालं होतं.

    सिस्टर अॅॅन रोझ नु त्वांग यांनी नागरिकांचं आणि प्रामुख्यानं बालकांचं संरक्षण करताना उघडपणे त्यांची भूमिका मांडली. गेल्या 20 वर्षांपासून त्या जीवनावश्यक सेवेत कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्या म्यानमारच्या काचीन राज्यात कोव्हिड रुग्णांसाठी काम करत होत्या.

    *म्यानमारमध्ये जे घडलं ते अत्यंत जड अंत:करणानं मी पाहिलं आहे. मला काही करता आलं असतं तर मी विनाकारण काहीही न विचारता तुरुंगात टाकलेल्या सर्वांना मुक्त केलं असतं. सर्व भेदभाव नष्ट करत मी सर्वांना समान वागणूक दिली असती.

  • एमा थेओफेलस

    नामिबिया पॉलिटिशन

    त्या आफ्रिकेतील सर्वात कमी वयाच्या मंत्री बनल्या आहेत. गेल्या वर्षी मंत्री बनल्या तेव्हा त्या 23 वर्षांच्या होत्या. एमा इनामुतिला थेओफेलसया संसदेच्या सदस्य आणि माहिती आणि संवाद खात्याच्या उपमंत्री आहेत. कोव्हिड 19 च्या काळात संवादासाठी अधिकृत माध्यम म्हणून त्यांनी मोठं काम केलं.

    त्यापूर्वी लैंगिक समानता, महिलांचे हक्क आणि शाश्वत विकास यासाठी लढणाऱ्या त्या सर्वात तरुण कार्यकर्त्या होत्या. युथ पार्लामेंटच्या त्या सभापती आणि विंडहोक शहराच्या कनिष्ठ महापौरही आहेत. याच शहरात त्यांचा जन्म झाला होता.

    थेओफेलस यांनी नामिबिया विद्यापीठातून लॉची डीग्री घेतली आहे. तसंच साऊथ आफ्रिका विद्यापीठातून त्यांनी आफ्रिकन फेमिनिझल आणि लैंगिक शिक्षणासंबंधी डिप्लोमा केला आहे.

    *आपल्याला पूर्वपदावर येण्यासाठी कामाचा वेग वाढवावा लागेल. सध्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या योजनांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. आता आणखी उशीर करून चालणार नाही. किंबहुना आधीच खूप उशीर झाला आहे.

  • सारा वाहेदी

    अफगाणिस्तान एहतेसाब या स्टार्टअपच्या सीईओ

    त्या अफगाणिस्तानातील तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप एहतेसाबच्या संस्थापिका असून त्यांचं पहिलं उत्पादन काबूलमधील नागरिकांना सुरक्षा, वीज आणि वाहतुकीबाबत रिअल टाईम अलर्ट देणारं अ‍ॅप हे होतं. नागरिकांना त्यांच्या आसपास असलेल्या धोक्यासंबंधी माहिती देण्यात हे अ‍ॅप अत्यंत महत्त्वाचं ठरलं. कारण याद्वारे आयईडी हल्ले, छापे किंवा सार्वजनिक मारहाण अशी माहिती दिली जात होती.

    2022 मघ्ये ग्रामीण भागातील लोकांना सेवांचा लाभ मिळावा म्हणून एसएमएस अलर्ट फंक्शन सुरू करण्याचा सारा वाहेदी यांचा विचार आहे.

    तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिका असलेल्या सारा यांनी टाईम मॅगझिनच्या 2021 मधील नेक्स्ट जनरेशन लीडर्सच्या यादीत स्थान मिळवलं होतं. सध्या त्या कोलंबिया विद्यापीठात डाटा सायन्स आमि मानवाधिकारांचं शिक्षण घेत आहेत.

    *अफगाणिस्ताननं देशाच्या पुनर्निर्मितीसाठी स्वतंत्र आणि निःपक्षपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी अफगाणिस्तानातील सर्वांनी एकत्र येऊऩ उभं राहणं अनिवार्य आहे. त्यासाठी मुली आणि मुले दोघांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी लढणं अत्यंत आवश्यक आहे.

  • वेरा वँग

    अमेरिका फॅशन डिझायनर

    प्रामुख्यानं वधूंचे ड्रेस डिझाईन कऱणाऱ्या प्रसिद्ध डिझायनर वेरा एलन वँग यांना 1970 पासून त्यांच्या खास स्टाईलसाठी ओळखलं जातं. त्यांनी आता परफ्युम, प्रकाशन आणि होम डिझाईनसह अनेक क्षेत्रांत व्यवसाय वाढवला आहे.

    अमेरिकेत चिनी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.वोगमध्ये त्या वरिष्ठ फॅशन संपादक होत्या. त्यानंतर राल्फ लॉरेनसाठी डिझाईन डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं. त्या उत्तम फिगर स्केटरही आहेत. तरुण असताना त्यांना त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.

    प्रतिष्ठीत अशा काऊन्सिल ऑफ फॅशन डिझायनर्स ऑफ अमेरिकाच्या त्या सदस्य आहेत. 2005 मध्ये या संस्थेनं त्यांना वुमन्सवेअर डिझायनर ऑफ द इअर पुरस्कारानं गौरवलं होतं.

    *आपल्या सर्वांना सारख्याच संकटांचा सामना करावा लागला आहे. या पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी आपण जेवढ्या लवकर एकत्रितपणे प्रयत्न केले तेवढं अधिक चांगलं ठरेल. हे प्रयत्नही अत्यंत सावधपणे आणि हुशारीने करावे लागतील.

  • नान्फू वँग

    चीन फिल्ममेकर, दिग्दर्शिका

    मूळच्या चीनमधील दुर्गम ग्रामीण भागातील असलेल्या पुरस्कार विजेत्या फिल्ममेकर नान्फू वँग या सध्या अमेरिकेत राहतात आणि काम करतात.

    2016 मध्ये त्यांचा हुलिंग स्पॅरो हा पहिला चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या बेस्ट डॉक्युमेंटरी फिचरसाठी निवडण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांनी वन चाईल्ड नेशन (2019) आणि सेम ब्रीद (2021) या चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं आहे. अमेरिका आणि चीनच्या सरकारनं कोव्हिड 19 च्या संकटाच्या काळात कसं वर्तन केलं याबाबत त्यांनी यात मांडणी केली आहे.

    वँँग या गरिबीमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. मात्र त्यांनी शांघाय, ओहियो आणि न्यू यॉर्क येथील विद्यापीठांमधून तीन मास्टर्स पदवी मिळवल्या आहेत. त्यांनी 2020 मध्ये हुकुमशाही सरकार, भ्रष्टाचार आणि जबाबदारी स्वीकारण्याचा अभाव याच्या प्रभावाचा अभ्यास करणारा अंतरंग चरित्र अभ्यास यासाठी मॅकआर्थर जिनियस ग्रँटनं गौरव करण्यात आला.

    *संपूर्ण जगालाच सध्या पुन्हा जुन्या जीवनशैलीचा अवलंब करण्याची घाई झाली आहे. मात्र ज्याला परिस्थितीला आपण सामान्य समजत होतो, ती म्हणजे सध्या आफण ज्या संकटात जगत आहोत, ती आहे.

  • रोशनाक वरदक

    अफगाणिस्तान स्त्रीरोगतज्ज्ञ

    संसदेच्या माजी सदस्य आणि प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉक्टर रोशनाक वरदक यांनी जवळपास 25 वर्षापेक्षा अधिक काळ महिलांना वैद्यकीय सेवा पुरवली. तालिबानच्या पहिल्या राजवटीच्या काळातही त्यांनी त्यांच्या मैदान वरदक प्रांतात डॉक्टर म्हणून सेवा बजावली होती.

    2001 मध्ये तालिबान पायउतार झाल्यानंतर त्या संसद सदस्य बनल्या. त्यांचा जिल्हा गेली 15 वर्षे तालिबानच्या नियंत्रणात आहे. इतर ग्रामीण भागांप्रमाणे याठिकाणी तालिबान आणि नाटो सैन्यामधला प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला.

    तालिबाननं सत्ता मिळवणं आणि युद्ध संपणं हे स्वप्नासारखं असल्याचं त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं. या भ्रष्टाचारी लोकांना सत्तेवरून उतरवण्यासाठी मी या दिवसाची वाट पाहत होते, असं त्या म्हणाल्या. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांनी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तालिबाननं आश्वासनं तोडल्यामुळं त्या मुलींच्या शिक्षणाची वकिली करत आहेत.

    *अफगाणिस्तानसाठी माझी एकच आशा आहे. ती म्हणजे गेल्या 40 वर्षातील सत्ताधाऱ्यांना देशविरोधी कृत्यांसाठी जबाबदार ठरवलं जायला हवं.

  • मिंग-ना वेन

    मकाऊ अभिनेत्री

    अनिमेटेड चित्रपट मुलान (1998) आणि मुलान 2 (2004) मधील फा ला आवाज दिलेली अभिनेत्री मिंग ना वेन यांनी अमेरिकेतील मेडिकल ड्रामा ER आणि इनकन्सिव्हेबल मध्येही भूमिका केल्या आहेत.

    सध्या त्या डिस्ने+ वरील मँडोलोरियनमधील फेनेक शँडची भूमिका साकारत आहेत. तसंच आगामी द बूक ऑफ बोपा फेट यातही त्या झळकणार आहेत. 2019 मध्ये मिंग ना यांना डिस्ने लेजेंड घोषित करण्यात आलं होतं.

    हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये 2022 मध्ये त्यांना स्टार मिळणार आहे.

    *पुन्हा पूर्वपदावर येणं किंवा सेटल होणं का खरा पर्याय नाही. मागे जाण्यात एवढं अडखळण्याचं काय कारण? प्रत्येक गोष्टीमागं एक कारण असतं यावर माझा विश्वास आहे. प्रत्येक नवा दिवस हा रिसेट असतो. त्यामुळं आजचा दिवस आनंदानं आणि समाधानानं जगा.

  • रेबेल विल्सन

    ऑस्ट्रेलिया अभिनेत्री, लेखिका आणि निर्मात्या

    हॉलिवूडमधील प्रसिद्ध मेगास्टार, अभिनेत्री, लेखिका, निर्मात्या आणि दिग्दर्शिका असलेल्या रेबेल यांनी लॉचंं शिक्षण घेतलं आहे. त्यांच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात सिडनी स्टेजेसपासून झाली. तिथं त्या स्वतः स्वतःसाठी लिखाण करत होत्या. त्यातून 2010 मध्ये अमेरिकेला स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियन कॉमेडीमध्ये नाव कमावलं.

    हॉलिवूूडमध्ये पदार्पणासाठी त्यांनी महिलांचा प्रामुख्यानं सहभाग असलेल्या हिट ब्राईड्समेडची निवड केली. ऑस्कर विजेत्या जोजो रॅबिडमध्येही त्यांनी भूमिका केली. मात्र त्यापेक्षा अधिक ओळख त्यांना हिट झालेल्या पिच परफेक्टमधील लठ्ठ अॅमीनं मिळवून दिली.

    2022 मध्ये विल्सन त्याचा पहिला चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.

    *वैविध्य, आदर आणि सर्वसमावेशकता याबाबत जीवनातील कोणत्याही भागात तडजोड करता कामा नये.

  • बेनाफ्शा याकूबी

    अफगाणिस्तान दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या कार्यर्त्या

    याकूबी आणि त्यांचे पती दोघेही अंध आहेत. त्यांनी अफगाणिस्तानातील अंधांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी राहयाब संघटनेची स्थापना केली. मानवाधिकार कार्यकर्त्या असलेल्या बेनाफ्शा यांनी देशाच्या मानवाधिकार आयोगाच्या आयुक्त पदाची जबाबदारीही पार पाडली आहे. अंध मुलांच्या शिक्षणावर त्यांचा जोर आहे.

    तालिबानच्या प्रवेशानं त्यांना देश सोडावा लागला मात्र त्यांनी अंधांच्या हक्कासाठी आवाज उठवणं कायम ठेवलं आहे. तालिबान त्यांच्याबरोबर भेदभाव करेल अशी त्यांना भीती आहे.

    अनेक दशकांच्या संघर्षामुळं अफगाणिस्तानात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक दिव्यांग आहेत. त्यामुळं याठिकाणी त्यांचे प्रश्न आणि त्यांच्याबरोबर होणार भेदभाव हा गंभीर मुद्दा आहे.

    *मला जर काही आशा असेल तर ती माझा देश अधिक स्वतंत्र झालेला पाहण्याची आहे. तसंच देशाच्या विकासासाठी सर्व अफगाण नागरिकांचा समावेश करून घ्यायला हवा, अशी माझी इच्छा आहे.

  • मलाला युसूफझई

    पाकिस्तान सहसंस्थापिका, मलाला फंड

    आजवरच्या सर्वात तरुण नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या असलेल्या मलाला या पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता दूतही आहेत. वयाच्या 11 व्या वर्षापासून त्या मुलींच्या शिक्षणाच्या अधिकाराबाबत आवाज उठवत आहेत.

    पाकिस्तानात तालिबानच्या सत्तेत राहत असताना बीबीसीवर लिहिलेल्या ब्लॉगद्वारे पाकिस्तान आणि मुलींच्या शिक्षणावर बंदीचे विषय त्यांनी मांडले होते. तेव्हापासून त्यांच्या या कामाची सुरुवात झाली. ऑक्टोबर 2012 मध्ये त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती.

    युा हल्ल्यातून सावरल्यानंतरही मलाला यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं. त्यांनी मलाला फंड नावाच्या सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. मुलींना न घाबरता शिक्षण घेता यावं यासाठी त्या काम करतात.

    *कोट्यवधी मुलींनी सध्या शिक्षण घेता येत नाही. मला 12 वर्षांपर्यंत मुलींना मोफत, सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण मिळालेलं जग पाहायचं आहे. त्यातून शिकून मुलींना नेतृत्व करता येईल.

  • युमा

    तुर्कमेणिस्तान मानसोपचारतज्ज्ञ

    गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एका सुपर मार्केटच्या जाहिरातीमध्ये युमा झळकल्या होत्या. या जाहिरातीत गे प्राईडमध्ये एक कुटुंब सहभागी झाल्याचं दाखवलं होतं. त्यानंतरच्या तीव्र प्रतिक्रियांमुळं त्यांना रशिया सोडून जाण्यास भाग पाडलं होतं.

    युमा (आडनाव जाहीन करू नये असं त्यांनी म्हटलं आहे) यांनी रशियात 2013 मध्ये गे प्रोपगंडा कायदा मंजूर झाल्यानंतर चळवळीत काम सुरू केलं होतं. या कायद्यात अल्पवयीन मुलांच्या अनैसर्गिक लैंगिक संबंधांच्या प्रचारावर बंदी घालण्यात आली होती.

    त्या चेचन्या येथील LGBT समुदायातील लोकांना मानसिक मदत करतात. 2017-2018 मध्ये रशियातील पोलिसांनी छळ केल्याची तक्रार या लोकांनी केली होती. त्या रशियातील LGBT समुदायांचे उत्सव आणि सोहळ्यांसाठीही मदत करतात.

    *जवळची नाती किती महत्त्वाची असतात हे लादलेल्या विलगीकरणावरून स्पष्ट होतं. आपल्या प्रियजनांसाठीच्या जगात आपण काय करत आहोत? याचा विचार करायला हवा.

  • झाला झाझई

    अफगाणिस्तान पोलिस कर्मचारी

    झाला या अफगाणिस्तानच्यटा खोस्त प्रांतातील गुन्हेगारी तपास विभागाच्या पहिल्या महिला पोलिस उपप्रुमुख आहेत. बंडखोर कारवायांमुळं हा भाग प्रचंड अशांत आहे. देशातील जवळपास 4 हजार महिला पोलिस अधिकाऱ्यांपैकी सेकंड लेफ्टनंट झाला झाझई या आहे. त्यांनी तुर्कस्तानातील पोलिस अकादमीतून व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलं.

    नोकरी करत असताना त्यांना पुरुष सहकाऱ्यांकडून धमकीचा सामना करावा लागला तसंच बंडखोरांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या.

    तालिबाननं अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्यानंतर 2021 मध्ये झाझई यांना देश सोडून जावं लागलं. तेव्हापासून त्या अफगाणिस्तानात लपून राहावं लागत असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी चिंता व्यक्त करत आवाज उठवत आहेत.

    *रुढीवादी समाजाला आव्हान देत पुन्हा एकदा मला गणवेश परिधान करता यावा हे माझं भविष्यासाठीचं स्वप्न आहे. मला पुन्हा एकदा ज्याठिकाणी महिलांना काम करण्याची परवानगी नाही, अशा दुर्गम भागातील अफगाणी महिलांसाठी काम करायचं आहे.

Short presentational grey line

100 विमेनमध्ये निवड कशी होते?

बीबीसी विश्वमधील विविध भाषासेवांमधून मिळालेली माहिती आणि सुचनांच्या आधारावर बीबीसी 100 विमेन टीमने महिलांची निवड केली.

गेल्या 12 महिन्यांमध्ये ज्या महिला चर्चेत राहिल्या किंवा एखादी प्रभावी भूमिका पार पाडली असेल, अशा महिलांचा यात समावेश असेल याची काळजी आम्ही घेतली. दुसऱ्या लोकांसाठी प्रेरक ठरलेल्या, काही लक्ष्य साध्य केलेल्या चर्चेत नसतील पण समाजाला प्रभावित केलेल्या महिलांचा यात विचार केला गेला.

तसेच यावर्षीची कल्पना- ज्या महिला रिसेट बटण दाबत आहेत, ज्या जागतिक साथीच्या काळात जगाने नव्याने स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

आम्ही यामध्ये प्रादेशिक प्रतिनिधित्वसुद्धा पाहिलं आणि अंतिम यादी निश्चित करण्याआधी पूर्ण निष्पक्षता राखली.

यावर्षी अर्ध्या जागा अफगाणिस्तानच्या महिलांसाठी ठेवण्याचाही अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला. अफगाणिस्तानातील सध्याच्या स्थितीमुळे तेथिल लाखो महिलांच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तालिबानच्या काळात महिलांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल अशी शंका मानवाधिकार संस्थांनी व्यक्त केली आहे.

ज्या महिला अफगाणिस्तानातल्या आहेत किंवा तिथं काम करत आहेत अशांना अर्ध्या जागा दिल्या आहेत. अफगाणिस्तानातील सार्वजनिक आयुष्यातून महिलांना कशाप्रकारे गायब व्हावं लागलं आहे हे आम्हाला यातून सांगायचं आहे. ज्या लोकांचा आवाज दाबला जात आहे त्यांना आवाज देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

3 डिसेंबर रोजी तालिबानने आपल्या सर्वोच्च नेत्यांच्या नावाने एक फर्मान जाहीर केलं आहे. यामध्ये संबंधित मंत्रालयांना महिला अधिकाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

या फर्मानातच महिलांचे विवाह आणि संपत्ती नियंत्रणाचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. तसेच महिलांवर विवाहासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही आणि त्यांच्याकडे संपत्ती म्हणून पाहू नये असं या फर्मानात लिहिल्याचं सांगितलं जात आहे.

मुलींचे माध्यमिक शिक्षण आणि महिलांच्या काम करण्याच्या अधिकारात कपात केल्यामुळे या फर्मानावर टीका होत आहे. काही महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी त्यांची ओळख जाहीर केलेली नाही. हे त्यांच्या सहमतीने आणि बीबीसीच्या संपादकीय मूल्यांच्या आधारावरच केले गेले आहे.

Short presentational grey line

क्रेडिट-

निर्मिती आणि संपादनः व्हेलेरिया पेरास्सो, एमिलिया बटर्ली, लारा ओवेन, जॉर्जिनिया पेयर्स, काउन ख़ामूश, हानिया अली, मार्क शेया.

बीबीसी 100 विमेन एडिटरः क्लेअर विल्यम्स,

प्रॉडक्शनः पॉल सर्जेएंट, फिलिपा जॉय, अना लुसिया गोंजालेज

डेव्हलपमेंटः अयू विदियानिसिह इदजाजा, अलेक्झांडर इव्हानोव्ह

डिझाइनः डेबी लोईजू, जॉय बार्थोलोम्यू

इलस्ट्रेशनः जिला दस्तमालची

line

फोटोंचे कॉपीराइट्स:

फेडिल बेरिशा, गेरविन पोलू/तालामुआ मीडिया, ग्रेग डिग्यूरी/ गेटी इमेजेस, नेटफ़्लिक्स, मॅनी जेफरसन, यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल), जूनो फोटोग्राफी, ब्रेन मावानडो, एस.एच.रेहान, सीएएमजीइडब्ल्यू, फरहत इल्क, चोले डेसोनेयर्स, रायटर्स, बोउडेव्हीजन बोलमैन, इमरान करीम खट्टक/रेड ऑन फिल्मस, पॅट्रिक डोस, काटे वारेन, शॅरीडन पोयर, फोडो सिमिलास, मॅग्निफिशिएंट लेंस लिमिटेड, डार्सी हेमले, रे रायन फोटोग्राफी टाम, कार्ला पोलिसेला/ महिला मंत्रालय, जेंडर अँड डायर्वर्सिटी (अर्जेंटीना), मॅटिएस सालाझार, अँक्यूमन पिक्चर्स, मार्सिया विंडवाय, कार्लोस ओरसी/क्यूस्ताओ डे सिनसिया, यूरी ओगराकोव, सेटिज़/@setiz, मेड अंतरावान, पीटर हर्ले, जैसन बेल, यूनिवर्सिटी ऑफ़ शेफ़ील्ड हॅलाम, कॅरोलीन मर्डोक, इमाद मनकुसा, डेविड एम बेनेट/ गेटी इमेजेस, ईस्ट वेस्ट इंस्टिट्यूट फ्लिकर गॅलरी, राशेद लोवान, अब्दुल्लाह रफीक, आरएफएच, जेन्नी लेविस, राम प्रकाश स्टूडियो, ओस्लो फ्रिडम फोरम, कियान हॅयारी/मलाला फंड, फातिमा हसानी, नसरीन राओफी, मोहम्मद अनवर दानिश्यार, सोफी शेनिवाल्ड, पेयाज जहनबीन, जेम्स बॅटन.

100 women BBC season logo

100 विमेन काय आहे?

बीबीसी 100 विमेन ही दरवर्षी जगभरातून 100 प्रभावशाली आणि प्रेरणादायक ठरणाऱ्या महिलांची यादी असते.

आमही या महिलांच्या आयुष्यावर आधारित माहितीपट आणि फिचर तयार करतो, त्यांच्या मुलाखती घेतो. या सर्व गोष्टी महिलाकेंद्रीत असतात.

आपण बीबीसी 100 विमेनला इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करू शकता,

#BBC100Women वर चर्चा करू शकता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)