School Rape Culture : 'मला पुन्हा शाळेत जायचे नाही, त्याने माझ्यावर बलात्कार केला'

फोटो स्रोत, RACHEL HALLIWELL
- Author, हॅना प्राईस
- Role, बीबीसी थ्री
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
जून 2020 मध्ये शाळांमधील बलात्कार संस्कृती (रेप कल्चर) बाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेमध्ये अनेकांनी अनुभव मांडले. याठिकाणी संपूर्ण युकेमधील जवळपास 54,000 एवढ्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी (निनावी) त्यांचे अनुभव मांडले.
शाळांमध्ये होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आणि पीडितांना सहाय्य करण्यासाठी प्रशासनानं आणखी बरंच काही करणं गरजेचं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्यापैकी काही जणांशी बीबीसीनं चर्चा केली. बीबीसीनं काही दिवसांपूर्वी केलेली ही बातमी पुन्हा शेयर करत आहोत.
झारा मॅकडरमॉट 21 वर्षांच्या असताना घरी जात होत्या त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता. दिवसा घरापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर त्या होत्या त्यावेळी त्यांना या हल्ल्याचा सामना करावा लागला.
एक किशोरवयीन मुलगा त्यांचा पाठलाग करत होता. त्यानं त्यांना तारेच्या कुंपणावर ढकललं आणि त्यांचे कपडे काढण्याचा तसंच विनयभंग करण्याचा प्रयत्नही केला.
सुदैवानं रस्त्यावरून जाणाऱ्या एका जणानं पाहिलं आणि तो मदत करायला आला म्हणून सुटका झाल्याचं झाला सांगतात.
"तो एक शालेय विद्यार्थी होता, अंदाजे तो 15 वर्षांचा असेल," असं त्या म्हणाल्या.
त्यांनी पोलिसांत याची तक्रार केली पण त्यांना गुन्हेगार शोधण्यात आणि त्याला शिक्षा देण्यात यश आलं नाही.
या घटनेनंतर त्या एकूणच रेप कल्चर आणि तरुणवयापासून अशा प्रकारच्या वर्तनामध्ये कशाप्रकारे वाढ होत जाऊ शकते याचा विचार करू लागल्या. "मला त्याला पकडायचं होतं. कारण यातून बचावल्यानंतर त्याला अधिक गंभीर अत्याचार करण्याची संधी आणि प्रोत्साहन मिळेल असं मला वाटत होतं."
झाला 2018 मध्ये लव्ह आयलंडमध्ये झळकल्या त्यानंतर त्या प्रसिद्धीझोतात आल्या आणि सध्या त्या मॉडेल, इनफ्लुएंसर आणि प्रेझेंटर म्हणून काम करतात. महिला आणि मुलींबरोबरच्या अशा घटना अगदी सामान्य असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं आहे. त्यामुळं ही घटना मनात दाबून ठेवल्याचं त्या सांगतात.
'तरुण मुले अश्लील मेसेज पाठवतात'
सोमा सारा यांनी जेव्हा इन्स्टाग्रामवर वाढत असलेल्या रेप कल्चरबाबतचा अनुभव शेअर केला, तेव्हा तो जगभरात पोहोचेल याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांनी पोस्ट केल्यानंतर काही वेळातच त्यावर प्रतिक्रियांचा पूर आला. तो एक अनुभव हजारोंच्या कथा सांगणारा होता. अनेकांना शाळांमधील रेप कल्चरचा त्यांच्यावर कसा परिणाम झाला हे व्यक्त करण्याचा तो एक मार्ग मिळाला.
अनेक खासगी आणि सरकारी शाळांवरही टीका करण्यात आली आणि युकेमधील शाळांवर या चळवळीचा मोठा परिणाम झाला.
एवढ्या प्रमाणावर शाळांमध्ये चर्चा होऊनही अजूनही तरुण मुलांकडून उघडपणे अश्लील मेसेज येत असल्याचं झारा यांनी सांगितलं.
"मला 11, 12 वर्षांच्या मुलांचे मेसेज येतात. त्यात लैंगिक टिपण्णी केलेली असते, काही लैंगिक गोष्टींची मागणी करणारे मॅसेज असतात. मी अशा वयाची होते त्यावेळी मला याबाबत काहीही माहिती नव्हतं," असं त्या म्हणतात.

झारा यांनी नुकत्यात एका माहितीपटात अनेक तरुणींशी चर्चा केली आहे. त्यात या तरुणांनी शाळेत असताना अनुभवलेल्या लैंगिक हिंसाचाराचा त्यांच्या संपूर्ण जीवनावर कसा परिणाम झाला, याबाबत माहिती दिली आहे.
"हा प्रकार (रेप कल्चर) प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक ठिकाणी असून जवळपास प्रत्येक तरुणीनं मुलीनं ते अनुभवलं असल्याचं ऐकून प्रचंड वाईट वाटलं," असं त्या म्हणाल्या.
एका अल्पवयीन मुलीनं गुप्तपणे तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती आमच्याबरोबर शेअर केली. तिच्याबरोबर काय झालं याची शाळेत तक्रार करायला अजूनही भीती वाटत असल्याचं ती सांगते.
"या संपूर्ण विषयातील सर्वात मोठी अडचण म्हणजे पीडित असलेल्या बहुतांश मुलींना असं वाटतं की त्यांच्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही. शिवाय त्यांच्या तक्रारीनंतर होणारे परिणाम हे या अत्याचारापेक्षा गंभीर असतील, असं त्यांचं मत असतं," असं झारा म्हणाल्या.
"प्रत्यक्ष अत्याचारापेक्षाही त्याची तक्रार करण्यासंदर्भातील परिणाम हा दीर्घकालीन आणि गंभीर असू शकतो, हा विचारच वेदनादायी आहे. कारण तेवढ्या प्रमाणात या तरुणी खचलेल्या असतात."
'पीडितांना घाबरवणं'
अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारीनंतर सरकारनं यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली आणि शाळांमधील लैंगिक अत्याचारांची माहिती घ्यायला सुरुवात केली. खासगी आणि सरकारी दोन्ही प्रकारच्या शाळांमध्ये मुलांचं गैरवर्तनापासून संरक्षण करण्याबाबत ऑफस्टेडला सूचना करण्यात आल्या.
NSPCC ने शालेय अत्याचारासाठी एप्रिल 2021 मध्ये हेल्पलाईन सुरू केली तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 800 तक्रारी यावर प्राप्त जाल्या. त्यात नकोसा असलेला लैंगिक स्पर्श, अश्लिल फोटो, लैंगिक अत्याचार यांचा समावेश होता.
तक्रार करता येणार नाही किंवा आपलं कोणी ऐकणार नाही अशी आधीची भावना असल्याचं पीडितांनी घटनेनंतर सांगितलं असं, NSPCC हेल्पलाईन सर्व्हीसच्या प्रमुख सँड्रा रॉबिन्सन यांनी बीबीसी थ्रीबरोबर बोलताना सांगितलं. संबंधित शाळांनी प्रकरणं योग्यपणे हाताळली नाहीत आणि काही प्रकरणात पीडितांना कारवाई करू नये म्हणून दबाव आणल्याचंही काही पालक आणि शिक्षकांनी सांगितलं.
'बलात्कार, छळ आणि धमकी'
"मला पुन्हा शाळेत जायचे नाही. त्याने माझ्यावर बलात्कार केला."
सेमिना हॅलिवेल हिनं मृत्यूपूर्वी तिची आई रेशेल हॅलिवेल बरोबर बोलताना उच्चारलेले हे अखेरचे शब्द होते.
तिचं वय अवघे 12 वर्ष होतं.
"ती कायम आनंदी राहणारी मुलगी होती. तिला गाण्याची, नाचण्याची आणि डिस्नेचे चित्रपट पाहण्याची प्रचंड आवड होती. ती खूप सुंदर होती," असं रेशेल म्हणतात.
कोव्हिड 19 मुळं लागलेल्या लॉकडाऊनमुळं सहावीतील अखेरचे काही महिले शाळा झाली नाही, त्यामुळं सप्टेंबर 2020 मध्ये शाळेसाठी सेमिना प्रचंड उत्सुक होती.

फोटो स्रोत, RACHEL HALLIWELL
पण काही महिन्यांनी अचानकपणे तिचं वागणं बदललं असं रेशेल सांगतात. सेमिना शांत राहू लागली होती, मूडी बनली होती आणि कायम फोन वापरत असायची. तिथूनच तिचं स्वतःला त्रास करून घेणं सुरू झालं होतं.
सेमिनाने CAMHS (Children and Adolescent Mental Health Services - बाल आणि किशोरवयीन मानसिक आरोग्य सेवा) मध्ये संपर्क साधायला सुरुवात केली होती. पण नेमकं काय घडलं ते तिनं कुणालाही सांगितलं नाही.
मार्चमध्ये रेशेल यांच्या लक्षात आलं की, सेमिना यांना शाळेतल्या मोठ्या मुलाचे मेसेज येत होते. सेमिनानं त्यांना सांगितलं की सुरुवातीला तो चांगला होता आणि तिचं कौतुक करत असायचा. हे काही दिवस चाललं पण नंतर धमक्या द्यायाला त्यान सुरुवात केल्याचं, तिनं आईला सांगितलं.
सेमिनानं सांगितलं की, काही स्नॅपचॅट मॅसेजमध्ये तो मला तू जर मला अश्लील फोटो पाठवले नाही तर मी तुला ब्लॉक करेन अशी धमकी देत होता. तिनं नकार दिल्यानंतर तो तिला भेटण्यासाठी अक्षरश: भीक मागत होता.
"त्याने तिला एवढा आग्रह केला की, अखेर तिला त्याला भेटण्यासाठी होकार द्यावा लागला," असं तिनं सांगितल्याचं रेशेल म्हणाल्या.
मदर्स डेच्या आधीच्या रात्री सेमिनावर डोंगर कोसळला.
"तिनं मला सांगितलं की त्यानं तिचा बलात्कार झाला आहे. तो क्षण कसा होता याचं मी वर्णनही करू शकत नाही," असं रेशेल म्हणाल्या.
"तिच्याशिवाय माझं संपूर्ण आयुष्य कसं बदलून गेलं हे मी शब्दात वर्णन करू शकत नाही."
पण त्यानंतर सेमिना इतरांकडून कायम ऑनलाईन आणि शारीरिक अत्याचाराची बळी ठरली. ते सातत्यानं सुरू होतं. सेमिनाचा छळ केला जात होता. तिला मारहाण, धमकावण्याचे प्रकार झाले. खोटारडी असल्याचं म्हणत हिणवलं गेलं, असं तिच्या आईने सांगितलं.
पोलिसांनी त्या मुलाची चौकशी केली पण त्याच्यावर कारवाई न करता त्याला सोडून देण्यात आलं.
'तिचा मृत्यू टाळता आला असता'
शाळेला याबाबत माहिती दिली पण त्यांनी कारवाई केली नाही, असं रेशेल म्हणाल्या.
कोव्हिड बबलनुसार तो मुलगा आणि सेमिनाचा शाळेचा एक दिवस सोबत येत होता. त्यादिवशी सेमिना शाळेत जाण्यास नकार देऊ लागली.
जून महिन्यात सेमिनानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर चार दिवसांनी हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला, असं रेशेल यांनी सांगितलं.
सेमिनाही स्वभावानं अगदी गरीब होती. तिला शाळेत जाऊन परत त्यामुलासमोर जायचीही भीती वाटत होती, असं रेशेल म्हणाल्या. सर्वात वेदनादायी बाब म्हणजे, सेमनाचे अखेरचे शब्द हे तिचा बलात्कार झाला त्याबाबतचे होते, असं त्यांनी सांगितलं.
"त्याचा एवढा गंभीर परिणाम तिच्या मनावर झालेला होता," असं त्यांनी सांगितलं.
कोमामध्ये असतानाच सेमिनाचा मृत्यू झाला.
"कुटुंब म्हणून आम्ही आता कधीही पूर्वीसारखे असणार नाही," असं त्या म्हणाल्या.
"तिचा मृत्यू टाळता आला असता, त्यामुळं यासाठी लोकांना जबाबदार ठरवायला हवं."
'बदल व्हायला हवा'
सेमिनाला प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही, असं रेशेल यांना वाटतं. शाळांमध्ये अजूनही सुरू असलेल्या रेप कल्चरचा सामना करण्यासाठी खूप काही करणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, RACHEL HALLIWELL
"जर 12 वर्षांची मुलगी तिच्याबरोबर असं घडलं आहे हे सांगत असेल तर याचा गंभीरपणे विचार करायला हवा."
"जर 12 वर्षांची ही मुलगी या लढ्यात अपयशी ठरली आणि त्याबाबत काहीही झालं नाही ही बाब पुढं आल्यानंतर अशा अत्याचाराला बळी पडणाऱ्या पीडित तरुणी पुढं येऊ शकणार नाही. त्यामुळं यात बदल व्हायला हवा."
"काहीतरी करायला हवे."
सेमिना यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आणि बलात्कार तसंच इतर आरोपांची चौकशी करत असल्याचं स्पष्ट केलं.
रेशेल या आता इतर मुलींबरोबर असं काही घडू नये यासाठी सेमिना फाऊंडेशन नावाची संस्था सुरू करून काम करत आहेत. शाळांमध्ये बलात्कार पीडितांच्या सुरक्षिततेसाठी योग्य काळजी घ्यावी यासाठी सरकारलाही त्या आवाहन करत आहेत.
नुकताच सेमिनाचा वाढदिवसही होता.
"ती किशोरवयात पदार्पण करणार होती. हे सर्व अत्यंत वेदनादायी आहे," असं रेशेल म्हणाल्या.
"जूनमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं आम्हाला तीव्र दुःख आहे. शाळेच्या परिसराबाहेर घडलेल्या या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाच्या तपासासाठी स्टॅन्ले हायस्कूल संबंधित संस्थांना मदत करेल," असं सेमिनाच्या शाळेनं बीबीसी थ्री बरोबर बोलताना सांगितलं.
विद्यार्थी आणि पालकांना आवश्यक असलेली सुरक्षितता प्रदान करण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. मुलांबाबत कोणत्याही समस्येसाठी शाळेशी संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
पुढे काय होणार?
जून महिन्यांत शाळांतील रेल कल्चरबाबत ऑफस्टेडचा अहवाल प्रसिद्ध झाला. 11 वर्षे वयापर्यंतची मुले काही मुलींना संपर्क करून अश्लील फोटोची मागणी करतात असं त्यात म्हटलं आहे.
शाळा आणि महाविद्यालयांनी सर्व प्रकारच्या लैंगिक अत्याचार आणि अशा प्रकारांची दखल घेतली जाईल, असं वातावरण तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे.
"पालक, विद्यार्थी, तरुण, शाळा, सरकार आणि गुन्हेगारी न्यायव्यवस्था या सर्वांनी एकत्रित संवाद साधून यावर योग्य तोडगा शोधणं गरजेचं आहे," असं सर्वांनी बीबीसी थ्रीबरोबर बोलताना सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























