पाकिस्तानातील 'या' हिंदू महिलेने मंदिरातच शाळा भरवणं का सुरू केलं?

शाळा

फोटो स्रोत, Akhter hafeez

    • Author, अख्तर हफीज
    • Role, पत्रकार
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पाकिस्तानच्या हैदराबाद येथील फलिली परिसरात गफूर शाह कॉलनी आहे. या परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सकाळ होताच पाठीवर दप्तर अडकवून मंदिराच्या दिशेने निघतात.

खरं तर मंदिर म्हणजे एक प्रार्थनास्थळ आहे. पण सोनारी बागडी नामक शिक्षिकेने या मंदिराचं रुपांतर शाळेमध्ये केलं आहे.

सोनारी बागडी यांचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालं आहे. या इयत्तेपर्यंत शिकणाऱ्या त्या आपल्या कुटुंबातील तसंच जत्थ्यातील पहिल्याच महिला आहेत. आता त्यांनी स्वतःला मुलांच्या शिक्षणासाठी समर्पित केलं आहे.

सोनारी सिंध येथील बागडी या भटक्या समाजाच्या आहेत. या समाजात शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं जात नाही. या समाजाचे बहुतांश नागरिक शेती किंवा हंगामी व्यवसाय करतात.

भटका बागडी समाज

बागडी हा एक भटका समाज आहे. हा समाज काठियावाड आणि मारवाडमधून सिंध प्रांतात दाखल झाला होता. बागडी या शब्दाचा प्रयोग राजस्थानातील बिकानेर परिसरात राहणाऱ्या एका हिंदू राजपूतसाठी केला जातो.

गुरुदासपूर येथील बागडी सुलहेरिया आहेत. ते आपल्या जत्थ्याला बागडिया किंवा भागड असं संबोधतात.

हा भटका समाज अलाउद्दीन घोरीच्या काळात दिल्लीतून पलायन करणाऱ्या राजपूतांपैकी एक आहे.

पाकिस्तान

फोटो स्रोत, Akhtar hafeez

आजही या समाजातील मुख्य व्यक्ती घरातील पुरुषाऐवजी महिला असते.

घरातील सर्व महत्त्वाच्या कामांची जबाबदारी महिला सांभाळते. समाजातील बहुतांश पुरुष किंवा महिला एकत्र काम किंवा मजुरी करतात.

बागडी मूळ स्वरुपात भटका समाज मानला जातो. पण गेल्या काही काळापासून या समाजातील नागरिक काही ठिकाणी कायम स्वरुपी वास्तव्याला असतात.

भारतीय तसंच पाकिस्तानी समाजात बागडी समाजाला अनुसूचित जातींच्या यादीत मोजलं जातं. त्यामुळे या समाजाच्या वाट्याला काही प्रमाणात द्वेष तसंच भेदभाव या समस्या आल्या आहेत.

एक दलित समाज म्हणून कष्ट सहन करणं यांच्यासाठी आव्हानात्मक राहिलं. इतकंच नव्हे तर एखाद्याला कनिष्ठ दर्जाचं संबोधण्यासाठी बागडी या शब्दाचा वापर केला जातो. अशा चुकीच्या पायंड्यामुळे समाजातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा झाली.

मंदिर

फोटो स्रोत, Akhtar hafeez

पण, असं असूनही बागडी समाज मागे राहिला नाही. त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतः तयार केला. नवनव्या पद्धती वापरून समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

चौथ्या इयत्तेतच शिक्षक होण्याचं ठरवलं

सोनारी बागडी या चौथी इयत्तेत शिक्षण घेत होत्या. तेव्हाच त्यांनी शिक्षक होण्याचं ठरवलं होतं.

हैदराबादच्या हुसैनाबाद परिसरातून त्यांचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालं.

2004 मध्ये लग्नानंतर त्या फलिली परिसरातील कॉलनीत वास्तव्यास आल्या.

लग्नानंतर सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी पतीसोबत मजुरी केली. कापूस, गहू, मिरची या पीकांच्या काढणी, कापणी, वगैरेंचं काम त्या करायच्या.

शाळा

फोटो स्रोत, Akhtar hafeez

दुसरीकडे सोनारी यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न अजूनही जिवंत होतं. त्यावेळी त्यांनी शहरातील मंदिरालाच शाळेत बदलण्याचा निर्णय घेतला.

आपल्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मंदिरात शाळा उघडण्याची परवानगी मिळवली.

सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त 3 मुली शिकायला होत्या. त्यापैकी 2 मुली तर त्यांच्या स्वतःच्याच मुली होत्या.

पण हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. आज घडीला या शाळेत 40 विद्यार्थी शिक्षण घेतल आहेत.

'आमच्या समाजात मुलांनाही शिकवलं जात नाही'

सोनारी बागडी यांना एक स्थानिक दानशूर व्यक्ती दरमहा साडेपाच हजार रुपयांचा पगार देते, असं त्यांनी सांगितलं.

सोनारी यांच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पाच विद्यार्थिनी माध्यमिक शाळेत जाऊ लागल्या. त्यामध्ये दोन मुली सोनारी यांच्याच आहेत.

शाळा

फोटो स्रोत, Akhtar hafeez

त्या सांगतात, "आमच्या समाजात मुलीच नव्हे तर मुलांनाही शिकवलं जात नाही. आमच्या घरातली शाळेत जाणारी मी पहिलीच मुलगी होते. आपल्या समाजासाठी काहीतरी करावं लागेल, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर मुलांना शिकवणं हे माझं ध्येय बनलं."

आजही त्या शहरात शिक्षण घेणं अवघड आहे. लोकांना मजुरी आणि इतर व्यवसाय करणं आवडतं. तसंच मुलींचं कमी वयातच लग्न करून दिलं जातं.

अशा स्थितीतही सोनारी यांना याच्या उलट विचार करून आपला मार्ग निवडला. हा मार्ग अवघड असला तरी अशक्य नक्कीच नव्हता.

सोनारी म्हणतात, "आमच्या शहराती हे मंदिर सर्वात चांगलं ठिकाण आहे. कुणी पाहुणा आला तरी त्याची राहण्याची सोय इथंच करण्यात येते.

राम पीर उत्सवादरम्यान येणारे यात्रेकरू इथंच राहतात. हे मंदिर आमच्यासाठी सर्व काही आहे."

शाळा इथून खूप दूर आहे. मुलांना ओढा पार करून जावं लागतं. रस्त्यात कुत्र्यांनीही मुलांना अनेकवेळा चावलं. तसंच जाण्याचं प्रवासभाडंही जास्त आहे, असं त्यांनी सांगितलं.

चार दशकांपूर्वी बांधलेलं मंदिर

सोनारी बागडी यांनी शाळा सुरू केलेलं हे शिव मंदिर चार दशकांपूर्वी बांधण्यात आलं होतं.

बागडी समाजाचे लोक 70 च्या दशकात मटियारी जिल्ह्यातून याठिकाणी आले. त्यावेळी फलिली परिसरात दाट जंगल होतं. त्यावेळी इथं वस्ती वसवताना अडचणी आल्या नव्हत्या.

विद्यार्थिनी

फोटो स्रोत, Akhtar hafeez

पण आता जलसिंचन विभागाने या जमिनीवर दावा केला आहे. झऱ्याच्या दोन्ही बाजूंना 60 फूट सरकारी जमीन आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

त्यांनी अतिक्रमण हटावची मोहीमही सुरू केली. त्यामध्ये बागडी, कोहली, भील आणि जानडाड यांच्या वस्त्यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांच्या मते मंदिरसुद्धा अतिक्रमण केलेल्या भागातच समाविष्ट आहे.

मंदिराला धोका

या प्रकरणी न्यायालयात एक खटलाही सुरू आहे. त्यामुळे सोनारी बागडी यांना आपल्या मंदिराची काळजी वाटते.

मंदिर

फोटो स्रोत, Akhtar hafeez

जलसिंचन विभागाचे अभियंता सिद्दीक सांद यांच्या मते, त्यांना कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं लागेल. लोकांनी इथं वर्षानुवर्षे अतिक्रमण केलं होतं. ओढ्याच्या दोन्ही बाजूंना 60 फूट जमीन आम्हाला रिकामी करायची आहे. मंदिरही त्यामध्ये येतं. पण इथं शाळा असल्याने आम्ही याला हात लावला नाही."

दरम्यान, विभागाने मंदिराला वाचवण्याची सूचना केली, किंवा आवश्यक ती जमीन मिळाली, तर हे पाडण्याची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)