सहा महिने हृदयात बंदुकीची गोळी अडकलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

हृदय, शस्त्रक्रिया, गोळीबार, विज्ञान

फोटो स्रोत, AYUB TEACHING HOSPITAL

फोटो कॅप्शन, ही गोळी अडकली होती.
    • Author, मोहम्मद झुबेर खान
    • Role, पत्रकार
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

हृदयात अडकलेली गोळी घेऊन सहा महिने राहिलेल्या महिलेची कहाणी

"त्या रुग्ण महिलेच्या ऑपरेशनला आम्ही सुरुवात केली. ज्या ठिकाणी गोळी फसलेली असेल अशी अपेक्षा होती तिथून म्हणजेच छातीच्या भागापासून आम्ही ऑपरेशनची (शस्त्रक्रिया) सुरुवात केली. पण आम्ही हृदयाच्या आसपास शोधाशोध केली, नसांना हटवूनही पाहिलं, पण कुठही गोळी आढळली नाही. तोपर्यंत मला रुग्ण महिलेची प्रचंड चिंता वाटायला सुरुवात झाली होती. कारण सहा महिन्यांपासून बंदुकीची एक गोळी तिच्या छातीमध्ये अडकलेली होती."

खैबर पख्तूनख्वाच्या अबोटाबाद शहरामध्ये असलेल्या, अय्यूब टिचिंग हॉस्पिटलच्या डॉक्टर जाहीद अली शाह यांच्यासाठी ही फार काही आश्चर्यकारक अशी बाब नव्हती. थोरॅसिक सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून, त्यांनी यापूर्वी अशा अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत.

पण त्यादिवशी समोर असलेला प्रश्न म्हणजे, 'नेमकी गोळी गेली कुठं?' हा होता.

'काढता येणार नाही, अशी गोळी'

नाझिया नदीम पेशावरमधील एका गावातील रहिवाशी आहेत. त्यांचे पती नदीम खान आफ्रिदी कराचीमध्ये काम करतात. तर त्या सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्यासह तीन मुलांबरोबर राहतात.

"फेब्रुवारीच्या महिन्यातले शेवटचे काही दिवस होते. संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही अंगणात बसलो होतो. अचानक मला असं वाटलं की, काही तरी माझी छाती फाडून, माझ्या शरीरात घुसलं आहे. मी, जोरात जमिनीवर कोसळले," असं त्या सांगतात.

नाझिया यांच्या मते, त्यांचे सासरचे लोक त्यांना लगेचच रुग्णालयात घेऊन गेले. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.

"मला गोळी लागली आहे आणि ती काढता येऊ शकत नाही अशा जागी अडकल्याचं, मला ऑपरेशननंतर सांगण्यात आलं. मात्र रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आणि छातीवर उपचार करण्यासाठी एक शस्त्रक्रिया करण्यात आली."

नाझिया यांना गोळी लागली तेव्हा त्यांच्या गावात तीन-चार विवाह सोहळे होत होते. सगळ्याच सोहळ्यांमध्ये फायरिंग सुरू होती. त्यामुळं गोळी नेमकी कुठून आली, हा अंदाज लावणं कठीण होतं.

आमच्या परिसरात लग्नामध्ये फायरिंग होणं यात काही नवीन नाही. पण अशा कुठून तरी येणाऱ्या अज्ञात गोळ्यांमुळं अनेकांचा जीव गेला असल्याचं, नाझिया नदीम यांचे पती नदीम खान आफ्रिदी म्हणाले.

"माझी पत्नीदेखील अशाच गोळीची शिकार ठरली. त्यामुळं आमच्या नशिबात सहा महिन्यांच्या वेदना आणि अनेक अडचणी निर्माण झाल्या."

"जगणं कठीण झालं होतं"

पेशावरमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर छातीमध्ये सतत वेदना होत होत्या. या वेदना एवढ्या तीव्र होत्या की मला उठताही येत नव्हतं, असं नाझिया यांनी सांगितलं.

"माझी तीन मुलं आहेत. सर्वात लहान दीड वर्षाचा आहे. पण मी उठून मुलांचं काही काम करू शकेल, एवढीही शक्ती माझ्यात नसायची. मला थोडंही ओझं उचलता येत नव्हतं."

तीन लहान मुलं असलेल्या आईचं दैनंदिन जीवन हे साधारणपणे अत्यंत व्यग्र असतं. त्यांना सारखं मुलांच्या मागे धावावं लागतं. पण नाझिया वेदनाशामक औषधं घेत होत्या. त्यामुळं दिवसातून बहुतांश वेळ त्या जवळपास बेशुद्धावस्थेतच असायच्या.

हृदय, शस्त्रक्रिया, गोळीबार, विज्ञान

फोटो स्रोत, AYUB TEACHING HOSPITAL

फोटो कॅप्शन, हृदय

मात्र, एकत्र कुटुंबात असल्यामुळं त्यांचे सासू, सासरे आणि जाऊ यांनी त्यांच्या वाट्याचं कामही सांभाळून घेतलं.

"त्या वेदनांनी माझं जगणं एवढं कठीण केलं होतं की, मला लहान मुलाला देखील उचलून घेता येत नव्हतं. घरची माणसंच माझ्या मुलींची काळजी घ्यायचे."

डॉक्टरांकडे पैसे घालवणे हाच उपचार

पत्नीच्या अपघाताची माहिती मिळताच नदीम आफ्रिदी कराचीहून सुटी घेऊन काही दिवसांसाठी पेशावरला आले. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी पत्नीला घरी आणलं होतं. पण पत्नीला छातीमध्ये होणाऱ्या वेदना असह्य होत होत्या. त्यांच्या पत्नी रोज या वेदनांची तक्रार करायच्या.

पत्नीला वेदना व्हायला लागल्या, आणि असह्य झाल्याने ती खूप रडायला लागायची. तिला अगदी कशाचंही भान राहत नव्हतं. ''मी सुटी घेतली आणि पेशावरमधील एकही असा डॉक्टर सोडला नाही, ज्याच्याकडून मी पत्नीचं चेकअप केलं नसेल," असं आफ्रिदी म्हणाले.

नदीम यांच्या मते, त्या सहा महिन्यांमध्ये ते दर आठवड्याला नाझिया यांना एखाद्या डॉक्टरकडं घेऊन जात होते. बहुतांश डॉक्टर, "गोळी अशा जागी आहे, की त्याठिकाणाहून ती काढणं शक्य नाही," असंच सांगायचे.

"असं होणं म्हणजे अगदीच काही नवीन बाब नाही, मात्र वेदनांवर काहीही उपाय नाही," असं डॉक्टर म्हणायचे.

"बऱ्याचदा मला, एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवयाचे. त्यामुळं मी अनेक डॉक्टरची फीस भरली. अनेक प्रकारच्या चाचण्या, एक्स-रे, सीटी स्कॅन, अल्ट्रासाउंड यावर पाच ते सहा लाख रुपये खर्च केले. इतर खर्च तर वेगळेच होते."

दरम्यानच्या काळात नदीम यांच्या पत्नीच्या अशा अवस्थेचा परिणाम त्यांचं कुटुंब आणि मुलांवर होऊ लागला होता. "मी काय करावं कुठं जावं, मला काहीही कळच नव्हतं," असं नदीम म्हणाले.

त्यानंतर कोणीतरी नदीम आफ्रिदी यांना अबोटाबादमध्ये डॉक्टर जाहीद अली शाह यांच्याकडं जाण्याचा सल्ला दिला. त्याचं कारण म्हणजे ते अशा गंभीर प्रकरणांचे तज्ज्ञ आहेत.

"आम्ही त्यांच्याकडे तपासणी केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की, एक आणखी शस्त्रक्रिया करावी लागेल, मात्र ते जीवासाठी धोकादायक ठरू शकतं."

हृदय, शस्त्रक्रिया, गोळीबार, विज्ञान

फोटो स्रोत, TWITTER / PTIOFFICIAL

फोटो कॅप्शन, या हॉस्पिटलात शस्त्रक्रिया झाली

अशा प्रकारे हे प्रकरण अबोटाबादच्या अय्यूब टिचिंग इन्स्टीट्यूटमध्ये असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर जाहीद असी शाह, यांच्याकडं पोहोचलं.

सुरुवातीच्या तपासणीच्या अहवालांवरून डॉक्टर जाहीद यांना गोळी महिलेच्या हृदयाजवळ कुठंतरी आहे आणि एका कठीण शस्त्रक्रियेद्वारे ती काढली जाऊ शकते, याचा अंदाज आला होता.

त्यांनी यापूर्वीही अशा कठीण शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यामुळं त्यांना विश्वास होता, असंही ते म्हणाले. "मी दोन वर्षांपूर्वी अशाप्रकारची एक शस्त्रक्रिया केली होती. तेव्हा एका नऊ वर्षाच्या मुलाला गोळी लागली होती. गोळी त्याच्या छातीला लागली आहे, असं सांगितलं जात होतं. पण शस्त्रक्रिया करायला घेतली तेव्हा गोळी प्रत्यक्षात त्याच्या हृदयात असल्याचं लक्षात आलं," असं त्यांनी सांगितलं.

शस्त्रक्रिया सुरू केली तेव्हा ती पाच तास चालेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. आम्ही छातीमध्ये गोळी ज्याठिकाणी अडकली असेल असं वाटत होतं, त्याठिकाणाहून शस्त्रक्रिया सुरू केली, असं डॉक्टर जाहीद अली शाह म्हणाले.

"महिलेच्या हृदयाला हाताने स्पर्श केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की, गोळी हृदयाच्या आत घुसली आहे."

"एक्स-रे केला तेव्हा हृदयाच्या ठोक्यांबरोबर गोळी वर-खाली होत असल्याचं दिसून आलं. त्या महिलेचं शरीर आमच्या समोर होतं. त्या रुग्ण महिलेबाबत मला काळजी वाटू लागली होती. सहा महिन्यांपासून गोळी त्यांच्या छातीमध्ये अडकलेली होती."

"त्यांचं जीवन होतं म्हणून त्या आतापर्यंत जीवंत होत्या. त्यांच्या जीवन आणि मृत्यूमध्ये अगदी किंचित फरक होता, नव्हे त्या थेट मृत्यूच्या दाढेतच होत्या."

तिसऱ्या प्रयत्नात यश

या ऑपरेशनसाठी भूल देण्यात (अॅनेस्थेशिया) तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर अहमद यांची मदत घेण्यात आली, असं डॉक्टर जाहीद म्हणाले.

"मी ईश्वराचं नाव घेतलं. अत्यंत काळजीपूर्वक गोळी लागली होती त्याठिकाणी म्हणजे, हृदयाच्या डाव्या व्हेंट्रिकलमध्ये मार्ग तयार करायला सुरुवात केली. कार्डियाक सर्जन (हृदयाची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर) शस्त्रक्रिया करताना हृदय नियंत्रित करण्यासाठी मशीनचा वापर करतात. पण माझ्याकडे ती सुविधा उपलब्ध नव्हती."

त्यामुळं या महिलेच्या धडधडत्या हृदयावरच मला काम करावं लागणार होतं, असं डॉक्टर जाहीद म्हणाले. अत्यंत नाजूक अशा नसांवर काम करताना, धडकणारं हृदय जेव्हा हलत असतं, तेव्हा छोटीशी चूकही अत्यंत धोकादायक ठरू शकते, असं ते म्हणाले.

"दोन वेळा प्रयत्न केला पण गोळीपर्यंत पोहोचण्यात यश आलं नाही. मात्र, तिसऱ्यावेळी मला यश आलं."

थोरॅसिक सर्जननं हृदयाची शस्त्रक्रिया कशी केली?

संपूर्ण देशात थोरॅसिक सर्जनची संख्या 80 किंवा 90 असेल आणि खैबर पख्तूनख्वामध्ये तर हा आकडा 9 किंवा 10 आहे, असं डॉक्टर जाहीद यांनी सांगितलं.

थोरॅसिक सर्जरीमध्ये छातीमधील सर्व अवयवांची शस्त्रक्रिया केली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रॉमाची 80-90 टक्के प्रकरणं थोरॅसिक सर्जरी विभागाला पाहावी लागतात.

"मी आधी ऑर्थोपेडिक सर्जरी शिकत होतो. पण वैद्यकीय आणि शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात सध्या सर्वाधिक आवश्यकता ही थोरॅसिक सर्जरीच्या विभागात आहे, असं मला वाटलं. त्यामुळं मी या क्षेत्रात आलो, असं डॉक्टर जाहीद अली शाह यांनी सांगितलं.

हृदय, शस्त्रक्रिया, गोळीबार, विज्ञान

फोटो स्रोत, AYUB TEACHING HOSPITAL

फोटो कॅप्शन, डॉ. झाहीद अली शहा यांनीच शस्त्रक्रिया केली

आमच्याकडे सोयी सुविधा या आधीच कमी असतात, असं डॉक्टर जाहीद अली शाह यांनी सांगितलं. "एकदा शस्त्रक्रियेसाठी छाती उघडली तर संबंधित तज्ज्ञाला फोन नक्की केला जातो, मात्र तुमची वैयक्तिक शक्ती तेवढी जास्त नसते. बहुतांश वेळा संबंधित तज्ज्ञ दुसऱ्या सर्जरीमध्ये व्यस्त असतात."

ते स्वतःदेखील त्यांच्या रुग्णालयात अत्यंत व्यस्त असतात असं, त्यांनी सांगितलं.

"गेल्या आठवड्यात मी मंगळवारी शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. त्यानंतर मी गुरुवारपर्यंत सुटी न घेत रोज शस्त्रक्रिया केल्या. यावरून तुम्हाला अंदाज लावता येईल. अशा परिस्थितीत कार्डियाक (हृदयाशी संबंधित) गोष्टीही शिकाव्या लागल्या," असं डॉक्टर जाहीद म्हणाले.

"ते 15-20 सेकंद"

पाच तास चाललेली ती शस्त्रक्रिया मी एकट्यानं सांभाळली. या दरम्यान मला थकवा आला नाही. मात्र मी स्वतःला चांगलं वाटावं म्हणून आराम नक्की केला, असं डॉक्टर जाहीद अली शाह म्हणाले.

"माझ्या मनात केवळ एकच विचार होता, तो म्हणजे रुग्णाला वाचवायचे आहे. त्यासाठी मी सर्वकाही पणाला लावलं."

ते गोळीपर्यंत पोहोचले आणि ती बाहेर काढली तेव्हा पंधरा सेकंदांसाठी रुग्णाचा रक्तदाब अत्यंत कमी झाला होता. त्यामुळं रुग्णाचं जवळपास एक बॅगपेक्षा अधिक रक्त वाहून गेलं. ते 15 सेकंद अत्यंत धोकादायक होते.

"त्यांनी लगेचच रक्त चढवलं आणि त्यांच्या हृदयाचं काम सुरू राहावं यासाठी काही उपाय केले. त्यानंतर पुढच्या 20 सेकंदांमध्ये रुग्ण स्थिर झाला. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की, सहा महिने हृदयात गोळी बाळगणाऱ्या या महिलेची स्थिती आता स्थिर आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)