पाकिस्तानात श्रीकृष्णाची मूर्ती गोकुळाष्टमीच्या दिवशीच कशी तुटली?

फोटो स्रोत, AZAAD RAAJAR
- Author, हुदा इकराम
- Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातल्या खिपरो प्रांतात गोकुळाष्टमीच्या उत्सवादरम्यान श्रीकृष्णाची मूर्ती भंगल्यानंतर आयोजकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
आयोजकांचं म्हणणं आहे की पोलिसांनी इथे लाठीमार केल्यानंतर इथे चेंगराचेंगरी झाली आणि या गोंधळात देवाची मूर्ती तुटली, तर पोलीस अधिकाऱ्यांनी हे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलंय.
त्यांनी म्हटलं की स्थानिक लोकांनी कोव्हिड-19 च्या नियमांचं पालन करू असं आश्वासन दिलं होतं पण असं झालं नाही, त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
या प्रकरणी अजून कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. पाकिस्तानात गेल्या काही महिन्यात हिंदुंच्या मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.
काय झालं होतं?
सिंध प्रांतातल्या या भागात हिंदू कोहली समाजाचे लोक दरवर्षी गोकुळाष्टमीचा उत्सव आयोजित करतात. एरवी इथे आठवडाभर हा उत्सव चालतो आणि या दरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रम होतात.
31 ऑगस्टला घडलेल्या या घटनेबद्दल म्हटलं जातंय की या वर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे निर्बंध लावले गेलेत आणि आयोजकांनी स्थानिक प्रशासनाला सांगितलं होतं की ते या कार्यक्रमाचं आयोजन मर्यादित स्वरूपात करतील. त्यांना गोकुळाष्टमीच्या उत्सवानंतर संध्याकाळी 6 ते सकाळी 8 पर्यंत जत्रा भरवण्याची परवानगी दिली होती.
निर्बंधांनुसार एकावेळी मंदिरात फक्त 250 ते 300 लोकांना मंदिरात जाण्याची परवानगी होती. भगवान श्रीकृष्णांची मुर्ती मंदिराऐवजी मोकळ्या जागेत ठेवण्यात आली होती म्हणजे लोकांना कोरोना निर्बंधांचं पालन करून दर्शन घेता येईल आणि पूजा करता येईल.

फोटो स्रोत, AZAAD RAAJAR
कोहली समाजाने पोलिसांना लिखित स्वरूपात आश्वासन दिलं होतं की नियमांचं पालन होईल पण आयोजकांवर आरोप आहेत की त्यांनी नियमांचं पालन केलं नाही.
प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं काय?
इथल्या हिंदुंनी मात्र हे आरोप खोडून काढले आहेत.
ऑल कोहली असोसिएशनच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष दिया राम कोहलीने बीबीसीला सांगितलं की, "पोलीस आणि प्रशासनाने जे नियम ठरवले होते, लोक त्यांचं पालन करत होते पण पोलीस त्यांना उत्सव साजरा करू देत नव्हते."
दिया राम पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या स्थानिक अल्पसंख्यांक शाखेचेही प्रमुख आहेत. त्यांच्यामते ते संपूर्ण घटनेचे प्रत्यक्षदर्शीही आहेत.
त्यांनी सांगितलं, "जेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप सुरू केला तेव्हा तिथे कोणी दुकानदार नव्हते. जी वेळ ठरवली होती त्या वेळेलाच स्थानिक दुकानदार तिथे पोहचले. त्याआधी तिथे फक्त एक महिला होती जी हाताने बनवलेली खेळणी विकायला घेऊन बसली होती. ती महिलाही दरवर्षी तिथे येते. त्यामुळे पोलिसांनाही तिच्याबद्दल माहिती होती."

फोटो स्रोत, SHIRAZ HASSAN
कोहली म्हणाले की, "पोलिसांनी लोकांवर लाठीमार केला. यामुळे तिथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.
त्यांनी म्हटलं की ही घटना 'मुद्दाम घडवण्यात आली नसली तरी पोलिसांच्या उपस्थितीमुळे असं झालं.'
ते पोलिसांना या घटनेसाठी जबाबदार ठरवत आहेत.
पोलिसांचं म्हणणं काय?
संगहारच्या एसएसपींनी या घटनेबद्दल एक पत्रक काढून आपलं म्हणणं मांडलं आहे आणि यात आयोजकांवर आरोप केले आहेत.
या पत्रकानुसार आयजोकांनी लिखित आश्वासन दिलं होतं की लोक कोव्हिड-19 च्या नियमांचं पालन करतील आणि या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या 300 पेक्षा कमी असेल.
पण आयोजकांनी आपला शब्द पाळला नाही असंही यात म्हटलंय.
"मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले होते. वेगवेगळं सामान विकणारे विक्रेते होते त्यामुळे त्या भागाला जत्रेचं स्वरूप आलं होतं. पोलिसांनी इशारा दिला होता की दुकानदारांना तिथून ह़टवलं नाही तर कारवाई केली जाईल. या दरम्यान गर्दी वाढल्यामुळे मूर्ती तुटली."

फोटो स्रोत, Getty Images
या पत्रकात पुढे असंही म्हटलंय की आयोजक आपल्यावर पुढे कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांवर दोषारोप करताहेत. या घटनेच्या विरोधात स्थानिकांनी काही काळ रास्तारोको ही केला होता पण अधिकाऱ्यांनी समजावल्यानंतर हा रास्तारोको मागे घेण्यात आला. या प्रकरणी अजून कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
सरकारचं म्हणणं काय?
सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे मानवाधिकार मुद्द्यांवर विशेष सहकारी असणाऱ्या वीर जी कोहलींनी बीबीसीला सांगितलं की पोलीस तिथे स्थानिक दुकानदारांना हे सांगायला आले होते की त्यांनी लवकरात लवकर तिथली जागा रिकामी करावी. ते जास्त वेळ तिथे थांबले तर आणखीन लोक येतील आणि कोव्हिडच्या नियमांची पायमल्ली होईल.
वीर जी कोहली असंही म्हणाले की, "लोकांनी अफवा पसरवू नयेत." त्यांनी म्हटलं की ते दिवसभर तिथे होते आणि जसं सांगितलं जातंय तसं तिथे काही होताना त्यांनी पाहिलं नाही. पोलीस त्यांचं काम करत होते."

फोटो स्रोत, AFP
वीर जी कोहली म्हणाले की यंदा हिंदूंना आपल्या उत्सवासाठी कमी जागा दिली गेली होती त्यामुळे तिथे जास्त गर्दी झाली होती. त्यांनी सांगितलं की श्रीकृष्णाची मूर्ती त्याच दिवशी सकाळी मातीने बनवलेली होती आणि तकलादू होती.
वाढते हल्ले
पाकिस्तानात गेल्या वर्षभरात हिंदुच्या सात प्रमुख मंदिरांवर हल्ले आणि तोडफोडीच्या घटना समोर आल्यात.
ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात गणपती मंदिरात तोडफोड आणि जाळपोळीची घटना घडली होती. ही घटना रहीम यार खान जिल्ह्यात झाली होती.
गेल्या वर्षी इस्लामाबादमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या अर्धवट बांधलेल्या मंदिरावर हल्ला केला गेला होता. ही अशा प्रकारची पहिली घटना होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कराचीत हनुमान मंदिरात तोडफोड झाली होती. ऑक्टोबर महिन्यात सिंध प्रांतातल्या श्रीराम मंदिरात तोडफोड झाली होती.
डिसेंबर महिन्यात खैबर पख्तूनख्वा भागात जमावाने एक मंदिर पाडलं होतं. मार्चमध्ये रावळपिंडीत 100 वर्षं जुन्या मंदिरावर जमावाने हल्ला केला होता.
जानेवारी महिन्यात सिंध प्रांतातही राणी भटियानी देवी मंदिरावर हल्ला झाला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























