हैती : 7.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरलं हैती, 300हून अधिक ठार

फोटो स्रोत, Getty Images
कॅरेबियन देश असलेला हैती शनिवारी विनाशकारी भूकंपाने हादरला. भूकंपात कमीत कमी 304 जण ठार झालेत तर 1800 हून अधिक जण जखमी झालेत.
शनिवारी सकाळी हैतीच्या पश्चिमेला भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी होती. या भूकंपाने चर्चे आणि हॉटेल्ससह अनेक घरं भुईसपाट झाली.
या नैसर्गिक संकटानं हैतीचं 'अभूतपूर्व नुकसान' झाल्याचं सांगत तिथल्या पंतप्रधानांनी देशात महिनाभरासाठी आणीबाणी घोषित केली आहे.
2010 मध्ये आलेल्या भूकंपातून हैती अजूनही सावरत असताना पुन्हा एका मोठ्या भूकंपाने हैतीचं मोठं नुकसान केलं आहे.
शनिवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू सेंट लुईस डू सूद शहरापासून 12 किमी अंतरावर होता, असं अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण संस्थेने (USGS) सांगितलं.
तब्बल 125 किमी अंतरावर असलेल्या राजधानी पोर्ट-औ-प्रिन्स आणि शेजारील राष्ट्रांमध्येही भूकंपाचे तीव्र झटके जाणवले.
"अनेक घरं उद्ध्वस्त झाली. अनेक जणांचा मृत्यू झाला तर अनेकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत," असं भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने AFP या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
भूकंपाविषयी माहिती देताना हैतीचे पंतप्रधान एरियल हेनरी म्हणाले, "ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना लवकरात लवकर बाहेर काढणे आणि त्यांचे प्राण वाचवणे, हे याघडीला सर्वांत महत्त्वाचं आहे." त्यांनी भूकंपग्रस्त भागाची हवाई पाहाणीही केली.
कठीण काळातून जात असतानाच मोठं संकट
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी हैतीला 'तात्काळ मदती'ची घोषणा केली आहे. नुकसानीचं आकलन, जखमींना मदत आणि पुनर्बांधणीच्या कामी अमेरिका मदत करणार असल्याचं ते म्हणाले.
"हैतीची जनता आधीच कठीण काळातून जात असताना आलेल्या या विनाशकारी भूकंपाने मी व्यथित झालोय," म्हणत बायडन यांनी हैतीच्या जनतेच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं.
भूकंपामुळे हजारो लोक मृत्यूमुखी पडू शकतात आणि जखमी होऊ शकतात, असा इशारा USGS ने यापूर्वीच दिला होता. तसंच भूकंपानंतर 5.8 तीव्रतेचे झटके आणखी बसू शकतात, असाही इशारा या संस्थेने दिला होता.

फोटो स्रोत, EPA
हैतीतील एका स्थानिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक फ्रान्झ डुव्हल यांनी लेस कॅयेस शहरातील दोन हॉटेल्स जमीनदोस्त झाल्याचं आणि शहरातील हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं ट्वीट केलंय.
डुव्हल यांनी ट्वीट केल्यानंतर काही स्थानिक पत्रकारांनी शहरातील बहुतांश चर्च आणि हॉटेल्स कोसळल्याची किंवा त्यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती दिली.
'रस्त्यावर आक्रोश'
लेस कॅयेस शहरातील एका चर्चेच्या प्रमुखांनी न्यू यॉर्क टाईम्स वृत्तपत्राशी बोलताना, "सर्व रस्त्यांवर आक्रोश सुरू आहे. लोक आपले प्रियजन, वैद्यकीय मदत किंवा पाण्यासाठी शोधाशोध करत असल्याचं" सांगितलं.
सोशल मीडियावर भूकंपाने नुकसानग्रस्त झालेल्या इमारती आणि ढिगाऱ्यांच्या फोटोंचा पूर आला आहे.
हैतीतील 'सेव्ह द चिल्ड्रन' या संस्थेच्या संचालक लैला बुराल्हा यांनी न्यू यॉर्क टाईम्स वृत्तपत्राशी बोलताना नुकसानीचं अचूक आकलन करण्यासाठी अजून बराच वेळ लागणार असला तरी "ही एक अभूतपूर्व अशी मानवतावादी आणीबाणी" असल्याचं सांगितलं.
भूकंपामुळे बेड हलत होता आणि त्यामुळे जाग आल्याचं राजधानी पोर्ट-औ-प्रिन्समध्ये राहणाऱ्या 34 वर्षांच्या नाओमी व्हर्नेस यांनी असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
त्या म्हणाल्या, "मला जाग आली आणि चपला घालायलाही वेळ नव्हता. आम्ही 2010 चा भूकंपही अनुभवला होता. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी पळण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. नंतर माझ्या लक्षात आलं की माझी आई आणि दोन मुलं घरातच होती. माझे शेजारी आत गेले आणि त्यांनी त्यांना बाहेर यायला सांगितलं. त्यानंतर आम्ही सगळे रस्त्याच्या मध्यभागी येऊन उभे राहिलो."

फोटो स्रोत, EPA
2010 सालीही हैतीमध्ये विनाशकारी भूकंप झाला होता. त्यात तब्बल 2 लाख लोकांना प्राण गमवावे लागले. त्या भूकंपाने हैतीचं मोठं आर्थिक नुकसानही झालं.
गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येमुळे हैतीमध्ये राजकीय संकट कोसळलं असताना हा भूकंप आला आहे.
जपानी आणि हैती मूळ असलेली आंतरराष्ट्रीय टेनिसपटू नाओमी ओसाकानेही या कठीण काळात आपण हैतीच्या जनतेसोबत असल्याचं ट्वीट केलं आहे.
आपल्या ट्वीटमध्ये ती म्हणते, "मी याच आठवड्यात एका स्पर्धेत भाग घेणार आहे आणि त्या स्पर्धेत मिळणारी बक्षीसाची रक्कम मी हैतीतील मदतकार्यासाठी दान करणार आहे. आपल्या पूर्वजांचं रक्त कणखर आहे आणि आपण सर्व या संकटातूनही बाहेर पडू, याची मला खात्री आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























