टोकियो ऑलिंपिकची डायरी : जपानची क्षणचित्रं आणि अखेरचं पान

जान्हवी मुळे
    • Author, जान्हवी मुळे,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

टोकियोमधला आज माझा अखेरचा दिवस आहे. काही तासांतच परतीचा प्रवास सुरू होईल. त्याआधी तुम्हा सर्वांशी परत एकदा संवाद साधावा असं वाटलं, म्हणून हे लिहिते आहे.

खिडकीबाहेर पडणारा पाऊस आणि सोबत 'माचा' (जपानचा ग्रीन टी). हे क्षण असेच थांबून राहावेत असं वाटतंय. कुठल्याही प्रवासाची अखेर अशीच तर असते. हूरहूर लावणारी, पुन्हा परतायचं वचन देणारी आणि नव्या वाटचालीचे वेध लावणारी.

पण हा प्रवास जास्त लक्षात राहील. कारण काम करता करता आपण इतिहासाचे साक्षीदार आहोत आणि त्याची नोंद करतो आहोत याची जाणीव करून देणारे अनेक क्षण गेल्या महिनाभरात अनुभवले आहेत.

ऑलिंपिकची सांगता झाल्यावर आमच्यावरचे निर्बंध बरेच शिथिल झाले. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांत टोकियोला अधिक जवळून जाणून घेता आलं. खूप काही शिकता आलं. त्याचीच ही टिपणं.

बॉर्डरलेस म्युझियम

टीमलॅब्जच्या बॉर्डरलेस म्युझियमची सैर हा गेल्या दोन दिवासांतला एक अविस्मरणीय अनुभव होता. हे संग्रहालय डिजिटल आर्टला वाहिलेलं जगातलं पहिलं संग्रहालय आहे.

तसं मला डिजिटल आर्टविषयी फारसं प्रेम नाही. पण या कलाकृतीही सृजनाचा नमुनाच असतात. म्हणूनच कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता या संग्रहालयाच्या अंधारलेल्या हॉलमध्ये पाऊल ठेवलं.

जान्हवी मुळे

इथे अनेक दालनं आहेत, त्यात भिंतींवर, फ्लोअरवर सगळीकडे स्क्रीन्स आहेत, आरसे आहेत आणि त्यात सतत फिरती राहणारी चित्र आहेत. हे फारच कोरडं वर्णन आहे, पण हा अनुभवच वर्णन करण्यापलीकडचा आहे.

इथे फिरताना आपणच या डिजिटल कलाकृतीचा भाग होऊन जातो. आसपासचं विश्व खोटं आहे, हे माहिती असूनही त्यात हरवून जातो.

बाकी प्रत्यक्ष जगातही आपण सध्या डिजिटल जगात असल्यासारखे वावरू लागलो आहोत, याची जाणीव झाली.

विरोधाभासांचं शहर

टोकियोच्या असाकुसा भागात काल फेरी मारायला आणि एका बातमीसाठी माहिती गोळा करायला गेले होते. मग संध्याकाळी तिथेच नदीकाठी एका बागेत काही क्षण घालवले. या शहरातले सगळे विरोधाभास एकाच वेळी तिथे दिसून आले.

टोकियो

समोर सुमेडा नदीचं पात्र, त्यापलीकडे जणू आकाशाला भेदणारा टोकियो स्कायट्री टॉवर, मागे जुन्या टोकियोकतल्या इमारती आणि मंदिरांचा परिसर. एका बाजूला कुणीतरी गाण्याचा सराव करतंय. दुसरीकडे बेसबॉलचा सामना सुरू आहे. तिसरीकडे कोपऱ्यात कुणी बेघर माणूस कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये काहीतरी शोधतोय.

कुणी सायकलवरून भर्रकन निघून जातं, एखादी वेगानं आलेली स्पोर्ट्स कार रस्ता ओलांडणाऱ्या एका आजी साठी झेब्रा क्रॉसिंग जवळ सावकाश येऊन थांबते, रेल्वेच्या पुलावरून ट्रेन धडधडत जाते आणि आसपास तरीही सगळं शांत वाटत राहातं.

इतिहासाला जपून आधुनिक रूप कसं घ्यावं, हे टोकियोवासींना छान जमलं आहे. इथे गोंधळालाही एकप्रकारची शिस्त आहे.

कोव्हिडचं आव्हान आणि नव्या पिढीचे प्रश्न

जपानमधले लोक काहीसे मितभाषी, पटकन मिसळत नाहीत. दुसऱ्यांना कसं आदरानं वागवायचं, नियम कसे पाळायचे हे जगानं त्यांच्याकडून शिकावं. इथल्या ट्रेन्समधून प्रवास करताना तर त्याची आणखीनच जाणीव होते.

टोकियो

या शिस्तीमुळेच जपाननं आतापर्यंत कोव्हिडचं आव्हान व्यवस्थित पेललं होतं पण गोष्टी बदलण्याची भीती निर्माण झाली आहे. इथे गेल्या दीड वर्षांत कधीच आपल्याकडे झालं तसं लॉकडाऊन झालेलं नाही.

पण सगळं सुरू आहे म्हणजे सुरळीत आहे, असं मात्र नाही.

शाळा कॉलेजेस हायब्रिड पद्धतीनं सुरू आहेत - म्हणजे ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षण होऊ शकत नाही, किंवा अभ्यास घ्यायला, लक्ष ठेवायला घरी कोणी नाहीत किंवा ज्यांना प्रॅक्टिकल वगैरे आहेत, असे विद्यार्थी प्रत्यक्ष ऑफलाईन शाळेत जातायत.

काल अशाच काही तरुणांना भेटले. निर्बंधांचा त्यांना कंटाळा आला होता आणि जपान तंत्रज्ञानात प्रगत असूनही आपल्याला लस मिळत नसल्यानं त्यांना चीड आली होती.

ऑलिंपिकचं आयोजन यशस्वीपणे करू शकतो, मग लस का मिळत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. माझ्याकडेच काय, कुणाकडेच त्याचं उत्तर नाही.

जपानकडे अजूनही जगाचं लक्ष

महायुद्धाच्या राखेतून उठलेला देश, अणुहल्ल्यानंतरही नव्यानं उभा राहिलेला देश, त्सुनामीनं केलेल्या विध्वंसातून नव्यानं जन्मलेल्या शहरांचा देश अशी जपानची ओळख आहे.

आता जागतिक साथीतून सावरण्यासाठी जगाला नवी आशा देणारा देश, अशी इतिहास जपानची दखल घेईल का, हे काळच ठरवेल. सध्यातरी पुढचे काही आठवडे जपानकडे अजूनही जगाचं लक्ष असेल.

कारण ऑलिंपिक संपलं असलं, तरी 24 ऑगस्टपासून टोकियोमध्ये पॅरालिंपिक खेळांना सुरुवात होते आहे.

त्यासाठी थांबता आलं असतं, तर.. असा विचार याक्षणी मनात येतो आहे. पण घरी परतायची ओढही तेवढीच मोठी आहे. कोव्हिडची साथ संपल्यावर भविष्यात कधीतरी जपानला पुन्हा येईन, एवढं मात्र नक्की.

आज टोकियोतून अखेरचा सायोनारा!

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)