Tokyo Olympics डायरी - पिन एक्सचेंज आणि आठवडाभराच्या प्रवासाचा आढावा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
दिवस इतके भराभर निघून जातात ना, की कधी कधी लक्षातही येत नाही. अनेकदा आपल्या आवडीची गोष्ट करताना कशाचं भान राहात नाही ना, तसं वाटतं आहे अगदी.
म्हणजे पाहा ना, म्हणता म्हणता ऑलिंपिक सुरू होऊन एक आठवडा पूर्ण झालासुद्धा. आज संध्याकाळी कोणीतरी त्याची आठवण करून दिली, तेव्हा लक्षात आलं.
मी तेव्हा टोकिओ बिग साईटच्या चौथ्या मजल्यावरच्या टेरेसवर होते. तिथून या इमारतीचं वैशिष्टय असलेले चार उलटे पिरॅमिड्स इतके सुंदर दिसात..
मी मागे सांगितलेलं, की या ऑलिंपिकचं मेन प्रेस सेंटर आहे आणि ही इमारत माझं दुसरं घर बनली आहे. या गच्चीत बसून चहा सोबत करियागे (म्हणजे जपानी भजीच एक प्रकारची) खात गेल्या आठवड्यात काय काय घडलं याचा विचार करत होते.
भारताचा विचार करायचा, तर एक पदक मिळालं, एक मिळणार हे निश्चित झालंय आणि एक मिळण्याची शक्यता आहे. सायखोम मिराबाई चानूनं रौप्यपदकासह भारताचं खातं पहिल्याच दिवशी उघडल्यावर आज सातव्या दिवशी लोव्हलिनानं दुसरं पदक निश्चित केलंय आणि पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत पोहोचली आहे- म्हणजे पदकाच्या एक-दोन पावलं जवळ आहे.
विजयाच्या आणि पराभवाच्या पलीकडे इथे बरंच काही घडत आहे. आज राही सरनोबतची मुलाखत घेताना त्याची आठवण झाली.
राहीच्या गळ्यातल्या आयकार्डच्या रिबिनवर बऱ्याच वेगवेगळ्या पिन्स लावल्या होत्या. अशा एकमेकांच्या देशांच्या पिन्स जमा करणं, त्या एकमेकांना भेट देणं ही ऑलिंपिकची परंपरा आहे. अगदी सुरुवातीपासूनची.
म्हणजे तुम्ही कोणासोबत पिनची अदलाबदली करता, यावरून तुमची किती जणांशी ओळख किंवा मैत्री आहे हे काहीजण अगदी मिरवतातही. अनेक जण अशा पिन्सचा संग्रहदेखील करतात.

फोटो स्रोत, janhavee moole
तर हा पिन एक्सचेंज होईल की नाही, अशी अनेकांना भीती वाटत होती. कारण अर्थातच कोव्हिड. पण अंतर राखूनही खेळाडू, अधिकारी, पत्रकार ही परंपरा जपताना दिसत आहेत. मलाही एका जपानच्या पत्रकारानं अशी पिन दिली आहे.
अशा कितीतरी गोष्टी आठवडाभरात घडल्या आहेत.
मैदानात, कोर्टवर, स्मिमिंग टँकमध्ये - ऑलिंपिकच्या प्रत्येक व्हेन्यूमध्ये - गेल्या आठ दिवसात नवीन कहाण्या लिहिल्या गेल्या आहेत. इथे आलेल्या प्रत्येकाचीच खरं तर एक कहाणी आहे. देश, भाषा, वंश कुठलाही असो.
आणि यापलीकडे अनेक मुद्द्यांची चर्चा झाली. सिमोन बाईल्सनं उचलून धरलेला मानसिक आरोग्याचा मुद्दा असो, किंवा जर्मन आणि नॉर्वेजियन महिला खेळाडूंमुळे समोर आलेला महिला खेळाडूंच्या पोशाख आणि चित्रणाचा मुद्दा असो खेळानं अनेक गोष्टींना वाचा फोडली आहे.
पण या सगळ्यात कोव्हिडची साथही वेगानं पसरते आहे. टोकियोमध्ये 64 टक्के हॉस्पिटल बेड्स कोव्हिड रुग्णांनी भरले आहेत. ही एक टांगती तलवार ऑलिंपिकच्या डोक्यावर आहे.
तरीही खेळ होतायत, खेळाडू पदकं जिंकतायत आणि माणसाला नवी उमेद देतायत, हेही महत्त्वाचं आहे.
भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..
Please wait...
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























