Tokyo Olympics डायरी : पहिला दिवस, पहिलं पदक

मीराबाई चानू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मीराबाई चानू
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

रँकिंग

24 जुलै 2021 म्हणजे या ऑलिंपिकचा अधिकृतरित्या पहिला दिवस. खरं तर टोकियोत आज पहाटेपासूनच पावसाळी वातावरण होतं. त्यामुळे आभाळ भरून आलं की हुरहूर लागते, तसंच झालं होतं.

पण दुपारपर्यंत मनातलं असं सगळं मळभ दूर झालं आणि हा दिवस खरंच साजरा करण्यासारखा झाला.

भारताच्या मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळवलं. मला इच्छा असूनही त्या सामन्याचं तिकिट मिळू शकलं नाही. त्यामुळे एकीकडे नेमबाजीचे सामने पाहताना, मीराबाईच्या निकालावर लक्ष ठेवून होते.

तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण इथे ऑलिंपिकचं ओळखपत्र मिळाल्यावरही त्या त्या सामन्यांचं तिकीट असल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. त्या तिकिटासाठी वेगळा अर्ज करावा लागतो. अर्थात सगळ्यांनाच सगळीकडे जाता येत नाही. कोव्हिडचे निर्बंध आणि ऑलिंपिक बबलमुळे तर अजिबातच नाही.

जपानमध्ये बंदुकांवर निर्बंध आहेत आणि नेमबाजीला खेळ म्हणून फारशी मान्यता नाही. त्यामुळे त्यांनी इथे एक तात्पुरती शूटिंग रेंज उभारली आहे. पण तरीही ती अगदी सुसज्ज अशीच आहे. अशा तात्पुरत्या गोष्टी उभारण्यात जपानचा हात कोणी धरणार नाही बहुदा.

तर बाहेर मध्येच पावसाळी हवा आणि मध्येच उन्हाचा तडाखा जाणवतोय, अशा सकाळच्या वातावरणात शूटिंग रेंजमधला थंडावा हवासाच वाटत होता. अधूनमधून मीराबाईच्या स्कोरवर लक्ष ठेवून होते.

ती पदकाच्या जवळ जाऊ लागली, तसं मला माझ्या काळजातली धडधड अगदी कानात स्पष्ट ऐकू यायला लागली. मला त्याक्षणी पाच वर्षांपूर्वीची ती रात्र आठवत होती.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

Please wait...

2016 सालीही मीराबाई रिओ ऑलिंपिकच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी झाली होती. पण तेव्हा तिला स्पर्धा पूर्णही करता आली नव्हती. तेव्हा केवळ उगवत्याला सलाम करण्याची वृत्ती असलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर तिची टर उडवायलाही कमी केलं नाही.

त्यानंतर आलेल्या निराशेतून बाहेर पडणं हाही मीराबाईसाठी संघर्ष होता. आता पाच वर्षांनी मीराबाईनं पदक जिंकणं हा एक काव्यात्मक न्यायच वाटला मला. सोबतच, यंदा भारतावर रिकाम्या हातानं परतायची नामुष्की येणार नाही, हे तिनं निश्चित केलं.

एका पदकानं वातावरण बदलून टाकलं नाही?

आता तुम्ही म्हणाल, एकच पदक मिळालंय अजून. पण इथे असेही अनेक देश आहेत, की ज्यांना एकही पदक मिळालेलं नाही. त्यांच्या पत्रकारांशी बोलताना जाणवतं, एका पदकाचं महत्त्वही किती मोठं असतं.

आज आणखी एका पदकाच्या आपण अगदी जवळ गेलो आणि जिंकू शकलो नाही, याची चुटपूट लागून राहिली. नेमबाज सौरभ चौधरीनं अवघ्या एकोणिसाव्या वर्षी फायनल गाठली, हेही काही कमी नाही.

विशेष म्हणजे, सौरभ सातव्या स्थानावर आला आणि स्पर्धेबाहेर झाला, त्यावेळीही अनेकांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. हे असे क्षण सांगतात की हारजीत, पदकं यांपेक्षा खेळ महत्त्वाचा का असतो ते..

आता उद्या काय होणार, याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)