टोकियो ऑलिम्पिक 2020 : पी. व्ही. सिंधू, लव्हलीना बोरगोहाईंकडून भारताला पदकाची आशा, मेरी कोमपाठोपाठ दीपिका कुमारीचं आव्हान संपुष्टात

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अँड्र्यू क्लॅरन्स
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
पी. व्ही. सिंधू आणि लव्हलीना बोरगोहाईंमुळे भारताच्या पदकाच्या आशा जिवंत आहेत. बॉक्सर मेरी कोमपाठोपाठ तिरंदाज दीपिका कुमारीचंही ऑलिंपिकमधील आव्हान संपुष्टात आलंय.
रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा 2-0 नं पराभव करत अंतिम चारमध्ये स्थान पक्क केलं.
तर लव्हलिना बोरगोहाईंनं बॉक्सिंगच्या उपांत्यफेरीत प्रवेश करत पदक निश्चित केलंय.
लव्हलिनानं 69 किलो वजन गटात उपांत्यपूर्वी फेरीत चीनच्या तैपेईच्या निएन-चीन-चेन चा पराभव करत ऑलिम्पिकमध्ये भारसासाठी दुसरं आणि वैयक्तिक किमान कांस्य पदक निश्चित केलं आहे.
तिरंदाज दीपिका कुमारीचा क्वार्टर फायनलमध्ये सलग तीन सेटमध्ये पराभव झाला.
टोकियो ऑलिंपिकमधलं बॉक्सर मेरी कोमचं आव्हान 29 जुलैला संपुष्टात आलं.
टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतानं आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू पाठवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पदकसंख्येमध्ये सुधारणा करून अधिक पदकं जिंकण्याची आशा यंदा भारताला आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारताचे 120 क्रीडापटू 58 क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होत आहेत.
रिओ इथं 2016 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला केवळ दोन पदकांवर समाधान मानावं लागलं होतं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिनं महिला एकेरीत रौप्य मिळवलं होतं, तर कुस्तीपटू साक्षी मलिक हिनं 58 किलो वजन गटात फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली होती.
भारताच्या कोणत्या खेळाडूंच्या स्पर्धा कधी आहेत? पाहाण्यासाठी क्लिक करा
Please wait...
यावेळी भारतीय क्रीडापटू दोन नव्या क्रीडाप्रकारांसाठी पात्र ठरले आहेत. भवानी देवी प्रथमच फेन्सिंग (तलवारबाजी) साठी पात्र ठरल्या आहेत. तसंच फवाद मिर्झा यांनी प्रथमच इक्वेस्ट्रीयन (अश्वारोहण) प्रकारात ऑलिम्पिकचं तिकिट मिळवलं आहे.
नेमबाजी (शूटिंग)
भारताचं 15 खेळाडूंचं नेमबाजी पथक टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी झालं यापैकी मनू भाकेर, तेजस्विनी सावंत आणि राही सरनौबतकडून पदकाच्या आशा आहेत.
मिक्स्ड इव्हेंट्समध्ये भारताच्या चारही टीम फायनलला पोहोचू शकल्या नाहीत. रायफल शूटिंगमध्येही खेळाडू क्वालिफायिंग राऊंडमध्येच बाहेर पडले.

फोटो स्रोत, Getty Images
सौरभ चौधरीने मेन्स 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेची फायनल गाठली, पण त्याला सातवं स्थान मिळालं. तर 10 मीटर एअर पिस्टल मिश्र नेमबाजीत मनू भाकरसह पहिल्या पात्रता फेरीत अव्वल ठरल्यानंतर दुसऱ्या पात्रता फेरीत सौरभची चांगली कामगिरी झाली पण भारतीय टीमला फायनल गाठण्यात अपयश आलं.मनू भाकर ही महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजी स्पर्धेत खेळत असताना तिच्या पिस्टलमधलं लिव्हर तुटलं आणि तिला बाराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तिला फायनल गाठण्यात अपयश आलं. त्यामुळे मनूच्या तुटलेल्या पिस्टलची चर्चा जास्त होते आहे
मनूच्या काही इव्हेंट्स अजून बाकी आहेत. यासोबतच राही सरनौबत आणि तेजस्विनी सावंतच्या स्पर्धाही व्हायच्या आहेत.
बॅडमिंटन
रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा 2-0 नं पराभव करत अंतिम चारमध्ये स्थान पक्क केलंय.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत 21 वर्षांच्या पी.व्ही.सिंधू हिनं रौप्य पदकाची कमाई करत कोट्यवधी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
"मी त्यावेळी केवळ एक सहभागी स्पर्धक होते. पण आता प्रत्येक जण सिंधूनं पदक आणायलाच हवं, असं म्हणत आहे," असं सिंधूनं नुकतंच बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं.
पी.व्ही.सिंधू हिला गेल्या वर्षी पहिल्या वहिल्या 'बीबीस स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' या सन्मानानं गौरवण्यात आलं आहे.
2019 मध्ये ती जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची विजेती ठरली. पण त्यानंतर तिच्या खेळात सातत्य नसल्याचं पाहायला मिळालं आहे. तसं असलं तरी पदकाची आशा असलेल्या भारताच्या आघाडीच्या सद्स्यांमध्ये तिचा समावेश आहे.
टोकियो ऑलिंपिकमध्ये पी. व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टचा 21-15, 21-13 ने पराभव केला आणि ती उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालीय.
बॉक्सिंग
भारताची बॉक्सर लव्हलिना बोरगोहाईं हिने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील आपलं पदक निश्चित केलं आहे. लव्हलिनाने 69 किलो वजनी गटात चीनच्या तैपेईच्या खेळाडूला धूळ चारून आपली घोडदौड सुरू ठेवली.
लव्हलिनाच्या विजयामुळे ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचं दुसरं, तर लव्हलिनाचं पहिलं पदक पक्कं झालं आहे.
मॅग्निफिशिअंट मेरी, आयर्न लेडी आणि अशा अनेक इतर नावांनी प्रसिद्ध असलेली बॉक्सर मेरी कोम हिच्याकडूनदेखील भारतीय चाहत्यांना पदकाच्या मोठ्या अपेक्षा होत्या पण 16व्या फेरीत मेरी कोमचा पराभव झाल्याने ती ऑलिंपिकबाहेर पडलीय.

फोटो स्रोत, Getty Images
बॉक्सिंगमध्ये पूजा राणीने क्वार्टर फायनल गाठली आहे.
मेरी कोम 38 वर्षांची आहे. त्यामुळं कदाचित ही स्पर्धा तिची अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असू शकते. त्यामुळं मेरीनं बॉक्सिंग रिंगचा निरोप घेण्यापूर्वी तिच्या पदकांच्या यादीत ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचा समावेश असावा अशी सगळ्यांची इच्छा होती. पण मेरीचा 48 -51 वजनीगटात पराभव झाल्याने टोकियो ऑलिंपिंकमधलं तिचं आव्हान संपुष्टात आलं.
हॉकी
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानेही अर्जेंटिनावर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताने अर्जेंटिनाला 3-1 अशी मात देत उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.

फोटो स्रोत, Getty Images
महिला हॉकी संघाची गट पातळीवरची कामगिरी चांगली झालेली नाही. संघाचा सलग 3 मॅचेसमध्ये पराभव झालाय, पण गटपातळीवरील अजून काही मॅचेस व्हायच्या आहेत.
कुस्ती
रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये साक्षी मलिक हिनं कांस्य पदकाची कमाई केल्यानं, काहीसं यश भारताला मिळालं होतं. यावेळी भारताची विनेश फोगाट भारताच्या महिला कुस्ती संघाचं नेतृत्व करतेय.

फोटो स्रोत, Getty Images
रिओ ऑलिम्पिकमध्ये अचानक झालेल्या दुखापतीनंतर विनेश फोगाटला व्हीलचेअरवरून भारतात परतावं लागलं होतं. त्यानंतर तिला शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं.
मात्र 26 वर्षांची विनेश आता 53 किलो वजनगटात भारतासाठी पदक मिळवण्याची प्रमुख दावेदार आहे. गेल्या काही महिन्यांत झालेल्या स्पर्धांमध्ये तिनं चांगलं यश मिळवलं आहे. तसंच क्रमवारीत अव्वल स्थानही मिळवलं आहे.
"एका क्षणाला मला असं वाटलं होतं की, दुखापतीमुळं माझं करिअर जणू आता संपुष्टात आलं आहे. पण आता मला आणखी एक संधी मिळाली आहे, आणि त्याद्वारे मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे," असं विनेश म्हणाली.
भारताच्या कुस्तीच्या पुरुष गटातील बजरंग पुनियावरदेखील यंदा सगळ्यांच्या नजरा आहेत. तीन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवलेला बजरंग पुनिया प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालाय. स्पर्धेत 65 किलो वजन गटातील प्रमुख दावेदारांपैकी तो एक आहे.

भारताची आजवरची ऑलिम्पिकमधील कामगिरी
2016 रिओ ऑलिम्पिक : 1 रौप्य, 1 कांस्य
2012 लंडन ऑलिम्पिक : 2 रौप्य , 4 कांस्य
2008 बीजिंग ऑलिम्पिक : 1 सुवर्ण, 2 कांस्य
भारतानं 1900 पासून आतापर्यंत ऑलिम्पिकची एकूण 28 पदकं जिंकली आहेत. त्यापैकी 11 हॉकीतील, 5 कुस्तीतील, 4 नेमबाजीतील तर बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि अॅथलेटिक्समधून प्रत्येकी दोन आणि टेनिस तसंट वेटलिफ्टींग (भारोत्तोलन) यातून प्रत्येकी एक पदक मिळवलं आहे.

वेटलिफ्टींग (भारोत्तोलन)
टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने पदकाची कमाई केली. 48 किलो वजन गटात मीराबाईने रौप्य पदक पटकावलं.
चानूने यापूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभाग नोंदवला होता. पण तिथे तिला तीन प्रयत्नांनंतरही बार उचलता आलं नव्हतं. त्यानंतर चानू खूपच निराश झाली होती. पण तिने मेहनत घेऊन आपल्यातील क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मीराबाई चानू ही वेटलिफ्टींग प्रकारातील भारतीय पथकातील एकमेव सदस्य आहे. मीराबाईने स्नॅच प्रकारात 87 तर क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचललं.
तिरंदाजी
तिरंदाज दीपिका कुमारीचा क्वार्टर फायनलमध्ये सलग तीन सेटमध्ये पराभव झाला.
कोरियाच्या एम. सेनने दीपिकाचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव केल्याने दीपिकाचं ऑलिंपिकमधील आव्हान संपुष्टात आलंय.
पॅरिस इथं गेल्याच महिन्यात झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारी हिनं तीन सुवर्ण पदकांची कमाई केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
महिलांच्या रिकर्व्ह प्रकारातील तिरंदाजीच्या जागितक क्रमवारीत सध्या दीपिका अव्वल स्थानी आहे. त्यामुळं टोकियो ऑलिम्पिकमध्येही ती पदकाची प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जात होतं.
दीपिकासोबतच तिचा नवरा आणि तिरंदाज अतानु दास याच्याकडूनही भारताला पदकाच्या आशा आहेत. 2016च्या रिओ ऑलिंपिक्समध्येही अतानु सहभागी झाला होता.
मराठमोळा तिरंदाज प्रवीण जाधवचं ऑलिम्पिकमधलं आव्हान मात्र संपुष्टात आलंय.
याशिवाय उदयन माने भारताकडून गोल्फ खेळतोय. तर अॅथलेटिक्समध्ये भारतातर्फे अविनाश साबळे (3000मी स्टीपलचेझ), नीरज चोप्रा भालाफेक प्रकारात, तर दुती चंद (100 आणि 200 मीटर) स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























