अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूप्रकरणी सुनावणी सुरू

अमेरिका

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सुनावणी चार आठवड्यात पूर्ण होण्याचा अंदाज
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिकेमध्ये आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी आणि माजी पोलिस अधिकारी डेरेक शॉविन विरोधात सोमवारपासून (29 मार्च) खटला सुरू झाला आहे. चार आठवड्यात या खटल्याची सुनावणी पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

खटला सुरू होण्याच्या आधी फ्लॉइड यांचे कुटुंबीय आणि मित्रांनी मिनीपोलिस शहरात एक जुलूस काढला आणि शांतिसभेचंही आयोजन केलं.

गेल्या वर्षी मे महिन्यात मिनिसोटा राज्यातील मिनीपोलिसमधील एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओत आरोपी असलेले पोलिस अधिकारी डेरेक शॉविन यांनी जार्ज फ्लॉइड यांच्या गळ्यावर आपला गुडघा रोवला होता. फ्लॉइड त्यांना म्हणत होते, "प्लीज, आय कान्ट ब्रीद (मला श्वास घेता येत नाहीये.)" पण शॉविन यांनी त्यांना सोडलं नाही आणि नऊ मिनिटांपर्यंत त्यांचा गळा दाबून ठेवला होता. याच कारणामुळे जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. मात्र, आपण गुन्हेगार नसल्याचं शॉविन यांचं म्हणणं आहे.

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पूर्ण अमेरिकेत वंशभेद आणि पोलिसांच्या क्रूरतेविरोधात हिंसाचार उफाळला होता. अमेरिकेशिवाय जगभरात इतर ठिकाणीही 'प्लीज, आय कान्ट ब्रीद' च्या बॅनरखाली वांशिक भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाली होती.

अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकाव्यतिरिक्त इतक ठिकाणीही 'आई कॉन्ट ब्रीद' मोहीमेअंतर्गत वंशवादाविरोधात आंदोलन करण्यात आले होते.

त्यानंतर 45 वर्षीय डेरेक शॉविन यांच्याविरोधात पहिल्यांदा थर्ड डिग्री आणि नंतर सेकंड डिग्री हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात अजून तीन गुन्हेही दाखल करण्यात आले. शॉविन यांच्याव्यतिरिक्त अन्य तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधातही हत्येमध्ये मदत करण्याचा आणि त्याला प्रोत्साहन देण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

फ्लॉइड यांच्या समर्थनार्थ मोर्चा

जॉर्ज फ्लॉइड यांना न्याय मिळावा म्हणून खटल्याच्या आधी त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी मिनीपोलिसमध्ये एक मोर्चा काढला. त्यांनी शांतीसभेचंही आयोजन केलं होतं. याचदरम्यान फ्लॉइड यांचे भाऊ टेरेन्स यांनी म्हटलं, ''आम्ही परमेश्वराला घाबरणारे लोक आहोत. आमची चर्चवर श्रद्धा आहे. म्हणूनच आम्ही त्यांना न्याय मिळावा अशी मागणी या व्यवस्थेकडे करत आहोत.''

त्यांचे अजून एक भाऊ फिलोनिस फ्लॉइड यांनी रविवारी (28 मार्च) माध्यमांशी बोलताना म्हटलं, ''आता माझ्या हृदयामध्ये एक मोठं छिद्र आहे. ते ठीक नाही होऊ शकत. आम्हाला जॉर्जसाठी न्याय हवा आहे. त्याच्या मारेकऱ्यांना मृत्यूदंड व्हावा.''

सुनावणीची तयारी

या प्रकरणाची सुनावणी बारा न्यायाधीश करतील. दोन अतिरिक्त न्यायाधीशांचाही पर्याय असेल. टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सुनावणीदरम्यान सर्व न्यायाधीशांना कॅमेऱ्यापासून लांब ठेवण्यात येईल. त्यांची नावंही प्रसिद्ध केली जाणार नाहीत.

शिक्षेची मागणी करणाऱ्या फिर्यादी पक्षाकडून खटल्याच्या सुरूवातीला फ्लॉइड यांच्या गळ्यावर शॉविन गुडघा टेकून बसल्याचा व्हीडिओ सादर केला जाईल, असा अंदाज आहे. फ्लॉइड यांच्या मृत्यूला शॉविन यांचीच कृती प्रामुख्याने कारणीभूत ठरली, हे त्यांना न्यायालयात सिद्ध करावं लागेल.

जॉर्ज फ्लॉइड

फोटो स्रोत, AFP

अटकेच्या आधी जॉर्ज फ्लॉइड यांनी ड्रग्सचं सेवन केलं होतं, असा युक्तिवाद शॉविन यांच्या बचावासाठी केला जाऊ शकेल. ड्रग्ज आणि फ्लॉइड यांना आधीपासून असलेल्या आरोग्य समस्या यांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जाऊ शकतं. शॉविन यांनी पोलिस प्रक्रियेचंच पालन केलं होतं असंही बचाव पक्षाकडून सांगितलं जाईल.

न्यायाधीशांची निवड कशी झाली?

पंधरा न्यायाधीशांपैकी नऊ महिला आणि सहा पुरूष आहेत. त्यांपैकी नऊ श्वेतवर्णीय आणि उरलेले सहा मिश्र वंशाचे आहेत.

पर्याय म्हणून ठेवलेल्या एका न्यायाधीशाला खटला सुरू होण्याच्या आधीच टीममधून बाहेर करण्यात आलं होतं. त्यांना सोमवारी डिसमिस केलं जाईल, असा अंदाज आहे. त्यानंतर या कार्यवाहीच्या 12 मुख्य आणि दोन पर्यायी न्यायाधीशांच्या मदतीनेच ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हा खटला चार आठवडे चालू शकतो. मध्य मिनीपोलिसांच्या न्यायालयाभोवती काँक्रिट बॅरिअर, काटेरी तारांचं कुंपण घालण्यात आलं आहे.

काय आहे हे सगळं प्रकरण?

या घटनेची सुरुवात 20 डॉलरच्या बनावट नोटेच्या तक्रारीपासून झाली. 24 मे 2020 रोजी संध्याकाळी फ्लॉईड यांनी कप फूड्स दुकानातून सिगारेटचे पाकीट खरेदी केले. याच दिवशी संध्याकाळी तक्रार नोंदवली गेली.

फ्लॉईड यांनी 20 डॉलरची बनावट नोट दिल्याच्या संशयावरुन दुकानातील कार्मचाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली.

फ्लॉईड हे मूळचे टेक्सासमधील हस्टनमधील असून कामानिमित्ताने ते गेल्या काही वर्षांपासून मिनियापोलीस येथे स्थायिक झाले होते.

कप फूड्स दुकानात फ्लॉईड नेहमी येणारे ग्राहक होते. त्यांचा चेहरा ओळखीचा झाला होता. त्यांनी कधीच कुठलाही त्रास दिला नाही, अशी प्रतिक्रिया दुकानाचे मालक माईक अबूमयालेह यांनी एनबीसीशी बोलताना दिली. घटनेच्या दिवशी ते दुकानात हजर नव्हते. संशायस्पद नोटेची तक्रार नोंदवताना दुकानाचा तरुण कर्मचारी केवळ नियमाचं पालन करत होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यादिवशी रात्री 8 वाजता 911 नंबरवर संपर्क करण्यात आला. दुकानदाराने सिगारेटचे पाकीट परत मागितले. पण फ्लॉईड यांना सिगारेटचे पाकीट परत द्यायचे नव्हते.

अमेरिका

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, आरोपी माजी पोलीस कर्मचारी डेरेक शॉविन यांचा आपण गुन्हेगार नसल्याचा दावा

पोलिसांना संपर्क केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दोन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. फ्लॉईड कोपऱ्यात पार्क केलेल्या कारमध्ये इतर दोन लोकांसोबत बसले होते.पोलीस अधिकारी थॉमस लेन गाडीजवळ गेले. त्यांनी पिस्तूल बाहेर काढलं आणि फ्लॉईड यांच्या दिशेनं रोखून त्यांना हात वर करण्यास सांगितले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यानं पिस्तूल का रोखली याचे स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.

लेन यांनी फ्लॉईड यांना कारबाहेर ओढल्याचं फिर्यादीच्या वकिलांचं म्हणणं आहे. त्यानंतर बेड्या ठोकताना फ्लॉईड यांनी विरोध केल्याचंही वकिलांनी सांगितलं .

मात्र जेव्हा पोलीस अधिकारी फ्लॉईड यांना गाडीत न्यायला लागले तेव्हा संघर्षाला सुरुवात झाली.

अहवालानुसार, साधारण सव्वा आठ वाजता फ्लॉईड जमिनीवर पडले. आपल्याला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचं त्यांनी पोलीसांना सांगितलं.

तोपर्यंत शॉविन घटनास्थळी पोहचले. इतर पोलीसांच्या मदतीने त्यांनी फ्लॉईड यांना पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 8 वाजून 19 मिनिटांनी शॉविन यांनी फ्लॉईड यांना गाडी बाहेर खेचले. ज्यामुळे ते जमिनीवर आदळले. ते तसेच खाली पडून होते. खाली पडलेले असताना त्यांचे हात तसेच बांधलेले होते.

यावेळी प्रत्यक्षदर्शींनी व्हीडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. फ्लॉईड यांना प्रचंड त्रास होत असल्याचं या व्हिडिओत दिसून येतंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)