इंडोनेशिया आग: जावामधील ऑईल रिफायनरीत मोठी आग

रिफायनरी
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

इंडोनेशियातील बालोंगान रिफायनरीला आग लागली आहे. ही रिफायनरी देशातील सर्वांत मोठ्या रिफायनरींपैकी एक आहे. आतापर्यंत त्या भागातील 950 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

अग्निशामक दलाचे लोक ही आग विझवायचा प्रयत्न करत आहेत.

बालोंगान नावाच्या रिफायनरीला स्थानिक वेळेनुसार रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी आग लागली. या आगीत कमीत कमी 5 लोक जखमी झाले आहेत तर 950 रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. काही लोक या आगीनंतर बेपत्ता झाले आहेत.

आगीचे कारण अद्याप समजलेले नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

टीव्हीवरची दृश्यं आणि सोशल मीडियावरच्या व्हीडिओवरून हे दिसतंय की आगीच्या ज्वाळा अजूनही धुमसत आहेत. धुराचे लोट आकाशभर पसरले आहेत. इंडोनेशियाच्या जावा भागात ही आग लागलेली आहे.

आग

वृत्तसंस्था रॉयटर्सने म्हटलं की तिथल्या रहिवाशाने स्थानिक न्यूज चॅनल मेट्रो टीव्हीला सांगितलं "आम्हाला इंधनाचा तीव्र गंध जाणवला. हा गंध इतका तीव्र होता की माझं नाकात हुळहुळायला लागलं. आम्हाला वीज पडल्याचाही आवाज आला."

प्रादेशिक आपत्ती निवारण संस्थेनुसार 5 जण गंभीररित्या भाजले आहेत तर 15 जणांना किरकोळ स्वरूपाच्या भाजल्याच्या जखमा आहेत. सगळ्यांवर उपचार सुरू आहेत.

जखमींमध्ये जवळपास राहाणारी लोक आणि त्यावेळी रिफायनरी जवळच्या रस्त्यावर असणाऱ्या लोकांचा समावेश आहे.

आसपासच्या खेड्यात राहाणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. मदतकार्य सुरू आहे पण कोव्हिड-19 च्या निर्बंधांमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.

'काम पूर्ववत सुरू होईल अशी आशा'

ही रिफायनरी सरकारी तेलकंपनी पेर्टामीनाच्या मालकीची आहे. त्यांनी म्हटलंय की आगीचं कारण काय ते अजून कळू शकलेलं नाही. पण जोराचा पाऊस आणि वीजांच्या कडकडाटादरम्यान ही आग लागली.

सोमवारी, मार्च 29, 2021, ला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की, "या आगीमुळे रिफायनरीच्या तेलशुद्धीकरणाच्या क्षमतेला काहीही धक्का पोहचला नसून येत्या पाच दिवसात पूर्ण क्षमतेने काम पूर्ववत सुरू होईल अशी आम्हाला आशा आहे."

रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार पेर्टामीनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक विद्यावटी यांनी म्हटलं की ही आग मुख्यत्वेकरून तेल साठवणूक करणाऱ्या टँकपाशी लागली होती. प्रोसिसिंग प्लांट कोणताही धक्का पोहचलेला नाही.

बालोंगान रिफायनरी इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून पूर्व दिशेला 200 किलोमीटर अंतरावर आहे. ही रिफायनरी 340 हेक्टर क्षेत्रफळावर पसरली आहे आणि दिवसाला तेलाचे 1 लाख 25 हजार बॅरल शुद्ध करू शकते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)