म्यानमार: सीमा पार करून भारतात आलेल्या पोलिसांना सुपूर्द करण्याची मागणी

म्यानमार

फोटो स्रोत, EPA

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

लष्कराचे आदेश मान्य करायला नकार देऊन सीमा पार करून भारतात शरण घेतलेल्या म्यानमारच्या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा आमच्या हवाली करा, अशी मागणी म्यानमारने भारताकडे केली आहे.

यासंबंधी म्यानमारने एक पत्र केंद्र सरकारला पाठवलं आहे. 'दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यासाठी' पोलीस अधिकाऱ्यांना आमच्या हवाली करावं, असं या पत्रात लिहिलं आहे.

या पत्रानुसार म्यानमारचे 8 पोलीस अधिकारी आतापर्यंत सीमा पार करत भारतात आले आहेत.

पत्रात लिहिलं आहे, "दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण नातं कायम रहावं, यासाठी आम्ही आपल्याला विनंती करतो की जे 8 पोलीस अधिकारी सीमा पार करून तुमच्या देशात आले आहेत, त्यांना ताब्यात घेऊन म्यानमारच्या हवाली करावं."

तर म्यानमारचे काही पोलीस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय काही दिवसांपूर्वीच भारतात आल्याचं भारतीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

म्यानमार

फोटो स्रोत, EPA

मिझोरमच्या चम्पई जिल्ह्याचे उपायुक्त मारिया सिटी जुआली यांनी आपल्याला म्यानमारच्या फालाम जिल्ह्यातल्या आयुक्तांकडून एक पत्र मिळालं होतं. यात पोलीस अधिकाऱ्यांना म्यानमारच्या हवाली करण्याची विनंती करण्यात आली होती, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे. आपण केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पुढील सूचना मिळण्याची वाट बघत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

रॉयटर्सनुसार गेल्या काही दिवसात म्यानमारच्या 8 पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंबीय, अशा एकूण 30 जणांनी भारतात आश्रय घेतला आहे.

तर एएफपी या वृत्तसंस्थेने भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने बातमी देताना शनिवारीदेखील भारतात येण्यासाठी म्यानमारच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, असं वृत्त दिलं आहे.

म्यानमारमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लष्कराने बंड करत सत्ता आपल्या हाती घेतली होती. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान सू ची यांच्यासह शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून म्यानमार धुमसतोय.

लष्करी राजवटीचा विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

म्यानमार

फोटो स्रोत, EPA

नागरिकांची निदर्शनं मोडून काढण्यासाठी लष्कराने पोलीस आणि सुरक्षा दलांच्या माध्यमातून बळाचा वापर सुरू केला आहे. अश्रूधूर, रबराच्या गोळ्यांचा वापर सुरू आहे. इतकंच नाही तर सुरक्षा दलांनी जिवंत काडतुसांनीही गोळीबार केल्याचं वृत्त आहे.

रॉयटर्सनुसार अॅडव्होकेसी ग्रुप असिस्टंट असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझनर्सने लष्कराने आतापर्यंत 1500 जणांना ताब्यात घेतल्याचं म्हटलं आहे.

शनिवारीदेखील म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शनं करण्यात आली.

म्यानमारमधील सर्वांत मोठं शहर असलेल्या यांगूनसह इतरही शहरांमध्ये लोकांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत लष्करी शासनाचा विरोध केला. यांगूनमधला जमाव पांगवण्यासाठी सुरक्षादलांनी अश्रूधुराचा वापर केला.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)