नेपाळ मुस्कान खातूनः 'त्याच्या हातात अॅसिडने भरलेला जग होता. त्यांनी मला अॅसिड पाजण्याचा प्रयत्न केला'

मुस्कान खातून

फोटो स्रोत, U.S. EMBASSY IN NEPAL

फोटो कॅप्शन, मुस्कान खातून
    • Author, कमलेश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

नेपाळची मुस्कान खातून अवघ्या 15 वर्षांच्या कमी वयातच एका मोठ्या लढ्यासाठी निघाली आहे - अॅसिड हल्ल्याविरोधात.

मुस्कान स्वतः अॅसिड हल्लापीडित आहे आणि या क्रूर गुन्ह्याविरोधात कठोर कायद्यासाठी ती लढा देतेय.

ती म्हणते, "माझ्यावर उपचार सुरू होते, त्यावेळी माझ्या मनात एकच विचार असायचा - उपचारासाठी पैसे कुठून येणार? माझ्या घरचे काय करतील? याच विचारात असताना एक दिवस माझ्यासारख्याच वेदनेतून जाणाऱ्या इतर मुलींचं काय, असं मला वाटलं."

मुस्कानची मेहनत काही अंशी फळाला आली आणि नेपाळ सरकारने अध्यादेश काढून या गुन्ह्याविरोधात नवा कायदा आणला.

अॅसिड हल्ल्याविरोधात याच योगदान आणि धाडसासाठी मुस्कानला अमेरिकेत 'इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज' (IWOC) पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अमेरिकेत 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनी हा पुरस्कार सोहळा व्हर्च्युअली पार पडेल. कार्यक्रमात अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन आणि परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन हेदेखील सहभागी होणार आहेत.

IWOC पुरस्काराचं हे 15 वं वर्ष आहे. शांतता, न्याय, मानवाधिकार, लैंगिक समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी असामान्य धाडस दाखवत नेतृत्त्व करणाऱ्या आणि ते करताना जोखीम उचलायला किंवा त्याग करायलाही ज्यांनी मागे-पुढे पाहिलं नाही, अशा महिलांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.

मुस्कान खातून

फोटो स्रोत, MUSKAN KHATUN

फोटो कॅप्शन, मुस्कान खातून

याआधी पाकिस्तानातील खैबर-पख्तुनख्वा भागात मुलींच्या शिक्षणासाठी अतिरेक्यांची गोळीदेखील झेलणाऱ्या मलाला युसूफझईचा देखील या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

14 व्या वर्षी असहनीय वेदना

मुस्कान खातून नेपाळमधल्या बीरगंज शहरात रहायची. तिथेच ती शाळेत जायची.

6 सप्टेंबर 2019 हा तो दिवस होता ज्या दिवशी तिला एका मुलाला नकार देण्याची किंमत मोजावी लागली. त्यावेळी मुस्कान नववीत शिकत होती. तो मुलगा तिला रोज त्रास द्यायचा. मुस्कानने घरी पालकांनाही याबद्दल सांगितलं.

मुस्कान सांगते, "माझे अब्बू त्या मुलाला ओरडले आणि कानशीलातही लगावली. यापुढे मी तुमच्या मुलीला त्रास देणार नाही, असं तो म्हणाला. पण चार महिन्यांनी तो परत आला."

"त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता. त्याच्या हातात अॅसिडने भरलेला जग होता. त्यांनी मला अॅसिड पाजण्याचा प्रयत्न केला. पण, मी प्रतिकार केल्यावर त्यांनी माझ्या अंगावर अॅसिड फेकलं. त्यांना मला मारून टाकायचं होतं. त्यावेळी मी असह्य वेदनेने विव्हळत होते. तिथलेच काही लोक मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले."

पुढे बरेच दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. या हल्ल्यात तिचा चेहऱ्याचा एक भाग, दोन्ही हात, गळा, छाती आणि एक कान जळाला. मुस्कानच्या कानाला मोठी इजा झाली.

उपचाराच्या खर्चाची काळजी

अॅसिड हल्ला झेलणाऱ्या मुस्कानला त्या असहनीय वेदनांचा सामना करावा लागला ज्याची कल्पनाही करवत नाही. ही वेदना जेवढी शारीरिक असते तेवढीच मानसिकही.

नववीत शिकणारी मुस्कान तिला आणखी शिकायचं होतं, डॉक्टर बनायचं होतं. पण, एका झटक्यात तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. आधी जिवंत राहू की नाही, याची भीती आणि नंतर अॅसिड हल्ल्याच्या जखमा घेऊन आयुष्य काढण्याची भीती. अशा अनेक गोष्टी त्यावेळी मुस्कानच्या मनात सुरू होत्या.

मुस्कान सांगते,"माझ्यावर उपचार सुरू होते त्यावेळी जळण्यापेक्षाही माझे अम्मी-अब्बू उपचारासाठी पैसे कुठून आणणार, हा त्रास मला जास्त होता. मी अम्मीला विचारलं तर ती म्हणाली, तू काळजी करू नकोस. काहीही करू पण तुझ्यावर उपचार नक्की करू."

उपचाराचा सुरुवातीचा खर्च मुस्कानच्या पालकांनीच उचलला. मात्र, पुढे वेगवेगळ्या ठिकाणांवरून मदत येऊ लागली आणि मुस्कानच्या पालकांना थोडा दिलासा मिळाला. बीरगंजमध्ये पुरेसे उपचार उपलब्ध नसल्याने मुस्कानला राजधानी काठमांडूला नेण्यात आलं. आता ते काठमांडूतच राहतात.

याच सर्व वेदनांचा सामना करत असताना मुस्कानला आयुष्याचं नवं ध्येय सापडलं. तिने अॅसिड हल्लाविरोधी कठोर कायदा आणि उपचारासाठी लागणाऱ्या खर्चात पीडितेला मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. तिने याबाबत नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांना पत्रही लिहिलं.

मुस्कान सांगते, "पूर्वी नेपाळमध्ये अॅसिड हल्ल्याविरोधात कठोर कायदा नव्हता. पीडितांना मदतही मिळत नव्हती. माझ्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्यामुळे मला अॅसिड विक्टिमचं आयुष्य किती खडतर असतं, याची जाणीव झाली. त्यांना न्यायदेखील मिळत नाही आणि म्हणूनच मी याविषयी आवाज उठवण्याचा निर्धार केला. लोकांकडूनही सहकार्य मिळत गेलं. घर असो किंवा बाहेर, सर्वांनी मला धीर दिला. प्रोत्साहन दिलं."

मुस्कान खातून

फोटो स्रोत, MUSKAN KHATUN

फोटो कॅप्शन, मुस्कान खातून

अॅसिड हल्ल्याविषीय भारताचा विषय काढत ती सांगते, "आम्ही भारतातही अशा प्रकरणांविषयी ऐकलं आहे. तिथेही अॅसिड हल्ल्याविरोधात कठोर कायदे तयार करण्यात आलेत. नेपाळ असो किंवा भारत मला प्रत्येक अॅसिड हल्ला पीडेतेला सांगायचं आहे की हार मानू नका आणि आवाज बुलंद करा."

मुस्कानची स्वप्नं अजूनही कायम आहेत. मात्र, त्यात आता भर पडलीय. तिला यापुढेही अॅसिड हल्ला पीडितांसाठी काम करायचं आहे.

मुस्कानवर अॅसिड फेकणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सध्या कोर्टात खटला सुरू आहे.

नेपाळमध्ये नवीन कायदा

मुस्कानने अॅसिड हल्लाविरोधी कायद्याची मागणी तर केलीच. त्यासाठी ती पंतप्रधान के. पी. ओली यांनाही भेटली.

या भेटीनंतरच के. पी. ओली यांनी नव्या कायद्याचा मसुदा तयार करण्याचे आदेश दिले आणि गुन्हेगारांना शिक्षा करणे आणि केमिकल्स विक्रीला नियमित करण्यासंबंधी अध्यादेश जारी केला.

नेपाळमध्ये याआधीही अॅसिड हल्ल्याविरोधात कायदा होता. मात्र, तो आता अधिक कठोर करण्यात आला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार सप्टेंबर 2020 मध्ये हा अध्यादेश जारी करण्यात आला. अध्यादेशात अॅसिड हल्ला पीडितेचा मृत्यू झाल्यास गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हल्ल्यात पीडिता जखमी झाल्यास किंवा तिच्या अवयवांना इजा झाल्यास 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र, मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद यापूर्वीही होती.

नव्या अध्यादेशात गुन्हेगाराच्या शिक्षेच्या निकषांना आणखी व्यापक करण्यात आलं आहे. यात पीडितेला झालेल्या जखमा आणि इजा झालेले शीरीरिक अवयव लक्षात घेऊन शिक्षेटी तरतूद करण्यात आली आहे. तसंच अॅसिड हल्ला पीडितांच्या मोफत उपचाराचीही तरतूद करण्यात आली आहे.

नवा कायदा आल्याचा आनंद असल्याचं मुस्कान सांगते. यामुळे अॅसिड हल्ले थांबतील आणि पीडितांना न्याय आणि मदत मिळेल, अशी आशा ती व्यक्त करते.

नेपाळमधल्या अमेरिकेच्या दूतावासाकडून सांगण्यात आलं, "हा बदल घडवून आणण्यात मुस्कानची भूमिका महत्त्वाची होती. आम्ही तिचं समर्थन करतो आणि नेपाळमधल्या महिला आणि मुलींच्या अधिकारांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देतो, याचा आम्हाला अभिमान आहे."

स्वप्नांच्या दिशेने झेप

मुस्कान या यशापर्यंत पोहोचण्यासाठीच्या मार्गात प्रेम आणि पाठिंबा देणाऱ्यांना धन्यवाद देते. नेपाळ, अमेरिका आणि भारतीयांचे तिने मनापासून आभार मानलेत.

भारतातून अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरूख खान, वरूण धवन आणि अभिनेत्री कृती सेनन यांनी आपल्याला शुभेच्छा संदेश पाठवले, तेव्हा खूप आनंद झाल्याचं मुस्कान सांगते.

मुस्कानच्या आई शहनाज खातून आणि वडील रसूल अंसारी यांनाही आनंद झाला आहे. त्यांनीही मुस्कानला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानलेत.

सध्या मुस्कानवर उपचार सुरू आहेत आणि आणखीही काही शस्त्रक्रिया बाकी आहेत. सोबतच ती नववीचं शिक्षणही घेतेय.

मुस्कान म्हणते, "मी आता थांबणार नाही आणि हे डाग माझं काहीही वाकडं करू शकत नाही. थांबावं त्याला लागेल ज्याने गुन्हा केला."

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)