BBC 100 Women 2020: जगभरातील प्रभावशाली महिलांच्या यादीत कोणत्या भारतीय महिला आहेत?

महिला
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

वर्ष 2020साठीच्या जगभरातल्या प्रेरणादायी आणि प्रभावशाली अशा 100 महिलांची यादी बीबीसीने जाहीर केलीय. सध्याच्या अवघड काळामध्ये बदल घडवून आणण्यासाठी झटणाऱ्या आणि नेतृत्व करणाऱ्या महिलांना यावर्षीच्या 100 महिलांच्या यादीत स्थान देण्यात आलंय.

आघाडी सरकारचं नेतृत्व करणाऱ्या फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन, नवीन अवतार आणि मार्व्हल सीरीजमधल्या सिनेमांच्या स्टार मिशेल योह आणि ऑक्सफर्डच्या कोरोना व्हायरसवरच्या लशीच्या संशोधनाचं नेतृत्व करणाऱ्या सारा गिल्बर्ट यांचा या यादीत समावेश आहे.

बीबीसीच्या 2020 मधल्या 100 Women

  • अनामिक नायिका

    जगभर बदलाची प्रवर्तक

    या विलक्षण वर्षात, जगभरातील असंख्य स्त्रियांनी इतरांना मदत करण्यासाठी त्याग केला आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून आणि बदल घडवताना ज्यांनी आपले जीवन गमावले त्यांना आदरांजली म्हणून या यादीतील पहिले स्थान मुक्त ठेवण्यात आले आहे.

    जगभरात आपला खारीचा वाटा उचलणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं नाव बीबीसीच्या 100 महिलांच्या यादीत घेता येणार नाही. म्हणूनच 2020 या वर्षात तुमच्या आयुष्यातील, तुमच्यावर थेट प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींविषयी तुम्ही विचार करावा, यासाठी ही पहिली जागा मोकळी सोडली आहे.

  • रीना अख्तर

    बांगलादेश पूर्वाश्रमीची सेक्स वर्कर

    जागतिक साथीच्या संकटादरम्यान ढाका इथल्या सेक्स वर्कर्सकडे गिऱ्हाईकं येणं बंद झालं, तेव्हा त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यावेळी रीना आणि तिच्या सहाय्यकांनी भाज्या,अंडी आणि मांसाहारासह दर आठवड्याला सुमारे 400 जणांना जेवण दिले.

    > लोक आमच्या व्यवसायाकडे अपमानास्पद म्हणून पाहतात, पण आम्ही हे काम पोट भरण्यासाठी करतो आहोत. या व्यवसायातील महिला उपाशी राहू नयेत आणि भविष्यात त्यांच्या मुलांना हे काम करावे लागू नये, यासाठी मी प्रयत्न करीत आहे.

  • मिहो इमादा

    जपान साके तयार करणारी

    सााके हे जपानी मद्य तयार करणं हे शतकानुशतकं पुरुषांचं काम मानलं जातं आणि महिलांना साके तयार करणाऱ्या कारखान्यात (ब्रूअरी) जाण्यासही मनाई होती.

    आपल्या कौटुंबिक मद्यगृहात पुरुष प्रमुखानं निवृत्ती स्वीकारल्यावर मिहो यांनी साके बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या जपानमधल्या मोजक्या महिला साके निर्माता बनल्या. जपानमध्ये सध्या केवळ 20 साके ब्रूअरी स्त्रिया चालवतात.

    > आपलं आयुष्य झोकून द्यावं असं काम मिळालं, तर त्यात बुडून जा. तुम्ही निवडलेल्या व्यवसायाचा आदर केला आणि प्रामाणिकपणे वागला तर तुम्ही तुमचं लक्ष्य साध्य करू शकाल.

  • इसैवानी

    भारत संगीतकार isaivaniisaiv

    इसैवानी तामिलनाडूमधली गाना गायिका आहे. उत्तर चेन्नईच्या कामगार वस्तीतून ती उदयास आली. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात तिनं आपल्या गायन आणि कलेनं अनेक वर्ष ठसा उमटवला आहे.

    इतर पुरुष गायकांप्रमाणे त्यांच्याचसोबत मंचावरून गाणं हे एक मोठं यश मानले जाऊ शकते. इसैवानीनं एक जुनी परंपरा यशस्वीरित्या मोडली आहे, ज्यामुळे इतर तरूण गाना गायिका पुढे आल्या आहेत आणि स्वत: ला व्यक्त करत आहेत.

    > 2020 मध्ये जग बरंच बदललं आहे, पण महिलांसाठी ते दररोज बदलत आहे: महिलांनी बदल घडवले आहेतत आणि आव्हान दिलं आहे. ही प्रक्रिया येणा पिढ्यांतही कायम राहील.

  • लालेह ओस्मानी

    अफगाणिस्तान कार्यकर्ता

    अफगाणिस्तानात, सार्वजनिकपणे स्त्रीचे नाव वापरल्यास आश्चर्य व्यक्त होतं. जन्माच्या दाखल्यावरही केवळ वडिलांचे नाव नोंदविले जाते. एखादी स्त्री लग्न करते तेव्हा तिचे नाव तिच्याच लग्नाच्या आमंत्रण पत्रिकांवर दिसत नाही; ती आजारी असताना तिचे नाव वैद्यकीय नोंदींत लिहिले जात नाही, आणि तिचा मृत्यू होतो तेव्हा तिचे नाव तिच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रात लिहिलं जात नाही, किंवा तिच्या कबरीवरील दगडावरही तिचं नाव लिहिलं जात नाही.

    लालेह ओस्मानीच्या मते हा अगदी मूलभूत अधिकार आहे आणि तो मिळत नसल्यानं तिनं व्हेअर इज माय नेम (WhereIsMyName) ही मोहीम सुरू केली. तीन वर्षांच्या संघर्षानंतर 2020 साली अफगाण सरकारनमं महिलांचं नाव राष्ट्रीय ओळखपत्रांवर आणि त्यांच्या मुलांच्या जन्मदाखल्यावर नोंदवण्याचं मान्य केलं आहे.

    > जगाला आणखी चांगलं बनवण्याचा प्रयत्न करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. बदल करणे अवघड आहे, परंतु अशक्य नाही. अफगाणिस्तानासारख्या अतिशय पारंपारिक देशात आपल्या ओळखीसाठी लढा देणा महिलांकडे पाहिल्यावर तेच दिसतं.

  • मयस्सर अब्दुल'एहेद

    चीनच्या घुलजा शहरातून हद्दपार झालेली विगर लेखक

    मयस्सर त्यांच्या हेनदान या टोपणनावानं ओळखल्या जातात. वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करतानाच त्यांनी कविता आणि निबंध लेखनाची सुरूवात केली. सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी लिखाणावर लक्ष केंद्रित केलं. 2013 मध्ये तुर्कस्तानात स्थलांतर केल्यावर, त्यांनी आयहान एज्युकेशन ही संस्था स्थापन केली आणि परदेशातील विघर लोकांमध्ये भाषेचं संवर्धन आणि शिक्षण देण्यास सुरूवात केली. सध्या त्या इस्तंबूलमध्ये राहतात.

    हेनदानचं अलीकडील लिखाण त्यांच्या मायभूमीतल्या खडतर परिस्थितीवर भाष्य करतं. त्यांची पहिली कादंबरी, खैर-खोष, क्विश (फेअरवेल टू द सन) ही चीनमधल्या छावण्यांत विगर लोकांच्या आयुष्यावर भाष्य करते.

    > मुले ही नेहमी राष्ट्राची आशा असतात. शिक्षण हीच आशा साकार करू शकते.

  • लोझा अबेरा गेईनोर

    इथियोपिया फुटबॉलर

    लोझा अबेरा गेईनोर इथियोपियाच्या दक्षिण भागातील एका छोट्या शहरात जन्मली आणि तिथेच लहानाची मोठी झाली. तिनं इतियोपियन विमेन्स प्रीमियर लीगमधअये हवासा सिटी एससी या टीमचं दोन हंगामात प्रतिनिधित्व केलं. त्या काळात ती आपल्या क्लबतर्फे सर्वाधिक गोल्स करणारी खेळाडू बनली.

    ती आता व्यावसायिक फुटबॉलर आहे आणि इथियोपियन महिलांच्या राष्ट्रीय संघाची सदस्य आहे.

    > जगातली प्रत्येक महिला तिनं जे स्वप्न पाहिलं आहे किंवा जे ठरवलं आहे ते साध्य करू शकते, तिला कशाही परिस्थितीचा सामना करावा लागला, तरीही.

  • हूदा अबूझ

    मोरोक्को रॅपर khtek.17

    हूदा अबूझ, उर्फ खतेक (Khtek), ही मोरोक्कोमधली रॅपर आहे. ती अनोखी शैली आणि लयबद्ध गीतांसाठी ओळखली जाते.

    ती महिलांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी संघर्ष करते आहे. मोरोक्कोतल्या पुरुष-वर्चस्व असलेल्या रॅप संगीतक्षेत्रात काम करणाऱ्या हुदाला तिचं संगीत हे बदल. घडवण्याचं माध्यम आहे असं वाटतं.

    > संघर्ष करत रहा, नवनिर्मिती करत राहा, प्रतिकार करा; कधीही माघार घेऊ नका. आपली लढाई नुकतीच सुरू झाली आहे, आपल्याकडे या जगासाठी आवश्यक असलेलं सगळं काही, म्हणजे स्त्री सामर्थ्य आहे.

  • ख्रिस्टिना अडेन

    नेदरलँड्स मोहिमेची प्रचारक christina.adane

    यूकेमधल्या शाळांतील मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीतही मोफत मध्यान्ह भोजन दिलं जावं यासाठी ख्रिस्टिना यांनी मोहीम सुरू केली होती. तिला फुटबॉलर मार्कस रशफोर्डचा पाठिंबा मिळाला.

    ख्रिस्टिना 'बाईट बॅक 2030' या अन्न-उद्योगातील अन्यायाविरोधात लढणाऱ्या मोहिमेच्या युवा गटाच्या सहअध्यक्ष आहेत. त्यांना स्वतःला शाळेतल्या मोफत जेवणाचा फायदा झाला होता, त्यामुळेच यूकेमधलं एकही मूल उपाशी राहू नये असं त्यांना वाटतं.

    > तुमच्याबाबतीत, तुमचा विश्वास असलेल्या गोष्टींच्या बाबतीत तडजोड करू नका. गर्दीत मिसळून जाऊन कुठल्याच महिलेनं कधीच बदल घडवून आणलेला नाही.

  • यिव्होन अकी-सॉयर

    सिएरा लिओन महापौर

    महापौर यिव्होन अकी-सॉयर, त्यांच्या तीन वर्षांत फ्रीटाऊन बदलण्याच्या योजनेसाठी ओळखल्या जातात. यिव्होन यांच्या या योजनेत पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामानबदल अशा संकटांचा सामना करण्यासोबतच नवीन नोकऱ्यांची निर्मिती करून बेरोजगारी कमी करण्यापर्यंत 11 कलमांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षात पूर आणि वणव्यांत कोट्यवधी लोकांना झालेल्या नुकसानामुळे हवामान बदलाचं संकट चर्चेत आहे. त्यातच अकी-सॉयर यांनी दोन वर्षांत दहा लाख झाडं लावण्याच्या योजनेसाठी फ्रीटाऊनच्या रहिवाशांना प्रेरणा दिली आहे.

    #FreetownTheTreeTown नावाची ही मोहीम जानेवारी 2020 मध्ये सुरू झाली, तेव्हा हाती कुठलीच फारशी साधनसंपत्ती नव्हती. पण ऑक्टोबर 2020 पर्यंत साडेचार लाख रोपं लावण्rयात आली आहेत, आणि बाकीची पुडील वर्षी पावसाळ्यात लावली जातील. पूर, जमिनीची धूप रोखण्यासोबतच झाडं ही पाणीटंचाईवर उपाय म्हणूनही महत्त्वाची आहेत.

    > आपल्याला कदाचित निराश आणि असमाधानी वाटतं, पण ही गोष्ट नकारात्मकतेनं पाहण्याची गरज नाही; आपल्या असंतोषाला आपण सकारात्मकतेत बदलून आपल्याला हवा असलेल्या बदलाला जन्म देऊ शकतो.

  • एरिका बेकर

    जर्मनी अभियंता

    एरिका 'गिटहब' इथे अभियांत्रिकी संचालक आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील एरिका यांच्या कारकीर्दीची सुरुवात 19 वर्षांपूर्वी झाली, त्या अलास्का विद्यापीठाला तांत्रज्ञानात मदत करत होत्या. 2006 साली त्या गुगलमध्ये दाखल झाल्या.

    2015 मध्ये स्लॅक, 2017 साली पॅट्रिऑन आणि तयानंतर मायक्रोसॉफ्ट आणि मग गिटहब असा त्यांचा प्रवास आहे. एरिका 'एटिपिका' आणि 'हॅक द हूड'; code.org डायव्हर्सिटी कौंसिल आणि बार्बी ग्लोबल अ‍ॅव्हायझरी कौन्सिल बोर्ड, गर्ल डेव्हलप इट अशा संस्थांच्या संचाचालक मंडळाच्या सल्लागार म्हणूनही काम करतात. त्या ब्लॅक गर्ल्स कोडसाठी टेक मेंटॉर आहेत. एरिका सध्या कॅलिफोर्नियातीलयातील ओकलँडमध्ये राहतात.

    > 2020 साली जग बरच बदललं आहे. निस्वार्थ असणं म्हणजे काय, सेवेचे महत्त्व काय आणि नातेसंबंधांची किंमत काय असते, ते आपण पुन्हा शिकतो आहोत. जग प्रत्येकासाठी समान नाही, याचीही जाणीव होते आहे. मी जगभरातील महिलांना त्यांची ताकद न्यायासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि समानतेसाठी संघर्ष करण्यासाठी वापरण्यास प्रोत्साहित करेन.

  • सारा अल-अमिरी

    यूएई प्रगत तंत्रज्ञान मंत्री

    सारा अल-अमिरी या यूएईच्या प्रगत तंत्रज्ञान राज्यमंत्री आहेत आणि यूएईच्या अंतराळ संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्या यााधी अमिराती मंगळ मोहिमेच्या प्रकल्प उपव्यवस्थापक आणि विज्ञान प्रमुख म्हणूनही काम करत होत्या.

    > विषाणूमुळे जगाला रोखून ठेवलं, ती स्तब्ध स्थिती विचार करण्यास आणि पुढे जाण्यास प्रवृत्त करणारी आहे. आम्हाला ही वाढ सुरू ठेवण्यासााठी आणि आपल्या नाजूक जगाचं स्थैर्य निश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे.

  • वाद अल-खातेब

    सीरिया फिल्मनिर्माता

    वाद अल-खातेब या सीरियातल्या कार्यकर्ता, पत्रकार आणि फिल्मनिर्माता आहेत. त्यांच्या अलेप्पोमधील वार्तांकनाला एमी अवॉर्डसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2020 साली 'फॉर समा' (समासाठी) या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार मिळाला. तसंच सर्वोत्तम लघुपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठीही या फिल्मला नामांकन मिळालं.

    2016 साली अलेप्पोमधून विस्थापित झाल्यावर वाद, आपले पती आणि दोन मुलींसह लंडनमध्ये राहतात. वाद आता चॅनेल फोर न्यूजसाठी काम करत असून, अ‍ॅक्शन फॉर समा ही मोहीम चालवतात.

    > आपण तेव्हाच हरतो, जेव्हा आपण आशा सोडतो. सर्व स्त्रियांनी, तुम्ही कुठेही असाल, एवढंच लक्षात ठेवा, ज्यावर तुमचा विश्वास आहे, त्यासाठी लढा सुरू ठेवा, स्वप्ने पाहण्याचं धाडस दाखवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधीही आशा सोडू नका.

  • एड्रियाना अल्बिनी

    इटली पॅथॉलॉजिस्ट

    एड्रियाना अल्बिनी या IRCS मल्टीमेडिका आणि मल्टीमेडिका फाउंडेशनच्या संवहनी जीवशास्त्र आणि एंजिओजेनेसिस प्रयोगशाळेच्या प्रमुख आहेत. मिलान-बिकोका विद्यापीठात त्या जनरल पॅथॉलॉजीच्या प्राध्यापक असून; यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ येथेही त्यांनी काम केलं आहे.

    अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्चच्या संचालक मंडळावर निवडलेल्या अल्बिनी पहिल्या इटालियन आहेत. नॅशनल ऑब्झर्वेटरी फाऊंडेशन ऑन वुमेन्स हेल्थ या इटलीतल्या आघाडीच्या महिला वैज्ञानिकांच्या क्लबच्या त्या अध्यक्ष असून महिला संशोधकांना पाटबळ देण्याचं त्या काम करतात. त्या तलवारबाजी खेळातही पारंगत असून, 2018 साली व्हेटरन्स वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक आणि युरोपियन व्हेटरन्स फेन्सिंग स्पर्धेत 2015 साली रौप्यपदकही मिळवलं आहे.

    > संशोधक त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात एक मार्गावरुन करतात; तर शास्त्रज्ञ जिथे रस्ता संपल्यासारखा वाटतो, तिथे नवा मार्ग शोधून काढतात. महिला शास्त्रज्ञांनी, त्यांच्या एकाचवेळी अनेक कामं करण्याच्या क्षमतेचा वापर करून असे नवे मार्ग शोधणं आवश्यक आहे, ज्याकडे इतर कुणी पाहातही नाहीयेत.

  • उबाह अली

    सोमालीलँड FGM विषयी जागरूकता पसरवणारी

    उबाह अली या 'सोलेस फॉर सोमालीलँड गर्ल्स' या संस्थेची सह-संस्थापक आहे, शिक्षण आणि सबलीकरणाद्वारे सोमालँडमध्ये महिला जननेंद्रियाच्या विकृती (एफजीएम) प्रथेचं निर्मूलनासाठी काम करणारी ही संस्था आहे.

    उबाह बैरूतच्या अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असून, लेबेनॉनमधील स्थलांतरित कामगारांच्या हक्कांसाठी लढत आहे.

    > 2020 मध्ये जगात बरेच बदल झाले आहेत. जगभरातील महिलांच्या ऐक्यासाठी तातडीचे आवाहन करण्याची गरज आहे. बर्‍याचजणींना घरगुती हिंसाचार, बलात्कार, एफजीएमसारख्या समस्या भेडसावत आहेत. एकत्र येऊन महिला न्याय मागू शकतात.

  • निसरीन अलवान

    इराक/यूके सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ

    निसरीन या यूकेमधील सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर आणि अभ्यासक आहेत. त्या महिला आणि मुलांच्या आरोग्याविषयी संशोधन करतात. कोव्हिड -19च्या जागतिक साथीच्या काळात देशांनी केवळ मृत्यूचे प्रमाण न मोजता, विषाणूमुळे होणाऱ्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं होतं.

    > 2020 च्या दरम्यान, मी तीन गोष्टींवर भर दिला : मला वाटतं ते बोलणं, मला भीती वाटते ती गोष्ट करून पाहणं आणि स्वतःला माफ करणं. मी तीन गोष्टी करणं टाळलं: इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करणं, स्वत: ला दोष देणं आणि आपण इतरांपेक्षा कमी आहोत असा विचार करणं.

  • एलिझाबेथ अ‍ॅनिनोवू

    इंग्लंड, यूके नर्स

    प्रोफेसर डेम एलिझाबेथ अ‍ॅनिनोवू वेस्ट लंडन विद्यापीठात नर्सिंग शिकवतात. त्या यूके सिकल सेल सोसायटीच्या आश्रयदाताही आहेत.

    त्यांनी सिकलसेल आणि थॅलेसिमियावर भरीव काम केलं आहे. ब्रिटीश-जमैकन नर्स मेरी सीकोल यांच्या पुतळ्यासाठी त्यांनी मोहीम राबविली. BAME म्हणजे कृष्णवर्णीय-आशियाई-अल्पसंख्यांक समुदायांवर कोव्हिडच्या साथीच्या होणाऱ्या परिणामांमदल्या असमानतेवर प्रकाश टाकणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आहे.

    > आपण आणि इतर बर्‍याच स्त्रिया करत असलेल्या जागतिक स्तरावरच्या सकारात्मक योगदानास कधीही कमी लेखू नका.

  • नदीन अश्रफ

    इजिप्त कॅम्पेनर actuallynadeen

    नदीन तत्त्वज्ञानाची विद्यार्थी असून सोशल मीडिया हे बदलाचं माध्यम आहे असं तिला वाटतं. सामान्य लोकांना शक्य होईल अशा पद्धतीनं शिक्षणाचा प्रसार करण्याची तिला आवड आहे.

    नदीन असॉल्ट पोलिस नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटची संस्थापक आहे. या अकाऊंटवर इजिप्तमधल्या महिला त्यांना आलेले लैंगिक छळाचे अनुभव मांडतात. महिला हक्क चळवळीच्या विश्वात लैंगिक छळासंदर्भात सामाजिक बदल घडवून आणण्याच्या लढ्यामधली महत्त्वाची व्यक्ती म्हणून नदीनकडे पाहिलं जातं.

    > मी अशा वातावरणात वाढले, जिथे माझ्या आसपासच्या महिलांनी आपलं जीवन परिवर्तनासाठी समर्पित केले आहे; मी त्यांचा आवाज वाढवण्याचं काम करू शकेन, असं मला कधीही वाटलं नव्हतं. विश्वास असेल, तर कुठलीही गोष्ट करण्यास कधीच उशीर होत नाही.

  • बिल्किस

    भारत आंदोलनकर्ती

    82 वर्षांच्या बिल्किस महिलांच्या एका गटाच्या भाग होत्या ज्यांनी शांततापूर्ण मार्गानं वादग्रस्त नागरिकत्व कायद्याचा निषेध केला.

    दिल्लीच्या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या शाहीन बाग इथे प्रदीर्घ काळ चाललेल्या निषेधाचा त्या चेहरा बनल्या. भारतीय पत्रकार आणि लेखक राणा अय्यूब यांनी तिचे वर्णन "उपेक्षित लोकांचा आवाज" असे केले आहे.

    > महिला घराबाहेर पडण्याकरिता आणि विशेषत: अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्याकरता सक्षम बनायला हव्यात. त्या घराबाहेर पडल्या नाहीत, तर त्यांची ताकद कशी दाखवू शकतील?

  • डायना बॅरन

    यूके पार्लमेंटरी अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट

    बॅरोनेस डायना बॅरन यांची 2019 मध्ये यूकेच्या नागरी समाज मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. त्या 'सेफलाइव्ह्ज' या संस्थेच्या संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी असून, घरगुती अत्याचार संपविण्यासाठी ही संस्था काम करते आहे. 'न्यू फिलॉन्ट्रॉपी कॅपिटल' या विचारवंतांच्या गटाच्या त्या माजी प्रमुख असून, याआधी त्यांनी मालमत्ता व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम केलं होतं आणि 1993 साली त्यांनी युरोपातल्या पहिल्या हेजफंडपैकी एकाच्या स्थापनेतही योगदान दिलं होतं.

    डायना बॅरन या रॉयल फाउंडेशन आणि कॉमिक रिलीफ या संस्थांच्या विश्वस्त होत्या आणि त्यांनी हेन्री स्मिथ चॅरिटीचे अध्यक्षही सांभाळले. 2007 मध्ये त्यांना इंग्लंडचा बीकन पुरस्कार आणि 2011 मध्ये घरगुती हिंसाचाराच्या विषयात कामासाठी MBEनं सन्मानित करण्यात आलं.

    > मला माया एंजेलोचे शब्द आठवतात, "आपण जे सांगितले ते लोक विसरतील, आपण काय केले ते लोक विसरतील, परंतु आपण त्यांना कसं वागवलं, हे लोक कधीही विसरणार नाहीत."

  • सिंडी बिशप

    थायलंड संयुक्त राष्ट्रांची दूत, मॉडेल cindysirinya

    सिंडी सिरिन्या बिशप एक मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट असून ती महिलांवरील अत्याचार नष्ट करण्यासाठी मोहीम राबवते. यावर्षी तिची आशिया आणि पॅसिफिकसाठी यूएन महिला प्रादेशिक सद्भावना दूत म्हणून निवड झाली आहे. शिक्षण, समुदाय आणि सरकारांद्वारे लैंगिक समानतेचा प्रचार करण्यासाठी ती काम करते आहे. 2018 साली थायलंडमधील अधिकाऱ्यांनी थाई नववर्षाच्या उत्सवादरम्यान लैंगिक अत्याचार होऊ नयेत असे वाटत असल्यास महिलांनी 'सेक्सी' दिसू नका असं विधान केल्यावर सिंडीनं #DontTellMeHowToDress या चळवळीची स्थापना केली.

    ती ड्रॅगनफ्लाय-360 या प्रादेशिक व्यासपीठाची नॉलेज डिरेक्टर असून हे त्याद्वारा ती आशियात लिंगविषयक समानतेचा पुरस्कार करते. ती सध्या लहान मुलांसाठी पुस्तकांची मालिका लिहिते आहे ज्यात सुरक्षा, हक्क आणि आदरपूर्ण नातेसंबंधांविषयीही लिहिलं आहे.

    > 2020 साली जग खूप बदललं आहे. बदलासोबतच प्रगतीची संधीही येत असते. प्रत्येकाला सन्मानानं आणि स्वातंत्र्यासह जगण्याची समान संधी मिळायला हवी. आपण पुढच्या पिढीच्या स्त्री आणि पुरुषांना प्रेरणा देत राहिलं पाहिजे.

  • डॉ. लिओ यी-सिन

    सिंगापूर डॉक्टर

    डॉ लिओ यी-सिन सिंगापूरमधलं संसर्गजन्य रोगांचं अत्याधुनिक नॅशनल सेंटर चालवतात, ज्यांवर साथीच्या रोगाचं संकट हाताळण्याची जबाबदारी आहे.

    कोव्हिड -19 विरोधात देशातील लढाईत अग्रेसर असण्याबरोबरच, त्यांनी सिंगापूरमध्ये HIVग्रस्तांना मिळणारे उपचार सुधारण्यासाठी तसंच सार्ससारख्या अन्य काही साथींतून सिंगापूरला बाहेर काढण्यासाठी अनेक दशकं काम केलं आहे. आपलं काम आणि तीन मुलांची आई अशा दुहेरी जबाबदारीचा ताळमेळ त्या साधतात.

    > कोव्हिड-19 ने सगळ्यांच आयुष्य कायमचं बदललं आहे. पण त्यानं महिला नेतृत्वाची प्रतिष्ठा बदललेली नाही. या विषाणूशी लढा देणाऱ्याांमध्ये महिला आघाडीवर आहेत आणि त्या धाडस, ताकद आणि भक्कमपणे हे करत आहेत.

  • मॅकिन्ली बटसन

    ऑस्ट्रेलिया वैज्ञानिक आणि संशोधक

    मॅकिन्ली बट्सन सात वर्षांची असल्यापासून वेगवेगळे शोध लावते आहे. आता विसाव्या वर्षी तिने स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये रेडिओथेरपीच्या उपचार अधिक परिणामकारक बनवणारं उपकरण, सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणारं यंत्र अशी अनेक उपकरणे तयार केली आहेत.

    ती ऑस्ट्रेलियन तरूणांना प्रेरणा देणारी आदर्श बनली आहे. STEMच्या माध्यमातून समाजाला कसं योगदान देता येईल, हे तिनं दाखवून. दिलं आहे.

    > आपली बदल घडवून आणण्याची क्षमता दुसऱ्या कशावर अवलंबून नसते. माजी जगभरातील प्रत्येक स्त्रीला विनंती आहे, की तिनं स्वतःला हे विचारावं, “मी नाही तर कोण? आता नाही तर मग कधी? ”

  • एव्हेलिना कबरेरा

    अर्जेंटिना फुटबॉल प्रशिक्षक आणि मॅनेजर evelinacabrera23

    एव्हेलिनाचा जन्म असुरक्षित वातावरणात झाला, पण परिस्थिती तिला फुटबॉल प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होण्यापासून रोखू शकली नाही.वयाच्या 27 व्या वर्षी तिनं अर्जेंटिनाच्या महिला फुटबॉल असोसिएशनची स्थापना केली.

    तिने अनेक संघ तयार केले (त्यात अंध महिलांसाठीही फुटबॉल संघाचा समावेश आहे), कैद्यांना प्रशिक्षण दिलं आणि असुरक्षित वातावरणातल्या महिला आणि मुलींना खेळ व शिक्षणाद्वारे मदत केली. एव्हेलिना अर्जेंटिनातल्या पहिल्या महिला फुटबॉल व्यवस्थापकांपैकी एक असून तिच्या आत्मचरित्रात तिच्या समानतेसाठी लढाईविषयी लिहिले आहे.

    > आपलं लिंग काय आहे आणि आपण कुठून आलो, याला आपलं भविष्य ठरवू देऊ नका. ही एक कठीण वाट आहे, पण एकत्रितपणे संघर्षानं आपण समानता आणि एकात्मकता असलेलं जग निर्माण करू शकू.

  • वेंडी बिट्रिझ कॅशपाल जाको

    एल साल्वाडोर अपंग हक्क कार्यकर्ता wendy_caishpal

    वेंडी कॅशपाल एक उद्योजक, कार्यकर्ता, वक्ता असून त्या अपंग आणि सशस्त्र संघर्षातून वाचलेल्यांच्या हक्कांसाठी काम करत आहेत.

    त्या लीडरशिप अँड डिसएबिलिटी (WILD) आणि आंतरराष्ट्रीय मोबिलिटी यूएसए या संघटनांमध्ये एल साल्वाडोरचं प्रतिनिधित्व करतात. त्या अपंग लोकांच्या हक्कांचा पुरस्कार करणाऱ्या आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या अहुआकापॅन सिन बॅरेरास (अहुआकापॅन विदाऊट बॅरियर्स) या संस्थेच्या संस्थापक आणि संचालक आहेत.

    > आपण काय करतो आणि आपण ते कसे करतो यावर प्रेम करायला हवे. आपण सामाजिक परिवर्तनाची साधने होऊया: आपण कृती करू, लढा देऊ, बदल घडवूया.जर प्रत्येकजण त्यासाठी लढा देत असेल तर आपणास आणखी चांगले जग तयार करता येईल.

  • कॅरोलिना कॅस्ट्रो

    अर्जेंटिना शासन

    कॅरोलिना कॅस्ट्रो अर्जेंटिना इंडस्ट्रियल युनियन (यूआयए) या संस्थेच्या 130 वर्षांच्या इतिहासात शासकीय पदावर पोहोचणारी पहिली महिला ठरल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी अत्यंत ध्रुवीकरण झालेल्या देशात वेगवेगळ्या पक्षांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचा अजेंडा पुढे नेण्यास हातभार लावला आहे.

    कॅस्ट्रो या कारपार्ट्सची निर्मिती करणाऱ्या एका कौटुंबिक मालकीच्या कंपनीमध्ये तिसऱ्या पिढीच्या प्रमुख आहेत. त्यांनी दुकानांमध्ये महिलांना बाजारातील अन्य कंपन्यांपेक्षा जास्त पगारावर दुकानांमध्ये नोकरी देत अनेक रूढी मोडल्या आहेत. त्यांनी लीकडेच रोम्पीमोस अल क्रिस्टल ("आम्ही काचेचं छत मोडलं") हे पुस्तक लिहिलं आहे, ज्यात व्यवसाय, कला, राजकारण आणि विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 18 अर्जेंटिनी स्त्रियांशी केलेल्या संभाषणाचा लेखाजोखा मांडला आहे.

    > समानतेचा अजेंडा असामान्य व्यक्ती चालवत नाहीत, तर आपण प्रत्येकजण, प्रत्येक लिंगाची व्यक्ती दैनंदिन आयुष्यात घेत असलेल्या छोट्या छोट्या निर्णायतून तो पुढे नेत असतो.

  • अ‍ॅग्नेस चाऊ

    हाँगकाँग लोकशाहीवादी कार्यकर्ता chowtingagnes

    हाँगकाँगमधील लोकशाही समर्थक 23 वर्षीय अ‍ॅग्नेस चाऊनं 2014 सालच्या 'अंब्रेला चळवळी'दरम्यान महत्वाची भूमिका बजावली होती. यंदा बीजिंगने लागू केलेल्या वादग्रस्त नवीन सुरक्षा कायद्यांतर्गत अटक केलेल्या मूठभर कार्यकर्त्यांपैकी ती एक होती. तिच्यावर “परदेशी शक्तींसह काम” करण्याचा आरोप होता.

    तिची जामिनावर सुटका झाली, पण अटकेमुळे तिला मिळणारा पाठिंबा वाढला आहे. वयाच्या पंधराव्या वर्षापासून ती राजकारणात सक्रिय होती. तिच्या समर्थकांनी तिला "मुलान" हे टोपणनाव दिले आहे. हे चीनच्या एका महान नायिकेचं नाव आहे जिने आपल्या कुटुंबाचं आणि देशाचं रक्षण करण्यासाठी संघर्ष केला होता.

    > महिला नेता आहे, याचा महिलांच्या हक्कांवर काहीही परिणाम होत नाही. आम्हाला व्यवस्थेत बदल आणि अस्सल लोकशाहीची गरज आहे.

  • पॅट्रिशिया कलोर्स

    यूएसए मानवी हक्क कार्यकर्ता

    कलाकार, संघटक, शिक्षक आणि सार्वजनिक वक्ता असलेल्या पॅट्रिशिया कुलोर्स लॉस एंजेलिसच्या रहिवासी आहेत. ब्लॅक लाइव्ह्स मॅटर ग्लोबल नेटवर्कच्या त्या सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत. तसंच लॉस एंजेलिसमधल्या डिग्निटी अँड पॉवर नाऊ या संस्थेच्या संस्थापक आहेत.

    पॅट्रिशिया सध्या अरायझोनाच्या प्रेस्कॉट कॉलेजमध्ये मास्टर ऑफ फाईन आर्ट्स या पदवीसाठी नव्या सोशल अँड एन्व्हायर्नमेंटल आर्ट्स प्रॅक्टिस या अभ्यासक्रमाच्या संचालक आहेत. त्यांनीच हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

    > कधीही आपल्या ताकदीवरचा विश्वास सोडू नका. आपला आनंद जोपासा. आणि बदलाची मागणी करा- केवळ स्वतःसाठीच नाही, तर आपल्या मागाहून येणाऱ्या महिलांसाठीही.

  • त्सित्सी दांगारेंबगा

    झिम्बाब्वे लेखक आणि चित्रपटनिर्माती

    त्सित्सी एक नावाजलेल्या लेखक, चित्रपट निर्माती आणि सांस्कृतिक कार्यकर्ता आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले असून, ती पुस्तकं झिम्बाब्वेत अभिजात म्हणून ओळखली जातात. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलसह जगभरातील चित्रमहोत्सवांमध्ये त्यांचे चित्रपट दाखवण्यात आले आहेत. त्या हरारे येथे राहतात आणि महिला आफ्रिकन चित्रपट निर्मात्यांसह काम करतात.

    यावर्षी झिम्बाब्वेमध्ये नागरिकांनी सरकारवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचा आरोप करत आंदोलन आणि निषेध केला. त्यात सहभागी झालेल्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यात त्सित्सिही होत्या. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आखलेल्या नियमांचा भंग केल्याचा आणि हिंसाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला, पण त्यांची जामिनावर सुटका झाली. त्सित्सि त्यांच्यावरचे आरोप नाकारतात. त्यांच्या सह लेखकांनीही हे आरोप मागे घेतले जावेत अशी मागणी केली आहे.

    > बदलाची भीती बाळगू नका. आपल्यासाठी उपयुक्त असे बदल करा.

  • शानी धांडा

    यूके अपंग हक्क कार्यकर्ता

    शानि धांडा या पुरस्कारप्राप्त अपंगत्व तज्ञ आणि सामाजिक उद्योजक आहेत, ज्या यूकेच्या सर्वात प्रभावी अपंग लोकांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. शानीनं अपंगांना सवलती देणाऱ्या डायव्हर्सिबिलिटी कार्डसाठी पुढाकार घेतला असून, एशियन वूमन फेस्टिवल आणि एशियन डिसएबिलिटी नेटवर्कची स्थापना केली आहे.

    ही तिन्ही व्यासपीठं अशा समुदायांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना फारसा वाव मिळत नाही.

    > जग सावरते आहे, आता एक सर्वसमावेशक व शाश्वत भविष्य घडवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

  • नओमी डिक्सन

    यूके मुख्य कार्यकारी अधिकारी

    नओमीने आपले जीवन ज्यू महिला आणि ज्यांना घरगुती अत्याचाराचा सामना करावा लागला आहे अशा मुलांना पाठबळ देण्यासाठी तसंच ज्यू समुदायाला शिक्षित करण्यासाठी समर्पित केले आहे जेणेकरून त्यांच्याकडे कॉल करणे, साइनपोस्ट करणे आणि घरगुती अत्याचार रोखण्यासाठी आतापर्यंत आणि भविष्यात साधने असतील.

    ज्यूईश विमेन्स एड संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नओमी सर्व धर्माच्या आणि कोणताही धर्म न मानणाऱ्या महिलांसोबत काम करतत आहेत. त्या वेगवेगळे समुदाय आणि धार्मिक पदांवरील नेत्यांना असं जग निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करतात जिथे महिला आणि मुलींवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही.

    > 2020 मध्ये जग बरंच बदललं आहे आणि आम्ही स्वतःला लवचिक बनवण्यास शिकलो आहोत, जेणेकरून आम्ही इतरांना मदत करू शकू.

  • कॅरेन डोल्वा

    नॉर्वे संशोधक

    कॅरेन डोल्वा या ऑक्टोबर 2015 मध्ये स्थापन झालेल्या 'नो आयसोलेशन' या स्टार्ट-अप कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक आहेत. भावनिक ओलावा कायम राखणारं तंत्रज्ञान आणि ज्ञानाद्वारे लोकांना एकत्र आणणे हे त्याचे ध्येय आहे.

    आजपर्यंत या कंपनीने दोन उत्पादने तयार केली आहेत: AV1 हा दीर्घकालीन आजाराने ग्रस्त मुले आणि तरुण प्रौढांमधील एकटेपणाचा सामना करण्यासाठी मदत करणारा टेलीप्रेझेन्स अवतार आणि KOMP वृद्धांना एक बटन दाबून संवाद साधता येईल असं यंत्र.

    > Covid-19चं कारण देत आपण आपला लढा थांबवू शकत नाही. ही झोपेतून जागं होण्याची वेळ आहे : सर्वात असुरक्षित लोक नेहमीच सर्वात खडतर परिस्थितीत असतात. हा काळ आपण बदल घडवण्यासाठी आणि धोक्यात असलेल्या व्यक्तींना सावरण्यासाठी वापरला पाहिजे.

  • इलवाद एल्मन

    सोमालिया शांततावादी कार्यकर्ता

    इलवा एल्मन या सोमाली शांतता प्रक्रियेत आघाडीवर असलेल्या एक तरुण महिला नेता आहेत. जागतिक स्तरावर त्या संघर्ष संपवून आणि समाजात समेट घडवून आणण्यासाठीच्या कामात अधिकारी व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी ओळख मिळवली आहे.

    अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी सोमालियातल्या पहिल्या बलात्कार मदत केंद्राची सह-स्थापना केली. गेल्या दशकात, इलवाद संघर्षामुळे प्रभावित झालेल्या सर्वांसाठी काम करते आहे विशेषत: महिला आणि मुलींना शांततेच्या वार्तालापात सहभाग मिळवून देण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.

    > जागतिक साथीच्या आजारानं जगाला सहानुभूतीचा धडा दिला आहे. जिथे बाकीचे अपयशी ठरले, तिथे महिलांना नेतृत्त्व करताना आपण पाहिलं आहे. नेतृत्वात असलेल्या महिलांना यापुढे पर्यायी दुय्यम मानले जाऊ नये, तर मुलभूत प्राधान्य मिळायला हवं.

  • जियाँग इयुन-क्योंग

    दक्षिण कोरिया KDCA आयुक्त

    डॉ. जियाँग इयुन-क्योंग यांचं वर्णन व्हायरस हंटर, म्हणजे विषाणूची शिकार करणाऱ्या असंच केलं जातं. त्यांनी कोव्हिड-19च्या संकटाविरोधात दक्षिण कोरियाच्या मोहिमेचं नेतृत्त्व केलं आहे.

    कोरिया रोग नियंत्रण व प्रतिबंध एजन्सी (KDCA) च्या विद्यमान आयुक्त म्हणून - आणि त्यापूर्वी KDCAच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आपल्या पारदर्शक कारभारासाठी आणि कोव्हिडच्या संदर्भात रोजची माहिती देण्याच्या शांत, संयत पद्धतीसाठी त्या ओळखल्या जातात.

    > साथीच्या रोगाला प्रतिसाद देण्यासाठी स्वत: ला झोकून देणाऱ्या सर्व आरोग्य सेवकांचे मी मनापासून कौतुक करते. मी आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता बळकट करून जग आणखी सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करेन.

  • फँग फँग

    चीन लेखक

    फॅंग फॅंग, ज्यांचे खरे नाव वांग फॅंग आहे, या एक पुरस्कारप्राप्त चीनी लेखक आहेत ज्यांनी 100 हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली आहे. यंदा त्यांनी जिथे कोरोना विषाणूचा पहिला उद्रेक झाला, त्या वुहानमधील घटनाचं दस्तऐवजीकरण करण्यास सुरवात केली. त्यांच्या डायरीनं चीनमधल्या कोट्यवधी लोकांना या शहरातील गोष्टींची झलक दाखवली. दैनंदिन जीवनातील आव्हानांपासून ते सक्तीच्या आयसोलेशनच्या शारीरिक प्रभावापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांनी लिहिले.

    इंग्रजीत भाषांतर झालेल्या त्यांच्या डायरीनं जगाचं लक्ष वेधून घेतलं, पण त्यांच्या वार्तांकनाविरोधात इंटरनेटवर टीकाही होऊ लागली. चीनमधल्या अनेकांचा रोष त्यांनी ओढवला आणि काहींनी त्यांना देशद्रोही ठरवून टाकलं.

    > स्वतंत्र बना.

  • सोमाया फारुकी

    अफगाणिस्तान रोबॉटिक्स टीम लीडर

    अफगाणिस्तानात कोव्हिड-19चा पहिला रुग्ण हेरातमध्ये आढळून आला, तेव्हा याच प्रांतात राहणारी सोमाया आणि तिच्या 'अफगाण ड्रीमर्स' या सर्व मुलीच असणाऱ्या रोबॉटिक्स टीमनं स्वस्तातले व्हेंटिलेटर्स तयार केले, जे कोरोनाविषाणूनं ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचारात मदत करू शकतात.

    सोमाया आणि तिची टीम त्यांचे व्हेंटिलेटर्स आरोग्य आरोग्य मंत्रालयाला दाखविण्याचा विचार करीत आहेत. मंजूर झाल्यास हे व्हेंटिलेटर्स दुर्गम भागातील रुग्णालयांमध्ये वापरले जाऊ शकतात. 2002 मध्ये जन्मलेल्लया सोमायानं अमेरिकेतील FIRST ग्लोबल चॅलेंजमध्ये रौप्य पदकासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. वर्ल्ड समिट एआयमध्ये मानवतेला मदत करणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी पुरस्कार, रॉ विज्ञान चित्रपट महोत्सवातील पुरस्कार तसंच एस्टोनियात होणाऱ्या युरोपमधील सर्वात मोठ्या रोबोटिक्स उत्सवातला पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

    > आपण आपल्या मुला-मुलींना शिकवतो आहोत, हीच भविष्याची किल्ली आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाची समान संधी मिळेल आणि त्यांचं स्वप्न साकार करण्याची साधनं मिळतील, याकडे आपण लक्ष द्यायला हवं.

  • आयलिन फ्लिन

    रिपब्लिक ऑफ आयर्लंड सिनेटर

    आयलिन फ्लिन यांनी आयरिश संसदेत शानद एअरन या वरिष्ठ सभागृहात स्थान मिळवणारी आयरिश ट्रॅव्हलर्स या भटक्या समुदायाची पहिली महिला बनत इतिहास रचला.

    त्या आता त्यांच्चा संसदेतील स्थानाचा उपयोग आयरिश ट्रॅव्हलर्स आणि इतर उपेक्षित समुदायांना मदत करण्यासाठी करत आहेत. रिपब्लिक ऑफ आयर्लंडमध्ये द्वेषातून होणाऱ्या गुन्हेगारीविरोधात कायदा लागू करण्याची तिची महत्वाकांक्षा आहे.

    > एकमेकांची काळजी घ्या; एकमेकांना हात द्या; दुसर्‍या महिलेस खाली ढकलण्याचा प्रयत्न करु नका. दुसर्‍याची मेणबत्ती विझवल्यानं आपली उजळत नसते. जेव्हा आपण एकत्र उभे राहतो, तेव्हा आपल्या ज्वालांनी जगाला आग लावू शकते.

  • जेन फोंडा

    यूएसए अभिनेत्री

    ऑन-स्क्रीन, जेन फोंडा या दोन वेळा अकादमी पुरस्कारप्राप्त अभिनेत्री आहेत. क्लूट, कमिंग होम, ऑन गोल्डन पाँड यासारख्या आयकॉनिक चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका नावाजल्या गेल्या. सध्या जेन फोंडा 'ग्रेस आणि फ्रॅन्की' या नेटफ्लिक्सवरच्या हिट मालिका मुख्य दोन पात्रांपैकी एक भूमिका साकारत आहेत.

    ऑफ-स्क्रीन, जेन फोंडा गेल्या पन्नास वर्षांपासून सामाजकार्य करत आहेत आणि ज्याविषयी त्यांना मनापासून काही करावासं वाटतं, अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. महिलांना समान पगाराची मागणी करण्यापासून, ते पर्यावरणाविषयी अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यांनी सध्या ग्रीनपीस यूएसए या संस्थेसोबत फायर ड्रील फ्रायडे ही मोहीम सुरू केली आहे, जी हवामान बदलाविषयी लोकांना माहिती देते आणि साप्ताहिक निषेध मोर्चाचं आयोजन करते.

    > विज्ञानानं अंदाज लावला होता, त्यापेक्षा जास्त वेगाने जगाचं तापमान वाढत आहे. मानवतेसमोर अस्तित्वाचं संकट आहे. त्यावर सामूहिक उपाय आहे. महिलांना हे माहिती आहे, की आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत. त्या हवामान बदलाचा फटका सहन करत आहेत आणि त्याच या समस्येचं निराकरण करण्यात पुढाकार घेतील. हे साधण्यासाठी भक्कम उभं राहुयात.

  • मॅडम गांधी

    यूएसए गायिका

    किरण गांधी गायिका आहेत. त्या मॅडम गांधी या नावानं कार्यक्रम सादर करतात. त्या महिला हक्क कार्यकर्ताही आहेत. महिलांच्या स्वातंत्र्यासाठी काम करणं हे त्याचं ध्येय आहे. किरण गांधी यांनी ड्रमिग टीमसह MIA. पासून थिएवरी कॉर्पोरेशनपर्यँत अनेक टूर आयोजित केल्या आहेत.

    याआधी किरण गांधी पाळी सुरू असताना लंडन मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या, जेणेकरून पाळीविषयी लोकांचं मत बदलता येईल.

    > आपल्यातल्या अनेकांना घरून काम करताना आपल्या कामाचं स्वरुप बदलावं लागलं. त्यामुले मुलांचा सांभाळ करण्याविषयी दृष्टिकोनात चांगला बदल दिसतो आहे. आपल्या आत ती ताकद आहे, ज्यानं आपण व्यवस्था बदलून ती आपल्यासाठी सुकर करू शकतो.

  • लॉरेन गार्डनर

    यूएसए शास्त्रज्ञ

    लॉरेन गार्डनर या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या प्राध्यापक आहेत, तसंच सिस्टिम सायन्स आणि इंजिनियरिंग केंद्राच्या सह-संचालक आहेत.

    गार्डनर यांच्या नेतृत्त्वाखालील टीमनंच जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचा कोव्हिड -19 डॅशबोर्ड बनवला आहे, ज्याला या आजाराविषयी सर्व आकडेवारीचा अधिकृत स्रोत म्हणून मान्यता मिळाली आहे. जगभरातील सरकारे, संसर्गजन्य रोग संशोधक आणि माध्यमे याचाच संदर्भासाठी वापर करत आहेत.

    > परवानगीची वाट पाहू नका. तुमच्या जागेवर बसा आणि काम सुरू करा.

  • एलिशिया गार्झा

    यूएसए मानवी हक्क कार्यकर्ता

    अ‍ॅलिसिया गर्झा एक संघटक, राजकीय रणनीतिकार आणि लेखक आहेत. "पर्पज ऑफ पॉवर : हाऊ वी कम टुगेदर व्हेन वी फॉल अपार्ट" हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे.

    त्या ब्लॅक फ्युचर्स लॅब तसंच ब्लॅक टू फ्यूचर अ‍ॅक्शन फंडच्या प्रमुख असून; ब्लॅक लाइव्हस मॅटर आणि ब्लॅक लाइव्ह्स मॅटर ग्लोबल नेटवर्कच्या सहसंस्थापक आहेत. राष्ट्रीय घरगुती कामगार आघाडीमध्ये त्या धोरण आणि भागीदारी विभागात संचालक असून; 'सुपरमेजॉरिटी'च्या सह-संस्थापक आहेत. त्या 'लेडी डोण्ट टेक नो' हे पॉडकास्टही करतात.

    जमिनीवर पाय, आकाशात डोकं, लक्ष्यावर नजर.

  • इमान गालिब अलृहमली

    येमेन मायक्रोग्रिड मॅनेजर

    इमान दहा महिलांच्या एका गटाचं व्यवस्थापन करतात, ज्या गटानं सौर ऊर्जेसाठी मायक्रोग्रिडची स्थापना केली आहे. त्याच्या मदतीनं स्वच्छ आणि कमी प्रदूषणकारी ऊर्जेची निर्मिती करता येऊ शकते. त्यांचं हे मायक्रोग्रिड येमेनमध्ये गृहयुद्धानं ग्रासलेल्या भागापासून केवळ वीस मैलांवर आहे.

    हे मायक्रोग्रिड संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रम (UNDP) अंतर्गत उभारण्यात आलेल्या तीन मायक्रेग्रीडपैकी एक आहे. यमनच्या अशा भागात हे ग्रिड उभारण्यात आलं आहे, जो देशात विजेच्या प्रमुख ग्रिडमध्ये समाविष्ट नाही. हे असं एकच मायक्रोग्रिड आहे ज्याचं संचालन महिला करतात. सुरुवातीला यावरून इमानच्या टीमची चेष्टा करण्यात आली की त्या पुरुषांची कामं करत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी मोठी मजल मारली आहे. आता लोक त्यांना आदरानं वागवतात. यासोबतच या महिलांनी स्वतःसाठी शाश्वत उत्पन्नाचं साधनही निर्माण केलं आहे आणि नवी व्यावसायिक कौशल्यंही मिळवली आहेत.

    > येमेनच्या सर्व मुलींसाठी माझा संदेश आहे, की त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करावं. त्यांनी पूर्ण आत्मविश्वासानं प्रयत्न करायला हवेत. आपल्या आयुष्यात त्या ज्या आव्हानांचा सामना करतात, त्याचा वापर करून त्यांनी आपली स्वप्नं पूर्ण करायला हवीत.

  • सारा गिल्बर्ट

    यूके शास्त्रज्ञ

    चीननं नव्या कोरोना विषाणूचे जनुकीय तपशील प्रकाशित केल्यावर लगेचच ऑक्सफोर्डमध्ये सारा आणि त्यांची टीम तत्काळ कामाला लागले. त्यांनी कोव्हिड -19 वरची लस तयार केली आहे, जी सध्या क्लिनिकल चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.

    सारा यांनी मायक्रोबायॉलॉजी, बायो केमिस्ट्री, मॉलेक्युलर बायॉलॉजी आणि व्हॅक्सिनोलॉजीचं प्रशिक्षण घेतलं आहे, त्या नव्या आजारांवर लस करण्याचं काम 2014 पासून करत आहेत.

    > आपण इतके लवचिक होऊ शकतो, की या वर्षाचा प्रवास पूर्ण करू शकू. आता वेळ आली आहे, की आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे, त्यावर आपलं लक्ष केंद्रित करावं. जसं की आरोग्य,शिक्षण आणि इतरांसोबत चांगले संबंध.

  • मॅगी गोब्रान

    इजिप्त कॉप्टिक नन stephenschildrenus

    ममा मॅगी गोब्रान यांनी त्यांचं जीवन इजिप्तमधल्या उपेक्षित मुलांचे जीवन बदलण्यासाठी समर्पित केले आहे. संपन्न आयु्ष्य आणि उत्तम शैक्षणिक कारकीर्दीचा त्याग करून त्यांनी आपली सर्व शक्ती आणि संसाधने मुलांचा सांभाळ करण्यासाठी, त्यांचे पाय धुवून, त्यांच्या डोळ्यात पाहात तेही जगासाठी महत्त्वाचे आहेत हे सांगण्यात घालवली आहे.

    1989 पासून ममा मॅगी आणि तिच्या टीमच्या समग्र दृष्टीकोनामुळे शेकडो, हजारो मुलांचे जीवन बदलले आहे, त्यांना मानसिक आरोग्य, शिक्षण, आरोग्यसेवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सन्मान मिळाला आहे.

    > जेव्हा आपण स्वतःशी एकरूप व्हाल तेव्हा आपण स्वर्ग आणि पृथ्वीशी एकरूप व्हाल.

  • रिबेका ग्युमी

    टांझानिया वकील

    रिबेका ग्युमी या मिशिना इनिशिएटिव्ह नावाच्या स्थानिक सेवाभावी संस्थेच्या संस्थपक आणि कार्यकारी संचालक आहेत, ही संस्था मुलींच्याा हक्कांसाठी काम करते. त्या स्त्रीपुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या असून तरुण मुलींसोबत काम करण्याचा, राष्ट्रीय आणि गावपातळीवर चळवळी उभारण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

    2019 साली मिशिना इनिशिएटिव्हला टांझानियात मोठं यश मिळालं, जेव्हा कोर्टानं लग्नाचं किमान वय अठरा वर्षांपर्यंत वाढवत बालविवाहांवर बंदी घातली.

    > जेव्हा जगणं कठीण होतं, तेव्हा कठीण व्यक्तीच जगू शकतात. चला लढाई चालू ठेवण्याची प्रतिज्ञा करूयात, हा प्रवास सुरू ठेवत आणि समानतेचा अजेंडा पूर्ण होईपर्यंत आपला आवाज आणि योगदान देऊयात.

  • डीटा हेडमन

    जमैका डार्ट्स विजेता

    डीटानं रॉयल मेलसाटी 22 वर्षे रात्रपाळीत काम केलं. तिन आजवर 215 स्पर्धा जिंकल्या. या बाबतीत ती दुसऱ्या स्थानावर आहे, केवळ फिल टेलरची कामगिरी यापेक्षा उत्तम आहे. ती आजवर 341 वेळा फायनलमध्ये खेळली आहे. 1973 सााली ती इंग्लंडमध्ये आली होती आणि आता इंग्लिश डार्ट्स टीमची कर्णधार आहे.

    ती हार्ट ऑफ डार्ट्स या सेवाभावी संस्थेची सदिच्छा दूत आहे आणि इंग्लंडची युवा डार्ट्स अ‍ॅम्बेसेडर आहे. वर्ल्ड डार्ट्स फेडरेशनच्या मंडळावर खेळाडूंची प्रतिनिधी म्हणून तिची निवड झाली आहे. डीटानं अकरा वेळा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं होतं आणि इंग्लंडकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या महिला डार्ट्स प्लेयर्समध्ये ती दुसऱ्या स्थानावर आहे.

    > माझं सर्व महिलांना सांगणं आहे : तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि कधीही हार मानू नका. वय, लैंगिकता आणि वंश हे यशस्वी न होण्याचे काही कारण नाही. आपण फक्त एकदाच इथे येतो, त्यात बरेच काही मिळवा. #बिलिव्ह.

  • उयेंदू इकपे-एटिम

    नायजेरिया फिल्म निर्माता

    उयेंदू या क्विअर, स्त्रीवादी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि LGBTQ+ कार्यकर्ता आहेत, ज्यांनी नायजेरियातील उपेक्षित गटांची कहाणी सांगण्याचा निर्धार केला आहे.

    त्यांची योरूबा भाषेतील फिल्म ‘इफ’ नायजेरियातल्या दोन लेस्बियन महिलांची कहाणी सांगते, ज्या देशातल्या समलिंगीविरोधी वास्तवाचा सामना करतात. चित्रपट प्रदर्शित होत असल्याची घोषणा झाल्यावर नायजेरियात या फिल्मला सेन्सॉरशिपचा सामना करावा लागला. नायजेरियात समलिंगी संबंध हा आजही वादाचा विषय आहे.

    > महिलांनो, कृपया मिळेल ती जागा व्यापत जा आणि ज्यांचा आवाज दाबला जातो आहे, त्यांची कहाणी सांगणं सोडू नका.

  • मानसी जोशी

    भारत खेळाडू

    मानसी ही भारतीय पॅरा-अ‍ॅथलीट आहे आणि सध्याची पॅरा-बॅडमिंटनची विश्वविजेती आहे. जून 2020 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या जागतिक क्रमवारीत ती SL3 गटात महिला एकेरीत दुसऱ्या स्थानावर आहे. मानसी अभियंता आहे आणि बदलाची पुरस्कर्ती आहे.

    अपंगत्व आणि पॅरा-स्पोर्ट्सकडे भारतात कसं पाहिलं, जातं ते तिला बदलायचं आहे. काही दिवसांपूर्वीच टाईम मासिकाने तिचा पुढच्या पिढीची नेता म्हणून यादीत समावेश केला होता. अपंग लोकांच्या हक्कांची पुरस्करती म्हणून तिला या मासिकाच्या आशिया आवृत्तीच्या मुखपृष्ठावर स्थान मिळालं

    > हे वर्ष महिलांसाठी अनेक प्रकारे आव्हानात्मक आहे. कठीण परिस्थितीपुढे दबून जाऊ नका. प्रत्येक शक्यतेचा शोध घेत राहा, स्वत: ला दररोज थोडा वेळ द्या.

  • नदिन कादान

    फ्रान्स लेखक/इलस्ट्रेटर

    सीरियन लेखिका नदिन कादान आठ वर्षांची असल्यापासून कथा लिहित आहेत आणि चित्र काढत आहेत. लहानाची मोठी होत असताना पुस्तकांमध्ये आपलं प्रतिबिंब दिसत नसल्यानं त्या असमाधानी होत्या आणि त्यातूनच त्यांनी प्रत्येक मूल स्वतःचं प्रतिबिंब पाहू शकेल अशा कथा लिहिण्यास सुरुवात केली.

    स्वत:च्या सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेत आणि अरब जगात वाचन संस्कृती पसरविण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन त्यांनी लिहिलेल्या कथा पश्चिम आशियातील गतिमंदतेसारख्या आजारांचा सामना करणाऱ्या आणि संघर्षमय वातावरणात वाढलेल्या मुलांभोवती फिरतात.

    > युद्ध असो वा कोव्हिड-19 महिला शांततेसाठी काम करत आहेत आणि पुढाकार घेत आहेत. असे असतानाही व्यवस्था आपल्या विरोधात तयार करण्यात आल्याचं दिसतं. अशा व्यवस्थेची पुन्हा उभारणी करण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे. जेणेकरून स्त्रिया स्वतःला व्यक्त करत राहू शकतील.

  • मुलेंगा काप्वेप्वे

    झांबिया कालाकार आणि क्युरेटर

    मुलेंगाा एम्पुंडू काप्वेप्वे या झांबियन महिला इतिहास संग्रहालयाच्या सहसंस्थापक आहेत. झांबियाच्या जडणघडणीत महिलांचं योगदान लक्षात आणून देणाऱ्या या संग्रहालयाची 2020 साली वाहवा झाली. काप्वेप्वे यांनी झांबियाची राजधानी लुसाकामध्ये मुलांसाठी वाचनालयंही उभारली आहेत.

    त्यांनी 20004-2017 या काळात झांबियाच्या नॅशनल आर्ट्स कौन्सिलचे अध्यक्षपद सांभाळलं. नृत्य, लेखन, संगीत आणि संस्कृतीविषयी काम करणाऱ्या अनेक संस्थांच्या संरक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

    > बदलाला तुमची संधी बनवा

  • डॉ. जेमिमा कारियुकी

    केनिया डॉक्टर

    डॉ जेमीमाह प्रतिबंधक औषधांबद्दल विशेषतः विशेषत: माता आणि बाल आरोग्यासाठी मनापासून उत्साहानं काम करतात. त्या 2007 साली निवडणुकीत झालेल्या हिंसाचारानंतर सुरू झालेल्या पीस क्लबच्या संस्थापक आहेत. तसंच गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाला आळा घालण्याच्या मोहिमेत सहभागी पब्लिक हेल्थ क्लबच्याही संस्थापक आहेत.

    प्रसूति व स्त्रीरोग तज्ञ म्हणून, त्यांच्या निदर्शनास आलं की कोव्हिड-19 दरम्यान प्रसूतीसाठी रुग्णालयात होणाऱ्या प्रवेशांमध्ये घट झाली आहे, पण प्रसुतीतली गुंतागुंत वाढली आहे. वाहतुकीच्या पर्यायांवर निर्बंध असल्यानं महिलांना आरोग्याची काळजी घेण्यास उशीर होतो आहे हे लक्षात येताच, त्यांनी यावर तोडगा काढला: परवानाधारक वाहने जी महिलांना त्यांच्या घरून रूग्णालयात नेऊ शकतील. त्यातून व्हील्स फॉर लाइफ ही मोफत रुग्णवाहिका सेवा जन्माला आली.

    > जागतिक साथीच्या संकटानं सर्वांना प्रभावित केलं आहे, तुम्ही एकटेच नाही आहात. तर, तुम्हाला रोज त्रास देणारा विचारच तुम्हाला वाट दाखवू शकतो. प्रतिसाद देण्यास घाबरू नका. आपण कदाचित दुसर्‍याच्या गरजेवर उत्तर शोधू शकता.

  • गुलसुम काव

    तुर्कस्तान सामाजिक न्याय कार्यकर्ता

    गुलसुम काव तुर्कस्तानातील डॉक्टर, अभ्यासक असून 'वुई विल स्टॉप फेमसाइड' या संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. गेल्या वर्षभरात, इस्तंबूलमध्ये महिलांच्या हत्यांचं वाढलेलं प्रमाण आणि संसदेत इस्तंबूल कन्वेशन (घरगुती हिंसाचाराच्या बळींच्या संरक्षणासाठी तयार केलेला कायदेशीर चौकट) रद्द करायचं की नाही यावरून झालेल्या चर्चेमुळं तुर्कस्तानात व्यापक टीका होते आहे.

    गुलसुम तुर्कस्तानातील लिंग-आधारित हिंसेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी स्त्रीहत्यांमुळे नातेवाईक गमावलेल्या बर्‍याच कुटूंबियांच्या प्रश्नांसाठी अथक परिश्रम घेत आहेत.

    > आज प्रतिकार करणार्‍या महिला समानता आणि स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत्न करतात. जागतिक साथीनं महिलांच्या वाट्याला येणाऱ्या असमानतेवर प्रकाश टाकला असून, महिलांशिवाय बदल घडवून आणणारं दुसरं माध्यम नाही, हेही दाखवून दिलं आहे.

  • जॅकी के

    स्कॉटलंड, यूके कवयित्री

    जॅकी के एक स्कॉटिश कवी, नाटककार आणि कादंबरीकार आहेत. त्यांनी लिहिलेलं रेड डस्ट रोड, हे तिच्या जन्मदात्या पालकांचा शोध घेण्याच्या प्रवासावरचं पुस्तक म्हणजे आपल्या गौरवर्णीय पालकांसाठी प्रेमपत्र असल्याचं त्या सांगतात. 2016 मध्ये त्यांना स्कॉट्स मकर म्हणजे स्कॉटलंडच्या राष्ट्रीय कवी म्हणून नावाजण्यात आलं.

    जॅकी स्कॉटलंड विद्यापीठात कुलपती असून त्यांना अनेक पुरस्कारांनी नावाजण्यात आलं आहे. 2020 मध्ये त्यांना साहित्यासंबंधीच्या सेवेसाठी CBE नं सन्मानित करण्यात आलं.

    > आपण कधीही आशा सोडू नये; यावर्षी जगभर होत असलेल्या निषेधांनी माझ्या मनात भविष्याबद्दल एक अनोखा आशावाद निर्माण केला आहे.

  • साल्साबिला खैरुन्निसा

    इंडोनेशियाा पर्यावरणवादी मोहीम चालवणारी jaga_rimba

    साल्साबिला ही जकार्ता, इंडोनेशियातील 17 वर्षाची विद्यार्थिनी आहे. दर शुक्रवारी ती जंगलतोडीविरोधात पर्यावरण व वनीकरण मंत्रालयाच्या कार्यालयासमोर शालेय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करते.

    वयाच्या 15 व्या वर्षी तिने जग-रिम्बा या युवा चळवळीची सुरुवात करण्यात योगदान दिलं. वनसंरक्षणाबरोबरच, कालिमनतानमधील शेवटच्या सदाहरित वनांपैकी किनिपान जंगलातील आदिवासी समुदायाच्या हक्कांसाठी ही संस्था संघर्ष करते.

    > जागतिक साथीच्या संकटानं एक सामूहिक जाणीव निर्माण केली आहे की, आपण सर्व जण एकाच पितृसत्ताक-भांडवलशाही व्यवस्थेत आहोत, जी केवळ नफ्यासाठी अस्तित्त्वात आहे. आपण एकत्र येण्याची आणि हिरव्या आणि न्यायपूर्ण वसुलीची वेळ आली आहे.

  • माहिरा खान

    पाकिस्तान अभिनेत्री mahirahkhan

    माहिरा खान साधारण फिल्म स्टार नाही - ती लैंगिक हिंसाचाराविरूद्ध बोलते, त्वचा उजळण्याचा दावा करणाऱ्या क्रीम्सची जाहिरात करण्यास नकार देते आणि वर्णद्वेषाविरूद्धच्या लढाईला समर्थन देते. चित्रपटांमध्ये आणि टीव्हीवरचं चित्रण बदलून तिला पाकिस्तानात सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची इच्छा आहे.

    माहिरा पाकिस्तानातली शरणार्थींसाठी संयुक्त राष्ट्रांची सद्भावना दूत आहे, ती अफगाण शरणार्थींच्या दुर्दशेविषयी जागरूकता वाढवण्यासाठी काम करते. 2006 मध्ये एमटीव्ही व्हीजे म्हणून सुरुवात केल्यापासून ती लोकप्रिय झाली. माहिरा अकरा वर्षाच्या मुलाची आईसुद्धा आहे.

    > हेतू आणि मुद्द्यांविषयी बोला आणि परिवर्तनास उत्तेजन द्या.

  • अँजेलिक किडजो

    बेनिन संगीतकार

    चार वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी एंजेलिक आज आंतरराष्ट्रीय संगीतातील एक महान कलाकार म्हणून नावाजली जाते. अमेरिकन आर अँड बी, फंक आणि जाझ, तसेच युरोप आणि लॅटिन अमेरिकेचा प्रभाव असलेलं पण बेनिनमध्ये तिच्या बालपणीच्या पश्चिम आफ्रिकन परंपरा जपणारं संगीत तिने तयार केलं आहे,

    टॉकींग हेड्स अल्बम रिमेन इन लाईटमध्ये आफ्रिकन समुदायातल्या वाटा आजमावून पाहिल्यावर, फ्रेंच-बेनिनी वंशाची ही गायिका आता क्यूबानमध्ये जन्मलेल्या आणि “साल्साची राणी” म्हणून नावाजलेल्या सेलिया क्रूझच्या अफ्रीकी मुळांचा शोध घेत आहेत. एंजेलिक युनिसेफची राजदूत म्हणूनही काम करते आणि तिची स्वतःची चॅरिटेबल फाउंडेशन, बटोंगा, आफ्रिकेतील तरुण मुलींच्या शिक्षणास पाठिंबा देते आहे.

    > आम्हाला एकता, प्रेम आणि सामर्थ्याने एकमेकांची काळजी घेणे चालू ठेवावे लागेल.चला एकमेकांचे रक्षक होऊया. या एकतेनं सामाजिक वर्ग, वांशिकता आणि लैंगिक प्रवृत्ती ओलांडली पाहिजे.

  • चू किम डक

    व्हिएतनाम वास्तुविशारद kim_duc_

    आर्किटेक्ट किम ड्यूक व्हिएतनाममध्ये मुलांच्या खेळाच्या अधिकारास प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहेत. थिंक प्लेग्राऊंड्स या संस्थेच्या त्या सह-संस्थापक आणि संचालक असून, पुनर्वापर केलेल्या सामग्रीपासून 180 हून अधिक सार्वजनिक क्रीडांगणे तयार करण्यासाठी त्या काम करत आहेत.

    त्या सध्या हॅनोईमध्ये व्हिएतनाम राष्ट्रीय बाल रुग्णालयासाठी थेरपी प्लेग्राऊंड आणि शहरातील पहिल्या लो-कार्बन क्रीडांगणाच्या उभारणीवर काम करत आहेत.

    > चंचल व्हा! कामात आणि जीवनात. आंतरिक प्रेरणा घेऊन शिकण्याविषयी हे सगळं आहे. आपण काय करण्याची गरज आहे, आपल्याला काय करायला आवडतं? उत्साही राहणं, सतत शिकत राहणं हेच आपल्याला अडचणींवर मात करण्यासाठी आणि आशावादी राहण्यासाठी मदत करते.

  • सफा कुमारी

    सीरिया वनस्पती विषाणूतज्ज्ञ

    एक वनस्पती विषाणूतज्ज्ञ म्हणून डॉ. सफा कुमारी पिकं नष्ट करणाऱ्या रोगांवर उपाय शोधत आहेत. सीरियात अन्नसुरक्षा निश्चित करतील अशा बियाणाची निर्मिती केल्यावर त्यांनी अलेप्पो शहरात हे बियाणं वाचवण्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घातला

    त्यांनी वर्षानुवर्ष संशोधन करून विषाणूंचा प्रतिकार करू शकतील अशी वाणं तयार केली आहेत. त्यात FBNYV विषाणूचा सामना करू शकतील अशा फाबा बिन्सचा समावेश आहे.

    > 2020 साली जग खूप बदललं आहे. अशा पद्धतीच्या संकटाचा सामना करण्याची जबाबदारी असणाऱ्या टीममध्ये तुमच्या क्षमतेचा विचार केला जातो, लिंगाचा नाही. महिलांनी त्यांचं योगदान पुरुषांच्या बरोबरीचं आहे, यावर विश्वास ठेवायला हवा.

  • इश्तर लखानी

    दक्षिण आफ्रिका कार्यकर्ता

    इश्तार एक स्त्रीवादी, कार्यकर्ता आणि स्वघोषित “ट्रबलमेकर” आहेत. त्या दक्षिण आफ्रिकेत राहतात आणि जगभरातील सामाजिक न्याय संस्था, चळवळी आणि नेटवर्कना सहयोग करतात. मानवी हक्कांच्या पुरस्कारासाठी त्या अशा संघटनांना आवश्यक आधार देतात.

    यावर्षी त्यांनी नि:शुल्क लस मोहिमेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. ही मोहीम सेंटर फॉर आर्टिस्टिक अ‍ॅक्टिझम आणि युनिव्हर्सिटीज अ‍ॅलॉइड फॉर इसेन्शियल मेडिसीन (यूएईएम) द्वारा चालवली जाते. कोविड-19 ची लस स्थिर किंमतीत सर्वांना उपलब्ध व्हावी आणि सर्वसामान्यांना ती मोफत मिळावी या उद्देशानं त्या काम करत आहेत.

    > विस्कळीत करणारे हे क्षण आपल्यासाठी संधीही आहेत, जिथे आपल्या आनंदाचा विचार न करता तयार करण्यात आलेली व्यवस्था सुधारण्यापेक्षा एक वेगळं भविष्य आपण घडवू शकतो.

  • क्लॉ़डिया लोपेझ

    कोलंबिया महापौर

    क्लॉडिया लोपेझ या कोलंबियाची राजधानी बोगोटाच्या पहिल्या महिला महापौर आहेत.

    एका शिक्षिकेची मुलगी असलेल्या क्लॉडिया यांनी अलियांझा वर्दे या पक्षाच्या सीनेटर म्हणून 2014 ते 2018 या कालावधीत काम केलं. त्यांनी भ्रष्टाचारविरोधात लोकांच्या सल्ल्याच्या अंमलबजावणीचे नेतृत्व केले ज्यात 11.6 दशलक्ष मते (99% आज्ञा) प्रस्तावित उपायांच्या बाजूने मांडली गेली. कोलंबियाच्या इतिहासातली ही ऐतिहासिक घटनाआहे.

    > जगातील महिलांना, मी म्हणते: थांबू नका. गेल्या शतकात सुरू झालेली सामाजिक क्रांती थांबणार नाही. आम्ही आमच्या सार्वजनिक आणि खाजगी जीवनात स्पष्टपणे बदल झालेले पाहू.

  • जोसिना माकेल

    मोझांबिक सामाजिक न्याय कार्यकर्ता JosinaZMachel

    जोसिना झेड माकेल यांना सामाजिक कार्याचा वारसा घरातूनच मिळाला. त्या मानवाधिकारांची संरक्षक म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत. महिलांच्या हक्कांसाठी लढणं हे त्यांचं आयुष्य बनलं असून, तीव्र उत्कटतेनं त्या हे काम करतात

    माकेल यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) मधून MSc केलं आहे. घरगुती हिंसाचारातून वाचलेली एक व्यक्ती म्हणून त्यांनी कुहुलका चळवळीच्या माध्यमातून आपल्या अनुभवाला कार्यात बदललं आहे. ही संस्था लिंग-आधारित हिंसेच्या संदर्भात सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आणि दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या समुदायांत अशा हिंसाचारातून वाचलेल्यांसाठी सुरक्षित निवारा निर्माण करण्यासाठी काम करते.

    > महिलांवर पडणाऱ्या अतिरिक्त भाराची मोजणी अजून झालेली नाही. पण आमची लवचिक वृत्ती आम्हाला माता, बायका, भगिनी, नेते आणि उद्योग जगतातही काम करत राहण्यासाठी प्रेरणा देत राहते.

  • साना मरिन

    फिनलँड फिनलँडच्या पंतप्रधान

    सन्ना मारिन हे फिनलँडच्या पंतप्रधान आणि फिनलँडच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेता आहेत. त्या ज्या आघाडी सरकारचं नेतृत्त्व करतात, त्या चारही पक्षांचं नेतृत्त्व महिलांकडे आहे. मारिया ओहासालो (ग्रीन लीग), ली अँडरसन (डावी आघाडी), अ‍ॅना-माया हेन्रिकसन (स्वीडिश पीपल्स पार्टी) आणि अन्निका सारिकको (सेंटर पार्टी)

    कोविड -19 ची परिस्थिती फिनलँडनं ज्या पद्धतीनं हाताळली, त्यासाठी या देशाचं कौतुक होतंय. नोव्हेंबर 2020 पर्यंत युरोपमधील सर्वात कमी संसर्ग दर फिनलँडमध्येच आहे.

    > आम्ही महिला नेते म्हणून हे दाखवू शकतो की विषाणूशी लढाई करणे शक्य आहे आणि त्याच वेळी हवामान बदलांना सामोरे जाणे, शिक्षणात गुंतवणूक करणे आणि समाजात सामाजिक सुधारणे करणे शक्य आहे.

  • हयात मिरशाद

    लेबेनॉन कार्यकर्ता

    एक स्त्रीवादी कार्यकर्ता, पत्रकार आणि मानवतावादी म्हणून हयात लेबेनॉनमधील फी-मेल (Fe-Male) या अग्रणी स्त्री-पुरूष समुहाच्या सह-संस्थापक आहेत. कुठलीही दिलगिरी न मागता तडजोड न करणारी, अशी ओळख असलेल्या हयातचं उद्दिष्ट आहे की मुली आणि महिलांना न्याय, माहिती, संरक्षण आणि मानवी हक्क मिळाले पाहिजेत.

    जनतेत बदल घडवून आणण्यासाठी त्या देशव्यापी मोर्चे आयोजित करून आणि भ्रष्टाचारी, पितृसत्तात्मक कारभाराला आव्हान देण्यासाठी आणि वेगवेगळ्या व्यासपीठावरुन आपला संदेश प्रसारित करीत आहेत.

    > आव्हाने व अडचणी असूनही, इतिहासात महिलांनी पुरुषप्रधानतेविरुद्ध आव्हान दिले आणि लढा दिला आहे. एकता, भगिनीपण आणि प्रेमाच्या माध्यमातून आम्ही लढा सुरूच ठेवू, आणि न्याय्य आणि लिंग-समान भविष्यासाठी आमचे आवाज आणि मागणी वाढवू.

  • बुलेल्वा एमकुटुकाना

    दक्षिण आफ्रिका गायक आणि गीतकार zaharasa

    बुलेल्वा एमकुटुकाना तिच्या स्टेजवरील नावानं, झहरा या नावानं अधिक ओळखली जाते. ती दक्षिण आफ्रिकेत अगदी साध्या परिस्थितीतून वर आली आहे. शाळेत तिला आपली गाण्याची आवड सापडली. तिच्या गायन कारकीर्दीची सुरुवात रस्त्यावर झाली. पण 2016 साली झहराचा पहिला अल्बम प्रकाशित झाला आणि तीन आठवड्यांतच त्याला डबल प्लॅटिनम दर्जाही मिळाला.

    गायक-गीतकार झहरावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला असून, ती संगीतक्षेत्रातील यशस्वी कारकीर्दीचा आनंद लुटते आहेच- पण तिनं. दक्षिण अफ्रिकेतील महिलांवरील हिंसाचाराबद्दल बोलण्यासाठी तिच्या प्रसिद्धिचा उपयोग केला आहे. आपणही अशा परिस्थितीतून गेलो असल्याचं तिनं जाहीर केलं.

    > मला या कठीण काळातून जातानाा प्रार्थनेनं मदत केली आहे. प्रार्थनेवर काहीही मात करू शकत नाही.

  • ल्युसी मोनाहॅन

    नॉर्दन आयर्लंड कॅम्पेनर

    ल्युसी मोनाहॅननं अनामिक राहण्याचा हक्क सोडला आणि 2015 मध्ये तिनं तिच्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार केल्यावर उत्तर आयर्लंडच्या पोलिस आणि फिर्यादींकडून तिला मिळालेल्या वागमुकीविषयी ती बोलू लागली. सुरुवातीला पोलिसांनी तिला सांगितले की, तिनं कथित गुन्हेगाराबरोबर फ्लर्टिंग केल्याचा पुरावा आहे, त्यामुळे तिच्या खटल्यात त्याला शिक्षा मिळण्याची शक्यता नाही.

    त्यांच्या तपासणीतील अपयशाबद्दल लुसीने अधिकाऱ्यांना न्यायालयात आव्हान दिले आणि परिणामी लैंगिक हल्ल्याचा बळी पडलेल्या व्यक्तींना मिळणाऱ्या वागणूकीत बदल करण्यात आला. ल्युसी आता बलात्कारातून वाचलेल्यांना मदत करते. 2019 तिनं जज गिलियन रिव्ह्यू या पुनरावलोकनात बाग घेतला, ज्यात कायद्यांमध्ये बदलांसाठी 250 पेक्षा जास्त शिफारसी करण्यात आल्या.

    > ते म्हणाले मी करू शकणार नाही. मी तरीही केलंच. तुम्हीही करू शकता!

  • ड्यूस नामवेझी नलबांबा

    डी.आर. काँगो पत्रकार

    नलबांबा एक पत्रकार असून त्यांनी युवेझो आफ्रिका इनिशिएटिव्हची स्थापना केली आहे. ही संस्था पत्रकारितेतून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न करते. त्यासाठी महिलांना प्रशिक्षणही देते

    त्यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये पाळीविषयी गैरसमजांविरोधात मोहिम उभारली असून, त्याअंतर्गत शालेय विद्यार्थी आणि महिलांना त्या लैंगिक शिक्षण आणि स्वच्छता किट उपलब्ध करून देतात.

    > आपण बदल घडवून आणणार्‍या मुली आणि महिलांची पिढी होऊ या, ज्या त्यांच्या दैनंदिन समस्यांचं निराकरण करतील आणि नेहमीच असे म्हणतील : काहीही अशक्य नाही!

  • व्हेनेसा नाकाते

    युगांडा क्लायमेट कार्यकर्ता

    युगांडातली वेनेसा 23 वर्षांची असून हवामान बदल रोखण्यासाठी ती काम करते. ती आफ्रिकेतील राइज अप चळवळीची संस्थापक आहे. हवामान बदलामुळे आफ्रिकेत होत असलेल्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहीम राबविली आहे. विशेषत: हवामान बदलामुळे दारिद्र्य, संघर्ष आणि लैंगिक असमानता कशा वाढत आहेत, यावर तिनं लक्ष केंद्रित केलं आहे.

    जानेवारी 2020 मध्ये नाकाते हिनं ग्रेटा थनबर्ग आणि अन्य युरोपियन कार्यकर्त्यांसह वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हजेरी लावली होती, पण असोसिएटेड प्रेसने (AP) त्यांना फोटोतून क्रॉप केलं होतं. त्यानंतर नाकाटे यांनी जागतिक हवामान बदल चळवळीतील वंशवादावर भाष्य केले. AP ने नंतर त्या फोटोत पुन्हा बदल केले आणि कुठलाही चुकीचा हेतू नसल्याचे सांगितले पण दिलगिरी व्यक्त केली नाही. 27 जानेवारी 2020 रोजी APच्या कार्यकारी संपादक साली बुज्बी यांनी त्यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून एपीच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली.

    > लॉकडाऊन आणि हवामान बदलासारख्या संकटाचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. परंतु आम्ही यावर उपायही शोधू शकतो: महिलांचे शिक्षण आणि सशक्तीकरण कार्बन खाली आणेल, आपत्ती निवारण क्षमता वाढवेल आणि भविष्यासाठी हवामानाविषयी जागरूक नेते तयार करेल.

  • डॉ. एथेलरेडा नकिमुली-मपुंगु

    युगांडा मानसिक आरोग्य तज्ज्ञ

    डॉ. एथेल नाकिमुली-मपुंगु युगांडाच्या मेकरेरे युनिव्हर्सिटीत विशेषत: एचआयव्ही आणि नैराश्याने ग्रस्त लोकांसाठीचे उपचार सांस्कृतिकदृष्ट्या अधिक योग्य बनवण्याच्या दिशेने कार्य करतात.

    त्यांनी एक अत्यंत किफायतशीर सामूहिक उपचारपद्धती विकसित केली आहे, जी आरोग्य सेवेतील कर्मचारीही देऊ शकतात. या उपचारांनी नाट्यमयरित्या नैराश्याची लक्षणं कमी केली आहे, तसंच अँटीव्हायरल औषधोपचार घेत असलेल्या व्यक्तींमध्ये औषधं घेण्याचं प्रमाण सुधारत असल्याचं दिसून आलं आहे.

    > तुमच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या आणि तुमची ताकद परत मिळवा.

  • नांदर

    म्यानमार स्त्रीवादी कार्यकर्ता

    नंदार या एक स्त्रीवादी वकील, भाषांतरकार, कथाकार आहेत. त्या फेमिनिस्ट टॉक्स आणि जी-टॉव झेगर वेन या दोन पॉडकास्टच्या निर्मातीही आहेत. त्यांनी पर्पल फेमिनिस्ट ग्रुपची स्थापना केली होती आणि यांगूनमध्ये 'व्हजायना मोनोलॉग्स' अर्थात योनीच्या गुजगोष्टींच्या प्रयोगाचं दिग्दर्शन केलं होतं.

    ईशान्य म्यानमारमधल्या शान राज्यातल्या एका गावात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. म्यानमारमधील कौटुंबिक आणि समाजजीवनात असलेल्या पारंपारिक मूल्यांना आव्हान देताना महिलांना काय त्रास सहन करावा लागतो, याचा अनुभव नंदार यांना आला. त्या आता आपल्या पॉडकास्टचा वापर पाळी आणि गर्भपात यांसारख्या निषिद्ध विषयांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी करतात.

    > असमानता नष्ट करण्यासाठी अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा असं मला वाटतं. म्हणजे आपण अशा जगात जगू जिथे आपल्याला मामूस म्हणून महत्त्व आणि आदर दिला जाईल. एकत्रितपणे आपण एक चांगले, उत्कृष्ट जग बनवू शकतो.

  • वर्नेटा एम ने मॉबर्ली

    यूएस पर्यावरणवादी कार्यकर्ता

    वर्नेटा एक पत्नी, आई, आजी आणि मैत्रीण आहेत.

    वर्षानुवर्षे तिने आपल्या इन्युपियाट समदायातील वडिलधाऱ्यांकडून माहिती जमा केली आहे आणि कौशल्य शिकून घेतली आहेत, जी त्या पुढच्या पिढीकडे सोपवत आहेत. धरतीमाता वाचवण्यासाठीचा लढा हीच त्यांची आवड आहे

    > आयांनो: आपली काळजी घ्या. आपल्या पूर्वजांच्या ज्ञानातून काही मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवा. आपण सर्वजण एकमेकांशी जोडलेले आहोत; मुलांना वाढण्यासाठी मदत करण्याविषयी आपल्या मनात समान प्रवृत्ती आणि आवड आहे. कुठे गोंधळ उडाला असेल, तरी त्यावर तोडगा काढा.

  • नेमोंटे नेंकिमो

    इक्वाडोर वाओरानी नेता nemonte.nenquimo

    नेमोंटे या अ‍ॅमेझॉनच्या सदाहरित वनांत राहणाऱ्या वाओरानी समुदायातील असून आपल्या पूर्वजांचा प्रदेश, संस्कृती आणि जीवनशैलीचा बचाव करण्यासाठी वचनबद्ध आहे.

    त्या स्थानिक समुदायातील लोकांनी ना-नफा तत्त्वावर चालवलेली संस्था सिबो अलायन्सच्या सह-संस्थापक आहेत. पास्ताझा प्रांताच्या वाओरानी संघटनेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत; आणि टाइम मासिकानं निवडलेल्या जगातील 100 सर्वात प्रभावी व्यक्तींपैकी एक आहेत

    > आपल्या ग्रह आणि मानवतेचे अस्तित्व धोक्यात येत असताना, या धोकादायक काळातून मार्ग शोधण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आम्हा महिलांकडे आहे. आता महिलांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे.

  • सानिया निष्तर

    पाकिस्तान जागतिक आरोग्य कार्यकर्ता

    डॉ. सानिया निष्तर या जागतिक आरोग्य आणि शाश्वत विकसाच्या आघाडीच्या पुरस्कर्त्या आहेत. 2018 पासून त्या एहसास गरीबी निर्मूलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. या उपक्रमाअंतर्गत मोबाइल बँकिंग, बचत खाती आणि इतर मूलभूत संसाधने देऊन लाखो पाकिस्तानी लोकांचे जीवनमान सुधारले आहे.

    गरीबी निवारण आणि सामाजिक संरक्षण या विषयांत पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणून सानिया यांनी आपल्या देशात कल्याणकारी राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणारी पहिली पावले उचलली आहेतत आणि जनतेला सक्षम बनविण्यात मदत केली आहे.

    > कोव्हिड-19 चा नाट्यमय प्रभाव म्हणजे ही एका अशा उत्तम जगाची निर्मिती करण्याची आणि दारिद्र्य, असमानता आणि हवामान बदलाच्या संकटाचा अंत करण्याची एखाद्या पिढीत एकदाच येणारी संधी आहे. यासाठी महिलांना समान वागणूक मिळणं आणि त्यांच्याकडे सक्षम भागधारक म्हणून पाहणे आवश्यक आहे.

  • फिलिस ओमिडो

    केनिया पर्यावरणवादी कार्यकर्ता

    फेलिस ओमिडो या केनियातल्या सेंटर फॉर जस्टिस गव्हर्नंस आणि एनव्हार्यनमेंटल अ‍ॅक्शनच्या सहसंस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत. केनियातल्या खाणकाम उद्योगाचे परिणाम झालेल्या आणि आर्थिक- सामाजिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या गटांच्या हक्कांसाठी काम करतात. 2015 मध्ये त्यांना गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार (ज्याला “ग्रीन नोबेल” असे संबोधिले जाते) देण्यात आला. उहुरूमध्ये शिसे निर्मिती करणारा कारखाना त्यांनी बंद पाडला होता.

    जून 2020 मध्ये त्यांनी पर्यावरणीय खटला जिंकला, ज्यात ओव्हिनो उहुरु समुदायाला 1.3 अब्ज केनियन शिलिंग नुकसानभरपाई आणि CJGEAला आणखी 70 कोटी केनियन शिलिंग मिळाले. कोर्टाने फिलिसचा कायदेशीर खर्चही अदा करण्याचे आदेश दिले. राष्ट्रीय पर्यावरण व्यवस्थापन प्राधिकरण याविरोधात अपील करीत आहे आणि हे प्रकरण सध्या अपील कोर्टात आहे.

    > ज्याप्रकारे जगभरातील स्त्रियांना मोठ्या संकटकाळात आपल्या कायदेशीर स्थानाविषयी पुनर्विचार करावा लागला आहे, त्याचप्रमाणे निसर्गही पर्यावरणाच्या संकटापासून स्वत: ला पुन्हा सावरण्यासाठी संघर्ष करतो आहे. केवळ एक स्त्री निसर्गाचं दु:ख समजून घेऊ शकते.

  • रिद्धिमा पांडे

    भारत पर्यावरण कार्यकर्ता

    रिद्धिमा पांडेनं वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी भारत सरकारविरुद्ध त्यांनी हवामान बदलाला रोखण्यासाठी शासन पुरेसे प्रयत्न करत नसल्यानं याचिका दाखल केली आहे. 2019 साली अन्य 15 बालयाचिकाकर्त्यांसोबत रिद्धिमानं संयुक्त राष्ट्रांमध्ये पाच देशांविरुद्ध खटला दाखल केला आहे.

    रिधिमा आजकाल आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेत आहे. ती इतर विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य आणि जगाच्या जैवविविधतेसाठी लढण्यासाठी सक्षम बनविण्यात मदत करीत आहे. रिद्धिमा तिचे आणि आगामी पिढ्यांचे भविष्य वाचविण्याच्या इराद्यानं काम करीत आहे.

    > आपण दृढ आणि एकजूट राहण्याची तसंच कठीण काळात आपण किती सक्षम असू शकतो हे सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे. एखाद्या स्त्रीने काहीतरी मिळवण्याचं ठरवलं, तर कोणीही तिला अडवू शकत नाही.

  • लोर्ना प्रॉनडेरगास्ट

    ऑस्ट्रेलिया स्मृतीभ्रंशावर संशोधन करणारी

    2019 मध्ये लोर्ना जगभरात चर्चेत आल्या, जेव्हा त्यांनी 90 वर्षांच्या वयात पदव्युत्तर पदवी घेतली. आपली पदवी त्यांनी दिवंगत पतीला समर्पित केली, ज्यांच्याशी त्यांच्या लग्नाला 64 वर्षे झाली होती आणि ज्यांना स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) झाला होता

    एक संशोधक म्हणून लोर्ना यांनी स्मृतिभ्रंश झालेल्या रूग्णांच्या गरजा, त्यांचे जीवनमान आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांसोबतचे संबंध आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याविषयी जाणीव निर्माण केली आहे.

    > तुमचं वय काहीही असो, तुम्ही तरुण असा किंवा वयस्कर. तुम्ही जगात बदल घडवून आणू शकता.

  • ओक्साना पुश्किना

    रशिया स्टेट ड्युमा डेप्युटी

    ओक्साना पुश्किना या रशियन संसद अर्थात स्टेट ड्युमामध्ये कुटुंब, महिला आणि बालविषयक समितीच्या उपाध्यक्ष आहेत

    2018 साली ड्युमामधल्या परराष्ट्र समितीचे अध्यक्ष लियोनिद स्लॉत्स्की यांच्याविरूद्ध अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक छळ केल्याचा दावा केला होता, तेव्हा या पत्रकारांना जाहीरपणे समर्थन देणाऱ्या ओक्साना या एकमेव खासदार होत्या.

    > 2020 साली जग खूप बदललं आहे. पण हा आघात आणि संकटाशिवाय मी एक गोष्ट शिकले आहे, ती म्हणजे नवीन आव्हानं आली, की लोकांमधलं सर्वोत्तम बाहेर पडतं.

  • सिबेल रेसी

    ब्राझिल शिक्षिका

    सिबेल या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत ज्यांनी साओ पावलोमधील प्राथमिक शाळेतील मुलांना वांशिक समानतेविषयी शिक्षण देण्यास सुरुवात केली.

    त्यांनी शाळेच्या सर्व व्यवस्थापन पद्धतींचा आढावा घेतला आणि कर्मचार्‍यांसाठी कामाचं वातावरण अधिक समावेशक बनवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा वंश, लिंग किंवा स्थिती काहीही असो.

    > या वर्षाने आपल्याला बदल होण्यासाठी समाजानं काय करायला हवं, यावर विचार करण्यासाठी भाग पाडलं आहे. मला आशा आहे की 2021 च्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही बदल घडवू शकेल अशी ऊर्जा गोळा केली आहे.

  • सुझाना राफिली

    व्हेनेझुएला आहारतज्ज्ञ

    सुझाना या एक मानवाधिकार कार्यकर्ता असून त्यांनी 22 वर्ष जगभरात आणीबाणीच्या परिस्थितीत काम केलं आहे. त्यांनी कारिटास द व्हेनेझुएलाला एक असं रिअल टाईम टूल तयार करण्यात मदत केली, जे मानवीय संकटांचे लहान मुलांवर होणारे परिणाम दाखवू शकेल. असं कुठलं संकट असल्याचं व्हेनेझुएलातील सरकार नाकारत होतं. सुझाना यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना पोषण आहार मिळावा, यासाठी केंद्रांचं जाळंही उभं केलं.

    2020 साली जागतिक साथीच्या संकटाच्या काळात सुझाना यांनी कमी उत्पन्न असणार्‍या नागरिकांसाठी, एचआयव्ही ग्रस्त महिला आणि तरूणांच्या कारागृहात अन्न सेवा सुरळीत राहील हे पाहिलं. स्केलिंग अप न्यूट्रिशन मूव्हमेंटमध्ये काम करताना सुझाना यांनी मध्य अमेरिकेतील देशांमध्ये कोव्हिडच्या संकटाचा सामना करताना पोषणाचा मुद्दा मुख्य प्रवाहात आणण्याचा सल्ला दिला.

    > आधी स्वतःकडे पाहा आणि तिथून मुक्तीची सुरूवात करा. लॉकडाऊनचा हा उत्तम परिणाम होईल.

  • सपना रोका मगर

    नेपाळ स्मशानातील तंत्रज्ञ

    तीन महिन्यांपासून बेघर झाल्यावर सपना काठमांडूला गेल्या आणि तेथे कुणीही न स्वीकारलेल्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणार्‍या संस्थेमध्ये सहभागी झाल्या.

    कोव्हिड-19मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह नेपाळी सैन्य काटेकोरपणे सांभाळतं. सपनाची संस्था रस्त्यावर किंवा शवागारात सोडून देण्यात आलेले मृतदेह घेते आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करते. मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी 35 दिवसांत कुणी आलं नाही, तर ती संस्था मृतदेह स्मशानभूमीत आणते हिंदू रिवाजानुसार विधिवत अंत्यसंस्कार करते, जे एरवी व्यक्तीच्या मुलानं करणं अपेक्षित असतं.

    > जगभरात बेघर, टाकून दिलेले लोक आहेत. रस्त्यावर ज्यांचा मृत्यू होतो, त्यांनाही अंत्यसंस्काराचा अधिकार आहे. मी ही नोकरी समाजसेवा म्हणून करत नाही, तर माझ्या मनाच्या शांतीसाठी करते आहे.

  • पारडिस साबेती

    इराण कम्प्युटेशनल जेनेटिसिस्ट

    पारडिस सबेती हार्वर्ड विद्यापीठ, एमआयटी आणि हार्वर्ड ब्रॉड इन्स्टिट्यूट आणि हॉवर्ड ह्युज मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी मानवी आणि सूक्ष्मजीव जिनोमिक्स, माहिती सिद्धांत आणि ग्रामीण भागातील संसर्गजन्य रोगांचं सर्वेक्षण तसंच पश्चिम आफ्रिकेतील शिक्षण प्रसाराच्या प्रयत्नांमध्ये योगदान दिले आहे.

    2014 मध्ये टाइम मासिकाने 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून निवडलेल्या इबोलाविरोधात लढणाऱ्या सेनानींमध्ये त्यांचा समावेश होता. टाइम मासिकानं त्यांचा '100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या' यादीत त्यांचा समावेश केला होता. अगेन्स्ट ऑल ऑड्स या शैक्षणिक व्हिडिओ मालिकेच्या त्या होस्ट असून थाऊजंड डेज या रॉक बँडची मुख्य गायिका आहेत.

    > सगळ्या आव्हानांचा सामना करत आपण टिकून राहू. आणखी चांगलं जग घडवण्यासाठीच्या लढ्यात इतर चांगल्या लोकांसोबत एकत्र येणं आणि हसणं ही आपण टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठीची गुरुकिल्ली आहे.

  • फेबफी सेत्यवती

    इंडोनेशिया कार्यकर्ता Febfisetyawati

    फेबफी सेत्यवती Untukteman.id च्या संस्थापक आहेत, ही संस्था असुरक्षित परिस्थितीत राहणारे लोक, विशेषत: आर्थिक अडचणींचा सामना करणारे रुग्ण आणि कोव्हि़ड-19 नं प्रभावित लोकांना मदत करते. विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य इंटरनेट (जे एरवी महागडे असते) आणि फिरत्या वाचनालयाची सुविधा देण्यासाठी त्या आणि त्यांची टीम फोक्सवॅगन कॅम्परवॅनमधून फिरत राहिल्या, जेणेकरून ते त्यांचे काम चालू ठेवू शकतील. त्यांची टीम आता जिथे ठिकाणी इंटरनेट सिग्नल नाही अशा ठिकाणी सिग्नल ट्रान्समीटर देण्याचा प्रयत्न करीत आहे.

    फेबफी यांच्या मुलाचा, अकारा हायकाल याचा मोबियस सिंड्रोम या न्यूरॉलॉजिकल आजारानं मृत्यू झाला तेव्हा त्यांना अपार दुःख झालं, पण त्यातूनच इतरांना मदत करण्याची प्रेरमाही मिळाली.

    > 2020 या वर्षात जग फार बदललं आहे. आपणही जगासाठी बदलायला हवं. खूप तक्रार करण्यापेक्षा थोडसं उपयुक्त काम करणं आपल्यासाठी योग्य ठरेल.

  • रूथ शेडी

    पेरू पुरातत्वज्ञ

    रूथ यांनी पुरातत्त्वशास्त्र आणि मानववंशशास्त्रात पीएचडी केलं असून, त्या सान मार्कोसमध्ये नॅशनल युनिव्हर्सिटीत समाजशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. त्या अमेरिका खंडांमधल्या सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या संस्कृतीच्या कराल येथील अवशेषांवर संशोधन करणाऱ्या गटाच्या संचालक आहेत.

    पेरूमदल्या पाच विद्यापीठांनी रूथ यांना मानद डॉक्टरेट दिली आहे. 2018 साली विज्ञानातील महिलांसाठीचं लोरियल-युनेस्को राष्ट्रीय पारितोषिकही त्यांना मिळालं. पेरूमधल्या मेडल ऑफ ऑनर ऑफ द काँग्रेसनंही त्यांना गौरवण्यात आलं आहे.

  • पानुसाया सितिजिरावत्तनाकू

    थायलंड विद्यार्थी कार्यकर्ता

    या वर्षी थायलंडमध्ये लोकशाही समर्थकांनी आंदोलन सुरू केले आहे आणि 22-वर्षीय पानुसायासारखे विद्यार्थी त्या आघाडीवर आहेत. आंदोलनात सहभागाबद्दल तिला आणि अन्य कार्यकर्त्यांना अटक करण्यात झाली होती पण नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

    तिच्या अटकेचा थेट व्हीडिओ इंटरनेटवर लाईव्हस्ट्रीम झाला होता ज्यात साध्या वेशातील पोलिस अधिकारी तिला हॉटेलच्या खोलीतल्या जमिनीवरून व्हीलचेयरवर बसवताना पोलिसांच्या ट्रकमध्ये नेऊन ठेवताना दिसतात. पानुसायाने तिच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

    ऑगस्टमध्ये तिने एका विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलताना दहा कलमी जाहीरनामा जाहीरनामा वाचून दाखवला जो आता प्रसिद्ध झााला आहे. त्यात पानुसायानं राजेशाहीने राजकारणात हस्तक्षेप करणे टाळावे अशी मागणी केली होती. हे एक धक्कादायक पाऊल होते, कारण थायलंड हा त्या मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे राजघराण्याची मानहानी हा गुन्हा मानला जातो. राजा, राणी, वारसदार किंवा राजाच्या जोडीदारावर टीका केल्यास कुणालाही 15 वर्षापर्यंत तुरूंगात टाकले जाऊ शकते.

    > जग बदलण्याची क्षमता प्रत्येकामध्ये आहे. तुम्ही काहीही करत असाल, कुणीही असाल, आत्मविश्वास बाळगा आणि आपले जीवन सार्थ करा.

  • नसरिन सोतूदेह

    इराण मानवाधिकार कार्यकर्ता

    नसरिन पेशाने वकील असून त्या इराणमध्ये कायद्याचे शासन तसंच राजकीय कैदी, विरोधातले कार्यकर्ते, महिला आणि मुलांच्या हक्कांसाठी बाजू मांडतात. खूप टीका झालेल्या इराणच्या न्यायव्यवस्थेविरोधात उभे राहिल्यामुळे नसरिन यांना दीर्घ तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, पण त्यातून त्यांना तात्पुरती रजा देण्यात आली आहे.

    तुरुंगवास होऊनही आणि कुटुंबाला धमक्या येत असतानाही नसरिन आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

    > हिजाब बंधनकारक आहे - आणि जर ते आमच्यावर या अर्धा मीटर कापडाची सक्ती करू शकतात तर ते आमच्याबरोबर काहीही करू शकतात.

  • कॅथी सुलिवान

    यूएसए शास्त्रज्ञ/अंतराळवीर

    कॅथी सुलिवान एक कुशल वैज्ञानिक, अंतराळवीर, लेखक आणि कार्यकारी अधिकारी आहेत. 1978 मध्ये नासाच्या अंतराळवीर कार्यक्रमात सामील झालेल्या पहिल्या सहा महिलांपैकी त्या एक होत्या. तसंच त्या अंतराळात चालणारी पहिली अमेरिकन महिलाही ठरल्या.

    महासागरात सर्वात खोलवर डुबकी मारणारी पहिली महिला बनण्याचा मानही त्यांनाच जातो - आणि अंतराळात उड्डाण आणि खोल समुद्रात डुबकी मारल्यामुळे त्यांना 'जगातील सर्वात व्हर्टिकल व्यक्ती' हे विशेषणही मिळालं आहे.

    > 2020मध्ये जग खूप बदललं आहे. ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की या ग्रहावरचं आयुष्य एकमेकांवर किती अवलंबून आहे आणि आपल्याला हा विचार करण्यास भाग पाडते, की आपल्याला खरोखर कशाची गरज आहे आणि कशाला महत्त्व द्यायला हवं.

  • रिमा सुलताना रिमू

    बांगलादेश शिक्षिका

    रिमा सुलताना रिमू या बांगलादेशात कॉक्स बाझार शहरामध्ये यंग विमेन लीडर्स फॉर पीसच्या सदस्य आहेत. हा उपक्रम ग्लोबल नेटवर्क ऑफ विमेन पीसबिल्‍डर्सचा भाग असून, युद्धग्रस्त देशात तरुणींना नेतृत्त्वासाठी आणि शांततेच्या प्रसारक बनण्यासाठी सक्षम करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

    रिमाने तिच्या समुदायातील रोहिंग्या निर्वासितांच्या संकटावर प्रतिसाद देताना लिंगाचा विचार करणाऱ्या मानवतावादी योजनांचा पुरस्कार केला आहे. त्या रोहिंग्या निर्वासितांसाठी आणि समाजात ज्यांना शिक्षणाची सोय नाही अशा मुली आणि महिलांसाठी लिंग-संवेदनशील, वय-योग्य साक्षरता वर्ग आयोजित करतात. रिमा यांनी रेडिओ आणि नाटकाद्वारा आपल्या समाजात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1325 आणि 2250 या ठरावांविषयी जागरूकता निर्माण केली.

    > बांगलादेशात लिंगाच्या मुद्द्यावरून समानता आणण्याचा मी निर्धार केला आहे. महिलांच्या आणि मुलींच्या आपल्या हक्कांसाठी लढण्याच्या ताकदीवर माझा विश्वास आहे. आम्ही यशस्वी होऊ.

  • लिया टी

    ब्राझिल ट्रान्सजेंडर मॉडेल leat

    आपण पहिलं काम गिव्हेंचीसाठी केलं, असं म्हणणं फार थोड्या मॉडेल्सना शक्य होतं. पण लियाच्या बाबतीत असंच घडलं. ती दहा वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात आहे आणि मेरी क्लेअर, ग्राझिया आणि व्होग सारख्या अनेक दिग्गज फॅशन मासिकांच्या मुखपृष्ठावर तिला स्थान मिळालं आहे.

    2016 मध्ये, ती ऑलिम्पिक एखाद्या उदघाटन सोहळ्यात सहभागी होणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरली. ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांची पुरस्कर्ती लिया एक लोकप्रिय आयकॉन आहे. LGBT समुदायाविरुद्ध भेदभावाविषयी ती बोलते आणि समाजाला त्याविषयी काम करण्याचं आवाहन करते. संपूर्ण कारकीर्दीत, तिने तिच्यासारख्या इतरांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रेरित केलं आहे.

    > जग सतत बदलत आहे आणि आपण सतत गतिमान आहोत. पण महिला एकट्याच चालून काही होणार नाही.

  • अ‍ॅना तिजू

    फ्रान्स संगीतकार

    अ‍ॅना तिजू ही चिलीची हिप-हॉप आंदोलक आहे. तिच्या गाण्यातून ती एक स्त्रीवादी आणि कार्यकर्ता म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक असमतेचा निषेध करते. चिलीतील ऑगस्टो पिनोशेट यांच्या हुकूमशाहीच्या काळात तिचे पालक निर्वासित झाले होते, ज्याचा तिच्या कारकीर्दीवर परिणाम झाला आहे, आणि त्यामुळे तिच्यात राजकीय आणि सामाजिक प्रश्नांविषयी विशेष संवेदनशीलता दिसून येते.

    ती महिला हक्कांच्या बाजूनं आणि लिंगाधारीत हिंसेच्या विरोधात उभी राहिली असून, हा मुद्दा तिनं 2014 मध्ये तिच्या 'वेंगो' या अल्बममधील 'अँटीपॅट्रियार्क' या गाण्यातून अधोरेखित केला. तिजू जगभरातील असमानता आणि दडपशाहीविरूद्ध मोहिमांमध्ये वारंवार सहभागी होते.

    > 2020 या वर्षानं अर्थव्यवस्थेची आर्थिक व्यवस्था किती नाजूक आहे हे समोेर आणलं आहे. आणि अशा काळात आपल्याकडे आपल्या नातेसंबंधांची ताकद असते. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे कारण तीच आपली शक्ती आहे.

  • ओपल टोमेटी

    यूएसए मानवाधिकार कार्यकर्ता

    ओपल टोमेती या पुरस्कारप्राप्त मानवाधिकार कार्यकर्ता आहेत आणि ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर या चळवळीच्या तीन महिला सह-संस्थापकांपैकी एक आहेत. त्या नवीन मीडिया आणि समर्थन करणारं केंद्र 'डायस्पोरा राइझिंग'ची संस्थापक देखील आहेत.

    अमेरिकेत नायजेरियन स्थलांतरितांच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. एक मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून त्यांची कारकीर्द वीस वर्षांपेक्षा मोठी आहे आणि देशांच्या सीमा ओलांडून जाणारी आहे.

    > खरं प्रबोधन झाले आहे. आपल्या सर्वांना हे आता ठाऊक आहे की अन्यायावरून नजर दुसरीकडे फिरवणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. मी सर्वांना धाडसी, वचनबद्ध राहण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या संपर्कात राहण्यासाठी प्रोत्साहित करते आहे.

  • स्वियातलाना तिखानोवस्काया

    बेलारूस राजकारणी

    सिवियातलाना तिखानोवस्काया या बेलारूसमध्ये यंदा झालेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्यांनी या देशात राष्ट्रीय लोकशाही चळवळीचे नेतृत्व केले. ऑगस्ट 2020 मध्ये, अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी निवडणुकीत भरीव विजयाचा दावा केला, ज्यानंतर मतदानात ढवळाढवळ झाल्याच्या आरोपांदरम्यानच देशभरात निदर्शनं सुरू झाली.

    निवडणुकीनंतर काही दिवसांतच आपल्या मुलांच्या सुरक्षेविषयी चिंता वाटत असल्यानं स्वियातलाना बेलारूस सोडून लिथुआनियात आश्रयाला गेल्या. देश सोडावा लागला असला, तरी त्या बेलारूसमधल्या लोकशाहीवादी चळवळीचं नेतृत्त्व करत आहेत.

    > तुम्ही दुबळे आहात असं कुणी सांगत असेल, तर कधीही, एका सेकंदासाठीही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. आपण किती ताकदवान आहोत याची अनेकदा आपल्याला कल्पना नसते.

  • युलिया त्स्वेतकोव्हा

    रशिया कार्यकर्ता

    युलिया त्स्वेतकोव्हा यांचा जन्म रशियाच्या दुर्गम पूर्व भागातील एका छोट्या औद्योगिक शहरात झाला. त्यांनी तिथे कला, नृत्य आणि दिग्दर्शनाचा अभ्यास केला. त्यानंतर नाटकांच्या माध्यमातून कार्यकर्ता म्हणून तसंच समाजकेंद्रातून त्यांनी महिलांचे हक्क, LGBT हक्क, सैन्य-विरोधी भूमिका आणि पर्यावरणशास्त्र या विषयांवर बोलण्यास सुरूवात केली.

    2019 मध्ये तिच्यावर पोर्नोग्राफी वितरणाचे गुन्हेगारी आरोप आणि 'LGBT प्रचार' केल्याच्या तीन प्रकरणांत आरोप दाखल करण्यात आले. महिला शरीराचे रेखाचित्र ऑनलाइन प्रसिद्ध केल्याबद्दल तिला सध्या सहा वर्षांच्या तुरूंगवासाचा सामना करावा लागत आहे. रशियन मानवाधिकार संघटनांनी ती राजकीय कैदी असल्याचं म्हटलं आहे. तिनं आपल्यावरचे आरोप नाकारले आहेत.

    > कधीही छळ सहन करू नका, तो सरकारकडून होणारा असो, जोडीदाराकडून किंवा समाजाकडून होणारा असो. तुम्ही बलवान आहात आणि तुमच्यात जग बदण्याची ताकद आहे. काळ कितीही अंधारलेला असो, स्वप्न पाहात राहा, लढत राहा.

  • अरुसी युंडा

    मेक्सिको कॅम्पेनर

    मेक्सिकोत महिलांच्या हत्या वाढत असताना अरुसी आणि तिची स्त्रीवादी चळवळ 'ब्रुजस डेल मार' ('समुद्रातील चेटकिणी') स्त्रियांचा आवाज म्हणून उदयास आले आहेत.

    यावर्षी त्यांनी देशभरातील महिलांना 9 मार्च रोजी राष्ट्रीय संप करण्याची प्रेरणा दिली. यामध्ये महिला आपले काम आणि इतर गोष्टी थांबवून घरीच राहिल्या.

    > सध्याच्या घडीला अनेक घोषणा आणि ब्रीदवाक्य आहेत, जसं की "क्रांती स्त्रीवादी असेल" किंवा "भविष्य स्त्रीवादी आहे." पण भविष्य सुरू झालं आहे. आपण धीट व्हायला हवं आणि उठून उभं राहायला हवं.

  • अनास्तासिया व्होल्कोव्हा

    युक्रेन उद्योजक

    डॉ. अनास्तासिया व्होल्कोव्हा या उद्योजक आणि कृषीत नाविन्यपूर्ण शोध लावणाऱ्या संशोधक आहेत. त्या अन्न सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करतात.

    2016 मध्ये त्यांनी फ्लूरोसॅट या कंपनीची स्थापना केली, जी ड्रोन आणि उपग्रह डेटा वापरत अल्गोरिदम आणि इतर साधनांसह शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढवण्यास करण्यात मदत करते.

    > तुम्हाला जगात जो बदल हवा आहे, तो बदल तुम्ही स्वतःच व्हा.मला आशा आहे की या परिस्थितीचा फायदा घेऊन सकारात्मक बदल करण्याचा स्वतःचा मार्ग आपण सगळे शोधू शकू.

  • कोचाकोर्न वोराखोम

    थायलंड लँडस्केप आर्किटेक्ट kotch_voraakhom

    कोचाचॉर्न व्होराखॉम स्वत:ला 'एक जबरदस्त थाई शहरी लँडस्केप आर्किटेक्ट' म्हणून संबोधतात. बँकॉकच्या विखुरलेल्या शहरात फुटलेल्या वाटांची मोडतोड करुन नवीन कल्पनांची रोपं लावण्याच्या उद्देशानं तिनं आपलं काम सुरू केलं आहे.

    ती आता सार्वजनिक जागांचा सकारात्मक उपयोग करता यावा यासाठी ती आता काम करते आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मोठ्या शहरांत बागेच्या आकारांची भगदाडं तयार करते आहे.

    > हवामानाच्या बाबतीत सर्वांना न्याय मिळावा यासाठी पद्धतशीर बदल घडवून आणायचे असतील तर आपण एकसंघ जग म्हणून काम करण्याची गरज आहे. ही पृथ्वी आपले घर आहे आणि तिला बरे करण्याचा एकमेव मार्ग आहे, आपण एक होऊन काम करणं.

  • स्यूझी वाईल्स

    यूके शास्त्रज्ञ

    स्यूझी या एक शास्त्रज्ञ आहेत आणि त्या सार्वजनिक आरोग्याविषयी बोलतात. साथीच्या आजाराच्या काळात न्यूझीलंडची ती ताकद बनली आहे. कोव्हिड-19 ची शास्त्रीय माहिती लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी व्यंगचित्रकार टोबी मॉरिसची मदत घेतली. त्यांच्या एकत्रित कामात लोकप्रिय 'फ्लॅटन द कर्व्ह' या व्हिज्युअलायझेशनचा समावेश आहे, ज्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे, आणि लॉकडाऊन का करतात हे लोकांना समजावण्यासाठी सरकारांना त्यानं मदत झाली आहे.

    त्या ऑकलंड विद्यापीठात बायोल्युमिनेसेंट सुपरबग्स लॅबच्या प्रमुख आहेत, जिथे संसर्गजन्य सूक्ष्मजीव आपल्याला कसे आजारी पाडतात हे समजून घेण्यासाठी आणि नवीन औषधे शोधण्यासाठी त्या आणि त्यांची टीम जीवाणूंना चमकवण्याचं काम करते.

    > ज्या देशांमध्ये लोक एकमेकांचं आजारापासून यशस्वीपणे रक्षण करण्यासाठी एकत्र आले आहेत ते दर्शवतात की मोठी आव्हानंही करुणा आणि सामूहिक कृतीसह पार करता येऊ शकतात.

  • एलिन विल्यम्स

    वेल्स, यूके अपंग हक्क ब्लॉगर

    एलिन एक लेखक आणि अपंग हक्कांची पुरस्कर्ती आहे. सोळा वर्षांच्या वयापासून ती माय ब्लर्ड वर्ल्ड या तिच्या ब्लॉगवर मायलजिक एन्सिफलायटिस आणि रेटिनाइटिस पिगमेंटोसा (दृष्टी कमी होत जाते असा आजार) या विषयीचे आपले अनुभव मांडले आहेत.

    ती तिच्या अनुभवांविषयी प्रामाणिकपणे आणि खुलेपणानं लिहिते. ती सल्ला देण्यापासून आजाराचा भावनिक परिणाम, तिला सामोरे जावे लागणारे सामाजिक अडथळे आणि फॅशन उद्योगात अपंग हक्कांचं समर्थन याविषयी लिहिते. आपल्या लेखनात ती जागरूकता वाढवण्याबरोबरच आपल्यासारख्या परिस्थितीतून जाणाऱ्या इतरांना ते एकटे नाहीत हे सांगत सकारात्मकतेचा धागा विणते.

    > एखादे माध्यम शोधा जे आपल्याला आपली सर्जनशीलता, ऊर्जा, विचार, वेदना आणि आनंद वाहतं करू देईल. त्यातून येणाऱ्या सर्व सकारात्मक गोष्टी स्वीकारा. दुसऱ्या कुणाचा काही प्रभाव नसलेल्या आणि पूर्णपणे तुमच्या असलेल्या अशा काही गोष्टींसाठी तुम्ही पात्र आहात.

  • एलिस वाँग

    यूएसए अपंग हक्क कार्यकर्ता

    एलिस डिसेबलिटी व्हिजिबलिटी प्रोजेक्ट या पायाभूत पातळीवरील मोहिमेची संस्थापक आहे. ही मोहीम अपंगत्वाचा सामना करणाऱ्या व्यक्तींना त्यांची कहाणी मांडण्यासाठी प्रेरणा देते.

    या वर्षी तिनं नवा संग्रह प्रकाशित केला आहे 'डिसेबलिटी व्हिजिबलिटी: फर्स्ट पर्सन स्टोरीज फ्रॉम ट्वेन्टी-फर्स्ट सेंचुरी'

    > 2020 मध्ये जग खूप बदललं आहे आणि मला पुन्हा सगळं पहिल्यासारखं 'नॉर्मल' होऊ नये असं वाटतं.

  • मिशेल येहो

    मलेशिया अभिनेत्री michelleyeoh_official

    मिशेल येहोनं हाँगकाँगच्या मार्शल आर्ट चित्रपटांच्या पुरुषप्रधान जगात स्वतःच स्वतःचे स्टंट करत प्रवेश केला. बॉन्ड गर्ल म्हणून (टुमोर नेव्हर डाइज अभिनीत) ती हॉलिवूडमध्ये गेली आणि अमेरिकेत दीर्घ, यशस्वी करिअरचा आनंद लुटणाऱ्या आशियातील मोजक्याच अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

    चित्रपट व्यवसायात 30 वर्षांहून अधिक काळानंतर, मिशेला मोठ्या चित्रपटांत तगड्या भूमिका मिळत आहेत. अवतार चित्रपटांच्या नव्या भागासह आणि मार्व्हलचा पहिला आशियाई सुपरहिरो चित्रपट शांग-ची मध्ये ती भूमिका साकारते आहे. हॉलिवूडमध्ये आशियाई प्रतिनिधित्वाच्या कमतरतेबद्दल ती वारंवार बोलते आणि संयुक्त राष्ट्रांची सद्भावना राजदूत म्हणून 2030 पर्यंत दारिद्र्य निर्मूलनासाठी काम करीत आहे.

    > कोव्हिड-19 ने सर्वांवर परिणाम केला आहे, पण महिलांना त्याची झळ सर्वाधिक बसली आहे. लक्षात ठेवा, आपण एकट्या नाही आहोत. आपल्याला एकटं वाटत असेल, तर आपण आधार घेतला पाहिजे. एकमेकांना आधार देणारं असं सपोर्ट नेटवर्क असणं आज खूप महत्त्वाचं आहे.

  • आयशा येसुफू

    नायजेरिया कार्यकर्ता

    आयशा येसुफू या नायजेरियात उत्तम शासनाची मागणी करमाऱ्या कार्यकर्ता आहेत.

    2014 साली नायजेरियाच्या चिबोकमध्ये माध्यमिक शाळेतल्या दोनशेहून अधिक मुलींचं बोको हराम या सशस्त्र गटाने अपबपण केलं होतं, तेव्हा सुरू झालेल्या 'ब्रिंग बॅक अवर गर्ल्स' या मोहिमेच्या त्या सह-संयोजक आहेत. एन्ड-सर्स या आंदोलनातही त्यांनी प्रामुख्यानं सहभाग घेतला आहे. नायजेरियन पोलिसांनी अधिक जबाबदारपणे काम करावे याची मागणी या आंदोलनात सहभागी नागरिकांनी केली. त्यानंतर खून, दरोडा, बलात्काराचा आरोप असलेल्या वादग्रस्त स्पेशल अँटी लुटमारी पथकाच्या विघटनाची प्रक्रिया सरकारनं सुरू केली आहे.

    > महिलांना माझा सल्ला आहे की जगात पूर्णपणे आणि बेधडकपणे त्यांची जागा घ्यावी. स्त्रियांनी टेबलावर जागेची मागणी करणे थांबवावे - त्यांनी स्वतःचे टेबल तयार केले पाहिजे.

  • गुलनाझ झुझबाएव्हा

    किर्गिझस्तान अपंग हक्क कार्यकर्ता gulnazzhuzbaeva

    किर्गिझस्तानमध्ये 5000हून अधिक लोकांना दृष्टीदोष आहे, अनेकांना बरीच महत्त्वाची सरकारी कागदपत्रे वाचता येत नाहीत. किर्गिझ फेडरेशन ऑफ दि ब्लाइंडच्या संस्थापक गुलनाज झुझबाएवा हे साहित्य ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.

    त्यांची टीम दृष्टीहीन लोकांसाठी एक उपक्रम राबवते ज्यात त्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्य शिकवली जातात. 2020 साली या उपक्रमात सहभागी झालेल्या 22 जणांपैकी सहा जणांना नोकरी मिळाली आहे तर दोघांना विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे.

    > आयुष्य अनेक आव्हानांनी भरलेलं आहे, हे धरूनच चाला.

याशिवाय वुहानमध्ये लॉकडाऊन असतानाच्या काळातल्या घडामोडींची तपशीलवार नोंद करणाऱ्या लेखिका फँग फँग, महिलांवरच्या अत्याच्याराबाबत आवाज उठवणाऱ्या दक्षिण आफ्रिकन गायिका - कवी झाहरा यांचाही या यादीत समावेश आहे. या अवघड वर्षात जगभरातल्या अनेक महिला इतरांना मदत करण्यासाठी झटत आहेत. म्हणून 100 महिलांच्या यादीतली एक जागा या सगळ्या महिलांच्या सन्मानार्थ रिकामी ठेवण्यात आलेली आहे.

Short presentational grey line

या 100 महिलांची निवड कशी करण्यात आली?

बीबीसीच्या जगभरातल्या विविध भाषांमध्ये काम करणाऱ्या टीम्सनी यासाठी नावं सुचवली. या सगळ्या नावांच्या यादीमधून बीबीसीच्या 100 विमेन टीमने एक निवडक यादी तयार केली. गेल्या 12 महिन्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या, त्यासाठी वाखाणल्या गेलेल्या उमेदवारांचा शोध आम्ही घेत होतो.

आम्हाला अशा महिला शोधायच्या होत्या ज्यांच्या कहाण्या प्रेरणादायी होत्या, ज्यांनी काहीतरी भव्यं साध्य केलं होतं किंवा मग समाजात असं काही घडवून आणलं होतं जे कार्य मोठं असेल, पण कदाचित त्याच्या बातम्या झाल्या नसतील.

या वर्षीची 100 विमेनसाठीची थीम आहे - विमेन हू लेड चेंज (Women who led change) म्हणजेच - बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिला. निवड करण्यात आलेल्या यादीतल्या महिलांचं या थीमबाबतचं योगदान, त्या त्या भागाचं प्रतिनिधित्वं, निपःक्षपातीपणा या सगळ्या निकषांवर अंतिम नावांची निवड करण्यात आली.

Short presentational grey line

फोटो कॉपीराइट्सः

मेलबर्न विद्यापीठ, किम सुहाययोन, क्वोक डाट, रचता संगरॉड, फी-ग्लोरिया ग्रोनेमेयर, रकयन ब्रमस्तो, एनसीआयडी, थॉमस लाइसने, नंदर, कुंजन जोशी, शजन सॅम, शाहबाझ शाझी, एक्सकिमिया, अर्श अशौरिनिया, यूएनएचआरसी, नॅन्सी राचेद, एमिली एल्मंड बरार, आयसीएआरडीए, 89अप, नो आयसोलेशन, एना खोदरेवा, बोग्दानोवा एकतेरिना, अनास्तासिया वोल्कोवा- सिडनी मॉर्निंग हेराल्ड, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड/ जॉन केयर्न्स, अर्विद एरिक्सन, नेमोन्ते नेन्क्विमो, जेरोनिमो जुनेगा/ अमेझॉन फ्रंटलाइन्स, एलेजेंड्रा लोपेझ, व्हिक्टर ह्यूगो यानेझ रामोस, रिक बकनन फोटोग्राफी, एडी हर्नांडिज फोटोग्राफी, अॅन्ट आय फोटोग्राफी, क्रिस कॉलिंग्रिज, अब्देलहामिद बेलहमिदी, कुन्मी ओवोपेटु, एलियन प्रोझ स्टुडिओ, मास्टरकार्ड फाउंडेशन, करेन डोलवा, हन्ना मेंतझ, फोर्ट्रेस, वाइस मीडिया ग्रुप एलएलसी, वॅनेसा नकाते, साइटेड डिझाइन से फ़्रांसिस मवेज, एंगेलो स्टुडिओ, जोला फोटो, डेविड गी, विल किर्क, पलोमा हर्ब्सटिन, मिगुएल मेंडोझा फोटो स्टुडिओ, क्रेडिट डेनिस एल्स, एल्स, शनि ढांडा, डायोन्ड विलियम्स, अलकेलडिया मेयर डे बगोटा, ग्लोबल नेटवर्क ऑफ वीमेन पीसबिल्डर्स, रीस विलियम्स विथ आर्टिस्ट इन प्रेसिडेंट्स, सेबेस्टियन लिंडस्टॉर्म, गेटी इमेजेस, सालसाबिला खैरुनिसा, आंद्रेज केरेसे, गुलनाझ जुजबायेवा, क्लेयर गोडले, द ऑस्ट्रेलियन वॉटर असोसिएशन, वू बाओजियान, लाउरा कोटीला प्राइम मिनिस्टर्स ऑफिस, ओ'शेया टॉमेटी, मारिया एस्मे डेल रियो, गियो सोलिस, लॉरेंट सेर्रोसी, डीसीएमएस, इन्ति गाजार्दो, मॉर्गन मिलर, हेलेना प्राइस हॅम्ब्रैच, जॉन रूसो यांच्या सौजन्यानं, यूएन वीमेन/ प्लॉय फुफेंग.

क्रेडिट

लेखन आणि संपादकीयः अॅमेलिया बटरली, लारा ओवेन, लॉरिन बोजकुर्त, वॅलेरिया पेरॅसो, स्टेफानी गब्बट;

प्रॉडक्शनः एलिसन टॉर्स्डेल, अॅना लुसिया गोंजालेझ; डेव्हलपमेंटः मार्ता मार्टि मार्केस, क्लोए स्पेलमैन और डिझाइनः शॉन विल्मोट.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)