अझरबैजान-आर्मेनिया : नागोर्नो-काराबाखमधल्या महत्त्वाच्या शहरावर 'अझेरी' लष्कराचा कब्जा

फोटो स्रोत, KAREN MINASYAN
अझरबैजानच्या राष्ट्रपतींनी म्हटलंय की नागोर्नो-काराबाख भागातल्या एका महत्त्वाच्या शहराला त्यांच्या सैन्याने ताब्यात घेतलं आहे. रविवार, 8 नोव्हेंबरला प्रसारित झालेल्या एका टेलिव्हिजन संदेशात अझरबैजानचे राष्ट्रपती इलहाम अलीयेव यांनी म्हटलं की त्यांनी शुशा नावाच्या शहराला ताब्यात घेतलं आहे.
पण आर्मेनियाने अझरबैजानचा हा दावा खोडून काढत म्हटलंय की त्या भागात अजूनही युद्ध सुरू आहे. या दोन्ही देशांमध्ये ज्या भागावरून संघर्ष चालू आहे त्या भागाच्या दृष्टीने शुशा शहर अत्यंत महत्त्वाचं आहे.
नागोर्नो-काराबाख 1700 चौरस मैलांचा डोंगराळ भाग आहे जो सोव्हियत संघाचं विघटन व्हायच्या आधीच स्वायत्त झाला होता आणि अझरबैजानचा भाग झाला.
पारंपरिकदृष्ट्या इथं ख्रिश्चन आर्मेनियाई आणि तुर्क मुसलमान राहातात. या भागावरून आर्मीनिया आणि अझरबैजान या दोन राष्ट्रांत तीस वर्षांआधीही संघर्ष झालेला आहे. यानंतर युद्धविराम झाला खरा, पण दोन्ही देशांमध्ये कोणताही शांतता करार होऊ शकला नाही.
सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये पुन्हा भडका पेटला आणि हिंसा सुरू झाली. दोन्ही देशांनी या हिंसेचं कारण म्हणून एकमेकांकडे बोट दाखवलं आहे.
सध्याची परिस्थिती काय?
नागोर्नो-काराबाखची राजधानी स्तेप्नाकियर्त (जिला अझरबैजानमध्ये खानकेन्दी या नावाने ओळखलं जातं) च्या वरच्या बाजूला असणाऱ्या एका डोंगरावर शुशा शहर वसलेलं आहे. स्तेप्नाकियर्तहून आर्मीनियाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला हे शहर वसलं आहे. जर हे शहर अझरबैजानच्या ताब्यात गेलं तर अझेरी सेनेला स्तेप्नाकियर्तवर हल्ला करणं अधिकच सोपं होईल.

फोटो स्रोत, EPA
अझरबैजानचे राष्ट्रपती इलहाम अलीयेव यांनी म्हटलं की, "शुशा शहराचा स्वातंत्र्यदिवस अझरबैजानच्या इतिहासात नोंदला जाईल." नागोर्नो-काराबाख आपण लवकरच ताब्यात घेऊ या आपल्या वचनाचा पुनरुच्चार करत ते म्हणाले की, "आम्हाला कोणतीही ताकद आता रोखू शकत नाही."
काही दिवसांपूर्वी बीबीसी प्रतिनिधी ओर्ला गुएरिन यांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की आता आर्मेनियाकडे फारसे दिवस उरलेले नाहीत.
दुसरीकडे आर्मेनियाने मात्र शुशा शहराला ताब्यात घेतल्याच्या अझरबैजानचा दावा खोटा आहे असं म्हटलं आहे. आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयातले अधिकारी आर्तस्रन होवानिस्यान यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिलं आहे की, " शुशामध्ये अजूनही लढाई चालू आहे. वाट पाहा आणि आपल्या सैनिकांवर भरोसा ठेवा."
नागोर्नो-काराबाखचे स्वयंघोषित राष्ट्रपती अरायिक हारुत्युन्यान यांच्या एका परराष्ट्र नीती सल्लागारांनी बीबीसीला सांगितलं की, "सध्या शुशा युद्धभूमी बनलंय असं आपण म्हणू शकतो. तिथे अझरबैजानचं सैन्य आहे आणि काराबाखचं सैन्य आहे. आम्ही या भागातल्या एकेक घरासाठी लढत आहोत."
अझरबैजानच्या घोषणेआधी आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता शूशान स्टेपन्यान यांनी लिहिलं होतं की, "आज रात्री शुशीमध्ये (शुशा) सगळ्यांत भयानक लढाई होतेय." त्यांनी असंही लिहिलं की यात लढाईत अझरबैजानच्या अनेक सैनिकांचा जीव गेलाय तर त्यांचे अनेक रणगाडे आणि गाड्या उद्धस्त झाल्यात.
शुशा शहराचं महत्त्व
अझरबैजान आणि आर्मेनिया दोन्ही देशांसाठी शुशा शहराचं वेगवेगळं सांस्कृतिक महत्त्व आहे. 1980 च्या शेवटी आणि 1990 च्या सुरूवातीला दोन्ही देशांमध्ये जे युद्ध झालं होतं त्याच्या आधीपर्यंत या भागात मुख्यकरून अझेरी लोकांची वस्ती होती. पण युद्धामुळे हजारो लोकांना आपलं घर सोडून परागंदा व्हावं लागलं.

फोटो स्रोत, KAREN MINASYAN
आर्मेनियासाठी या शहरात पवित्र समजलं जाणार ऐतिहासिक गजानचेत्सोत्स चर्च आहे. हे आर्मेनियातल्या सगळ्यांत जुन्या आणि मोठ्या असणाऱ्या चर्चपैकी एक आहे. मागच्या महिन्यात आर्मेनियाने अझरबैजानवर या चर्चवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. अर्थात दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे की ते सामान्य नागरिकांवर हल्ला करत आहेत.
8 नोव्हेंबरला या दोन्ही देशांमधलं युद्ध सुरू होऊन 43 दिवस झाले आहेत. 27 सप्टेंबरला सुरू झालेल्या या लढाईत किती लोकांचा जीव गेला याबद्दल काही ठोस माहिती उपलब्ध नाहीये. नागोर्नो-काराबाखच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या लढाईत सैन्याच्या कमीत कमी 1200 लोकांचा जीव गेलाय. त्यांचं म्हणणं आहे की या लढाईत सामान्य माणसांचाही जीव गेला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गेल्या महिन्यात म्हटलं होतं की या लढाईत आतापर्यंत जवळपास 5000 लोकांचा जीव गेला आहे.
यावर काय आल्या प्रतिक्रिया?
अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेनंतर राजधानी बाकूमध्ये लोकांनी रस्त्यावर येऊन आंनदोत्सव साजरा केला. ते कारचे हॉर्न वाजवत होते, घोषणा देत होते आणि आपला राष्ट्रीय झेंडा फडकवत होते.

फोटो स्रोत, GAVRIIL GRIGOROV
वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रिचेप तैय्यप अर्दोआन यांनी आपल्या, "अझेरी बांधवांना" शुभेच्छा दिल्या आहेत. तुर्कस्थान अझरबैजानला आपला मित्र मानतो आणि या लढाईत आपण अझरबैजानची साथ देऊ असं त्यांनी आधीच म्हटलंय.
शनिवारी, 7 नोव्हेंबरला अद्रोआन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना उद्देशून म्हटलं की आर्मेनियाने आता अझरबैजानच्या जमिनीवरून मागे हटलं पाहिजे.
याच प्रकरणी रशियन सरकारने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे ज्यानुसार पुतीन यांनी अर्दोआन यांना म्हटलं आहे की त्यांनी, "दोन्ही देशांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे आणि त्यांच्यामते लोकांचे जीव वाचवण्यासाठी लवकरात लवकर युद्धबंदी व्हायला हवी. या प्रश्नावर राजकीय तसंच मुत्सदी उत्तर शोधलं पाहिजे."
दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून युद्धविरामासाठी प्रयत्न केले गेले आहेत. रशिया आर्मेनियाचा मित्र आहे पण त्यांचे अझरबैजानशीही चांगले संबंध आहेत. रशियाने दोनदा युद्धबंदीसाठी प्रयत्न केले, पण ते सफल झाले नाहीत. युद्धबंदी लागू झाल्यानंतर काही मिनिटातच ती तुटली. दोन्ही पक्षांचा आरोप आहे की समोरच्याने युद्धबंदीचं उल्लंघन केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























