iPhone 12 : अॅपलच्या आयफोन- 12ची भारतातील किंमत किती?

अॅपल आयफोन

फोटो स्रोत, APple

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणारी अमेरिकेतील आघाडीची कंपनी अॅपलने आयफोन 12 सिरीजचं अनावरण केलं आहे. यामध्ये त्यांनी चार नवे मॉडेल बाजारात आणले आहेत.

मंगळवारी एका ऑनलाईन कार्यक्रमात अपलने या नव्या मॉडेल्सची घोषणा केली.

आयफोन 12 सिरीजच्या मोबाईल फोनमध्ये 5जी नेटवर्क चालू शकेल, असंही कंपनीने म्हटलं आहे.

"आम्ही आयफोनमध्ये 5जी नेटवर्क सुरू करत आहोत. आयफोनकरिता ही नव्या युगाची सुरुवात असेल," असं यावेळी अॅपलचे प्रमुख टिम कुक म्हणाले.

अॅपलने आयफोन 12 (64, 128 आणि 256 GB स्टोरेज), आयफोन 12 मिनी (64, 128 आणि 256 GB स्टोरेज) यांच्याशिवाय आयफोन 12 प्रो (128, 256 आणि 512 GB स्टोरेज), आयफोन 12 प्रो मॅक्स (64, 128, 256 GB स्टोरेज) हे मोबाईल लाँच केले आहेत.

काय असेल किंमत?

आयफोन 12 सिरीजमधील मोबाईल्सची किंमत 70 हजार रुपयांपासून 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत आहे.

स्टोरेजच्या हिशोबाने याच्या किंमतीत वाढ होत जाते. 64 GB स्टोरेजच्या आयफोन 12 मिनी मोबाईलची किंमत भारतात 69 हजार 900 रुपये इतकी आहे. यातील 256 GB चं मॉडेल 84 हजार 900 रुपयांना मिळणार आहे.

अॅपल

फोटो स्रोत, APple

त्याच प्रमाणे 512 GB स्टोरेजच्या आयफोन प्रो मॅक्सची किंमत 1 लाख 59 हजार 900 रुपये आहे.

आयफोन 12 मिनी 5जी तंत्रज्ञान वापरण्यात आलेला जगातील सर्वांत लहान फोन आहे.

कधी उपलब्ध होणार?

जगभरात आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रोचं बुकींग 16 ऑक्टोबरपासून सुरू होईल तर हा मोबाईल 23 ऑक्टोबरपासून वितरीत केला जाईल.

आयफोन 12 मिनीसाठी बुकींग 6 नोव्हेंबरपासून सुरू होईल. 13 नोव्हेंबरनंतर हा मोबाईल मिळायला सुरुवात होईल.

त्याचप्रमाणे, आयफोन 12 प्रो मॅक्स 6 नोव्हेंबरपासून ऑर्डर करता येईल. 20 नोव्हेंबरपासून हा मोबाईल आपल्या हाती येईल.

भारतात हा मोबाईल कधीपर्यंत मिळेल, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

एकीकडे कोरोना व्हायरस आणि अर्थव्यवस्थेला फटका बसल्याच्या कारणामुळे जगभरातील बाजारपेठा थंड पडल्या आहेत. अशा परिस्थितीत अॅपल आयफोनच्या विक्रीत गेल्या एका वर्षात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

आयफोन 12 मधील नव्या फिचर्समुळे कंपनीला चांगला फायदा होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.

अॅपल प्रमुख टिम कुक म्हणाले, "5जी तंत्रज्ञानामुळे डाऊनलोड आणि अपलोड करण्याचा वेग वाढेल. व्हीडिओचा दर्जा चांगला असेल. गेम जास्त रंजक असतील, संवादाच्या प्रक्रियेत नवीन बदल पाहायला मिळू शकतात."

आयफोन 12 ची स्क्रिन 6.1 इंच इतकी असेल. हा फोन तुलनेत 11 टक्के पातळ आणि 16 टक्के हलका असेल.

नव्या फोनच्या स्क्रिनचं रिझोल्यूशन जास्त आहे. त्यामध्ये सिरॅमिक शिल्डचा वापर करण्यात आला आहे.

यामध्ये ए-14 बायोनिक चीप वापरण्यात आलं आहे. हे पाच नॅनोमीटर प्रोसेसरवर बनवण्यात आलं आहे. यामुळे फोटोंचा दर्जा आणखी सुधारेल.

रात्रीसुद्धा फ्लॅशशिवाय काढा फोटो

नव्या आयफोनमध्ये फ्लॅशचा वापर न करता सेल्फी घेता येऊ शकते, असं कंपनीने म्हटलं आहे. याशिवाय, कलर काँट्रस्ट आणि आवाजाच्या बाबतीत नवा आयफोनमधील तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा सुधारीत आहे.

आयफोन

फोटो स्रोत, APple

आयफोन 12 प्रोची स्क्रिन 6.1 इंच असेल. आयफोन 12 प्रो मॅक्सची स्क्रिन 6.7 इंच असणार आहे.

दोन्ही प्रो मॉडेलमध्ये 128 गिगाबाईट स्टोरेज असेल.

आयफोन 12 मध्ये 12 मेगापिक्सलचे दोन वाईड अँगल कॅमेरे वापरण्यात आले आहेत. कमी प्रकाशातसुद्धा यामुळे चांगले फोटो येऊ शकतात. व्हीडिओ रेकॉर्डिंगबाबत बोलायचं झाल्यास, आयफोन 12 मध्ये नाईट मोड टाईम लॅप्स फीचरसुद्धा देण्यात आलं आहे. यामुळे कमी प्रकाशातसुद्धा व्हीडिओ उत्तमरित्या रेकॉर्ड करता येऊ शकतात.

5जी तंत्रज्ञान

सॅमसंग कंपनीने फेब्रुवारी 2019 मध्ये पहिल्यांदा 5जी तंत्रज्ञान असलेल्या गॅलेक्सी S 10 या मोबाईलचं अनावरण केलं होतं. त्यानंतर ख्वावे, वन प्लस आणि गुगल या कंपन्यांनीसुद्धा 5जी तंत्रज्ञान वापरलेले मोबाईल फोन लाँच केले.

पण तज्ज्ञांच्या मते, या फिचर्समध्ये आता लोकांना कमी रस आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत फॉरेस्टर या कंपनीचे थॉमस हसन यांच्या मते, "अॅपल कंपनी नवं तंत्रज्ञान लगेच वापरत नाही. ग्राहकांना वेगळा अनुभव देण्यासाठी ते तंत्रज्ञान परिपक्व होण्याची ते वाट पाहतात."

अॅपलने नवा आयफोनची 5जी तंत्रज्ञानविषयक 3.5 गीगाबाईट्स पर सेकंद वेगाने चाचणी केली होती. म्हणजेच या वेगाने 20 GB साईजचा कोणताही चित्रपट फक्त 45 सेकंदात डाऊनलोड करता येऊ शकणार आहे.

पण 5जी तंत्रज्ञान वापरावं की नाही हे पूर्णपणे ग्राहकावर अवलंबून असणार आहे.

5जी नेटवर्क सुरू करणारा ब्रिटन हा युरोपातील दुसरा देश होता. त्याचा ब्रिटनला फायदा झाला पण मर्यादित ठिकाणीच त्याचा वापर करता येत होता.

अमेरिका ही अॅपलची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. तिथं 5जीचा वेग खूप कमी आहे.

एका अभ्यासानुसार, कॅनडाचा 4जीचा वेग अमेरिकेच्या 5जीपेक्षा जास्त आहे. काही देशांमध्ये 5जी तंत्रज्ञान अजूनही उपलब्ध झालेलं नाही.

अमेरिकेनंतर चीनमध्ये अॅपल आयफोनची सर्वाधिक विक्री होते. चीन सरकारने देशात 5जी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिलं आहे. याठिकाणी बीजिंग आणि शेनजेन शहरात 5जी नेटवर्कचं काम पूर्ण झालं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)