अमेरिका निवडणूक 2020 : ट्रंप आजारपणामुळे अध्यक्षपद सांभाळू शकत नसतील, तर काय होईल?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक महिनाभरावर आलेली असतानाच सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना कोव्हिड-19ची लागण झालेली आहे. आता पुढे काय होऊ शकतं, याविषयी अनेक शंका यामुळे निर्माण होतात.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय, तर फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप या आयसोलेशनमध्ये आहेत.
प्रचारासाठीच्या कोणत्या कार्यक्रमांना ट्रंप हजेरी लावू शकणार नाहीत?
1 ऑक्टोबरला ट्रंप यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 10 दिवसांसाठी ते 'सेल्फ आयसोलेशन' मध्ये जाणार होते, पण आता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणूक प्रक्रियेमधलं दुसरं डिबेट - वादविवादाचा कार्यक्रम 15 ऑक्टोबरला नियोजित आहे. 10 दिवसांच्या आयसोलेशन कालावधीप्रमाणे गणित केल्यास ट्रंप हे या कार्यक्रमाला हजर राहू शकतील असा अंदाज सुरुवातीला बांधण्यात आला होता, पण आता ट्रंप हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याने ही गणितं बदलू शकतात.
याशिवाय ट्रंप यांची फ्लोरिडामध्ये होऊ घातलेली रॅली रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता ते ज्येष्ठ नागरिकांशी फोनवरून संवाद साधणार असल्याचं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलंय.
या पुढच्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये ट्रंप यांच्या इतरही काही रॅलीज होणार होत्या. आता त्याही रद्द कराव्या वा पुढे ढकलाव्या लागतील.
निवडणूक कधी पुढे ढकलावी लागू शकते?
ट्रंप यांच्यावरच्या उपचार आणि आयसोलेशनच्या कालावधीमुळे त्यांच्या प्रचारक्षमतेवर परिणाम झालेला आहे. त्यामुळेच ही निवडणूक पुढे ढकलणं शक्य आहे का, असा प्रश्न विचारला जातोय आणि ते कसं शक्य आहे, याविषयीची चर्चाही सुरू झालीय.
अमेरिकेतल्या कायद्यानुसार दर चार वर्षांनी नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होते. यावर्षी ही निवडणूक 3 नोव्हेंबरला आहे.
निवडणुकीची ही तारीख बदलणं राष्ट्राध्यक्षांच्या हाती नसून अमेरिकन धोरणकर्त्यांच्या हाती आहे.
यासाठी काँग्रेसच्या दोन्ही सदनांमध्ये तारीख बदलण्याच्या बाजूने बहुमतात मतदान व्हावं लागेल. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजवर डेमोक्रॅटिक पक्षाचं वर्चस्व असल्याने असं होण्याची चिन्हं कमी आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जरी ही तारीख बदलण्यात आली, तरी अमेरिकन घटनेच्या नियमांनुसार राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ हा फक्त 4 वर्षंच असू शकतो. म्हणूनच 20 जानेवारी 2021ला ट्रंप यांचा कार्यकाळ आपोआपच संपुष्टात येईल.
ही तारीख बदलण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेली. त्यासाठी अमेरिकेच्या धोरणकर्त्यांपैकी दोन तृतीयांश जणांचा याला पाठिंबा असावा लागेल किंवा मग राज्य पातळीवरील विधीमंडळ सदस्यांपैकी 75 टक्के जणांचा पाठिंबा याला असावा लागेल, आणि हे देखील होण्याची शक्यता कमी आहे.
ट्रंप जबाबदारी पार पडायला अकार्यक्षम झाले तर?
सध्यातरी ट्रंप यांनी आपल्याला कोव्हिडची सौम्य लक्षणं जाणवत असल्याचं म्हटलंय. पण समजा त्यांचं आजारपण वाढलं आणि ते अध्यक्षपदाचं काम करू शकत नसतील, तर त्यासाठी अमेरिकेच्या संविधानामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
25व्या सुधारणेनुसार अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष सगळा कारभार उपाध्यक्षांकडे सोपवू शकतात. म्हणजेच माईक पेन्स अशा परिस्थितीत तात्पुरते अध्यक्ष असतील. प्रकृती ठीक झाल्यानंतर ट्रंप पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रं स्वतःकडे घेतील.
रॉनल्ड रेगन आणि जॉर्ज डब्ल्यू. बुश या दोघांच्याही अध्यक्षपदाच्या कार्यकाळादरम्यान असं घडलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
जर राष्ट्राध्यक्ष स्वतःही सूत्रं सोपवण्याच्या परिस्थितीत नसतील तर अशावेळी कॅबिनेट आणि उपाध्यक्ष हा निर्णय घेतील आणि पेन्स पदभार स्वीकारतील.
जर पेन्सही आजारी पडले तर प्रेसिडेन्शियल सक्सेशन अॅक्टनुसार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांच्याकडे सूत्रं जातील. पण त्या डेमोक्रॅट आहेत आणि असं झाल्यास यातून कायदेशीर लढाया सुरू होण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेतल्या घटनातज्ज्ञांना वाटतंय.
जर पलोसी यांना पदभार स्वीकारायचा नसेल तर मग पुढे ही सूत्रं 87 वर्षांचे ज्येष्ठ रिपब्लिकन सिनेटर चार्ल्स ग्रासले यांच्याकडे जातील. पण यातूनही कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
जर ट्रंप निवडणूक लढवू शकत नसतील, तर काय होईल?
कोणत्याही कारणामुळे जर एखाद्या पक्षाने निवडलेला उमेदवार निवडणूक लढवू शकत नसेल, तर त्यासाठीही काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
अध्यक्षपदाची सूत्रं तात्पुरती उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्याकडे जाऊ शकत असली तरी उमेदवारीच्या बाबत असं घडेलंच असं नाही. रिपब्लिकन पक्षाने उमेदवार म्हणून सध्या ट्रंप यांच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली आहे.
पक्षाच्या नियमांनुसार राष्ट्राध्यक्षपदासाठीचा नवीन उमेदवार निवडण्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे 168 सदस्य मतदान करतील आणि माईक पेन्स हा त्यांच्याकडचा एक पर्याय असेल.

फोटो स्रोत, Getty Images
माईक पेन्स यांची निवड झाली तर त्यांना त्यांचा नवीन रनिंग मेट - उपाध्यक्ष निवडता येईल.
पण निवडणुकीसाठीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आतापर्यंत डेमोक्रॅट्स किंवा रिपब्लिकन्सना कधीही त्यांचा उमेदवार बदलावा लागलेला नाही.
याआधी झालेल्या मतदानाचं - अर्ली व्होट्सचं काय?
पक्षांनी घोषित केलेल्या उमेदवारांच्या नावे आतापर्यंत लाखो मतपत्रिका पोस्टाने पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे याबाबत अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.
काही राज्यांमध्ये तर आगाऊ प्रत्यक्ष मतदानाला - Early in-person voting ला सुरुवात झालेली आहे.
त्यामुळे एखादा उमेदवार निवडणूक लढवायला सक्षम नसला तरी त्याच्या नावाच्या मतपत्रिकांनी मतदान होत राहील, असं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्राध्यापक रिक हॅन्सन लिहीतात.
याशिवाय इलेक्टोरल कॉलेजमधल्या मतदारांना नवीन उमेदवाराला मत देण्याची परवानगी राज्याचे कायदे देतात का याबाबतही शंका आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीचा अभ्यास असणारे कायद्याचे प्राध्यापक रिचर्ड पिलडेस लिहीतात, "काहीही झालं तरी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचं नाव मतपत्रिकेवर राहणार हे जवळपास नक्की आहे."
रिपब्लिकन पक्षाने मतपत्रिकांवरचं नाव बदलण्यासाठी कोर्टात दाद मागितली तरी यासाठी पुरेसा अवधी हातात नसल्याचं ते लक्षात आणून देतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)























