पक्षाघातासारख्या गंभीर स्थितीतून बाहेर येऊन कॅरोल धावल्या फुल मॅरेथॉन

- Author, अँगनी ब्राऊन
- Role, बीबीसी स्कॉटलंड न्यूज
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
वर्षभरापूर्वी कॅरोल फॉर्च्युन बिछान्यातून उठताना पडल्या. पक्षाघात आला आणि त्यानंतर त्या खाली पडल्या. त्यांचे अर्ध शरीर लुळं पडलं. 'अॅम्ब्युलन्सला बोलवा' इतकंच त्या ओरडून सांगू शकल्या.
जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्या 56 वर्षांच्या होत्या आणि त्यांना कल्पनाही नव्हती की आणखी वर्षभरात त्या पर्वतरांगातल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.
एडिनबर्गमधल्या घरी बीबीसीशी बोलताना त्यांनी हे स्थित्यंतर उलगडलं. आदल्या दिवशी जिममध्ये थोडा जास्तच घाम गाळला असं त्यांना अपघाताच्या वेळी वाटलं.
"मला शरीरात कुठेच दुखत खुपत नव्हतं. पण माझ्या हाताची आणि पायाची हालचाल होईना. तेव्हा मला काहीतरी गंभीर आहे हे जाणवलं. मला अर्धांगवायूचा झटका आला आहे हे समजलं," असं कॅरोल सांगतात. त्यांना दोन मुलं आहेत.
"माझा चेहरा एका बाजूला फिरला होता असं माझ्या मुलीने सांगितलं. माझ्या शरीराची डावी बाजू पूर्णपणे लुळी पडली होती. त्यात काहीच त्राण नव्हतं. तो प्रकार भीषण होता," असं कॅरोल सांगतात.
हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान कॅरोल यांना विचारण्यात आलं की, गाठ फोडण्यासाठी थ्रोमबलसिस नावाच्या उपचारांना तुम्ही सामोरं जाणार का?
ही उपचारपद्धती टोकाची असती- एकतर ती तुम्हाला बरी करते किंवा तुमचा जीव जातो.
कॅरोल डॉक्टरांना म्हणाल्या, "मला ते औषध द्या. मला उर्वरित आयुष्य लुळ्यापांगळ्या स्थितीत घालवायचं नाहीये."

उपचारांना सुरुवात झाली. पुढच्या अर्ध्या तासात डॉक्टरांना माझ्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. माझा चेहरा वाकडा होऊन एका बाजूला झुकला होता तो नीट होऊ लागला.
मला डावा हात हलवता येऊ लागल्याचं लक्षात आलं असं कॅरोल सांगतात. त्यांनी आपल्या मुलांना पाहून प्रतिसाद दिला.
मात्र त्यांना खूप अशक्तपणा जाणवत होता. पुन्हा चालता-फिरता, धावता येईल का विचार त्यांच्या मनात होता.
गाला हॅरियर्स रनर असलेल्या कॅरोल या 15 वेळा लंडन मॅरेथॉमध्ये धावल्या आहेत.
कॅरोल म्हणाल्या, "मी पुन्हा धावू शकेन का हाच विचार मनात घर करून राहिला होता. सहा महिन्यांनंतर होणाऱ्या लंडन मॅरेथॉनमध्ये मी धावू शकेन का असं मी डॉक्टरांना विचारलं."
ते म्हणाले, "तुम्ही मॅरेथॉनमध्ये पळण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण अर्धांगवायूचा झटका येण्यापूर्वी तुमची तब्येत ठणठणीत होती."
उपचारानंतर घरी परतल्यानंतर कॅरोल यांनी हळूहळू चालायला सुरुवात केली. खडतर अशा फिजिओथेरपी सेशन्सला जायला त्यांनी सुरुवात केली. स्पीच थेरपीचे उपचारही सुरू होते.
तीन मैल एकटीने कोणाच्याही मदतीविना चालता येतंय याची खात्री पटल्यानंतर त्यांनी थोडं जॉगिंग करायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, CAROLE FORTUNE
कॅरोल सांगतात, "मी बाहेर जायला घाबरत असे कारण मला पुन्हा झटका येईल अशी भीती वाटायची. म्हणूनच वॉकला जाताना कोणीतरी सोबत असेल याची मी दक्षता घेत असे. माझं शरीर किती कमकुवत झालं आहे याची मला जाणीव होत असे.
"माझ्या शरीराची एक बाजू अतिशय व्यवस्थितपणे काम करत असे मात्र त्याचवेळी दुसरी बाजू अशक्त झाली होती. त्या बाजूला मला कमकुवत वाटत असे. माझा तोल जाऊन पडेन असं वाटत असे."
कॅरोल चालताना पडल्यादेखील. गुडघ्याला बसवलेलं कवचही निखळलं. त्यांच्या बरगड्यांना फ्रॅक्चर झालं. डोळ्यांना दुखापत झाली. धावताना त्या वापरत असलेलं महागडं घड्याळही फुटलं हे सांगताना कॅरोल यांचा स्वर गदगदून येतो.
"पण धावणं सोडण्याचा प्रश्नच नव्हता. मी पडून जखमांनी विव्हळत असतानाही धावणं सोडण्याचा विचार माझ्या मनाला शिवला देखील नाही," असं त्या सांगतात.
लंडन मॅरेथॉन 2020 कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली होती. 4 ऑक्टोबरला होणार असलेली मॅरेथॉन रद्द करण्यात आली. त्याचदिवशी कॅरोल यांनी पर्वतरांगांमध्ये धावायला जायचं असं ठरवलं.
एडिनबर्गमधल्या रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन पाथ या त्यांच्या घरापासून निघून डॉल्फिन्टन इथल्या ब्लॅक माऊंट पॅरिश चर्चपर्यंत जायचं असा मार्ग होतं. 5,000 फूटांची चढण होती. चेस्ट हार्ट आणि स्ट्रोक स्कॉटलंड यांच्याकरता त्या निधी जमवणार होत्या.
शरीराच्या उजव्या बाजूच्या तुलनेत कॅरोल यांची डावी बाजू अशक्त होती. मात्र तरीही त्यांनी लांब पल्ल्याचं धावायला सुरुवात केली. 26.2 मैलांचं आव्हान एकदम सोडून देण्यापेक्षा हळूहळू जात राहीन असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, CAROLE FORTUNE
2009 मध्ये कॅरोल यांच्या बाईकला गाडीने धडक दिली होती. स्कॉटिश बॉर्डरजवळ मोफॅट रोडजवळ हा अपघात झाला होता. त्या प्रसंगातून सावरत त्यांनी धावायला सुरुवात केली होती. त्या अनुभवातून प्रेरणा घेत यावेळीही त्यांनी धावणं सोडलं नाही.
कॅरोल सांगतात, "नर्स असलेली एक मैत्रीण म्हणाली तू धावणं अविश्वसनीय आहे. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर सहा महिन्यात तू मॅरेथॉनमध्ये पळते आहेस. तिचे शब्द ऐकून मला प्रचंड आनंद झाला. मी खूप मोठा टप्पा गाठला आहे. हा प्रवास अवघड होता पण खूप काही शिकवणारा होता."
चेस्ट हार्ट आणि स्ट्रोक स्कॉटलंड या फंडरेझिंग संस्थेच्या संचालक लॉरेन्स कोवन म्हणाल्या, "कॅरोल यांची कहाणी प्रेरणादायी आहे. अशा आजारावर मात करत मॅरेथॉन पळणं हे खूपच आव्हानात्मक आहे. एका वर्षात त्यांनी आयुष्य बदलून दाखवलं आहे.
"आयुष्याकडे अर्ध्या रिकाम्या भरलेल्या ग्लासातून पाहायचं नसतं हे कॅरोल यांनी दाखवून दिलं आहे. चेस्ट हार्ट आणि स्ट्रोक स्कॉटलंडचं ब्रीदही तेच आहे. रुग्णांनी केवळ आजारातून वाचलो या भावनेसह जगू नये. त्यांनी समरसून आयुष्य जगावं असं आम्हाला वाटतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























