IPL 2020: धोनीसेनेची विजयी सलामी; अंबाती रायुडू चमकला

फोटो स्रोत, Robert Cianflone
अंबाती रायुडूच्या 48 बॉलमध्ये 71 धावांच्या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सला 5 विकेट्सनी नमवलं. चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन म्हणून धोनीसाठी आयपीएल स्पर्धेतला हा शंभरावा विजय आहे.
मुंबईने सुरुवातीला बॅटिंग करताना 162 रन्सची मजल मारली. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. शेन वॉटसन आणि मुरली विजय झटपट माघारी परतल्याने चेन्नईची अवस्था 6/2 अशी झाली. मात्र यानंतर फॅफ डू प्लेसिस आणि अंबाती रायुडू जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी करत विजयासाठी आवश्यक पायाभरणी केली. रायुडूने 48 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सेससह 71 रन्सची शानदार खेळी केली. रायुडू आऊट झाल्यानंतर रवींद्र जडेजाही फार काळ टिकला नाही. मात्र धोनीने प्रयोग म्हणून सॅम करनला पाठवलं. सॅमने 5 बॉलमध्ये 18 रन्स करत चेन्नईचा विजय सोपा केला. फॅफ डू प्लेसिसने 44 बॉलमध्ये नाबाद 58 रन्सची खेळी केली.
दमदार सलामीनंतरही नियमित अंतरात विकेट्स गमावल्याने मुंबईला इंडियन प्रीमिअर लीगच्या तेराव्या हंगामाच्या सलामीच्या लढतीत 162 धावांचीच मजल मारता आली.
शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये मुंबईने सहा विकेट्स गमावल्या. मुंबईतर्फे सौरभ तिवारीने सर्वाधिक 42 रन्सची खेळी केली. चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने 3 तर रवींद्र जडेजा आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
हिटमॅन रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी मुंबईला पाचव्या ओव्हरमध्येच 46 धावांची खणखणीत सलामी दिली. मात्र पीयुष चावलाच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याचा रोहितचा प्रयत्न फसला. स्थिरावलेला क्विंटन सॅम करनच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्याने 33 रन्सची खेळी केली. सूर्यकुमार यादव आणि सौरभ तिवारी यांनी डाव सावरला. दीपक चहरने सूर्यकुमारला 17 धावांवर आऊट केलं. सौरभ तिवारीने 42 धावांची चांगली खेळी केली पण फॅफ डू प्लेसिसच्या अफलातून कॅचमुळे त्याला तंबूत परतावं लागलं. जडेजाच्या बॉलिंगवर डू प्लेसिसच्या कॅचमुळे हार्दिक पंड्या माघारी परतला. त्याने 14 रन्स केल्या. धोकादायक वाटणाऱ्या पोलार्डला एन्गिडीने आऊट करत मुंबईची धावसंख्या आटोक्यात राहील याची काळजी घेतली.
तत्पूर्वी महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. ड्वेन ब्राव्हो फिट नसल्यामुळे त्याला अंतिम अकरात स्थान मिळालं नाही. सॅम करन, लुंगी एन्गिडी, शेन वॉटसन, फॅफ डू प्लेसिस या विदेशी खेळाडूंना खेळवण्याचा चेन्नईने निर्णय घेतला. मुंबईने क्विंटन डी कॉक, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट आणि कायरेन पोलार्ड यांना खेळवण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Robert Cianflone
गेल्या वर्षी हैदराबाद इथे झालेल्या फायनलमध्ये प्रेक्षकांच्या आवाजी जल्लोषात मुंबई अवघ्या एका रनने चेन्नईला हरवत जेतेपदावर नाव कोरलं होतं. चेन्नईच्या शेन वॉटसनने एकहाती मॅच जिंकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र लसिथ मलिंगाने शार्दूल ठाकूरला आऊट करत मुंबईला चौथ्यांदा जेतेपद मिळवून दिलं.
हिटमॅन रोहित शर्मा दुखापत आणि कोरोना यामुळे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करतो आहे. गेल्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलला न्यूझीलंडविरुद्ध खेळल्यानंतर महेंद्रसिंग धोनी दिसलाच नाही.
स्वातंत्र्यदिनी इन्स्टाग्रामवर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सव्वा वर्षानंतर धोनीला खेळताना त्याच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.
मुंबईने यंदा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस लिन, ऑलराऊंडर नॅथन कोल्टिअर नील, युवा मोहसीन खानसह सौरभ तिवारीला लिलावात संघात घेतलं. दुसरीकडे चेन्नईने इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन, शिस्तबद्ध बॉलिंगसाठी प्रसिद्ध जोश हेझलवूड, युवा स्पिनर आर.साई किशोर आणि अनुभवी स्पिनर पीयुष चावलाला ताफ्यात समाविष्ट केलं आहे.
चेन्नई संघाचं सरासरी वय 32 आहे. ट्वेन्टी-२० सारख्या वेगवान फॉरमॅटमध्ये डॅडी आर्मी कसं परफॉर्म करतेय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. जेतेपदांच्या बाबतीत चौकार लगावलेल्या मुंबईला सुरुवातीपासूनच जिंकण्यात सातत्य राखायला आवडेल.
युएईतल्या पिचेस फिरकीला पोषक आहेत. चेन्नईकडे पीयुष चावला, आर.साई किशोर, इम्रान ताहीर, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, करण शर्मा अशी फिरकीपटूंची फौज आहे.
मुंबई-चेन्नई द्वंद्वं एवढं कट्टर का?
जिंकण्यात शिस्तबद्ध सातत्य असणारे संघ अशी या संघांची ख्याती आहे. चेन्नईने प्रत्येक हंगामात प्ले ऑफ्स अर्थात बादफेरी गाठली आहे. तीनवेळा त्यांनी जेतेपदाची कमाई केली आहे.
मुंबई इंडियन्सच्या खात्यात चार जेतेपदं आहेत. चेन्नईकडे कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आहे. मुंबईकडे हिटमॅन रोहित शर्मा आहे.
दडपणाच्या क्षणी शांत राहून संघाला जिंकून देण्यात दोन्ही कॅप्टन्स निपुण आहेत. धोनी आणि रोहित दोघांनीही स्वत:च्या खेळातून सहकाऱ्यांसमोर वस्तुपाठ सादर केला आहे. स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत दोघेही अव्वल दहामध्ये आहेत.
दोन्ही संघ संतुलित आहेत. नवा बॉल परिणामकारक ठरवू शकतील असे फास्ट बॉलर्स, मधल्या ओव्हर्समध्ये विकेट्स मिळवत राहतील असे स्पिन बॉलर्स आणि हाणामारीच्या षटकात विकेट्सच्या बरोबरीने रन्सला ब्रेक लावतील असे फास्ट बॉलर्स अशी फौज दोन्ही संघांकडे आहे.
मुंबईकडे लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, हार्दिक आणि कृणाल पंड्या, राहुल चहर यांनी हे काम केलं आहे. चेन्नईकडे लुंगी एन्गिडी, दीपक चहर, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, इम्रान ताहीर असं पंचक आहे.

फोटो स्रोत, Robert Cianflone
दोन्ही संघांकडे एकहाती मॅच फिरवू शकतील असे बॅट्समन आहेत. शेन वॉटसन, फॅफ डू प्लेसिस, स्वत: धोनी, अंबाती रायुडू अशी ताकद आहे. मुंबईकडे रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या अशी सशक्त फळी आहे.
फिल्डिंगच्या बाबतीतही दोन्ही संघ एक इंचही प्रतिस्पर्धी संघाला देत नाहीत. डॅडी आर्मी म्हणजे चेन्नईच्या संघाचं सरासरी वय 32 असलं तरी कोणालाही लपवावं लागत नाही. मुंबई तरुण तुर्कांची असल्याने ते रन्स रोखून, अफलातून कॅचेस टिपत, रनआऊट करत सतत दबाब आणतात.
दोन्ही संघ सहजासहजी हार मानत नाहीत. परिस्थिती बिकट झाली तरी झुंजत राहतात. शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत लढतात. त्यामुळे मुंबई-चेन्नईच्या अनेक मॅच शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलपर्यंत खेळल्या जातात.

फोटो स्रोत, Robert Cianflone
दोन्ही संघांचा फॅनबेस प्रचंड आहे. प्रत्यक्ष मैदानावर येऊन पाठिंबा देणारे खूपजण आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही संघांचे फॅनक्लब आहेत. स्पर्धा संपल्यानंतरही हे सगळे ग्रुप अक्टिव्ह असतात.
संघातल्या प्रत्येक खेळाडूविषयी त्यांना माहिती असते. या दोन्ही संघांदरम्यान मॅच झाल्यानंतर नाक्यावर, मित्रामित्रांच्या गाठीभेटीत, ट्रेनमध्ये, बसमध्ये चर्चा पाहायला मिळते. बाकी संघांच्या तुलनेत जिंकण्यातल्या सातत्यामुळे लोकप्रियता खूप आहे.
चेन्नई-मुंबई किती वेळा आमनेसामने
या दोन संघांमध्ये तब्बल 28 वेळा समोरासमोर आले असून मुंबईचं पारडं 17-11 असं जड आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत, प्लेऑफ्समध्ये, फायनलमध्ये सातत्याने हे दोन संघ एकमेकांना टक्कर देताना दिसतात.
चेन्नईची अडचण
तिसऱ्या क्रमांकावर येऊन बॅटिंग, उपयुक्त बॉलिंग आणि अफलातून फिल्डिंग असं सगळं करणारा सुरेश रैना वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. चेन्नईचा भरवशाचा माणूस एकही मॅच न खेळता माघारी परतल्याने त्यांना समीकरणं नव्याने आखावी लागली आहेत.
दुसरीकडे अनुभवी हरभजन सिंगनेही वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याने चेन्नईला डावपेचांमध्ये बदल करावे लागले. सगळे हंगाम खेळणाऱ्या रैना आणि हरभजनचा अनुभव चेन्नईसाठी नेहमीच फायदेशीर ठरला आहे.
रैना आणि हरभजनच्या जागी चेन्नईने कोणालाही समाविष्ट केलेलं नाही. ऋतुराज गायकवाड अजूनही कोरोनाच्या संसर्गातून बरा झालेला नाही. फास्ट बॉलर दीपक चहर कोरोनामुक्त झाला असून तो खेळण्यासाठी सज्ज आहे.

फोटो स्रोत, Robert Cianflone
मुंबईला काळजी
अडचणीच्या स्थितीत संघाला तारणारा लसिथ मलिंगा यंदा खेळू शकणार नाही. वैयक्तिक कारणांमुळे मलिंगा श्रीलंकेतच आहे. मलिंगाच्या अनुपस्थितीत मुंबईकडे नॅथन कोल्टिअर नील, मिचेल मक्लेघान, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन असे चांगले बॉलर आहेत. पण फसवे यॉर्कर आणि स्लोअरवन टाकणाऱ्या मलिंगाची अनुपस्थिती मुंबईला प्रकर्षाने जाणवेल.
युएईतली पिचेस फिरकी बॉलर्सना साथ देणारी आहेत. मुंबईकडे कृणाल पंड्या, राहुल चहर, जयंत यादव आणि अनुकूल रॉय अशी चौकडी आहे. परंतु जयंत आणि अनुकूल यांच्याकडे स्पर्धेत खेळण्याचा अनुभव कमी आहे.
संघ
चेन्नई- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डू प्लेसिस, इम्रान ताहीर, जगदीशन नारायण, करण शर्मा, केदार जाधव, लुंगी एन्गिडी, मिचेल सँटनर, मोनू सिंग, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दूल ठाकूर, सॅम करन, पीयुष चावला, जोश हेझलवूड, आर. साई किशोर.
मुंबई- रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरेन पोलार्ड, मिचेल मक्लेघान, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, शेरफन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन, नॅथन कोल्टिअर नील, सौरभ तिवारी, मोहसीन खान.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























