कोरोना लॉकडाऊन : का वाढलंय रिव्हेंज पॉर्नच्या तक्रारींचं प्रमाण ?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, क्रिस्टीना क्रिडल
- Role, टेक्नॉलॉजी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
बदला घेण्यासाठी पॉर्नचा वापर करण्याच्या म्हणजेच 'रिव्हेंज पॉर्न'च्या घटनांचं प्रमाण यावर्षी वाढलंय. लॉकडाऊन दरम्यान ही समस्या खूप वाढल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
ब्रिटन सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या हेल्पलाईनकडे याविषयीच्या सुमारे 2,050 तक्रारी आल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 22 टक्क्यांनी वाढलेली आहे.
लॉकडाऊनच्या अटी शिथील केल्यानंतरही या प्रकरणांची संख्या वाढतेय. लोक या सगळ्या प्रकाराकडे फारशा गांभीर्याने न पाहता ते स्वीकारत असून हे एक प्रकारे 'न्यू नॉर्मल' होत असल्याची भीती हेल्पलाईन चालवणाऱ्यांना वाटू लागलीय.
कौटुंबिक हिंसाचाराविषयी काम करणारी संस्था 'रेफ्यूज'ने याविषयी नुकतीच एक पाहणी केली. यानुसार दर 7 पैकी एका तरुणीला तिचे खासगी फोटो जगजाहीर करण्याची धमकी देण्यात आलेली आहे.
ब्रिटनमध्ये यावर्षी हेल्पलाईनवर 2019च्या तुलनेत रिव्हेंज पॉर्नच्या जास्त तक्रारी आलेल्या आहे. या एकूण तक्रारींपैकी दोन तृतीयांश तक्रारी या महिलांच्या आहेत.
लॉकडाऊनमुळे लोकांच्या अशा वागण्यात वाढ झाल्याचं हेल्पलाईन मॅनेजर सोफी मॉर्टिमर सांगतात. पीडितांची तक्रार आल्यानंतर यावर्षी आतापर्यंत 22,515 फोटोज काढून टाकण्यात आले आहेत. हे प्रमाण एकूण तक्रारींच्या 94 टक्के आहे.
'न्यू नॉर्मल'
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विविध समस्या निर्माण होत असल्याचं युके सेफर इंटरनेट सेंटरचे संचालक डेव्हिड राईट सांगतात. ते म्हणतात, "आम्ही जे पाहतोय त्याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. आमचं काम पूर्वीपेक्षा वाढणार आहे आणि हे येत्या काळात न्यू नॉर्मल असू शकतं, ही चिंतेची बाब आहे."

फोटो स्रोत, ISTOCK / BBC THREE
तर हिंसाचार करणाऱ्या जोडीदारासोबत राहाणं हे लॉकडाऊनच्या काळात आपल्यासाठी वाईट अनुभव ठरल्याचं 60 टक्के महिलांनी म्हटल्याचं 'विमेन्स एड' या कौटुंबिक हिंसाचाराविषयी काम करणाऱ्या संस्थेने म्हटलंय.
रिव्हेंज पॉर्न हे शोषणासाठीचं साधन झाल्याचं 'विमेन्स एड' संस्थेच्या कॅम्पेन आणि पॉलिसी मॅनेजर ल्युसी हॅडली सांगतात. "खासगी फोटो जाहीर करणं वा तसं करण्याची धमकी देणं ही पद्धत शोषणासाठी वापरली जाते. तरुणींना विशेषतः याचं लक्ष्य केलं जातं. रिव्हेंज पॉर्नद्वारे शोषण करण्याचा हा प्रकारही एक प्रकारचं लैंगिक शोषणंच आहे आणि त्याकडे गांभीर्याने पहायला हवं."
पीडितेला काय वाटतं?
फोलामी प्रेहाये 2014मध्ये रिव्हेंज पॉर्नला बली पडल्या. त्यांच्या पूर्वाश्रमीच्या जोडीदाराने त्यांचा फोटो इंटरनेटवर टाकला. आक्षेपार्ह फोटो जाहीर करणं आणि शोषण प्रकरणी त्याला 6 महिन्यांचा तुरुंगवास झाला.

फोटो स्रोत, Getty Images
प्रेहाये यांनी आता इंटरनेटवरच्या या गुन्हेगारीला बळी पडलेल्यांसाठी एक वेबसाईट सुरू केलीय. इथे इंटरनेटवरच्या अपराधांना बळी पडलेल्यांना मानसिक आधार दिला जातो.
त्या सांगतात, "लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली यात आश्चर्य नाही. या काळात अनेकांना ऑनलाईन नाती जोडण्यासाठी बळजबरी करण्यात आली. ही समस्या पूर्वीपासून होतीच. लॉकडाऊनमुळे ती अजून भीषण झाली आणि एखाद्याला लैंगिक शोषणाला बळी पाडणं जास्त सोपं झालं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























