Iowa caucuses: डोनाल्ड ट्रंप यांना आव्हान देणाऱ्या डेमोक्रॅट्सपैकी बर्नी सँडर्स आणि पीट बटिगिग आघाडीवर

फोटो स्रोत, Reuters/AFP
अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदासाठीच्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी निवडण्याची प्रक्रिया तांत्रिक गोंधळामुळे काही काळ लांबली.
पण अखेर आयोवामध्ये झालेल्या निवडणुकीचे आकडे हाती आल्यानंतर पीट बटिगिग आणि बर्नी सँडर्स आघाडीवर असल्याचं दिसत आहे. या कॉकसचे पूर्ण निकाल जाहीर झालेले नाहीत.
सोमवारी शाळा, लायब्ररीज आणि चर्चेसमधल्या 1,600 मतदान केंद्रांमध्ये मतदारांनी मतदान केलं. त्याचा निकाल लागलेला नसतानाही अनेक उमेदवारांनी आपणच जिंकल्याचा दावा केला होता.
पण नंतर मतमोजणीच्या तीन सेट्समध्ये सातत्य नसल्याचं अधिकाऱ्यांना आढळलं, असं आयोवा डेमोक्रॅटिक पार्टी (IDP)च्या प्रवक्त्या मँडी मॅक्लुअर यांनी सांगितलं. पण हे हँकिंग वा घुसखोरी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
निकाल जाहीर करण्यासाठी तयार केलेलं अॅप क्रॅश झाल्याच्या वृत्ताला त्यांनी नकार दिला होता.
त्यानंतर आता 71% प्रदेशातून आलेल्या आकेडवारीनुसार बटिगीग यांना 26.8% तर बर्नी सँडर्स यांना 25.2% मतं मिळाल्याचं आयोवाच्या डेमोक्रॅटिक पक्षाने म्हटलंय. एलिझाबेथ वॉरन 18.4 टक्के मतांसह सह तिसऱ्या क्रमांकावर असून जो बायडन यांना 15.4% मतं असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत.
कॉकस प्रक्रियेमध्ये एखाद्या उमेदवाराची निवडणूक करण्याआधी लोक एकत्र भेटतात. इथे हात उंचावून वा लोकांची गणना करून उमेदवाराविषयी ठरवलं जातं.
जसं न्यू हॅम्पशायरमध्ये होणाऱ्या प्रायमरी व्होटिंगमध्ये निवडणुकीत लोक मतदान केंद्रावर जाऊन मत देतात.
आयोवातली निवडणूक महत्त्वाची का?
2020च्या व्हाईट हाऊससाठीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांना आव्हान देण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार निवडण्यात येतोय.
आयोवातील लोकसंख्या ही बहुतांश श्वेतवर्णीय आहे आणि ग्रामीण भागांमध्ये तुरळकरित्या पसरलेली आहे. या राज्यातून एकूण 1991 डेलीगेट्सपैकी 41 जणांची निवड होते.
पण ही निवड महत्त्वाची असते. डेमोक्रॅटिक पक्षाचे अंतिम उमेदवार ठरलेल्यांपैकी गेल्या चार उमेदवारांनी या 'आयोवा कॉकस'मध्ये विजय मिळवला होता.
या स्पर्धेत सध्या सिनेटर सँडर्स आणि अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बायडेन आघाडीवर आहेत.
कॉकस म्हणजे काय? (Caucus)
आयोवासारख्या काही राज्यांमध्ये प्राथमिक निवडणुकांच्याऐवजी कॉकस (Caucus) पद्धत अवलंबली जाते. ही निवडणूक राजकीय पक्ष आयोजित करतात.
ही निवडणूक राज्य सरकारतर्फे होत नसल्याने राजकीय पक्षांना त्यासाठीचे नियम ठरवणं सोपं जातं. मतदान कोण करणार हे देखील राजकीय पक्ष ठरवतात.

फोटो स्रोत, Getty Images
डेमोक्रॅट्सच्या कॉकसमध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान होत नाही. पक्षाचे सदस्य एका ठिकाणी एकत्र येतात आणि उमेदवाराच्या नावावर चर्चा केली जाते. यानंतर तिथे उपस्थित असणारे लोक हात उंचावून उमेदवाराची निवड करतात.
कधी आहे निवडणूक?
3 नोव्हेंबर (मंगळवार) 2020ला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होईल.
मुख्य राजकीय पक्ष कोणते?
अमेरिकेत मुख्यतः दोनच मोठे राजकीय पक्ष आहेत - डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन.
डेमोक्रॅटिक पक्ष हा आधुनिक उदारमतवादी विचारसरणीचा आहे. राज्यांची स्वायत्तता, सार्वजनिक आरोग्यावर भर, स्वस्त शिक्षण, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संरक्षणासाठीची धोरणं आणि कामगार संघटनांवर डेमोक्रॅटिक पक्षाचा विश्वास आहे.
गेल्या निवडणुकीमध्ये या पक्षाच्या उमेदवार होत्या हिलरी क्लिंटन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
अमेरिकेतला आणखीन एक जुना राजकीय पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष. हा पक्ष एकप्रकारे पारंपरिक विचारसरणीचा आहे. सरकारचं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवणं, कर कमी करणं, मुक्त भांडवलशाहीला प्रोत्साहन, हत्यारं बाळगण्याचे अधिकार, कामगार संघटनांचं विघटन, गर्भपातासारख्या गोष्टींवर निर्बंध अशा स्वरूपाची या पक्षाची विचारसरणी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय अमेरिकेत लिबरटेरियन, ग्रीन आणि इतर स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत. अनेकदा हे पक्षही आपला उमेदवार निवडणुकीसाठी उभा करतात.
राष्ट्राध्यक्षपदासाठी दावा सांगणारे सध्यातरी देशभरामध्ये प्राथमिक निवडणुकांद्वारे (प्रायमरीज) आपल्या पक्षाचं नामांकन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या प्राथमिक निवडणुका अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पहिला टप्पा असतो. या प्रक्रियेविषयी अमेरिकेच्या घटनेमध्ये कोणतेही लिखित नियम वा सूचना नाहीत. ही प्रक्रिया त्या त्या पक्षावर आणि राज्यावर अवलंबून असते. या निवडणुका पक्षाकडून नाही, तर राज्य सरकारकडून घेतल्या जातात.
प्राथमिक निवडणुका या मर्यादित पद्धतीने पार पडतील की खुल्या हे त्या राज्याच्या कायद्यानुसार ठरवलं जातं.
मर्यादित स्वरूपातल्या निवडणुकीमध्ये फक्त पक्षाचे सदस्यच मतदान करू शकतात. तर खुल्या निवडणुकीत पक्षाशी संबंधित नसणारे लोकही मतदान करू शकतात. अशा प्रकारे निवडण्यात आलेले प्रतिनिधी कन्व्हेन्शनमध्ये उमेदवाराचं नामांकन करतात.

फोटो स्रोत, Getty Images
उमेदवाराने प्राथमिक निवडणूक जिंकल्यास हे प्रतिनिधी दुसऱ्या टप्प्यात कन्व्हेन्शनमध्ये उमेदवारांसाठी मतदान करतात. या टप्प्यातच राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार औपचारिकरित्या ठरवला जातो.
ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलची निवडणूक प्रक्रियादेखील काहीशी अमेरिकेसारखीच आहे. यामध्ये अनेक उमेदवारांमधून एक उमेदवार निवडला जातो.
सुपर ट्युस्डे म्हणजे काय?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक होताना 'सुपर ट्युस्डे'ला मतदान होतं.
राज्यांमध्ये या दिवशी प्राथमिक किंवा कॉकस पद्धतीने निवडणूक होते. यावर्षीचा सुपर ट्युस्डे 3 मार्च रोजी आहे.
निवडणूक प्रक्रिया कधीपर्यंत चालेल?
अमेरिकेतली प्राथमिक आणि कॉकस निवडणूक प्रक्रिया फेब्रुवारीत सुरू होईल आणि जूनपर्यंत चालेल.
निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक देशांमध्ये ठराविक कालावधी असतो. पण अमेरिकेमध्ये उमेदवार हवा तेवढा काळ प्रचार करू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटन आणि फ्रान्समध्येही अशीच पद्धत आहे. राष्ट्राध्यक्ष पदासाठीची प्रचार मोहीम सुमारे 18 महिने चालते.
डॉनल्ड ट्रंप यांना आव्हान कधी मिळणार?
राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीचा उमेदवार निवडण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचं राष्ट्रीय कन्व्हेन्शन 13 ते 16 जुलैदरम्यान होणार आहे.
रिपब्लिकन पक्षाचं राष्ट्रीय कन्व्हेन्शन 24 ते 27 ऑगस्टदरम्यान होईल.

फोटो स्रोत, Getty Images
या कन्व्हेन्शनमध्ये अधिकृतरित्या घोषणा होत नाही तोपर्यंत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार ठरणार नाहीत.
यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि उपाध्यक्ष माईक पेन्स हे डेमोक्रॅटिक पक्षाच्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांसोबत 4 'डिबेट्स' म्हणजे वादविवादात सहभागी होतील.
जिंकण्यासाठी किती मतं हवीत?
अमेरिकेमध्ये अध्यक्षांची निवड जनता थेट (पॉप्युलर वोट) करत नाही. ही निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे होते.
ज्या प्रकारे कॉकसद्वारे डेलिगेट्सची निवड होते, त्याचप्रकारे निवडणुकीसाठी इलेक्टर्स निवडले जातात.
याला 'इलेक्टोरल कॉलेज' म्हटलं जातं. इलेक्टोरल कॉलेज म्हणजे असा गट जो आधी अमेरिकन जनतेकडून निवडला जातो आणि मग या गटाकडून अध्यक्षांची निवड होते.
व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यासाठी 538 पैकी 270 मतांची गरज असते.
यामुळेच काही राज्यं उमेदवारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरतात. सगळ्यांत जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त 'इलेक्टोरल व्होट्स' असतात.
स्विंग, रेड आणि ब्लू स्टेट्स म्हणजे काय?
रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव असणाऱ्या दक्षिणेतल्या राज्यांना 'रेड स्टेट्स' (Red States) म्हटलं जातं.
डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रभाव असणाऱ्या राज्यांना 'ब्लू स्टेट्स' (Blue States) म्हटलं जातं.
ज्या राज्यातून विजयाची शक्यता अगदी कमी असेल त्या राज्यांमध्ये अनेकदा प्रचारादरम्यान उमेदवारांना पाठवलंच जात नाही आणि तिथल्या प्रचारावर खर्चही केला जात नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या राज्यांचा कोणताही ठराविक कल नाही, त्यांना 'स्विंग स्टेट्स' (Swing States) म्हणतात. ओहायो, फ्लोरिडा सारख्या राज्यांमधली निवडणूक म्हणूनच अतिशय रंजक होते.
अॅरिझोना, पेन्सेलवेनिया आणि विसकॉन्सिन ही राज्यं 2020 च्या निवडणुकीत 'स्विंग स्टेट्स' असतील असं मानलं जातंय.
मतदान कसं होतं?
हे देखील प्रत्येक राज्यावर अवलंबून असतं. अनेक राज्यांमध्ये आधीच मतदान होतं, ज्यानुसार नोंदणीकृत मतदारांना मतदानाच्या दिवसाच्या आधीच मतदान करता येतं.
ज्या मतदारांना आजारी असल्याने, अपंग असल्याने, राज्यातून बाहेर असल्यामुळे मतदान करणं शक्य नसतं, त्यांना पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठवता येऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
निवडणुकीच्या दिवशी मतदान करणाऱ्यांना ठरवण्यात आलेल्या दिवशी मतदान केंद्रावर जावं लागतं. इथे ऑनलाईन मतदान करता येत नाही.
प्रत्येक राज्यामध्ये तिथे झालेल्या मतदानाची गणना करण्यात येते आणि बहुतेकदा त्याच रात्री निकालही लागतो.
बहुमत मिळालं नाही तर?
जर कोणत्याही उमेदवाराला इलेक्टोरल वोटमध्ये बहुमत मिळालं नाही तर संसदेचं कनिष्ठ सभागृह असणारं 'हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज' आघाडीच्या तीन उमेदवारांमधून राष्ट्राध्यक्षाची निवड करतं.

फोटो स्रोत, Getty Images
उरलेल्या दोन उमेदवारांमधून उपाध्यक्षाची निवड सिनेटद्वारे केली जाते. फार कमी वेळा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. 1824 मध्ये असं झालं होतं.
निकाल जाहीर झाल्यानंतर...
निकाल आणि विजेता जाहीर झाल्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्षांना आपल्या कॅबिनेटचे सदस्य निवडण्यासाठी आणि नवीन योजनांच्या आखणीसाठी काही कालावधी दिला जातो.
नोव्हेंबर महिन्यात हे झाल्यानंतर जानेवारी महिन्यात नवीन राष्ट्राध्यक्ष शपथ घेतात. काँग्रेसमध्ये (अमेरिकी संसदेत) हा सोहळा झाल्यानंतर अध्यक्ष एका परेडने व्हाईट हाऊसला जातात आणि पुढच्या चार वर्षांचा त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू होतो.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























