हाँगकाँग: निदर्शकांवर पोलिसांचा पुन्हा गोळीबार, आंदोलकाने चीनच्या समर्थकाला पेटवलं

फोटो स्रोत, Reuters
हाँगकाँगमध्ये झालेल्या हिंसक निर्दशनांमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोमवारी सकाळी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारादरम्यान एक आंदोलक जखमी झाला. 24 आठवड्यांपूर्वी ही आंदोलनं सुरू झाल्यापासून पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची ही तिसरी घटना आहे.
दुसऱ्या एका घटनेत आंदोलकांसोबत वाद घालणाऱ्या एका बीजिंग समर्थकावर इंधन ओतून त्याला पेटवून देण्यात आलं.
दिवसभर आंदोलन सुरू पोलीस आणि आंदोलकांमध्ये अनेक झटापटी झाल्या. पोलिसांनी रबरच्या बुलेट्स आणि अश्रुधुराचा वापर केला. आठवड्याच्या कामाच्या दिवसामध्ये हाँगकाँगच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये अश्रुधुराचा वापर करण्यात आला. सहसा असं केलं जात नाही.
शुक्रवारी एका 22 वर्षांच्या आंदोलकाचा मृत्यू झाला. आठवडाभरापूर्वी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईदरम्यान अलेक्स चो कार पार्कवरून खाली कोसळला होता. तेव्हापासून तो हॉस्पिटलमध्ये होता.
नेमकं काय घडलं?
हाँगकाँगच्या ईशान्येकडील साय वान हो मध्ये आंदोलकांनी एक चौक अडवण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. एका अधिकाऱ्याने गोळी झाडली आणि त्यात एक माणूस जखमी झाल्याच्या बातमीला पोलिसांनी दुजोरा दिलाय.

फोटो स्रोत, Reuters
फेसबुकवर याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. यामध्ये एक पोलीस अधिकारी आपली बंदूक काढताना दिसतोय. त्याच्या समोरून मास्क घातलेला एक आंदोलक येतो, पोलीस त्यावर गोळीबार करतो. यामध्ये ही व्यक्ती जखमी होते. यानंतर या अधिकाऱ्याने आणखीन दोनदा गोळीबार केला पण त्यात कोणी जखमी झालं नाही.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा 21 वर्षांचा आंदोलक व्हिडिओत पाहायला मिळतो. या तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचं हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, EPA
आणखीन दोन जागी अधिकाऱ्यांनी बंदुका बाहेर काढल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
पोलिसांनी गोळीबार करण्याची ही तिसरी घटना आहे. 1 ऑक्टोबर रोजी चीनने कम्युनिस्ट अंमलाची 70 वर्षं साजरी केली तेव्हा झालेल्या निदर्शनांदरम्यान पहिल्यांदा गोळीबार करण्यात आला होता.

फोटो स्रोत, Reuters
त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी एका तरुण मुलाच्या पायावर गोळी झाडण्यात आली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























