'काऊ हग डे'संदर्भातील पशुकल्याण मंडळाचा अध्यादेश अखेर मागे #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -
1. 'काऊ हग डे'संदर्भातील पशुकल्याण मंडळाचा अध्यादेश अखेर मागे
14 फेब्रुवारी रोजी काऊ हग डे साजरा करण्याचं आवाहन केंद्रीय पशुकल्याण मंडळाने केलं होतं.
पण त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेचे सूर उमटू लागल्यानंतर मंडळाने हा अध्यादेश मागे घेतला आहे.
अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्यावतीने 14 फेब्रुवारी रोजी व्हेलेंटाइन डे ऐवजी काऊ हग डे साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. हा निर्णय हास्यास्पद असल्याचे अनेकांनी म्हटलं होतं.
तर, काहींनी या निर्णयावर तिरकस भाषेत टिप्पणी केली होती. गाईला मिठी मारण्यासाठी 14 फेब्रुवारीच का, इतर दिवस का नाही? असा प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला. इतकेच नव्हे तर यासंदर्भात अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अखेर, हा अध्यादेश पशु कल्याण मंडळाने मागे घेतला आहे. ही बातमी फायनान्शियल एक्सप्रेसने दिली.
2. मी तुमच्याच कुटुंबातील सदस्य, नरेंद्र मोदींची बोहरा समाजाला साद
मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही, तर तुमच्याच कुटुंबातील सदस्य आहे. माझे बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासून संबंध आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
बोहला समाजाच्या अल जामिया-तुस-सैफिया कॅम्पसचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (10 फेब्रुवारी) झालं. याप्रसंगी ते बोलत होते.

फोटो स्रोत, PMO
यावेळी मोदी म्हणाले, "माझी बोहरा समाजाकडे एक तक्रार आहे. कृपया तुम्ही त्यात सुधारणा करावी. तुम्ही मला वारंवार आदरणीय पंतप्रधान म्हणत आहात. पण मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहे. मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही. माझे बोहरा समाजाशी चार पीढ्यांपासून संबंध आहेत."
"विकासाच्या बाबतीत बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध केलं आहे. आज अल जामिया-तुस-सैफिया सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याच विकासाचे उदाहरण आहे. मला देशातच नाही, तर परदेशातही बोहरा बांधव भेटायला येतात. बोहरा समाज माझ्यासाठी खूप जवळचा आहे," असं मोदींनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.
3. देशात 11 राज्यात खनिजांचा मोठा साठा, लिथियम-सोन्याच्या खाणींचा शोध
देशातील 11 राज्यांत खनिजांचा मोठा साठा मिळाला आहे. या साठ्यात 100 टक्के आयात करावे लागणारे लिथियमचाही समावेश आहे. तसंच देशात सोन्याचाही साठा मिळाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने राज्य सरकार आणि कोळसा मंत्रालयाला ही माहिती दिली आहे. देशातील 51 ब्लॉकमध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजांचा साठा सापडला आहे. त्यात जम्मू आणि काश्मीरात सापडलेल्या लिथियमचा समावेश आहे.
जम्मू आणि काश्मीरसह आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्येही खनिजांचा मोठा साठा आढळून आला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
4. गेल्या 11 वर्षांत 16 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडलं
गेल्या 11 वर्षांत सुमारे 16 लाख नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडलं असून त्यांनी इतर देशांमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.
गुरुवारी राज्यसभेमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "2022 मध्ये म्हणजे, गेल्या वर्षी 2 लाख 26 हजार 620 इतक्या नागरिकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक मोठी संख्या आहे. या नागरिकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग का केला याचं कारण मात्र परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं नाही.
2011 पासून 16 लाखांहून अधिक भारतीयांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे की, 2015 मध्ये भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या 1,31,489 होती.
तर 2016 मध्ये 1,41,603 लोकांनी आपले नागरिकत्व सोडले. 2017 मध्ये ही संख्या 1,33,049 इतकी होती.
सन 2018 मध्ये ही संख्या 1,34,561 होती, तर 2019 मध्ये 1,44,017, 2020 मध्ये 85,256 आणि 2021 मध्ये 1,63,370 भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले होते. गेल्या वर्षी ही संख्या सर्वाधिक असून, 2,25,620 भारतीयांनी आपलं नागरिकत्व सोडलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.
5. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पुण्यात परवानगी नाकारली
नर्तिका गौतमी पाटील हिच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जागेचं ना हरकत प्रमाणपत्र आणि आणि ट्रॅफिक एनओसी नसल्याचं कारण सांगत पुण्यातील उत्तम नगर पोलिसांनी गौतमीला कार्यक्रम घ्यायला नकार दिला.
शिवणे येथील राजकीय नेते संजय धिवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गौतमी पाटील हिच्या हस्ते होणार होते. पण या कार्यक्रमाला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारल्याने आयोजकांचा आणि गौतमीच्या फॅन्सचा हिरमोड झाला.
शिवणे येथे शुक्रवारी (10 फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजता राजकीय नेते संजय धिवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गौतमी पाटील हजेरी लावणार होती. संजय धिवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गौतमी पाटील हिच्या हस्ते होणार होते.
या कार्यक्रमानंतर गौतमीच्या लावण्यांचा कार्यक्रम होणार होता. पण परवानगी नसल्याने ऐनवेळी गौतमीच्या कार्यक्रमाला उत्तम नगर पोलिसांनी परवानगी नाकारली. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























