You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाना पाटेकरांचा एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांना सवाल, 'टॅक्स भरूनही आमची चौकशी होते…'
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. टॅक्स भरुनही आमची चौकशी होते, तुमची का नाही? नाना पाटेकर यांचा शिंदे-फडणवीस यांना सवाल
"आम्ही टॅक्स भरत असूनही आमची चौकशी केली जाते, मग तुमची चौकशी का होत नाही? असा थेट सवाल नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात आयोजित महामुलाखत कार्यक्रमात पाटेकर यांनी वरील प्रश्न शिंदे-फडणवीस यांना विचारला.
"नगरसेवक निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोट्यधीश असतो. मला कळतं की हा भ्रष्ट आहे, पण तुमच्या का लक्षात येत नाही? त्याची चौकशी का होत नाही? 100 रुपये कमावल्यानंतर मी 30 रुपये टॅक्स आणि सोबत जीएसटीही भरतो. हे सगळं केल्यानंतरही आमच्या चौकश्या होतात, तुमच्या का होत नाहीत?" असा सवाल पाटेकर यांनी केला.
नाना पाटेकरांच्या या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, "भ्रष्टाचार ही फक्त राजकारणच नाही तर संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. ही संपवायची असेल तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील. भ्रष्टाचारासाठी जेलमध्ये जाऊन आलेले, अडकलेले लोक थम्पिंग मेजॉरिटीने जिंकून येतात."
"समाजामध्ये भ्रष्टाचाराबाबत कोणताही तिरस्कार तयार होत नाही. जोपर्यंत समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही, वाईटाला वाईट म्हणणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही," असं फडणवीस यांनी म्हटलं.
2. ढाल-तलवार ही मराठमोळी निशाणी - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिल्यानंतर त्यांच्या नव्या चिन्हावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे.
बाळासाहेबांच्या शिवसेनेला आयोगाकडून ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं असून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याचं स्वागत केलं आहे.
चिन्ह मिळाल्यानंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, "बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांची शिवसेना आहे. सूर्य या चिन्हाला आम्ही पहिली पसंती दिली होती. परंतु, निवडणूक आयोगाने आम्हाला ढाल-तलवार हे चिन्ह दिलं."
"निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालेलं ढाल-तलवार हे चिन्ह मराठमोळी निशाणी आहे," असंही शिंदे यांनी म्हटलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.
3. माझ्यावर टीका करण्याचं कंत्राट काँग्रेसने दुसऱ्याला दिलं - नरेंद्र मोदी
काँग्रेसने माझ्यावर टीका करण्याचं कंत्राट दुसऱ्याला दिलं आहे आणि काँग्रेस शांतपणे आपलं काम करत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षावर टीका केली आहे.
गुजरातमधील राजकोट येथे आयोजित एका सभेत मंगळवारी ते बोलत होते.
"मागील 20 वर्षांत गुजरातच्या विरोधता असलेल्यांनी राज्याची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी मला 'मौत का सौदागर' असं म्हणत टीकाही केली."
पण ते आता अचानक शांत झाले आहेत. त्यांनी गोंधळ घालणे आणि माझ्यावर टीका करण्याचं कंत्राट दुसऱ्यांना दिलं आहे. ते शांतपणे गावांमध्ये जात आहेत आणि लोकांना मत मागत आहेत, असं मोदी म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.
4. शिवसेना आणखी जोमाने वाढेल - शरद पवार
चिन्ह गेल्यामुळे शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही. उलट उद्धव ठाकरे आणखी भक्कम होतील. शिवसेना आणखी जोमाने वाढेल, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवल्याचं समोर आल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. पवार यांनी याविषयी बोलताना म्हटलं, "अशा प्रकारांनी शिवसेना संपेल असं कुणाला वाटत असल्यास ते चुकीचं आहे. चिन्ह गोठवलं म्हणून घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. मी स्वतः यामधून गेलेलो आहे." ही बातमी लोकमतने दिली.
5. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा मालिका विजय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने 7 विकेट राखून विजय मिळवला आहे.
या विजयामुळे भारताने ही मालिका 2 - 1 अशी जिंकली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 99 धावांपर्यंत मजल मारू शकला.
100 धावांचं माफक आव्हान घेऊन फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने हा पल्ला 19.1 षटकात फक्त तीन विकेटच्या मोबदल्यात पार केला.
भारताकडून शुभमन गिलने 49 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने नाबाद 28 धावा करत भारताचा विजय षटकार मारून साकार केला.
तत्पूर्वी, कुलदीप यादवच्या 4 षटकात 4 विकेटच्या बळावर भारताला दक्षिण आफ्रिकेला कमी धावांत रोखण्यात यश आलं.
या विजयामुळे भारताला या मालिकेत 2-1 असा विजय मिळाला. तसंच या विजयाबरोबरच का कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या विक्रमाशीही भारताने बरोबरी केली आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)