गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, पाठोपाठ वडिलांनीही सोडले प्राण

- Author, प्रवीण नलावडे,
- Role, बीबीसी मराठीसाठी, विरारहून.
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
नवरात्रोत्सवादरम्यान दांडिया खेळताना हृदयविकाराचा धक्का बसल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाने डोळ्यांदेखत प्राण सोडले, याचा धक्का बसून त्यापाठोपाठ त्या तरुणाच्या वडिलांचाही मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबईजवळच्या विरारमध्ये ही घटना घडली. या प्रकारामुळे येथील ग्लोबल सिटी परिसरातील एव्हरशाईन अव्हेन्यू सोसायटीत शोककळा पसरली आहे.
मनिष जैन असं या प्रकरणातील मृत तरूणाचं नाव असून नरपत जैन असं त्याच्या वडिलांचं नाव होतं.
35 वर्षीय मनिष जैन हा शनिवारी (1 ऑक्टोबर) आपल्या सोसायटीत बेधुंद होऊन गरबा खेळत होता.
रात्री साडेअकराच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटू लागलं. सुरुवातीला मनिषला फॅमिली डॉक्टरकडे नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मोठ्या रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार, मनिषला मोठ्या रुग्णालयात नेण्यात येत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रसंगी मनिषचे वडील नरपत जैन हेसुद्धा समोर होते.
आपल्या पोटच्या मुलाने आपल्यासमोर प्राण सोडल्याचा धक्का नरपत जैन पचवू शकले नाहीत. मनिषपाठोपाठ नरपत यांनाही हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचाही यामध्ये मृत्यू झाला.
तीन महिन्यांपूर्वी झाला होता मनिषचा विवाह
विरार येथील जैन कुटुंबीयांचा सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय आहे. मनिष आणि त्याचे वडील नरपत हे दोघे मिळून आपला व्यवसाय सांभाळत होते.
जैन कुटुंबीय पाच वर्षांपूर्वी भाईंदरवरून विरारला वास्तव्यासाठी आले होते. तर, केवळ तीनच महिन्यांपूर्वी मनिषचा विवाह झाला होता. त्याची पत्नी राखी ही गृहिणी आहे.
एव्हरशाईन अव्हेन्यू सोसायटीत जैन कुटुंबीय हे संस्थापक सदस्य होते. त्यामुळे येथील इतर रहिवाशांसोबत त्यांचे घरगुती स्वरुपाचे संबंध होते. त्यामुळे जैन पिता-पुत्राच्या अकस्मात मृत्यूचा धक्का सोसायटीतील इतर सदस्यांनाही बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनिषला त्याचे वडील, भाऊ आणि सोसायटील काही मित्रांनी रिक्षाने हॉस्पिटलला नेलं. पण हॉस्पिटलच्या दारातच तो कोसळला.

या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी (2 ऑक्टोबर) पिता-पुत्रांवर विरार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन आठवड्यांपूर्वीच मनिषच्या काकांचंही निधन झालं होतं. त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या जैन कुटुंबीयांवर आणखी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हार्ट अटॅक येतो कसा?
हार्ट अटॅकचं प्रमुख लक्षण म्हणजे- छातीत दुखणं. आपल्या चित्रपटांमध्ये हार्ट अॅटॅक म्हटलं की काही दृश्यं हमखास दाखवली जातात. छातीत दुखणारा माणूस हात हृदयाशी घेऊन पिळवटतो. वेदनेमुळे त्याच्या डोळ्यात भीती दिसते. दुखणं हाताबाहेर गेल्याने तो जमिनीवर पडतो. चित्रपटात दाखवलं जाणारं हे दृश्य प्रत्यक्षात नेहमीच तसं नसतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
दृदयाशी संबंधित गोष्ट म्हणजे छातीवर प्रचंड आघात झाल्यासारखं वाटणं असा समज आहे. असं बहुतांशी वेळेला होतंही पण दरवेळी असंच होईल असं नाही.

फोटो स्रोत, iStock
जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा होत नाही तेव्हा हार्ट अटॅक येतो. साधारणत: धमन्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला की हृदयाला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो. या कारणामुळे छातीत प्रचंड दुखतं. मात्र काही वेळेला छातीत दुखत नाही. त्याला सायलेंट हार्ट अॅटॅक म्हटलं जातं.
Healthdata.org या वेबसाईटनुसार जगभरातही हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. 2016 वर्षात विविध कारणांनी होणाऱ्या मृत्यूंचा अभ्यास करण्यात आला. यापैकी 53 टक्के लोकांनी हार्ट अॅटॅकमुळे जीव गमावला.

हार्ट अटॅकची लक्षणं?
- छातीत दुखतं, अस्वस्थ वाटतं
- छातीतून हात, जबडा, मान, पाठ, पोट याकडे जाणाऱ्या मार्गात दुखतं
- मन अस्वस्थ होतं
- चक्कर येते
- प्रचंड घाम येतो
- श्वास घेण्यात अडचण
- उलटीसारखं वाटतं
- खोकल्याची मोठी उबळ येते. जोराजोरात श्वास घ्यावा लागतो.
- महिला, ज्येष्ठ नागरिक आणि डायबेटिस असणाऱ्यांना छातीत प्रचंड दुखत नाही. मात्र तरीही तो हार्ट अॅटॅक असू शकतो.

अचानक हार्ट अटॅक येण्याची कारणं?
बीबीसीशी बोलताना बॉम्बे हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. लक्ष्मण खेराडे सांगतात, "बी-12 शरीरामध्ये कमी प्रमाणात असेल तर, रक्ताची गाठ तयार होते. रक्त घट्ट होण्याची शक्यता असते. ही गाठ हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यास हार्ट अटॅक येतो. असं झाल्यास कार्डिअॅक अरेस्टने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते."
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काहीवेळा अचानक तयार झालेली रक्ताची गाठ डोक्यात जाते. पण, यात रुग्णाला अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते.

फोटो स्रोत, Science Photo Library
"काही रुग्णांना त्यांना हृदयाचा आजार आहे याची माहिती नसतं. अशावेळी हृदयावर जास्त प्रेशर आल्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते, " असं डॉ. खेराडे पुढे सांगतात.
हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी काय करावं?
युवा वर्गाने आपल्या जीवनशैलीत थोडी शिस्त आणणं आवश्यक आहे असं डॉ. मनचंदा सांगतात. योगसाधना केल्यास हार्ट अॅटॅकचा धोका कमी होऊ शकतो. योग केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. मन एकाग्र होण्यास फायदा होतो, असंही डॉक्टर सांगतात.
हार्ट अटॅकपासून वाचायचं असेल तर ट्रान्स फॅट्सन दूर ठेवा
तरुण वयात येणाऱ्या हार्ट अॅटॅकपासून वाचण्यासाठी सरकारने काही पावलं उचलणं आवश्यक असल्याचं डॉ. मनचंदा सांगतात. जंक फूडवर सरकारने टॅक्स आकारायला हवा. तंबाखू आणि सिगरेटवर सरकारने कर बसवला आहे. तसंच जंक फूडच्या बाबतीत हवं. जंक फूडच्या पॅकेटवरही सिगारेटच्या पाकीटावर असतो तसा ठळक अक्षरात इशारा लिहायला हवा. हे केल्याने लगेच हार्ट अटॅकचं प्रमाण घटणार नाही पण जागरुकता वाढेल.
हार्ट अटॅकचा संबंध शरीरातल्या कोलेस्टेरॉलशी असतो असं सांगण्यात येतं. म्हणूनच खूप तेलकट पदार्थ खाणं टाळायला हवं. मात्र ही गोष्ट किती खरी आहे?
डॉ. मनचंदा यांच्या मते, कोलेस्टेरॉलपेक्षा ट्रान्स फॅटमुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढते. ट्रान्स फॅट चांगल्या कोलेस्टेरॉलला कमी करतात आणि वाईट कोलेस्टेरॉलला वाढवतात.
वनस्पती तूप हे ट्रान्स फॅटचे मुख्य स्रोत आहेत. म्हणून यापासून दूर राहायला हवं.
हार्ट अॅटॅक आल्यानंतर CPR का महत्त्वाचा आहे?
हार्ट अॅटॅक आलेल्या व्यक्तीचं हृदय अचानक बंद पडतं आणि तो व्यक्ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो. अशा व्यक्तीला योग्य वेळी CPR दिल्यास जीव वाचू शकतो.
वैद्यकीय भाषेत CPR ला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन म्हणतात.

फोटो स्रोत, Thinkstock
टीव्ही किंवा सोशल मीडियावर तुम्ही अनेक दृष्य पाहिली असतील. ज्यामध्ये हार्ट अटॅकमुळे अचानक बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर दोन्ही हातांच्या मदतीने लोक दबाव देतात. या प्रक्रियाला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन असं म्हटलं जातं.
हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात, हार्ट अटॅकचे 50 टक्के मृत्यू रुग्णालयात वेळेवर न पोहोचल्याने होतात. कार्डिअॅक अरेस्टमुळे रुग्णांचा मृत्यू होतो. कार्डिअॅक अरेस्ट आलेल्या रुग्णांसाठी CPR अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
डॉ. महाजन पुढे सांगतात, "कार्डिअॅक अरेस्ट आलेल्या रुग्णाला CPR वेळेत दिला गेला. तर, लोकांचे प्राण वाचवणं शक्य आहे. रुग्णाला रुग्णालयात हलवताना CPR देण्यात आला पाहिजे."
मेंदू आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना CPR दिल्यामुळे रक्तप्रवाह सुरू रहातो.
'गोल्डन अवर' लक्षात ठेवा
मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागात रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध असतात. पण, दुर्गम आणि ग्रामीण भागात ही परिस्थिती नसते. ग्रामीण भागात अनेकवेळा रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो.
डॉ. विपीन खडसे जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सर्जरी विभागात शिक्षण घेत आहेत. पण, आदिवासी दुर्गम मेळघाटात हार्ट अटॅक आलेल्या एका रुग्णाचा 'गोल्डन अवर'मध्ये रुग्णालयात आल्यामुळे जीव कसा वाचला याची ते माहिती देतात.
ते म्हणाले, "मेळघाटात वैद्यकीय सेवा देत असताना एका 70 वर्षाच्या रुग्णाला त्याचे नातेवाईक 60 किलोमीटर लांबून मोटर सायकलवरून रुग्णालयात घेऊन आले. रुग्णाला हार्ट अॅटॅक आला होता. पण, वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने त्याचा जीव वाचवता आला."
या रुग्णाच्या नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ न घालवता तात्काळ रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णाचा जीव वाचला.
डॉ. विपीन यांनी पुढे सांगितलं, "बऱ्याचवेळा ग्रामीण भागातील लोक सुविधा नसल्याने रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत. रुग्णांना घरीच ठेऊन उपचार करतात. रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचला नसता, तर त्याच्या जीवावर बेतलं असतं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























