महिला पोलिसाला चिरडण्याचा वकिलाचा प्रयत्न, काय आहे नेमकं प्रकरण?

फोटो स्रोत, Social media
नालासोपाऱ्यात एका वकिलाने वाहतूक महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा एक व्हीडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ब्रजेश भेलोरिया असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दोघांनाही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "ब्रजेश भेलोरिया यांची दुचाकी काही दिवसांपूर्वी नो पार्किंग झोनमध्ये असल्याचं वाहतूक पोलिसांना आढळून आलं होतं. पोलिसांनी कारवाई करत ही दुचाकी जप्त केली. यानंतर भेलोरिया यांच्या दुचाकीची रवानगी वाहतूक शाखेच्या गोडाऊनमध्ये करण्यात आली होती."
सोमवारी (26 सप्टेंबर) ब्रजेश आणि त्यांची पत्नी हे गोडाऊनमध्ये दुचाकी घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिला पोलीस कर्मचारी प्रज्ञा दळवी यांनी गाडी अडवून दंड भरण्यास सांगितलं.
पण, ब्रजेश यांनी दळवी यांनाही न जुमानता त्यांच्या अंगावर गाडी चढवली. या प्रसंगादरम्यान दळवी खाली पडल्या. त्यांच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ब्रजेशवर यांच्यावर यापूर्वीही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रजेश भेलोरिया आणि त्यांच्या पत्नीवर कलम 307, 353 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
वसई न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांसोबत वादाच्या वाढत्या घटना
वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकांचे वाद होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढल्याचं दिसून आलं आहे.
काही प्रसंगांमध्ये पोलिसांकडून वाहनचालकांना त्रास देण्यात येत असल्याचे आरोप केले जातात. तर काही प्रकरणांमध्ये पोलीस हेच पीडित ठरल्याचंही दिसून आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याच वर्षी जुलै महिन्यात नो पार्किंगच्या जागेत दुचाकी लावल्याने वाहतूक शाखेच्या क्रेनने दुचाकीस्वारासह दुचाकी उचलल्याचा प्रकार समोर आला होता.
तर, इतर काही घटनांमध्ये नियमांनुसार कारवाई करणाऱ्या पोलिसांना अडवून काही वाहनचालकांनी हुज्जत घालण्याचे आणि शिवीगाळ करण्याचे प्रकारही अनेकवेळा समोर आले आहेत.
विशेषतः सोशल मीडियाच्या आगमनानंतर असे प्रकार वारंवार समोर येत आहेत. शिवाय, संबंधित घटनांचे व्हीडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात.
'हुज्जत घालणं टाळावं'
वारंवार उद्भवणारे असे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याविषयी बीबीसीने पुण्याचे माजी पोलीस उपायुक्त आणि वाशिमचे विद्यमान पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्याशी चर्चा केली.
ते म्हणतात, "वाहतूक पोलिसांशी होणारे वाद आणि त्यानंतर संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाहनचालकांनी त्यांच्याशी हुज्जत घालणं सर्वप्रथम टाळलं पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
बच्चन सिंग यांच्या मते, "नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास कोणताही वाद निर्माण होणार नाही. पोलिसांकडे वाहतूक नियमनाची जबाबदारी असते. ते आपया अधिकारांचा वापर करून नियमानुसारच कार्यवाही करतात. परंतु, आपण केलं ते योग्यच आहे, असं म्हणत काही नागरीक आक्रमकपणे वाहतूक पोलिसांविरोधात वाद करतात. पण खरंच त्यांची बाजू योग्य असेल, तर वाद करण्यात काहीच अर्थ नाही. संबंधित वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ते याबाबत तक्रार करू शकतात. त्यामुळे हुज्जत न घालता शांतपणे आपलं म्हणणं मांडणं अशा वेळी गरजेचं आहे."
पोलिसांच्या गणवेशावर कॅमेरा लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे, याबाबतही सिंग यांनी माहिती दिली.
"तसंच आजकाल शहरांमध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी असते. आपली बाजू योग्य की अयोग्य हे सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग होऊ शकते. अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठीच वाहतूक पोलिसांच्या शर्टवर, तसंच त्यांच्या वाहनांवर कॅमेरा लावण्याचा उपक्रम महाराष्ट्रात सुरू झाला आहे. या सगळ्यांचा उपयोग अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठी तर होईलच, शिवाय एखाद्या गुन्ह्याच्या तपासातही या कॅमेऱ्यांचा उपयोग होऊ शकेल," असंही बच्चन सिंग यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























