धावत्या ट्रेनमध्येच प्रसुतीकळा... बाळाचा रेल्वेतच असा झाला जन्म

बाळंतपण रेल्वेत
    • Author, लोक्कोजू श्रीनिवास
    • Role, बीबीसीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

या महिन्याच्या 13 तारखेची गोष्ट, तेलंगणच्या सिकंदराबाद रेल्वे स्टेशनमधून सुटलेली दुरांतो एक्स्प्रेस विशाखापट्टणमकडे वेगानं निघाली होती. रात्री 3.30 च्या दरम्यान आंध्रप्रदेशातील राजमुंद्री रेल्वे स्टेशन मागे पडलं होतं.

अशातच ट्रेनमध्ये असलेली सत्यावती नावाची गर्भवती महिला प्रसूती वेदनेने विव्हळत होती. तिला मणक्याच दुखणं असल्याने त्या प्रसुतीच्या वेदना आहेत हे तिच्या नवऱ्याला समजलंच नव्हतं.

सत्यवती गरोदर होती आणि तिला आठवा महिना सुरू होता. बाळंतपणासाठी ती तिच्या गावी म्हणजेच आंध्रप्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील चेपुरापल्ली इथं जात होती. तिच्यासोबत तिचे पती होते. पण चालत्या ट्रेन मध्येच तिची डिलिव्हरी झाली.

गीतम मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी स्वाती रेड्डी सुद्धा याच ट्रेनमधून प्रवास करत होत्या. नेमकं त्यादिवशी काय घडलं हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने स्वातीशी संपर्क साधला.

स्वाती रेड्डी म्हणाल्या, 13 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजायच्या सुमारास मी विजयवाडा रेल्वे स्टेशनवरून दुरांतो एक्स्प्रेस पकडली.

ट्रेनमध्ये चढल्यावर आराम करावा म्हणत मी झोपी गेले. पण पहाटे 3.30 च्या दरम्यान ट्रेनमध्ये गोंधळ सुरू झाला. ट्रेनमध्ये असलेल्या एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या होत्या. पण त्या नेमक्या प्रसूतीकळा आहेत की पाठदुखी हे तिच्या पतीला समजलंच नाही.

बाळंतपण रेल्वेत

पुढच्या दीड तासात तर परिस्थिती आणखीच गंभीर झाली. सत्यवतीचे पती सत्यनारायण ट्रेन मधल्या इतर महिलांना मदत मागू लागले. त्यांनी मलाही झोपेतून उठवत माझ्याजवळही मदत मागितली. तोपर्यंत तरी तिथल्या कोणालाच माहीत नव्हतं की मी वैद्यकीय विद्यार्थिनी आहे.

काही मदत करता येते का या उद्देशाने मी सत्यवतीजवळ गेले. तिच्या जवळ गेल्यावर मला खात्री झाली की तिला प्रसूतीवेदनेमुळे पाठदुखीचा त्रास सुरू झालाय. एव्हाना बाळाचं अर्ध डोकंही बाहेर आलं होतं. ट्रेन थांबवावी तर ट्रेनने राजमुंद्री रेल्वे स्टेशनसुद्धा ओलांडलं होतं.

'बाळाच्या आईने आधी माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता..'

सत्यनारायणला सुद्धा लक्षात आलं की आपली पत्नी प्रसूतीवेदनांमुळे विव्हळते आहे. बाळाचं अर्ध डोकं बाहेर आलं असलं तरी बाकीचं शरीर अजूनही बाहेर आलं नव्हतं. बाळाचं शरीर बाहेर यावं म्हणून सत्यावती जोर लावत होती. मात्र तिच्या पाठदुखीमुळे तिला जोर लावणं जमत नव्हतं.

मी तिला आधार द्यायला सुरुवात केली. तसेच बाळ पूर्णतः बाहेर यावं यासाठी पुश करायला सुरुवात केली. पण यासाठी तिने आणि गाडीतल्या इतरांनीही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. कारण नंतर गोष्टी बिघडल्या असत्या. त्यामुळे मी सत्यवतीसह इतरांना विश्वासात घेण्यासाठी सांगितलं की मी वैद्यकीय विद्यार्थिनी आहे.

बाळंतपण रेल्वेत

आपल्या पत्नीची परिस्थिती बघून सत्यनारायण रडवेल्या अवस्थेत 'काहीतरी करा आणि माझ्या पत्नीला वाचवा' अशी विनवणी करत होते.

मी तिला पुश करण्यात मदत करायला सुरुवात केली. पण मला ही घाम फुटला होता. बऱ्याचदा नॉर्मल डिलिव्हरी दरम्यान बाळाचं डोकं आतच अडकतं. पण इथं बाळाचं डोकं बाहेर आल्याने थोडं पुश केलं तर बाळ बाहेर यायला मदत होईल अशी अवस्था होती. पण बाळ आतमध्ये अडकल्याने ते जिवंत आहे की नाही याबाबत शंका निर्माण झाली.

सत्यवतीचं सांत्वन करत मी माझं काम करत होते. ती मात्र सातत्याने माझ्याकडे बघत होती. तिच्या बघण्याने मी घाबरले होते. पण का? माझ्याकडून काही चुकलं तर? कारण मी अजून डॉक्टर झाले नव्हते. मी अजूनही एक विद्यार्थिनी होते. बाळाची नाळ कापायला माझ्याकडे सर्जिकल सीझर नव्हती. ही परिस्थिती मेडिकल इमर्जन्सी मध्ये बदलली तर? लोकांनी मला दोष दिला तर? जर अशी परिस्थिती ओढवलीच तर सत्यवती कशी रिऍक्ट करेल?

हे सगळे विचार पहिल्या काही मिनिटांतच माझ्या मनात यायला लागले. पण तरीही मी मदत करण्याचा निर्धार केला आणि सत्यावतीला पुश करायला मदत करू लागले.

बाळंतपण रेल्वेत

पण आता दुसरी एक अडचण निर्माण झाली होती. ती म्हणजे पाऊस आणि ट्रेनमध्ये सुरू असलेला एसी.

पाच मिनिटांनी आम्हाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे ट्रेनमधील सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तेव्हा सकाळचे 5 वाजून 35 मिनिटं झाले होते. ट्रेन आंध्रप्रदेशातील अनकापल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती. माझ्याकडे सर्जिकल साहित्य नसल्याने मी बाळाची नाळ कापून ती कापडात गुंडाळली.

आम्ही 3 एसी कंपार्टमेंट मधून प्रवास करत होतो. जेव्हा बाळ जन्माला येत तेव्हा त्याला उबदार ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं. नाहीतर बाळाचा रंग बदलतो आणि त्याला आरोग्याच्या इतर समस्यांही सामोरं जावं लागतं. पण आम्ही तर एसी डब्यात होतो, उबदार वातावरण कुठून आणणार. त्यात भरीस भर म्हणून सलग तीन दिवस पाऊस सुरू होता, त्यामध्ये बाहेरचं वातावरण ही थंड होतं.

आता आहे त्या परिस्थितीचा सामना करायचं ठरवलं. आम्ही ट्रेनच्या अटेंडंट्सकडून बेडशीट मागितल्या आणि त्याने बाळाला गुंडाळलं. दरम्यान काही प्रवाशांनी अनकापल्ली रेल्वे स्टेशनशी संपर्क साधून ट्रेन थांबवण्याची विनंती केली. दुरांतो ट्रेन अनकापल्ली स्टेशनवर थांबत नाही. राजमुंद्री नंतर पुढचा मुक्काम थेट विशाखापट्टणम इथं असतो. मात्र अनकापल्लीच्या टीटीईने गाडी थांबवण्यासाठी केलेली विनंती ऐकली. आणि स्टेशनवर एक अॅम्ब्युलन्सही बोलावली.

बाळंतपण रेल्वेत

बाहेर धो धो पाऊस सुरू असल्याने आम्ही बाळ आणि आईला अॅम्ब्युलन्सपर्यंत जाता यावं यासाठी रेनकोट आणि बेडशीट दिले. त्यानंतर अॅम्ब्युलन्स थेट एनटीआर या सरकारी रुग्णालयात नेण्यात आली. माझा स्टॉप विशाखापट्टणम होता पण मी अनकापल्ली इथंच उतरायचं ठरवलं. मी बाळ आणि त्याच्या आईसोबत हॉस्पिटलमध्ये गेले.

हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आईला स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांकडे नेण्यात आलं. बाळाचं वजन, नाडी, आणि हृदयाचे ठोके तपासण्यात आले. सर्वकाही नॉर्मल आहे याची खात्री झाल्यावर मी बाळाला त्याच्या वडिलांकडे सोपवलं आणि विशाखापट्टणला जाण्यासाठी निघाले, तेव्हा सकाळचे 7 वाजले होते.

'मला परवानगी नव्हती. मात्र तरीही मी प्रयत्न केला'

मी विद्यार्थिनी असल्यामुळे एखादा वैद्यकीय सल्ला देण्याचा किंवा एखादी वैद्यकीय मदत पुरवण्याचा मला अधिकार नाहीये. पण तरीही मी मेडिकलची विद्यार्थिनी आहे असं सांगून सत्यवतीला ट्रेनमध्ये मदत केली. मी जर मदत केली नसती तर परिस्थिती गंभीर झाली असती आणि दोन्ही जीव धोक्यात आले असते.

मागच्या दीड महिन्यात मी गीतम मेडिकल कॉलेजमध्य स्त्रीरोग विभागात हाऊस सर्जन म्हणून प्रशिक्षण घेत होते. या प्रशिक्षणाची मदत मला यावेळी झाली. बऱ्याचदा मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी किंवा सी सेक्शनसाठी डॉक्टरांची असिस्टंट म्हणून काम करायचे. या अनुभवाचा फायदा झाला.

बाळंतपण रेल्वेत

बऱ्याचदा घडतं असं की, आपल्याला मदत तर करायची असते पण चुकून काही झालं तर मात्र अवघड प्रसंग ओढावू शकतो. त्यामुळे बरेच जण मदत करायला संकोच करतात. पण मला असं वाटतं की हा संकोच करू नये. जर काही चुकीचं घडलं तर आमच्या संपूर्ण करिअरसाठी हा मोठा टॉस असतो. पण आपण चांगलं करण्याच्या उद्देशाने पुढं जायला हवं. फक्त बेजबाबदारपणा टाळला पाहिजे.

'डिलिव्हरी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण, कधी कधी...'

स्वाती रेड्डीने जे काम केलं त्याबद्दल गीतम कॉलेजचे व्यवस्थापन, रेल्वे विभाग, मित्रमंडळी आणि डॉक्टरांनी तीच अभिनंदन केलं. विशाखापट्टणम येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तनुजा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणतात की, डिलिव्हरी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण प्रवासात डिलिव्हरी दरम्यान गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी स्वातीने योग्यरित्या परिस्थिती हाताळली. विशेष म्हणजे बाळाला आणि आईला दवाखान्यात नेईपर्यंत ती त्यांच्यासोबत राहिली. उपचारापेक्षाही महत्वाचं काय असेल तर ते आत्मविश्वास देणं आणि स्वातीने ते केलं. मेडिकलचे विद्यार्थी अशा आपत्कालीन परिस्थिती प्रथमोपचार करू शकतात."

बाळंतपण रेल्वेत

या घटनेवर अनकापल्ली रेल्वे स्टेशनचे टीटीई व्यंकटेश्वर राव म्हणतात, "एका महिलेची ट्रेनमध्येच डिलिव्हरी झालीय अशा आशयाचा मला एक फोन आला. त्यामुळे ट्रेन जवळच्या स्टेशनवर थांबावी म्हणून मी प्रयत्न केला. यासाठी अनकापल्ली स्टेशनची निवड करण्यात आली. तसेच त्यांच्यासाठी अॅम्ब्युलन्सची सोय केली. जेव्हा केव्हा अशी आपत्कालीन परिस्थितीत उद्भवते, जसं की एखाद्याला हार्ट अटॅक येतो, कोणी ट्रेन खाली पडतो तेव्हा उपचारासाठी ट्रेन थांबवली जाते."

यावर सत्यवतीचे पती सत्यनारायण सांगतात, "माझ्या पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर मी सगळ्यांकडे मदत मागायला सुरुवात केली. सर्वजण मदत करायला तयार होते पण नेमकं करायचं काय हे कोणालाच माहीत नव्हतं. शेवटी स्वातीने धाडस दाखवलं आणि ती मदत करायला तयार झाली. डिलिव्हरीवेळी ट्रेनमधील इतर प्रवाशांनीही मदत केली."

"ट्रेनमध्ये डिलिव्हरी होईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. पण स्वातीमुळे आमचं बाळ वाचलं. तिने आम्हाला ट्रेनमध्ये मदत केली होती. त्यानंतरही आजही ती आम्हाला कॉल करून बाळाच्या तब्येतीची चौकशी करते. आमचं बाळ वाचवल्याबद्दल आम्ही तिच्या ऋणात राहू. आम्ही कोण आहोत, कुठले आहोत याची माहिती नसतानाही तिने आम्हाला मदत केली. तिने केलेली मदत आम्हाला कधीच विसरता येणार नाही." असं म्हणत सत्यावती आणि सत्यनारायण या दोघांनीही कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)