याकूब मेमन: कब्रस्तानमध्ये मृतदेह दफन करण्याचे नियम काय आहेत?

फोटो स्रोत, UGC
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनच्या कबरीवरुन वाद निर्माण झालाय.
याकूब मेमनला दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं आहे.
याकूब मेमनच्या कबरीच्या बाजूला संगमरवर आणि फरशीने कठडा बांधण्यात आलाय.
या मुद्यावरून भाजपने याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण झाल्याचा आरोप केलाय. तर, बड़ा कब्रस्तान अध्यक्ष शोहेब खतीब यांनी हा आरोप फेटाळून लावला.
"याकूब देशद्रोही होता. त्याच्याबाबत कोणतीही सहानुभूती नाही. याठिकाणी कोणतीही मजार बनवण्यात आलेली नाही," असं शोहेब खतीब यांनी म्हटलंय.
कब्रस्तानमध्ये मृतदेह दफन करण्याचे नियम काय आहेत? कबरीच्या बाजूला कठडा बांधता येतो का? हे आम्ही मुस्लिम समाजाच्या जाणकारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
याकूबच्या कबरीचा वाद काय?
सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम केल्यानंतर याकूब मेमनला 2015 मध्ये फाशी देण्यात आली. त्यानंतर याकूबचा मृतदेह कुटुंबीयांना सूपूर्द करण्यात आला.
गुरूवारी याकूबच्या कबरीवरून वाद सुरू झाला. कबरीभोवती फरशी आणि संगमरवराने कठडा बांधण्यात आल्याचे फोटो व्हायरल झाले. तर दिव्यांची रोषणाई करण्यात आल्याचे फोटोही पुढे आले.
हे फोटो ट्विट करत भाजप नेत्यांनी याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण झाल्याचा आरोप केला.
भाजप आमदार राम कदम यांनी याकूबच्या कबरीप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली.
हे आरोप फेटाळून लावताना शिवसेना प्रवक्ते अरविंद सावंत म्हणाले, उद्दव ठाकरेंचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने याकूबचा मृतदेह कुटुंबीयांना का सुपूर्द केला? असा सवाल त्यांनी भाजप नेत्यांना विचारला.
दरम्यान, याकूबच्या कबरीवरून वाद सुरू झाल्यानंतर पोलीस बड़ा कब्रस्तानमध्ये पोहोचले. दिव्यांची रोषणाई काढून टाकण्यात आलीये. पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
वक्फ बोर्ड आणि मुंबई महापालिकेकडून याबाबतची कागदपत्र मागवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.
बड़ा कब्रस्तानचे ट्रस्टी काय म्हणाले?
दक्षिण मुंबईतील बड़ा कब्रस्तानमध्ये याकूब मेमनला दफन करण्यात आलं. बड़ा कब्रस्तानचे अध्यक्ष शोहेब खतीब यांनी याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण झाल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

फोटो स्रोत, UGC
शोहेब खतीब म्हणाले, "याकूबला ज्या ठिकाणी दफन करण्यात आलंय. त्याठिकाणी कोणतीही मजार बांधण्यात आलेली नाही. कबरीभोवतीची माती पडत असल्याने बाजूने पक्कं बांधकाम करण्यात आलं आहे." "या ठिकाणी मेमन कुटुंबातील इतर काही लोकांची कबर आहे. फक्त याकूबची आहे असं नाही."
दक्षिण मुंबईतील बड़ा कब्रस्तान मुस्लीम धर्मियांचं मोठं कब्रस्तान आहे. या कब्रिस्तानात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि गॅंगवॉरशी संबंधित अनेक लोकांच्या कबरी आहेत.
शोहेब खतीब पुढे म्हणाले, "शब्बे बारातच्या वेळी ठिकाणी लायटिंग करण्यात आली होती. कोव्हिडनंतर पहिल्यांदाच सर्व कब्रस्तानात ही सुविधा देण्यात आली होती."
याकूब मेमनला बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशी देण्यात आली होती. मग त्याच्या कबरीच्या बाजूला कठडा का बांधण्यात आला? यावर शोहेब खतीब म्हणाले, "याकूब देशद्रोही होता. त्यामुळे आम्हाला त्याच्यासोबत कोणतीही सहानुभूती नाही."
कब्रस्तानमध्ये मृतदेह दफन करण्याचे नियम काय?
कब्रस्तानमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी एक मोकळी जागा असते. ही जागा सर्वसामान्यांसाठी असते.
याठिकाणी कोणीही व्यक्ती त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृतदेह दफन करू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
तर, काही कब्रस्तानात एकाच कुटुंबातील व्यक्तींना विशिष्ठ जागेत दफन केलं जातं. मुंबई पोलिसांचे निवृत्त अधिकारी समशेर पठाण सांगतात, "एकाच कुटुंबातील लोकांचे मृतदेह एकत्र ज्याठिकाणी पुरले जातात त्या जागेला ओटा असं म्हणतात.' ही जागा त्या कुटुंबाला पूर्वापारपासून भाडेतत्वावर देण्यात आलेली असते.
"एखाद्या कुटुंबाकडे अशी जागा भाडेतत्वावर असेल तर त्या कुटुंबाकडून या जागेवर पक्कं बांधकाम केलं जातं. या बांधकामाला अवैध म्हणता येणार नाही," समशेर पठाण पुढे म्हणाले.
पण 1984 नंतर काही कब्रस्तानात ओटा पद्धत बंद करण्यात आली होती. जामा मस्जिद ऑफ बॉम्बे ट्रस्टने असा बोर्ड कब्रिस्तानबाहेर लावला आहे.
यावर लिहिण्यात आलंय, "लोकसंख्या वाढल्याने आणि मृतदेह दफन करण्यासाठी जागा पुरेशी नसल्यामुळे जामा 1984 पासून ओटा पद्धत बंद केली आहे." लोकांनी ओटा मिळेल या हेतूने पैसे दिल्यास ट्रस्ट जबाबदार रहाणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
इस्लामच्या मूळ शिकवणीप्रमाणे प्रत्येक कब्रस्तान समान पातळीवर मानण्यात येतं. उर्दु साहित्याचे अभ्यासक अबिद खान म्हणतात, कबर पक्की नसून साधी असावी असं इस्लाम सांगतो. मग याकूबच्या कबरीबाजूला कठडा बांधणं योग्य आहे?
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे विचारवंत शम्सुद्दीन तांबोळी म्हणाले, "कबरीभोवती कठडा बांधण्याला इस्लामचा मूळ विरोध आहे."
जाणकारांच्या मते, भारतातील सूफी पंथातील संतांबाबत लोकांमध्ये आदर होता. त्यामुळे या संतांच्या कबरीबाजूला कठडा बांधणं सुरू झालं. शमसुद्दीन तांबोळी पुढे म्हणाले, "काही श्रीमंत लोक आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी व्यक्तिगत पातळीवर असे कठडे बांधतात. याला कोणताही धार्मिक आधार नाही. आपल्या व्यक्तीसाठी काहीतरी केलं अशी यामागे भावना असते."
कब्रस्तानमध्ये कबरीभोवती कठडा बांधणं अवैध आहे ? शम्सुद्दीन तांबोळी पुढे सांगतात, "कठडा बांधणं अवैध नाही. पण याला काही धार्मिक आधार नाही."
ते पुढे सांगतात, "शब्बेबारातच्या दिवशी कब्रस्तानमध्ये लायटिंग करण्यात आलं असेल. जेणेकरून लोकांना फायदा होईल. त्यामुळे हे याकूबच्या उदात्तिकरणासाठी असं करण्यात आलं असावं असं मानण्याचं कारण नाही."
"मुस्लीम सत्यशोधक मंडळ याकूबच्या कबरीभोवती बांधलेल्या कठड्याचं समर्थन करणार नाही." अशा मुद्द्यांचा राजकारणासाठी वापर करण्यात येतो असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
अहमदनगरचे पत्रकार आणि उर्दू साहित्याचे अभ्यासक अबिद खान म्हणाले, "काही कब्रस्तानात पक्की कबर बांधता येणार नाही, सुशोभीकरण करता येणार नाही असे बोर्ड लावण्यात येतात. तर काही ठिकाणी हे बोर्ड नाहीत." अशा ठिकाणी लोक बांधकाम करतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























