भाजप नेत्या सीमा पात्रांवर मुलाचाच आरोप, 'माझी आई मोलकरणीला तोंडानेच मलमूत्र स्वच्छ करायला लावायची'

फोटो स्रोत, Facebook
- Author, आनंद दत्त
- Role, बीबीसी हिंदीसाठी, रांचीहून
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
आदिवासी युवती सुनीता खाखा छळवणूक खटल्यात भाजप नेता सीमा पात्रा यांना अटक करण्यात आली आहे. रांची पोलिसांनी बुधवार 31 ऑगस्टला त्यांना अशोक नगर येथील घरातून अटक केली.
सुनीता खाखा या आदिवासी नोकराणीवर आठ वर्षं अनन्वित अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
सीमा पात्रा यांना कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी त्यांना 14 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मी निर्दोष असल्याचं सीमा पात्रा म्हणाल्या.
त्यांच्यावर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या 323, 325,346 आणि 374 या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आम्ही त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी राँग नंबर असल्याचं सांगत फोन कट केला.
सीमा पात्रा निवृत्त सनदी अधिकारी महेश्वर पात्रा यांची पत्नी आहे. त्यांच्या घरून 22 ऑगस्टला एका आदिवासी युवतीला जिल्हा प्रशासनाने सोडवलं होतं.
आनंद बास्के नावाच्या एका व्यक्तीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली होती. आनंद हे सीमा पात्रा यांच्या मुलाचे मित्र आहेत.
हे प्रकरण समोर कसं आलं?
आयुष्मान यांनी आपल्या आईच्या या कारमतींची माहिती विवेक यांना दिली होती. विवेक झारखंड सरकार मध्ये कक्ष अधिकारी आहेत. विवेक यांनी दाखल केलेल्या तक्रारीत ते म्हणतात, "सुनीता खाखा यांचा गेल्या आठ वर्षांपासून छळ सुरू आहे. ती मरणाच्या दारात आहे. लोखंडी रॉडने तिचे दात तोडण्यात आले आहेत."
विवेक यांनी संपूर्ण घटनाक्रम बीबीसीला सांगितला. ते म्हणाले, "सीमा यांचा मुलगा आयुष्मान माझा मित्र आहे. आम्ही इंजिनिअरिंगला एकत्र होतो. काही दिवसांपूर्वी त्याचा फोन आला आणि तो म्हणाला की त्यांच्या घरी जी आदिवासी नोकराणी आहे तिला वाचव. माझी आई तिला मारून टाकेल."
ते पुढे सांगतात, "काही वेळाने सीमा पात्रा यांचाही फोन आला. त्यांनी सांगितलं की माझा मुलगा मानसिक रुग्ण झाला आहे. घरात तो हिंसाचार करतो. त्याला वेड्यांच्या रुग्णालयात न्यावं लागेल."
"मी आयुष्मानवर विश्वास ठेवला नाही. उलट सीमा यांच्या सांगण्यावरून त्याला रांची सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकाईट्रीमध्ये दाखल करण्यास घेऊन गेलो. दाखल होतानाच आयुष्मान त्याच्या आईवर जोरजोरात ओरडायला लागला. आणि म्हणत होता की तू किती निर्दयी माहिला आहे. तू ,सुनीताला विकलांग केलंस. जेव्हा ती चालू शकायची नाही तेव्हा ती कपड्यातच मलमूत्रविसर्जन करायची. तेव्हा तू तिला तोंडाने स्वच्छ करायला लावायची."
ते पुढे म्हणतात, "हे ऐकताच मी स्तब्ध झालो. त्यानंतर मी सीमा पात्रा यांच्या अन्य कर्मचाऱ्यांकडून महिती घेतली. जी माहिती समोर आली ती फार भीषण होती."

फोटो स्रोत, Anand Dutta/BBC
दाखल केलेल्या FIR मध्ये असा दावा केला होता की सुनीता खाखा यांना गरम तव्याचे चटके दिले गेले. तिचे दात तोडले. अनेक दिवस तिला एका खोलीत डांबून ठेवलं जात होतं.
त्या दरम्यान ती नेसत्या कपड्यातच सगळे विधी पार पाडायची. त्यावर सीमा तिच्यावर ओरडायच्या. गेली तीन वर्षं ती खोलीच्या बाहेर पडलेली नाही असं त्यांनी सांगितलं.
विवेक म्हणतात, "मला माझ्या मित्रावर विश्वास बसायला लागला. मी तातडीने ही माहिती रांचीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यांनी एक टीम तयार केली आणि 22 ऑगस्टला सुनीताला सीमा यांच्या घरातून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं."
RIMSच्या शीतल मलुआ यांनी बीबीसीला सांगितलं की सुनीता यांची तब्येत स्थिर आहे. ती सध्या अतिशय अशक्त आहे. तिच्यावर सध्या औषधोपचार सुरू आहेत. मात्र तिला पूर्णपणे बरं व्हायला आणखी वेळ लागेल.
इतकी वर्षं छळ झाल्यामुळे तिच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम कमी होण्यास वेळ लागेल.
सीमा पात्रा यांची मुलगी वत्सला यांच्या दिल्लीच्या घरी ती कामाला होती. तिथेही सुनीताला अशीच वागणूक मिळायची. वत्सला सध्या NTPC च्या रामगढ केंद्रात काम करतात.
मायलेकींचा अत्याचार इथेच संपत नाही. जेव्हा दोघी घराबाहेर जात तेव्हा सुनीताच्या खोलीला कुलूप लावून जात असत. जर त्या दोन दिवस घरी आल्या नाहीत तर सुनीता दोन दोन दिवस उपाशी राहत असे. जेव्हा सुनीताची परिस्थिती आणखी खालावली तेव्हा सीमा तिला एका आश्रमात सोडून द्यायचा विचार करत होती.
सीमा पात्रा कोण आहे?
सीमा पात्रा यांना अभिनेत्री व्हायचं होतं. जमशेदपूरमध्ये राहणारे ज्येष्ठ पत्रकार राकेश कुमार सांगतात, "मी त्यावेळी समकालीन तापमान नावाच्या एका मासिकात काम करत होतो. त्यावेळी सीमा पात्रा यांना ड्रीम गर्ल ऑफ बिहार असं म्हटलं जायचं. 1998 मध्ये त्या मासिकात सीमा पात्रा यांचा प्रोफाईल छापून आला होता. त्याची हेडलाईन होती, कुठे आहे पिंकी पात्रा? सीमा यांचं टोपणनाव पिंकी आहे.
तेव्हा चारा घोटाळ्यात अनेक नावं समोर येत होती RJD नेते आर. के. राणा सीमा पात्रा यांना फिरवायला मुंबईला घेऊन गेले होते. त्यावर दौऱ्यात 20 कोटी रुपये खर्च झाले होते. तेव्हा आम्ही या हेडलाईनलसकट हा लेख छापला होता."
1991 मध्ये डाल्टेनगंज या मतदारसंघातून त्यांनी जनता दलाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी सीमा पात्रा यांचे पोस्टर सगळीकडे लागले होते. त्या आधी राष्ट्रीय जनता दलात होत्या. त्यानंतर त्या काँग्रेसमध्ये गेल्या. पाच वर्षांआधी त्या भाजपात आल्या आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत त्या महिला मोर्चाच्या सदस्य होत्या.
सीमा आधीपासूनच अशा आहेत का याचाही शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. बालहक्क कार्यकर्ता वैद्यनाथ कुमार यांच्याशी आम्ही संपर्क साधला.

फोटो स्रोत, Anand Dutta/BBC
सीमा यांचे पती रांचीला असताना वैद्यनाथ सीमा यांच्याकडे काम करायचे. ते सांगतात, "सीमा पात्रा 11 वाजेनंतर उठायच्या. त्या कधी उठायच्या मला कळायचं नाही. त्या थेट स्वयंपाकघरात यायच्या आणि माझे केस ओढून चहा का केला नाही म्हणून आरडाओरडा करायच्या. त्यांचा नवरा समंजस स्वभावाचा आहे. अनेकदा ते आमच्याबरोबर जेवायचे. तेव्हाही सीमा अशाच शिव्या द्यायच्या."
विवेक बास्के वैद्यनाथ कुमार यांच्या बोलण्याला दुजोरा देतात. ते म्हणतात, "जेव्हा मी पोलिसात तक्रार केली तेव्हा त्यांचा नवरा आणि मुलगी माझ्याकडे आले आणि म्हणाले की माझ्या पत्नीला वाचवा. मात्र मी तसं करण्यास नकार दिला. तेव्हा ते म्हणाले की सुनीताची काळजी घ्या."
या प्रकरणी भाजपाने त्यांना निलंबित केलं आहे. अशा मानसिक विकृतीच्या लोकांना पक्षात स्थान नाही, असं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे. पात्रा झारखंडच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ'च्या संयोजिका होत्या.
झारखंडमध्ये आदिवासींची मानव तस्करी मोठ्या प्रमाणात होतो. वैद्यनाथ कुमार यांनी अशा अनेक मुलींना सोडवलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























