सेंट झेवियर्स कोलकाता : 'इंस्टाग्रामवर बिकिनीतील फोटो शेअर केल्यामुळे मला नोकरीहून काढलं', प्राध्यापिकेचा आरोप

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

बिकिनीतील फोटो खासगी इंस्टाग्राम अकाउंटवर टाकले म्हणून एका प्राध्यापिकेला नोकरीवरून काढण्यात आलं आहे. इतकेच नाही तर यामुळे आपल्याला मानसिक आणि 'लैंगिक' छळाला सामोरं जावं लागलं अशी तक्रार या प्राध्यापिकेनी केली आहे.

या प्राध्यापिकेनी आपले बिकिनीतील फोटो इंस्टाग्रामवर टाकल्यानंतर कोलकात्यामध्ये गदारोळ झाला आहे. संबंधित शिक्षिकेला आपली नोकरी तर गमवावीच लागली परंतु त्याचबरोबर त्यांना मॉरल पोलिसिंग आणि छळवणुकीला सामोरं जावं लागल्याचं त्यांनी सांगितलं.

कोलकात्यातील खासगी विद्यापीठ सेंट झेवियरमध्ये विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारीनंतर हा प्रकार घडलाय.

प्राध्यापिकेनी सांगितले की त्यांनी बिकिनीतील फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकले होते. त्यामुळे विद्यापीठाने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, विद्यापीठाने हे आरोप फेटाळले आहेत.

"या फोटोंमुळे मला मॉरल पोलिसिंगचा सामना करावा लागला, मला स्टाफच्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि माझी यामुळे लैंगिक छळवणूक देखील झाली," असं 31 वर्षीय माजी प्राध्यापिकेनी बीबीसीला सांगितलं आहे.

या महिला प्राध्यापिकेनी या संदर्भात विद्यापीठाला कायदेशीर नोटीस बजावली आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर विद्यापीठाने त्यांच्यावरच अब्रू नुकसानीचा दावा करत 99 कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे.

माझी कसून चौकशी करण्यात आली

माजी प्राध्यापिकेनी सांगितले की त्या 9 ऑगस्ट 2021 रोजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात रूजू झाल्या. दोन महिन्यानंतर त्यांना कुलगुरूंच्या कार्यालयात बोलवण्यात आलं.

त्यानंतर त्यांची कसून चौकशी झाली. यावेळी कुलगुरू फेलिक्स राज, निबंधक आशिष मित्रा आणि पाच महिला हजर होत्या.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

त्यांना सांगण्यात आले की एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी तुमच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे, "माझा मुलगा प्राध्यापिकेच्या अंतर्वस्त्रातील फोटोंकडे पाहत होता. हे फोटो अश्लील आहेत, विद्यापीठाने माझ्या मुलाला या अधःपतनापासून वाचवावं. अशी तक्रार तुमच्याविरोधात आली आहे."

त्या महिला प्राध्यापिकेनं याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, "कुलगुरूंनी मला सांगितलं की तो मुलगा तुझे इंस्टाग्रामवरील फोटो पाहत होता. त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले. तेव्हा तो तुझ्या अंतर्वस्त्रातील फोटोंकडे पाहत होता. पालकांचं म्हणणं आहे की हे फोटो अश्लील आहेत आणि विद्यापीठाने माझ्या मुलाला अशा अश्लील वर्तनापासून वाचवावं."

"माझ्यासमोर काही प्रिंटआउट ठेवण्यात आल्या आणि मला विचारले की या फोटोग्राफमध्ये दिसणारी व्यक्ती तूच आहेस का?"

"हॉटेलच्या रूममध्ये असताना टू-पिस बिकिनीत मी फोटो काढले होते. आणि ते इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले होते म्हणजे ते 24 तासांमध्ये तिथून निघून जातात."

"पण या समितीने माझे हे म्हणणे ऐकले नाही आणि त्यांनी सांगितले की 13 जून 2021 रोजी म्हणजेच तुम्ही नोकरीवर रूजू होण्यापूर्वीच हे फोटो टाकण्यात आले. आणि तेव्हा तर कुणी विद्यार्थी देखील तुमचे अकाउंट फॉलो करत नव्हता कारण तेव्हा ते अकाउंट प्रायव्हेट होतं. असं त्या समितीने मला म्हटलं," अशी माहिती प्राध्यापिकेनं दिली.

"मला तर धक्काच बसला. मला पॅनिक अॅटकच आला. मला तर काहीच कळलं नाही की माझे खासगी फोटो माझ्या संमतीविनाच कसे शेअर झाले."

इंस्टाग्राम

फोटो स्रोत, Getty Images

"काही क्षणासाठी तर मीच माझ्या फोटोकडे पाहू शकले नाही. ज्या पद्धतीने ते माझ्यासमोर ठेवण्यात आले आणि जशी त्यावर चर्चा झाली तो अतिशय घाणेरडा प्रकार वाटला. मला वाटलं की मी चितेवरच आहे आणि कुणी तरी माझी चिर-फाड करत असल्यासारखं मला वाटलं."

"मला तर यावेळी अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला. तू असं का केलं असं त्यांनी मला विचारलं, एक महिला म्हणून तुला काहीच वाटलं नाही का, एक प्राध्यापिका म्हणून समाजात कसं वावरावं याची तारतम्य तुला नाही का? महिलांना ड्रेसकोड असतो हे तुला माहीत नाही का अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली," त्या प्राध्यापिकेनी अत्यंत उद्विग्नतेनी सांगितले.

तुझ्या आई-वडिलांना हे फोटो दाखवले का?

प्राध्यापिकेला या घटनेमुळे वाईट-साईट ऐकावं लागल्याचं त्यांनी सांगितलं.

"ते मला म्हणाले की माझ्यामुळे विद्यापीठाची मान शरमेनी खाली गेली आहे. ते मला हे देखील म्हणाले की तुझ्या आई-वडिलांनी तुझे असले फोटो पाहिले आहेत का? मला तर हे सर्व ऐकून चक्करच आली आणि अक्षरशः मळमळ होऊ लागली होती."

"मला लेखी माफी देण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी कुलगुरूंच्या ऑफिसमध्ये गेले. दुसऱ्या दिवशी मी माफीनामा सादर केला. समितीने मला सल्ला दिल्याप्रमाणे मी ही माफी सादर करत आहे, असे मी त्यात लिहिले."

महिला

फोटो स्रोत, Getty Images

"जर माझ्या फोटोंमुळे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असेल तर मी माफी मागते असं मी त्यात लिहिलं होतं."

"हा फारच वेदनादायी अनुभव होता. पण मला वाटलं की ही गोष्ट इथेच संपली."

"पण नंतर कुलगुरूंनी मला सांगितले की सर्वानुमते तुला काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुझे फोटो व्हायरल झाले आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांनी ते पाहिले आहेत. ते आता तुला गांभीर्याने घेणार नाहीत. आणि तुझी तक्रार पालकांकडे करतील. हेच योग्य राहील की तू स्वतःहून राजीनामा द्यावा."

"जर मी राजीनामा दिला नाही तर मला तुरुंगात जावं लागेल कारण पालक पोलिसांत जाण्याबद्दल बोलत आहेत."

"माझ्यावर दबाव टाकण्यात आला शेवटी मी हार मानली, आणि राजीनामा दिला."

"पण त्याच वेळी मला भयंकर राग आला आणि मला कायदेशीर सल्ला घ्यावा वाटला. कारण माझे फोटो डाऊनलोड करण्यात आले, त्यांचे स्क्रीनशॉट काढून माझ्या परवानगीशिवाय टाकण्यात आले. माझ्या वकिलांनी सांगितलं की मी सायबर क्राईम पोलिसांकडे लैंगिक छळवणुकीची तक्रार दाखल करावी," असं प्राध्यापिकेनी सांगितलं.

'कुलगुरूंनी भाष्य करण्याचं टाळलं'

समितीने तिला राजीनामा देण्यास भाग पाडलं की नाही, या विषयावर कुलगुरू फेलिक्स राज यांनी भाष्य करण्याचं टाळलं. पण त्यांच्यावर आणि विद्यापीठावर जे आरोप प्राध्यापिकेनी केले आहेत ते त्यांनी फेटाळले आहेत.

सोशल मीडिया

फोटो स्रोत, Getty Images

"आम्ही एक पवित्र संस्था आहोत जिथे ज्ञान आणि शिक्षण प्रदान केलं जातं. एक वरिष्ठ आणि विद्यापीठाचा प्रमुख या नात्याने मी तिला सांगितले की तू अशा प्रकारचे फोटो टाकू नयेत," असे फेलिक्स यांनी सांगितलं.

"तरी सुद्धा मी तिला राजीनामा देण्यास बळजबरी केली नाही. तिने तिच्या मनानेच राजीनामा दिला," फेलिक्स सांगतात.

"तिने 8 ऑक्टोबर 2021 ला माफीनामा दिला आणि आम्ही तो स्वीकारला. मला वाटतं ती योग्य कृती होती. पण 25 तारखेला तिने राजीनामा दिला. दुर्गापूजेच्या सुट्टीनंतर पुन्हा विद्यापीठ उघडलं त्यानंतर ती आलीच नाही. मला हे कळलंच नाही की या दोन आठवड्यात असं काय घडलं ज्यामुळे ती परत आली नाही," फेलिक्स यांनी सांगतिले.

"तिच्याबद्दल मनात काही राग नाही, आम्ही तिच्यासोबत चांगलं वागलो होतो," फेलिक्स सांगतात.

इंस्टाग्रामवरील फोटो तिच्या रूजू होण्यापूर्वीचे आहेत, नंतर ते तिच्या फीडमध्ये असणे शक्य नव्हते असं विचारलं असता ते फेलिक्स राज म्हणाले की 'मी काही तंत्रज्ञानाचा तज्ज्ञ नाही.'

'प्रतिगामी विचारांचा प्रतिकार करा'

प्राध्यापिकेविरोधात केलेल्या कारवाईवर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी ही गोष्ट प्रतिगामी आहे असं म्हटलं आहे.

change.org या ठिकाणी ऑनलाइन पेटिशन दाखल करण्यात आली आहे. गौरव बॅनर्जी या विद्यार्थ्याने पश्चिम बंगालच्या शिक्षण मंत्र्यांना विनंती केली आहे की प्राध्यापिकेला परत कामावर घ्यावं. यावर 25 हजाराहून अधिक जणांनी स्वाक्षरी केली आहे.

इंस्टाग्राम

फोटो स्रोत, Getty Images

बॅनर्जी यांनी बीबीसीला सांगितले की "विद्यापीठाने प्राध्यापिकेची माफी मागायला हवी. आणि ज्या लोकांनी त्यांच्यावर कारवाई केली त्यांच्याविरोधात सरकारने कारवाई करायला हवी."

"मला याचा आनंद आहे की माझ्याप्रमाणे इतरही विद्यार्थी विचार करतात. विद्यापीठात जे काही घडलं त्यामुळे त्यांना देखील वाईट वाटल्याचं दिसतंय," गौरव सांगतो.

नुकताच विद्यापीठात विद्यार्थ्यांनी काळे कपडे घालून शांततापूर्ण मार्गाने निषेध व्यक्त केला.

"विद्यापीठात एका प्राध्यापिकेविरोधात अशी 'मॉरल पोलिसिंग'ची अन्यायकारक घटना घडल्याचे आम्हाला समजले. ही अतिशय वाईट घटना आहे. कुणी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय करत आहे याबद्दल कुणी भाष्य करण्याची काय गरज आहे," असे या निषेध मोर्चात सामील झालेल्या एका विद्यार्थ्याने म्हटले.

"सर्वांत खराब गोष्ट म्हणजे या समितीमध्ये पाच महिला होत्या. त्यांना देखील असे वाटले नाही की हा मॉरल पोलिसिंगचा प्रकार आहे," असे त्या विद्यार्थ्याने म्हटले.

कदाचित मी जिंकणार नाही पण

"लोकांनी दिलेल्या आधारामुळे मी भारावले आहे अशी भावना महिला प्राध्यापिकेनी व्यक्त केली आहे. मी त्याबद्दल त्यांची ऋणी आहे," असे प्राध्यापिकेनी म्हटले आहे.

पुढे त्या सांगतात, "गेल्या काही महिन्यात नैराश्याचा सामना केल्यानंतर आता मला असं वाटत आहे की या गोष्टीतला फोलपणा देखील इतरांना कळला आहे."

"प्रत्येकाला आपल्या खासगी आयुष्यात आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. एखाद्यावर अशा प्रकारे पाळत ठेवणे आणि त्याचे पडसाद आपल्या कामाच्या जागी पडणे ही गंभीर बाब आहे," असे त्यांनी म्हटले.

"या संस्थेत मी रूजू होण्यापूर्वी काय केले यावरून या संस्थेच्या सोशल मीडिया नियमावलींचा भंग कसा झाला हेच मला कळत नाही."

"मला असं वाटतं की मी जे काही केलं ते काही चूक नाही, ही लढाई मी जिंकेन की नाही हे मला माहीत नाही पण लढणे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)