20 रुपयांसाठी रेल्वेविरुद्ध 22 वर्षे लढून मिळवली भरपाई

प्रवासासाठी लागू दरापेक्षा जास्त रक्कम आकारल्याप्रकरणी एका व्यक्तीने भारतीय रेल्वेविरुद्ध तब्बल 22 वर्षं लढा दिला. अखेर, त्यांनी ही लढाई जिंकली असून त्याची चर्चा सध्या सर्व माध्यमांमध्ये होताना दिसत आहे.
तुंगनाथ चतुर्वेदी असं रेल्वेविरुद्ध हा खटला जिंकणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. ते व्यवसायाने वकील आहेत.
तुंगनाथ यांनी 1999 साली दोन तिकिटे विकत घेतली होती. या तिकिटांकरिता त्यांना रेल्वेकडून 20 रुपये अधिकचे आकारण्यात आले होते.
हा प्रकार रेल्वे विभागाच्या मथुरा कॅन्टोनमेंट रेल्वे स्थानकावर घडला.
तुंगनाथ यांनी ही बाब निदर्शनास येताच ग्राहक न्यायालयात धाव घेतली. अखेर 22 वर्षांनी तुंगनाथ चतुर्वेदी यांच्या लढ्याला यश मिळालं.
या प्रकरणात ग्राहक न्यायालयाने चतुर्वेदी यांच्या बाजूने निर्णय दिला. "तिकिटासाठी आकारलेली अधिकची रक्कम व्याजासकट चतुर्वेदी यांना परत करावी," असे आदेश ग्राहक न्यायालयाने रेल्वेला दिले आहेत.
याविषयी बीबीसीशी बोलताना तुंगनाथ चतुर्वेदी म्हणाले, "मी या खटल्यात 100 पेक्षा जास्त सुनावणींना हजर राहिलो. या लढाईदरम्यान खर्ची गेलेली माझी ऊर्जा आणि वेळ यांची भरपाई कोणत्याच प्रकारे होऊ शकणार नाही."
ग्राहकांचे हक्क आणि अधिकार जपण्यासाठी ग्राहक न्यायालयाची देशात स्थापना करण्यात आली होती. पण ग्राहक न्यायालयात ग्राहकांच्या तक्रारींचं प्रमाण मोठं असल्याने त्यांचा वेळेत निपटारा होऊ शकत नाही. यामुळे प्रकरण मिटवण्यासाठी अनेकवेळा वर्षानुवर्षांचा कालावधी लागतो.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले तुंगनाथ चतुर्वेदींनी 1999 मध्ये मथुरा ते मोरादाबाद असं तिकिट काढायचं होतं. या प्रवासासाठी प्रत्येकी तिकिट दर 35 रुपये इतकं होतं.
दोन तिकिटे हवी असल्याने चतुर्वेदी यांनी बुकिंग क्लार्कला 100 रुपये दिले. दोन तिकिटांचे मिळून 70 रुपये इतकी रक्कम जाईल आणि 30 रुपये परत मिळतील, अशी अपेक्षा त्यांना होती.
पण तिकिट बुकिंग क्लार्कने त्यांना दोन तिकिटांसाठी 20 रुपये जास्तीचे आकारत 90 रुपये त्यांच्याकडून घेतली. त्यानुसार शिल्लक केवळ 10 रुपये चतुर्वेदी यांना देण्यात आले.
पैसे जास्त आकारण्यात आल्याविषयीची ही बाब चतुर्वेदी यांनी बुकिंग क्लार्कच्या निदर्शनास आणून दिली. पण त्यांनी ते फेटाळून लावत पैसे परत करण्यास नकार दिला.
यामुळे चतुर्वेदी यांनी उत्तर-पूर्व रेल्वे विभाग, गोरखपूर तसंच संबंधित तिकिट बुकिंग क्लार्क यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मथुरा येथील ग्राहक न्यायालयातच यासंबंधित तक्रार दाखल केली.
भारतात कोर्टाचं काम संथगतीने होत असल्यानेच आपल्याला न्याय मिळण्यास उशीर झाला, अशी खंत चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे.
"यादरम्यान, रेल्वेविरुद्धच्या तक्रारी ग्राहक न्यायालयात दाखल न करता रेल्वे लवादाकडेच दाखल करण्यात याव्यात, असं म्हणत रेल्वे विभागाने ही तक्रार रद्दबातल करण्याचा प्रयत्नही केला होता. पण 2021 साली सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निर्णयानुसार संबंधित खटल्याची सुनावणी होऊ शकते यावर शिक्कामोर्तब झालं," असं चतुर्वेदी यांनी सांगितलं.
हा खटला लांबल्याचं दुसरं कारण म्हणजे न्यायाधीशांच्या सुट्ट्या असल्याचंही त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
या लांबलचक लढाईनंतर चतुर्वेदी यांना 15 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी सूचना ग्राहक न्यायालयाने भारतीय रेल्वेला केली आहे.
इतकंच नव्हे तर तिकिटाचे जास्तीचे आकारलेले 20 रुपये परत करावेत, या 20 रुपयांवर दरवर्षी 12 टक्के दरानुसार 1999 ते 2022 अशी 22 वर्षांचे व्याजही देण्यात यावे, असं कोर्टाने म्हटलं आहे.
"सदर रकमेची भरपाई येत्या 30 दिवसांत न केल्यास व्याजदर वाढवून 15 टक्के करण्यात येईल," असा इशाराही कोर्टाने दिला आहे.
पण कोर्टाच्या या निर्णयावर तुंगनाथ चतुर्वेदी हे नाराज असल्याचं दिसून येतं. त्यांच्या मते, "नुकसान भरपाईसाठी देण्यात येत असलेली ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. या रकमेतून कुटुंबाला झालेल्या मानसिक त्रासाची भरपाई होऊ शकत नाही."
वेळेचा अपव्यय नको म्हणत कुटुंबाने अनेकवेळा हा खटला लढवण्यापासून आपल्याला परावृत्त केलं होतं, परंतु आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहिलो होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
ते म्हणतात, "प्रश्न पैशाचा नाही. भ्रष्टाचाराविरोधात न्याय मिळवण्यासाठीची ही लढाई होती. मी स्वतः वकील असल्यामुळे मला वकिलांच्या फीसाठीचे पैसे देण्याची आवश्यकता भासली नाही. जर ते द्यावे लागले असते तर ही लढाई मला परवडणारी नव्हती."
"सरकारी अधिकारी मग त्याचं पद काहीही असो, लोकांनी त्यांना वेळीच रोखलं तर ते चुकीचं काम करण्यापासून आपोआप दूर होतील, असं मला वाटतं. माझ्या या खटल्यातील लढाईमुळे इतरांना प्रेरणा मिळेल, लढाई कितीही अवघड वाटत असली तरी न्यायाबाबत समझोता कधीही करू नये, हा संदेश यामधून जाईल," असा विश्वास चतुर्वेदी यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























