शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना लवासा प्रकरणी नोटीस #5मोठ्याबातम्या

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा.

1. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना लवासा प्रकरणी नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.

लवासा प्रकरणी सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

नाशिकचे नानासाहेब जाधव यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात काही वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हाय कोर्टासह विविध खंडपीठांसमोर सुनावणी झाली. मुळशी तालुक्यातील लवासा हे हिल स्टेशन म्हणून विकसित करण्यामध्ये शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावाचा परिणाम झाल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते.

मात्र, प्रकल्पाचे हक्क तिसऱ्या पक्षाला देण्यात आलेले आहेत आणि प्रकल्पाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यास खूपच विलंब झाला आहे, असे स्पष्ट करून मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत 26 फेब्रुवारी रोजी ही याचिका निकाली काढली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

2. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय दिवे लावणार?- उद्धव ठाकरेंचा सवाल

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) होत आहे. भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर खोचक टीका केलीय.

उद्धव यांनी म्हटलं, "दोन जण दिल्लीला चकरा मारत आहेत, पण पाळणा काही हलत नाही. आता बातमी आलीय की विस्तार होणार. पण विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार?"

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK

ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्यावर सोमवारी (8 ऑगस्ट) शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

"आता मी मैदानात उतरलो आहे, पळणार नाही. निष्ठा आणि पैसा अशी ही लढाई आहे," असंही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं टीव्ही 9 मराठीच्या बातमीत म्हटलं आहे.

3. राज्यपालांवर मुंबईवरील विधानाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक

मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नुकतेच टीकेचे धनी झाले होते. यानंतर सोशल मीडियातूनही त्यांना निशाणा बनवलं होतं.

प्रदीप भालेकर नामक व्यक्तीनं सोशल मीडियावर राज्यपालांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. याची शहानिशा केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटकडून या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं सकाळनं आपल्या बातमीत म्हटलं आहे.

कोश्यारी

फोटो स्रोत, TWITTER/@BSKOSHYARI

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटनं कुरार भागातील प्रदीप भालेकर नामक व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ट्विटरवरील पोस्टद्वारे शिवीगाळ केली होती.

गुजराती, राजस्थानी लोकांना जर मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली होती.

4. आजोबा भिजले, नातूही भिजले. पण काय उपयोग आहे?- सदाभाऊ खोतांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस साताऱ्यातील सभेला भर पावसात संबोधित केलं होतं. त्यांच्या त्या भाषणाचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचेही पावसातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

याच फोटोंवर माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे, "आजोबा भिजले, नातूही भिजले. पण काय उपयोग आहे? ह्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यातील अडचणींचा, प्रश्नांचा पूर नाही दिसला. ह्या नाटकावर पडदा टाका रोहित दादा, प्रेक्षक हुशार आहेत."

रोहित पवार यांनी कराड इथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट दिली होती. यावेळी रिमझिम पाऊस सुरू होता. रोहित पवार यांच्या हातात छत्री असूनही त्यांनी पावसात भिजतानाचे फोटो टाकल्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं आहे.

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

5. कपिल सिब्बलांच्या 'त्या' विधानावर बार काऊंन्सिलचे अध्यक्ष म्हणतात...

सर्वोच्च न्यायालयातील काही निकालांवर नाराजी व्यक्त करताना 'आता सर्वोच्च न्यायालयाकडून आशा राहिली नाही' असं विधान राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलं होतं. या विधानावर बार काऊंन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष एम. के. मिश्रा यांनी टीका केली आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की, "तब्बल 50 वर्षं सर्वोच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर आता मला या संस्थेकडून आशा राहिली नाही. ज्या न्यायालयात न्यायाधीशांची निवड तडजोडीच्या प्रक्रियेद्वारे होते, असे न्यायालय कधीच स्वतंत्र होऊ शकत नाही."

सिब्बल यांच्या याच वक्तव्यावर टीका करताना एम. के. मिश्रा यांनी म्हटलं आहे, "काही खटले हरल्यानंतर संपूर्ण न्यायव्यवस्थेला दोष देणे योग्य नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)