भारताच्या जंगलात 70 वर्षांत पहिल्यांदाच चित्त्यांचं आगमन होणार

फोटो स्रोत, AFP
- Author, नदीम शाद
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
70 वर्षांत नंतर पहिल्यांदाच भारताच्या जंगलात चित्त्यांचं आगमन होणार आहे.
यातले आठ चित्ते ऑगस्टमध्ये नामिबियातून भारतात येतील. नामिबियामध्ये वाईल्ड कॅट प्रजातीतील प्राण्यांची संख्या जगात सर्वांत जास्त आहे.
1952 मध्ये भारतातील स्थानिक चित्ते नामशेष झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. आता इतक्या दशकांच्या प्रतिक्षेनंतर या प्राण्यांचं भारतात पुनरागमन होईल.
चित्ता हा जमिनीवरील सर्वांत वेगवान प्राणी असून तो ताशी 70 मैल (113 किमी) वेगाने धावू शकतो.
इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अंतर्गत नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींची रेड लिस्ट प्रसिद्ध होते. या लिस्टमध्ये चित्त्यांचा समावेश असुरक्षित प्रजाती म्हणून करण्यात आलाय. जगभरात फक्त 7,000 चित्ते शिल्लक असल्याचं या लिस्टमध्ये नमूद करण्यात आलंय.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये या प्राण्यांना 'काळजीपूर्वक निवडलेल्या ठिकाणी' पुन्हा आणले जाऊ शकते, असा निर्वाळा दिल्यानंतर अधिकाऱ्यांच्या मदतीने चित्ता भारतात कोणत्या मार्गाने आणायचा हे ठरवण्यात आलं. आणि मगच या कराराची घोषणा झाली.
पहिल्या टप्प्यात या प्राण्यांना मध्यप्रदेशातील कुनो-पालपूर नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येईल. हे नॅशनल पार्क चित्त्यांसाठी अनुकूल आहे.
भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अशा प्रकारचा करार अपेक्षित होता.

फोटो स्रोत, Getty Images
चित्त्यांच्या आगमनावर भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यात ते म्हणतात, "स्वातंत्र्याची 75 गौरवशाली वर्षे पूर्ण करताना भारतात सर्वांत वेगवान चित्त्याची प्रजाती आल्याने पर्यावरणीय गतिशीलता पुन्हा जागृत होईल."
चित्ता वेगवान प्राणी असूनही या प्राण्यांची शिकार झाल्यामुळे, नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे आणि अन्नाच्या कमतरतेमुळे चित्ता भारतातून नाहीसा झाला. ब्रिटीश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात नामशेष झालेला हा एकमेव मोठा सस्तन प्राणी आहे.
आशियाई चित्ता एकेकाळी अरबी द्वीपकल्पापासून ते अफगाणिस्तानपर्यंत आढळून यायचा.
आता हा प्राणी फक्त इराणमध्येच टिकून आहे. 2022 मध्ये तिथं एक सर्वेक्षण झालं. त्यात तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीनुसार फक्त 12 चित्ते जिवंत असावेत.
1950 पासून भारतात चित्यांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. 1970 च्या दशकात त्यांना इराणमधून आणण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी इराणमध्ये सुमारे 300 प्राणी होते. पण इराणमध्ये क्रांती झाली आणि शाह मोहम्मद रझा पहलवी पदच्युत झाले. त्यामुळे या वाटाघाटी संपुष्टात आल्या.
दीर्घकालीन प्रयत्नानंतर आता भारतात चित्ते आणण्यासाठी भारतीय अधिकारी उत्सुक आहेत.
यावर भारताच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटलंय की, "चित्त्यांचं पुनरुज्जीवन करणं हा या प्रकल्पचा उद्देश असून अन्नसाखळीत एक शीर्ष शिकारी म्हणून चित्ता त्याची कार्यात्मक भूमिका पार पाडू शकेल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























