जिथे वाळू माफियाने Dy. एसपींना डंपरखाली चिरडले, त्या गावात कसं वातावरण आहे?

फोटो स्रोत, ANI
- Author, शुभम किशोर
- Role, बीबीसी प्रतिनिधी, नूहवरुन
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
भारतातल्या गावांमध्ये रात्री सगळं जनजीवन थंडावलेलं असतं. हरियाणातल्या नूह जिल्ह्यातलं पचगाव त्याला अपवाद नाही. पण मंगळवारी रात्री पचगावमध्ये वातावरण वेगळं होतं. गावातल्या रस्त्यांवर एवढी माणसं होती की रात्र झालेय असं वाटूच नये. प्रत्येकजण त्या एकाच घटनेबद्दल बोलत होता. त्या माणसाच्या आठवणी जागवत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुग्रामजवळच्या नूह जिल्ह्यातल्या तावडू पोलीस स्थानक परिसरातील पचगाव इथे तावडू इथले डेप्युटी सुप्रिंडेंडट ऑफ पोलीस सुरेंद्र सिंह बिश्नोई यांची हत्या करण्यात आली. सुरेंद्र सिंह ड्रायव्हरच्या कागदपत्रांची शहानिशा करत होते. पोलिसांनी यासंदर्भात एका आरोपीला अटक केली आहे.
पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर या भागात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस अलर्टवर आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली आहे. रात्रभर पोलिसांच्या गाड्या सतत जा-ये करत आहेत.
यासगळ्यादरम्यान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश यांनी दिले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सूर्यास्तानंतर गावांमध्ये शुकशुकाट असतो पण मंगळवारी पचगावमध्ये रस्त्यावर वावरणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर चिंता जाणवत होती. वातावरणात इतकी भीती की कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास कोणीही तयार नाही.
बीबीसीच्या टीमला पाहून एक ज्येष्ठ नागरिक महिला घरातून बाहेर पडली. नाव सांगण्याच्या अटीवर त्या आमच्याशी बोलल्या. मी 50 वर्ष या गावात आहे. असं वातावरण मी कधीच पाहिलेलं नाही. गावकऱ्यांचा पोलिसांनी पाठिंबा आहे. कोणीही पोलिसाला कसं मारू शकतो?
पोलिसांबरोबर असल्याचं गावकरी सांगत असले तरी गावकऱ्यांना पोलिसांचं भयही वाटतं.
हरियाणात डीवाय एसचीपी हत्या
डीवाय एसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई यांच्यावर मंगळवारी दुपारी एका डंपरवाल्याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. या अपघातात बिश्नोई यांचा जागीच मृत्यू झाला. सुरेंद्र सिंह मंगळवारी दुपारी 12 वाजता दोन पोलीस कर्मचारी, एक ड्रायव्हर आणि एक गनमॅनसह बेकायदेशीर खाणप्रकरणी छापा घालण्यासाठी गेले होते.

फोटो स्रोत, ANI
1994 मध्ये एएसआय म्हणून सुरेंद्र सिंह सेवेत दाखल झाले. तावडू इथे सुरेंद्र सिंह डीवाय एसपी पदावर कार्यरत होते. आणखी चार महिन्यांमध्ये ते निवृत्त होणार होते. सुरेंद्र सिंह यांना शहीदचा दर्जा देण्याचे आदेश हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिले आहेत.
सुरेंद्र यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मत देण्यात येणार आहेत. आर्थिक सहाय्यतेसाठी कुटुंबातील सदस्याला नोकरी दिली जाईल.
गावातले मोहम्मद वारिस सांगतात, "गावात भीतीदायक वातावरण आहे. सगळे घाबरले आहेत. लहान मुलंही जेवली नाहीयेत. गावावर काही संकट येऊ नये असंच सगळ्यांवा वाटत आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी."
कॅमेरा आणि लाईट पाहून एक माणूस येऊन सांगतो की तुम्ही निघून जा नाहीतर पोलीस येतील.

थोडं चालल्यावर आम्हाला आणखी काही माणसं भेटली. त्यापैकी एकजण खूप आग्रह केल्यानंतर बोलायला तयार झाला. त्यावेळी तिथून पोलिसांची एक गाडी रवाना झाली. लोक इकडून तिकडून धावू लागले.
थोड्या वेळानंतर ही सगळी माणसं परत आली.
हामिद हुसैन सांगतात, "गावात इतकी भीती आहे की महिला आणि लहान मुलं गाव सोडून निघून गेले आहेत. आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांनी आश्रय घेतला आहे."
गावात शोधायला आणखी माणसं तरी कोण आहेत कारण निम्म्याहून अधिक माणसं गाव सोडून गेली आहेत.

घटनेनंतर पोलीस गावातून सहा सात लोकांना घेऊन गेले आहेत. पोलिसांचे प्रवक्ते कृष्ण कुमार यांनी पोलिसांशी बोलताना सांगितलं की एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बाकी आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना पचगावपासून जवळच असलेल्या अरवली डोंगररांगांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने खाणकाम सुरू असल्याचं कळलं होतं. त्यानंतर दुपारी 12 वाजता दोन पोलीस सहकारी, एक ड्रायव्हर आणि एका गनमॅनसह ते घटनास्थळी पोहोचले.
बेकायदेशीर खाणीचा विषय नवा नाही. गेल्या काही महिन्यात स्थानिक प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातल्या बातम्या दिल्या होत्या. पोलिसांनीही गेल्या काही महिन्यात याबाबत चौकशीची वारंवारता वाढवली.
आजूबाजूच्या भागातले अनेकजण या बेकायदेशीर खाणीशी संबंधित आहेत असं गावकरी सांगतात.
मध्यरात्री गावात खुल्या असलेल्या एका दुकानाइथे जाऊन आम्ही काही लोकांशी बोलणार तर दोन गाड्या आल्या. ते पाहून ती माणसं लपू लागली.

फोटो स्रोत, ANI
त्या गाड्यांमधली काही माणसं पोलिसांच्या वर्दीत होती तर काही साध्या वेशात होते. पोलीस असलेल्या व्यक्तीने आम्हाला बोलावलं. एक फोटो दाखवून विचारलं की याला कुठे पाहिलं आहे का? आम्ही ते कोण आहेत आणि त्यांचं पद काय ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यांनी माहिती द्यायला नकार दिला.
जेमतेम दोन मिनिटं हे बोलणं झालं. आम्ही मागे वळलो तर तिथली सगळी माणसं लपून बसली होती.
पोलिसांची गाडी तिथेच उभी राहिली पण रस्त्यावर फिरणारी माणसं लपून बसली होती.
रोहतकचे बीबीसीसाठी काम करणारे सहयोगी पत्रकार सत सिंह यांनी सांगितलं की डीवाय एसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना बेकायदेशीर खाणकामाबद्दल कळलं होतं. संशयित वाटणाऱ्या एका डंपरला त्यांना थांबायला सांगितलं. त्याच्याकडे कागदपत्रं मागितली. पण ड्रायव्हरने ते देण्याऐवजी वेग वाढवला.
सुरेंद्र सिंह यांचे ड्रायव्हर आणि गनमॅन जीव वाचवण्यासाठी उडी टाकली. पण डंपरच्या ड्रायव्हरने सुरेंद्र यांच्या अंगावर डंपर चढवला. सुरेंद्र यांचा जागेवरच मृत्यू झाला..
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
हरियाणा पोलिसांनी केलेल्या ट्वीटनुसार, कर्तव्याप्रति तत्पर असताना सुरेंद्र सिंह बिश्नोई यांनी स्वत:चा जीव गमावला. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. दोषींना शिक्षा देण्यात कुठलीही कसर केली जाणार नाही.

























