'लग्नाला हो म्हण नाहीतर गोळ्या घालू', लग्नासाठी मुलीनं मुलाला किडनॅप केल्याचा आरोप

उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, NASEEM MALIK

    • Author, शहबाज अनवर
    • Role, बीबीसी हिंदी, बिजनौर
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात एका मुलीवर तिच्यासोबत लग्न ठरलेल्या मुलाला जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तरुणीसह, भाऊ, नातेवाईक आणि आणखी एकाला अटक करून गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणातले चार आरोपी अद्यापही फरार आहेत.

चांदपूरचे प्रभारी कोतवाली निरीक्षक किशन मुरारी दोहरे यांनी बीबीसीशी बोलताना या प्रकरणाची माहिती दिली.

त्यानुसार, "चांदपूरच्या न्यायदंडाधिकाऱ्यांचे स्टेनो अंकुर कुमार हे गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास राहत्या घरातून ऑफिससाठी बाहेर पडले. त्यांच्या सोबत त्यांचा मित्र प्रदीप कुमार होता. ते दोघेही बाईकने ऑफिसकडे निघाले होते.

"चांदपूरमधीलच एका ठिकाणी अंकुर यांच्या बाईकसमोर कार येऊन थांबली. या गाडीत एका तरुणीसह पाच लोक बसले होते. यातल्या काही लोकांकडे हत्यारं होती. त्यांनी अंकुरला हत्यार दाखवून जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवली."

या घटनेत प्रत्यक्षदर्शी असलेले अंकुरचे मित्र प्रदीप कुमार बाईकवर मागेच बसले होते. त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दिली.

प्रदीप कुमार यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, "अंकुर आणि मी ऑफिससाठी घराबाहेर पडलो होतो. साधारण सकाळी पावणे दहाच्या सुमारास एक कार आमच्या मागून आली. या गाडीवर गुर्जर असं लिहिलेलं होतं. गाडीतल्या लोकांकडे हत्यारं होती. त्यांनी अंकुरला जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि तिथून धूम ठोकली."

'लग्न केलं नसतं तर जीवे मारण्याचा कट रचला होता'

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनंतर पोलीस आणि एसओजीचे पथक सक्रिय झाले. सुमारे चार तासांची शोध मोहीम राबवल्यानंतर नजीबाबाद येथील आर्य समाज मंदिरातून पोलिसांना अंकुरची सुटका केली.

याप्रकरणी तरुणीसह अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आलंय.

उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, NASEEM MALIK

बिजनौरचे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी मीडियाशी बोलताना सांगितल की, "अंकुरला चांदपूरमधून किडनॅप केल्यानंतर हे लोक त्याला नजीबाबादच्या एका आर्य समाज मंदिरात घेऊन गेले. तिथं अंकुरचं आरोपी मुलीशी जबरदस्तीने लग्न लावायचं सुरू होतं. पण पोलिसांच्या पथकाने काही मोबाईल सर्व्हेलन्सवर ठेवले होते. याच आधारावर तीन आरोपींना घटनास्थळावरून अटक करण्यात आली."

दिनेश कुमार यांनी पुढे सांगितलं की, "अटक करण्यात आलेल्यांमध्ये तरुणीचाही समावेश आहे. त्यांच्याकडून लग्नाचा लाल पोशाख आणि दोन पिस्तुल जप्त करण्यात आली."

चार आरोपी अद्यापही फरार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पण या अपहरणामागे नेमकं कारण काय होत या प्रश्नावर दिनेश कुमार म्हणाले, "अंकुर आणि प्रियंकाचं गेल्या वर्षीच लग्न ठरलं होतं. नंतर दोघांचं बोलणंही सुरू झालं. पण अंकुरचे विचार आणि प्रियंकाचे विचार पटत नव्हते. त्यामुळे अंकुरला हे लग्न करायच नव्हतं."

मीडियाशी बोलताना त्यांनी असा दावा केलाय की, जर त्या आर्य समाज मंदिरात अंकुरने त्या मुलीशी लग्न केलं नसतं तर अंकुरला जीवे मारण्याचा कट रचला होता.

'लग्न कर नाहीतर गोळ्या घालू'

या घटनेमुळे अंकुर खूपच घाबरलाय. मीडियाशी बोलताना अंकुर म्हणाला, "प्रियांका आणि माझं लग्न ठरलं होतं. लग्न ठरल्यानंतर आम्ही फोनवरही बोलायचो. पण मध्येच आमच्या बोलण्यात विसंवाद व्हायला लागला. यावर मी लग्न करणार नाही अशी भूमिका घेतली.

"तुमचं काय नुकसान झालंय तेही आम्ही द्यायला तयार आहोत, असं आम्ही सांगायचो. यावर पंचायत बसली. ते लोक पंचायतीत तर हो म्हणायचे, पण घरी गेल्यावर याच मुलाशी लग्न करायचं आहे म्हणून मुलगी अडून बसायची."

घटनेच्या दिवसाचा संदर्भ देत अंकुर म्हणाले की, ऑफिसला जात असताना माझं अपहरण झालं.

उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, NASEEM MALIK

फोटो कॅप्शन, अंकुरचा मित्र प्रदीप

त्यांनी पुढे सांगितल की, "त्या कारमध्ये पाच जण होते. त्यातला अर्ध्या जणांकडे तर बंदुका होत्या. हे लोक मला नजीबाबादला घेऊन गेले. वाटेत मला बंदुक दाखवून धमकावण्यात आलं. ते म्हणत होते की लग्नाला हो म्हण नाहीतर गोळ्या घालू."

अंकुरच्या एका नातेवाईकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल की, लग्न झालं नाही तर मुलाला चांदपूरातून उचलून नेईन, अशी धमकी या मुलीने दिली होती.

या घडलेल्या प्रकारानंतर बऱ्याच लोकांच्या तोंडी या मुलीचं नाव आहे. तिच्यात एवढा कमालीचा वेडेपणा आला कुठून की तिने थेट मुलाच्या अपहरणाचा कट रचला अशी चर्चा सध्या त्या परिसरात रंगलीय.

उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, NASEEM MALIK

चंदपूरच्या पोलीस उप-अधीक्षक सुनीता दहिया बीबीसीला सांगतात की, "मुलीच्या वडिलांच निधन झालंय. तिच्या या कटात तिचा भाऊ आणि काकाचा मुलगा आणि इतर लोकही सहभागी होते. तिच्या घरात कोणी शहाणं असेल तर ती तिची आईच आहे."

मुलीच्या 'लग्नाच्या आग्रहामागचे कारण' नेमकं काय होतं या प्रश्नावर दहिया सांगतात, "मुलगी आणि मुलगा यांच्यात काही क्लोज विषयांवर चर्चा झाली होती. पण अद्याप हा तपासाचा विषय आहे."

दहिया पुढे सांगतात, "मुलगी अंकुरच्या मागे वेडी होती. अपहरणाच्या वेळी अंकुरने थोडं जर का कु केलं असतं तर त्याची हत्या होण्याची दाट शक्यता होती."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)