शहाजी पाटलांनी संजय राऊतांना सांगितला ताकदीचा फॉर्म्युला, 'राऊतांचं मनगट अंगठ्याएवढं आहे'

फोटो स्रोत, FACEBOOK
शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि शिंदे गटातील आमदार यांच्यामध्ये तयार झालेली बेदिली आता फारशी नवी राहिलेली नाही. पण इतके दिवस संजय राऊत करत असलेल्या शाब्दिक हल्ल्यांना तितक्याच जोराने परतवायला सुरुवात झाली आहे.
बहुमत जिंकल्यावर शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष आमदार आपापल्या मतदारसंघात जात आहेत.
मतदारसंघात गेल्यावर त्यांनी शक्तीप्रदर्शन, भाषणांचा, पत्रकारांशी बोलण्याचा सपाटा लावला आहे.
गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, सांदिपान भुमरे, संजय गायकवाड अशा विविध नेत्यांनी केलेली वक्तव्यं नव्या बातम्यांच्या स्वरुपात वाचायला मिळत आहेत.
पण 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल' फेम शहाजी पाटील यांनी या सर्वांवर कडी करत एक पाऊल पुढं टाकलं आहे.
सांगोल्याच्या या आमदारांनी सांगोल्यात गेल्यावर आपली बंडामागची भूमिका तर मांडलीच पण आपल्या खास शैलीत संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला आहे.
काय म्हणाले शहाजी पाटील?
मंगळवार 5 जुलै रोजी शहाजी पाटील सांगोल्यात पोहोचले. त्यांचं तिथं खास पद्धतीत स्वागतही करण्यात आलं. तेथे उपस्थित असलेल्या लोकांना पाटील यांनी संबोधित केलं.
या भाषणात उद्धव ठाकरे यांचा आमदारांशी संपर्क तुटल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
राष्ट्रवादी, काँग्रेस हे शिवसेनेला लागलेली वाळवी आहे ती शिंदे साहेबांनी दूर केली असं ते म्हणाले.
संजय राऊत यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, "राऊतांचं मनगट अंगठ्याएवढं आहे. पण हात वर करून याला कापून काढू, प्रेतं आणू असं बोलतंय. अरं तुझं तुला चालाय येईना. सकाळी बशीभर फवं खातंय, घरातून बाहेर पडतंय, झोपताना एक चपाती खाऊन झोपतंय. अरे ये आमच्याकडे बोकाड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची शिकवतो. आमच्यासारखं मग मनगटात रगात येती. ज्याच्या अंगात मॅट आहे त्यानं बोलावं. कुणीही बोलू नये. मिळाली संधी उद्धव साहेबांमुळे म्हणून संजय राऊतांनी गैरफायदा घेऊ नये. तातडीनं त्यांनी बोलणं बंद करावं. तरंच उरलंसुरलं ठाकरे घराण्याचं राहिलं. नाहीतर ठाकरे घराण्याला संपवायची सुपारी संजय राऊतानं घेतली आहे."
कोण आहेत शहाजी पाटील?
शहाजी पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत.
आसाममधून आपल्या एका कार्यकर्त्याला केलेला त्यांचा कॉल राज्यभर प्रचंड व्हायरल झाला होता.
सोशल मीडियावर त्यांच्या बोलण्यावरून मिम्सचा धुमाकूळ सुरू आहे.
सध्या शिवसेनेतून आमदार असलेल्या शहाजी पाटील यांचा राजकारणाची सुरुवात काँग्रेसच्या एनएसयुआय पासून झाली. या काळात ते शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी आंदोलनात सक्रिय होते.
एनएसयुआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असा प्रवास करत त्यांनी आपल्या सक्रिय राजकारणाला सुरुवात केली.
1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना युवक काँग्रेसच्या कोट्यातून सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
कॉलेज जीवनापासून वक्तृत्वावर पकड
"शहाजीबापू यांच्या डोक्यात कोणत्या गावात, कोणत्या भाषेत, काय बोलायचं स्क्रिप्ट तयार असते. याचा अनुभव त्यांच्या या ठरवून व्हायरल केलेल्या कॉलमध्ये येतो आहे," असे मत सोलापूर लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळकोटे व्यक्त करतात.
ते म्हणतात, "शहाजीबापू पाटील यांची कॉलेज जीवनापासून वक्तृत्वावर पकड आहे. आजपर्यंत ते फक्त दोनच निवडणुका जिंकले आहेत. पण त्यांच्या सभांना मात्र कायम गर्दी होत आली आहे. आपल्या भाषणात गावरान भाषेत किस्से सांगत, अनेक दाखले देत ते श्रोत्यांचा टाळ्या-शिट्या मिळवत असतात."
गणपतराव देशमुख यांचा पराभव करून विधानसभेत
सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि गणपतराव देशमुख हे समीकरण संपूर्ण राज्याने पहिले आहे. 1962 पासून गणपतराव देशमुख सलग या मतदारसंघातून निवडून येत होते. पण शहाजी पाटील यांनी 1995 साली गणपतराव देशमुख यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. फक्त 192 मतांनी ते निवडून आले होते.

फोटो स्रोत, Facebook
1995 सालचा एक विजय सोडला तर शहाजी पाटील यांना सलग पराभवाला सामोरं जावं लागलं. 1995 नंतर 1999, 2004, 2009 असे सलग पराभव त्यांनी स्वीकारले.
काँग्रेस ते शिवसेना व्हाया राष्ट्रवादी
आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून करणारे शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला पण विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी 1999 ची विधानसभा अपक्ष म्हणून लढवली. याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2004 ची विधानसभा काँग्रेसच्या तिकिटावर लढवली.
सलग चार पराभव
अखेर 2014 च्या विधानसभेपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण तरीही त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यांनतर शहाजी पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकीमुळे भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा असताना युतीच्या वाटपात जागा शिवसेनेला सुटल्यामुळे 2019 विधानसभा ते शिवसेनेच्या चिन्हावर लढले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी गणपतराव देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्याशी त्यांची लढत झाली त्यात ते विजयी झाले.
सलग चार पराभव पचवल्यानंतर 2019 मध्ये ते फक्त 674 मतांनी विजयी झाले. 1990 पासून आजपर्यंत तब्ब्ल सात निवडणुका लढवून शहाजी पाटील यांना फक्त दोनदा विजय मिळवता आला आहे आणि त्यांचे दोन्ही विजय निसटते आहेत.
1995 मध्ये फक्त 192 तर 2019 मध्ये फक्त 674 मतांनी त्यांना विजय मिळवता आला आहे. "त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला होता." असे मत सचिन जवळकोटे व्यक्त करतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























