तीस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला, तत्काळ आत्मसमर्पण करण्याचे हायकोर्टाचे आदेश

तीस्ता सेटलवाड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तीस्ता सेटलवाड
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांच्या विशेष पीठासमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जाची सुनावणी होणार आहे.

जस्टीस बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील विशेष पीठासमोर आज (1 जुलै) ही सुनावणी होणार आहे.

तीस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठामध्ये एकमत झालं.

त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर करावी, ही मागणी करणारी याचिका सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर सादर करण्यात आली.

तिस्ता सेटलवाड

फोटो स्रोत, Twitter

बीबीसीचे सहयोगी पत्रकार सुचित्र मोहन्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन न्यायाधीशांच्या पीठामध्ये मतभेद असल्याने हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर सुनावणीसाठी आणण्यात आलं आहे.

शनिवारी (1 जुलै) सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी होती, मात्र तीस्ता सेटलवाड यांच्या याचिकेनंतर या प्रकरणावर विशेष सुनावणी घेण्यात आली.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की, उच्च न्यायालयात सरेंडर करण्यासाठी तीस्ता सेटलवाड यांना थोडा वेळ दिला जावा.

सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की, "सप्टेंबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर नऊ महिन्यांपासून त्या जामीनावर बाहेर आहेत. या प्रकरणी सोमवार किंवा मंगळवारीही सुनावणी केली जाऊ शकते. पुढच्या 72 तासांमध्ये असं काय घडणार आहे?"

तिस्ता सेटलवाड

फोटो स्रोत, Twitter

मात्र गुजरात सरकारच्या वतीने युक्तिवाद करत असलेले महाधिवक्ता तुषार मेहता यांनी या युक्तिवादाला विरोध केला.

त्यांनी म्हटलं की, सेटलवाड यांना अंतरिम जामीन मिळणं योग्य नाही. कारण त्यांनी सरकारविरुद्ध संवेदनशील आरोप करण्यासाठी बनावट कागदपत्रं बनवली, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी फिरवल्या आणि न्याय व्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.

2002 च्या गुजरात दंगल प्रकरणात षडयंत्र केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात तीस्ता सेटलवाड यांना सप्टेंबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.

अंतरिम जामीनामुळे इतके दिवस त्यांची अटक टळली होती. भारताचे सरन्यायाधीश (CJI) उदय उमेश लळित यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने तीस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामिनाचा आदेश दिला होता.

या प्रकरणी 2 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने तीस्ता सेटलवाड यांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला होता.

पण, आता गुजरात हायकोर्टातील न्यायाधीश निर्झर देसाई यांनी सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्या अंतरिम जामिनावर बाहेर असून त्यांनी तत्काळ आत्मसमर्पण करावं, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

तीस्ता सेटलवाड

फोटो स्रोत, Twitter

सत्र न्यायालय आणि गुजरात हायकोर्ट यांच्याकडून जामीन फेटाळण्यात आल्यानंतर सेटलवाड यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

तीस्ता सेटलवाड यांना गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथका (ATS) ने 25 जून 2022 रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती.

झकिया जाफरींच्या कायदेशीर लढाईत तीस्ता सह-याचिकाकर्त्या

अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील दंगलीत काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह एकूण 69 जणांचा मृत्यू झाला होता.

तिस्ता सेटलवाड

फोटो स्रोत, Ani

फोटो कॅप्शन, तिस्ता सेटलवाड

या प्रकरणात नरेंद्र मोदी आणि इतर कथित गुन्हेगारांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) क्लीन चिट दिली होती. या संदर्भात पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी एहसान जाफरी यांच्या पत्नी झकिया जाफरी यांनी केली होती. झकिया जाफरी यांच्या या कायदेशीर लढाईत तीस्ता सेटलवाड सहयाचिकाकर्ता आहेत.

झकिया जाफरी यांच्या तक्रारीमागे तीस्ता सेटलवाड यांचा हस्तक्षेप असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांचं म्हणणं आहे.

तीस्ता सेटलवाड कोण आहेत?

तीस्ता सेटलवाड या मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्त्या आहेत. भारत सरकारनं त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केलंय.

तीस्ता सेटलवाड या भारताचे पहिले ऑटर्नी जनरल एम सी सेटलवाड यांच्या नात आहेत.

200 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर स्थापन झालेल्या 'सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस' या स्वयंसेवी संस्थेच्या त्या संस्थापिका विश्वस्त आहेत.

तसंच, त्या सातत्यानं सामाजिक विषयांवर आवाज उठवत असतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)