सदाभाऊ खोतांना हॉटेल मालकाने भर रस्त्यात अडवलं, 'आधी जेवणाची उधारी द्या' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. 'आधी जेवणाची उधारी द्या', हॉटेल मालकाने सदाभाऊ खोतांना भर रस्त्यात अडवलं
2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 'हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा' असं म्हणत सांगोल्याच्या अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना भर रस्त्यात अडवलं.
हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या घटनेची सोलापूर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
सदाभाऊ खोत पंचायतराज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सांगोला पंचायत समितीमध्ये आले होते. त्यावेळी सर्वांसमोर उधारीसाठी सदाभाऊ खोत यांना अडवल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान या प्रकाराबाबत सदाभाऊ खोत यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली असून, 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसंच अंगावर येण्याचा प्रयत्न केला,' असा आरोप ही खोत यांनी यावेळी केला आहे. न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे.
2. चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि 500 रुपये मिळवा - नितीन गडकरी
जो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर गाडी उभी करेल त्याला 1000 रुपये दंड लावण्यात येईल. त्याचवेळी त्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्या व्यक्तीला 500 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/NITIN GADKARI
यासाठी लवकरच कायदा आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
देशात अनेक शहरांमध्ये कार पार्किंगविषयी नागरिकांना शिस्त नसलेल्या प्रवृत्तीविरोधात नवीन कायदा आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं नितीन गडकरींनी यावेळी सांगितलं. ही बातमी ABP माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे.
3. गौतमभाईंना बारामती नवी नाही - सुप्रिया सुळे
जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक असलेले गौतम अदानी यांनी बारामतीचा पाहुणचार घेतला. शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबाच्या उपस्थितीत वेगवेगळ्या कार्यक्रमांना अदानींनी हजेरी लावली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः गाडी चालवत अदानींच सारथ्य केलं.

फोटो स्रोत, @SUPRIYASULE
गौतम अदानी आणि पवार कुटुंबांचे संबंध गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आहेत. अदानी दरवर्षी दिवाळीला बारामतीत येतात. आज तिथीनुसार दिवाळी नसली तरी सायन्स सेंटरचं उद्घाटन हा दिवाळीचा योग आहे आणि अशावेळेस गौतम अदानी उपस्थित आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. लोकमतने हे वृत्त दिले आहे.
4. महिला आयोगाच्या अध्यक्षांना अश्लील भाषेत ट्रोल
'लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही' असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमच्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यांच्या या पोस्टनंतर वाद निर्माण झाला होता.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, चाकणकर यांच्या पोस्टवर अनेकांनी अर्वाच्य आणि अश्लील भाषेतही कमेंट्स केल्या होत्या. याची दखल घेत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी याविरोधात फेसबुक पोस्ट लिहून रुपाली चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

फोटो स्रोत, @NCPRUPALICHAKANKAR
हेरबं कुलकर्णी यांनी यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात अशाप्रकारची भाषा वापरल्याप्रकरणी त्यांनी आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.
5. हॉटेल बदललं म्हणून मनस्थिती बदलत नसते - आशिष शेलार
राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार म्हणतात, "महाविकास आघाडीचा निकाल राज्यसभेत जसा लागला तसाचं विधान परिषदेच्या निवडणुकीत लागेल. हॉटेल बदलल्यावर मनस्थिती बदलत नसते. माणसं बदलतात असंही नाही."
विधानपरिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून महाविकासआघाडी विशेष खबरदारी घेताना दिसून येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा पक्षाच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
त्यात शिवसेना, काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. शिवसेनेच्या या खेळीवर आशिष शेलार यांनी टोला लगावला. तसेच भाजप कुठल्याही आव्हानाला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लोकमतने हे वृत्त दिले आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























