भाजपाचे कृपाशंकर सिंग म्हणताहेत, उत्तर प्रदेशात 'मराठी' शिकवा

कृपाशंकर सिंह, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कृपाशंकर सिंह
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

उत्तर भारतीय आणि मराठी हा काही महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा वाद नाही. शिवसेनेपासून मनसेपर्यंत या वादानं अनेक रंग विशेषत: मुंबईत घेतले आहेत. त्याला उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्येही राजकीय फोडणी मिळाली आहे. मुंबईच्या निवडणुकांमध्ये तर त्याचा मतांवरही परिणाम झाला आहे.

पण उत्तर भारतीयांची मुंबईतले नेते अशी ओळख असलेल्या कृपाशंकर सिंह यांनी आता या खेळपट्टीवर नवाच बॉल टाकला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्यात उत्तर प्रदेशातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जावी अशी मागणी केली आहे. यापूर्वी अशी मागणी कोणी कधी केली नव्हती.

कृपाशंकर सिंह हे अनेक वर्षं कॉंग्रेसमध्ये होते. कॉंग्रेसची मुंबईतली धुराही त्यांनी सांभाळली आहे. त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर ते बराच काळ राजकारणापासून दूर गेले. पण आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून जिंकून घेणारच असा चंग बांधलेल्या भाजपाची इथल्या उत्तर भारतीय मतदारांवर मदार आहे आणि कृपाशंकर यांच्याकडे त्यातली महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. त्याच कृपाशंकरांनी आता उत्तर प्रदेशमध्येच मराठी शिकवा अशी विनंती करुन नवी चर्चा सुरू केली आहे.

काही काळापूर्वीच उत्तर प्रदेश सरकारनं मुंबई, महाराष्ट्रात काम करणा-या तिथल्या रहिवाशांना सुविधा मिळाव्या म्हणून एका प्रशासकीय अधिकाऱ्याची मुंबईत नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरही बरीच उलटसुलट चर्चा झाली. त्यामुळे आता कृपाशंकर यांची सूचना योगी आदित्यनाथ गंभीरपणे घेणार की हा निवडणुकीच्या तापत चाललेल्या माहोलमध्ये लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न हे लवकरच समजेल.

कृपाशंकर काय म्हणतात?

कृपाशंकर त्यांच्या पत्रात या सूचनेचा उल्लेख उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात भाषेच्या आडकाठीमुळं आर्थिक संधी हुकाव्या लागू नयेत या हेतूनं करतात. त्यांच्या पत्रात ते म्हणतात, "मी गेली पन्नास वर्षं उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमधून येऊन महाराष्ट्रात येऊन राहतो आहे. या काळात मी पाहिलं आहे की शालेय शिक्षण घेतल्यावर अनेक उत्तर प्रदेशचे विद्यार्थी महाराष्ट्रात नोकरीच्या शोधात स्थलांतरित होतात.'

कृपाशंकर सिंह, काँग्रेस, भाजप, महाराष्ट्र

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, कृपाशंकर सिंह विधानसभा परिसरात अन्य नेत्यांबरोबर

"पण याच काळात मी हेसुद्धा बघितलं की अनेक विद्यार्थ्यांना स्थानिक मराठी भाषा समजत नसल्यामुळे खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यातली सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या अनेक नोक-या असतात, पण तिथं मराठी येणं अनिवार्य असतं."

"त्यामुळे माझी सूचना अशी आहे की उत्तर प्रदेश सरकारनं तिथल्या शाळांमध्ये मराठी भाषा ही पर्यायी भाषा म्हणून उपलब्ध करुन द्यावी. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात चांगल्या नोकऱ्या मिळणं सोपं होईल."

कृपाशंकर यांचा रोख पूर्णपणे उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात अधिक नोकऱ्या मिळणं याकडे आहे. जो कायमच महाराष्ट्रात स्थानिक विरुद्ध परप्रांतीय या संघर्षाचा पाया राहिला आहे.

'भाषा शिकण्यापेक्षा तिकडेच उद्योगधंदे उभारा'

आता उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रातल्या नोकऱ्या म्हटलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उल्लेख येणारचं. मनसेनं उत्तर भारतीयांनी इथं येऊन स्थानिकांच्या नोकऱ्यांमध्ये हिस्सा मिळवण्याविरुद्ध आंदोलन केलं होतं. शिवाय इथं येऊन स्थायिक झालेल्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे असाही मनसेचा आग्रह राहिला आहे.

पण आता कृपाशंकर सिंह यांनी मराठी शिकून महाराष्ट्र सरकारच्या नोकऱ्यांमध्येच उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना संधी मिळावी असं म्हटल्यानंतर मनसेलाही प्रतिक्रिया विचारली गेलीच. मनसे सध्या भाजपाच्या राजकीयदृष्ट्या जवळ जाण्यासाठी नव्या भूमिकेच्या शोधात आहे आणि भाजपानंही त्यांना उत्तर भारतीयांविरुद्धची आक्रमक भूमिकेचा पुनर्विचार करण्यासाठी मनसेला जाहीररित्या सांगितलं आहे.

कृपाशंकर

फोटो स्रोत, Twitter/Devendra Fadanavis

त्यामुळे मनसेच्या संदीप देशपांडेंनी कृपाशंकर यांच्या पत्रावर म्हटलं तर आक्रमक आणि म्हटलं तर सबुरीनं प्रतिक्रिया दिली. "त्यांनी उत्तर प्रदेशात मराठी शिकायचं, मग महाराष्ट्रात येऊन नोकऱ्या करायच्या, असा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा जर उत्तर प्रदेशमध्येच उद्योगधंदे उभारले तर त्यांना मराठी शिकायचीही गरज उरणार नाही आणि महाराष्ट्रात यावंही लागणार नाही. उरला प्रश्न मराठी शिकायचा तर जर कोणाला मराठी शिकायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. महाराष्ट्रात जे उत्तर भारतीय अनेक वर्षं राहतात, त्यांनीसुद्धा मराठी शिकावं," असं देशपांडे म्हणाले.

आता जर या पत्राचं वादात रुपांतर झालं तर मनसे पुढची भूमिका काय घेते याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल.

जसं आता उत्तर प्रदेशमध्ये शाळेत मराठी सुरू करण्याविषयी कृपाशंकर सिंह सुचवत आहेत, तशाच मराठी शाळा 'आप'च्या सरकारनं दिल्लीत सुरू केल्या होत्या. त्यामागेही तिथल्या स्थानिकांना व्यवहारात मुंबईत मराठी सोपी जावी हा उद्देश होता. पण आता विषय उत्तर प्रदेशचा आहे ज्याला मुंबईत राजकीय परिमाण आहे. त्यामुळे आता या पत्राचा निवडणुकीतल्या रणनीतिवर काय परिणाम होतो हे पाहणं आवश्यक आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)