अॅपवरून कर्ज देणाऱ्या घोटाळेबाजांमुळे मराठी माणसावर आत्महत्येची वेळ

फोटो स्रोत, Getty Images
राज यांनी मार्चमध्ये 8500 रुपये इतकं कर्ज घेतलं. या कर्जाने त्यांच्या सगळ्या आर्थिक अडचणी थांबतील असं त्यांना वाटलं. पण झालं उलटंच. या कर्जाने त्यांच्या आयुष्यात नुसती उलथापालथ झाली.
राज हे डिजिटल कर्ज घोटाळ्याला बळी पडले आहेत. राज (नाव बदललं आहे) अगदी सहज आणि तातडीने कर्ज देणाऱ्या योजनेला बळी पडले. त्यांना फक्त फोनवर एक अप डाऊनलोड करायचं होतं आणि एक ओळखपत्र द्यायचं होतं.
त्यांना तातडीने पैसे मिळाले. मात्र त्यांना जितके पैसे हवे होते त्याच्या अर्धेच पैसे मिळाले. पैसे मिळाल्याच्या तीनच दिवसांनंतर ज्यांच्याकडून कर्ज घेतलं त्यांच्याकडून राज यांना फोन येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जितकं कर्ज घेतलं त्याच्या तिप्पट पैशाची मागणी करू लागले.
हे कर्ज चुकवण्यासाठी त्यांनी इतर अॅप्समधून आणखी कर्ज घ्यायला सुरुवात केली आणि कर्जाचा डोंगर वाढतच गेला. आता राज यांच्या डोक्यावर 45000 रुपये इतकं कर्ज झालं होतं. आतापर्यंत राज यांनी तब्ब्ल 33 अप्समधून कर्ज घेतलं होतं.
ज्यांच्याकडून कर्ज घेतलं त्यांनी राज यांना धमकावण्यास सुरुवात केली. मात्र तरीही राज यांना पोलिसात जाण्याची हिंमत होत नव्हती.
जे लोक हे अप्स चालवायचे त्यांनी राज यांच्या फोन मधील सगळ्या कॉन्टॅक्ट्सचा ताबा घेतला होता. राज यांच्या फोनवर असलेल्या त्यांच्या पत्नीचे नग्न फोटो सगळ्यांना पाठवण्याची धमकी दिली.
या घोटाळेबाजांचे पैसे चुकवण्यासाठी राज यांनी बायकोचे दागिनेही विकले. पण तरीही ते अतिशय घाबरलेले आहेत.
"मला वाटत नाही मला ते सोडतील. मला आता माझ्या जीवाची भीती वाटतेय. मला रोज धमकीचे फोन येतात," राज सांगतात.

फोटो स्रोत, Raj
मोबाईल फोनवरून होणाऱ्या घोटाळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. 1 जानेवारी 2020 ते 31 मार्च 2021 या काळात रिझर्व्ह बँकेने एक संशोधन केलं. त्यात 600 बेकायदेशीर अॅप्स अशा प्रकारचं कर्ज देत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
"हे अॅप्स कोणतीही तसदी न देता लगेच कर्ज देतात. तातडीने पैसे मिळतात म्हणून लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. या प्रक्रियेत त्यांचे फोन हॅक होतात. त्यांचा डेटा ते चोरतात. आणि खासगीपणा अगदीच चव्हाट्यावर येतो," असं महाराष्ट्र पोलिस महानिरिक्षक यशस्वी यादव सांगतात. ते सध्या सायबर क्राईम विभागात काम करतात.
"भारतातल्या बहुतांश लोकांना कर्ज मिळत नाही म्हणून या घोटाळ्यांचं प्रमाण वेगानं पसरतंय असं मला वाटतं." असंही ते पुढे म्हणाले.
अनेकदा अशी अॅप्स चीनच्या सर्व्हरमधून चालवली जातात. मात्र घोटाळेबाज लोक भारतात राहतात, असं यादव पुढे सांगतात.
एका घोटाळेबाजाशी बीबीसीने बातचीत केली. भारताच्या पोलिसांना गुंगारा देणं तुलनेनं सोपं आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
"अॅपचे संस्थापक किंवा त्यांच्यासाठी जे काम करतात त्यांना शोधणं फार कठीण असतं कारण मोबाईल नंबर मिळवण्यासाठी आम्ही खोटी कागदपत्रं वापरतो."
"आम्ही पूर्ण भारतातून काम करतो. आमची जागा ठरलेली नसते. आम्हाला फक्त लॅपटॉप आणि फोनचं कनेक्शन हवं असतं. माझ्यासारख्या माणसाकडे ग्राहकांना धमकावण्यासाठी 10 पेक्षा जास्त फोन नंबर आहेत."
या घोटाळेबाजांनी आम्हाला सांगितलं की "आम्ही गरजू आणि भोळे भाबडे लोक शोधतो. त्यांना मागितलेल्या पैशाच्या अर्धीच रक्कम आम्ही देतो." राज यांना जसं तिप्पट पैसा मागताहेत तसा पैसा नंतर ते मागतात.
जर पीडित व्यक्ती पैसे देण्यास असमर्थ असेल तर लगेच दबाव टाकला जातो.
"पहिला टप्पा छळवणुकीचा असतो. मग धमकी द्यायची. त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा खरा खेळ सुरू होतो. कारण त्यांच्या फोनमधली सगळी माहिती आमच्याकडे असते," घोटाळेबाज आम्हाला सांगत होता.

फोटो स्रोत, Getty Images
"भीती आणि लाजेमुळे लोक पोलिसांकडे जात नाहीत."
पीडित लोकांना पाठवलेले मेसेजही बीबीसीने पाहिले. कुटुंबियांना, मित्र मैत्रिणींना आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांना कर्ज बुडवल्याबद्दल सांगू अशी धमकी देतात. काही लोक आणखी क्रूर असतात. ते पीडित व्यक्तींचा चेहरा लावून त्यांच्या नावाने पॉर्न व्हीडिओ इतरांना पाठवण्याची धमकी देतात.
सरकारने हे घोटाळे थांबवण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. गुगल ने अशा 69 अपवर बंदी घातली आहे.
गुगल हा भारतातल्या बहुतांश स्मार्टफोनचा अविभाज्य घटक आहे. स्मार्टफोनमध्ये असलेल्या गुगल प्ले स्टोअरवरून बहुतांश अॅप्स डाऊनलोड केले जातात.
जेव्हा या सर्व्हिसेसमधून अॅप्स मिळणं बंद होतं तेव्हा इतर मार्गाने घोटाळे केले जातात.
रिझर्व्ह बँकेनेही आता सरकारला या घोटाळ्यांच्या विरोधात कडक पावलं उचलण्याची विनंती केली आहे. त्यात अशा अॅप्सचं अवलोकन करणारी एक केंद्रीय संस्था आरबीआयमध्ये असेल.
याबाबत येत्या काही आठवड्यात सरकारने योग्य प्रतिसाद देणं अपेक्षित आहे. हा नियम आला तरी काही लोकांसाठी आधीच उशीर झालेला आहे.
संदीप कोरगावकर यांनी 4 मेला आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. घोटाळेबाजांनी दिलेल्या सतत त्रासांमुळे त्यांनी हे पाऊल उचललं.
त्याच्या भावाच्या मते त्यांनी पूर्ण कर्जही घेतलं नव्हतं. त्यांनी फक्त अॅप डाऊनलोड केलं होतं.
त्यानंतर हे घोटाळेबाज संदीपच्या कामाच्या ठिकाणी फोन करून सांगत आहेत की त्याच्यावर कर्ज होतं. त्याचे फोटो एडिट करून त्याचे नग्नावस्थेतले फोटो किमान 50 लोकांना पाठवले आहेत.
"त्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतरही हा छळ थांबला नाही. त्याचं आयुष्य नरकासारखं झालं होतं. तो नीट झोपत नव्हता किंवा खातही नव्हता, असं दत्तात्रेय म्हणाले.
पोलीस या खटल्याचा तपास करत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























