प्रदीप भिडे यांनी जेव्हा राजीव गांधींच्या हत्येची बातमी सांगितली...

प्रदीप भिडे
    • Author, टीम बीबीसी मराठी
    • Role, नवी दिल्ली
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

आज संध्याकाळी प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनाची वार्ता कानी आली. 24 तास न्यूजचा जमाना नसलेल्या काळात प्रदीप भिडे हे एखाद्या क्रिकेटर किंवा सिनेस्टारप्रमाणे प्रसिद्ध होते. त्यांचा चेहराच नव्हे तर आवाज देखील सर्वांच्या ओळखीचा होता.

घशाला कोरड पडेल असा आरडा ओरडा न करता योग्य आवाजात बातमी आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे कसब भिडेंकडे होते. दूरदर्शनवर संध्याकाळी येणाऱ्या बातम्यांची लोक आतुरतेने वाट पाहत आणि प्रदीप भिडेंनी 'आजच्या ठळक बातम्या...' असे उच्चारल्यावर दिवस सत्कारणी लागल्याची भावना उमटत असे. शेकडो न्यूज चॅनेलची गर्दी नव्हती तेव्हाचा हा काळ होता आणि या काळातला बातम्यांचा चेहरा हा प्रदीप भिडे होते.

त्यांनी सांगितलेली एक बातमी अद्यापही लक्षात आहे.

राजीव गांधी यांची 21 मे 1991 ला हत्या झाली. 21 मे 1991 ला श्रीपेरंबुदूर येथे राजीव गांधींची हत्या झाली. तत्कालीन वृत्त संपादिका विजया जोशी यांनी प्रदीप भिडेंना असशील तसा त्वरित निघून ये म्हणून सांगितलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

तेव्हा ही बातमी मुंबईत वाऱ्यासारखी पसरली होती. मुंबईत स्मशानशांतता पसरली होती. तेव्हा ते पोलिसांच्या जीपने केंद्रात आले आणि कोणताही अभिनिवेश न आणता त्यांनी ही बातमी दिली होती.

महाराष्ट्राचा आवाज

प्रदीप भिडे यांच्या आठवणी सांगताना प्रसिद्ध निवेदक श्रीराम केळकर सांगतात, "प्रदीप भिडे हे महाराष्ट्राचा आवाज आणि चेहरा होते. आकाशवाणी कार्यालयाखाली भिडेसाहेबांना भेटण्यासाठी गर्दी झाल्याचं मी पाहिलं आहे. स्टुडिओत जाण्याआधी निवेदकाने तीनवेळा बुलेटिन वाचलेलं असायला हवं हा दंडक त्यांनीच घालून दिला.

"निवेदकाला सगळं बुलेटिन माहिती असायला हवं असा त्यांचा दृष्टिकोन असायचा. अँकर मंडळींसाठी भिडेसर म्हणजे वस्तुपाठ होते. त्यांच्यात कमालीचा साधेपणा होता. कधीही भेटले तर त्यांचा पहिला प्रश्न असायचा- सध्या काय वाचतो आहेस?" ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांच्या आठवणी प्रसिद्ध निवेदक श्रीराम केळकर सांगतात.

प्रदीप भिडे

फोटो स्रोत, Pradeep Bhide

"त्यांच्यात जराही मीपणा नव्हता. कामाप्रती तादात्म्य पावणे म्हणजे काय हे मी त्यांच्याकडून शिकलो. ते जोपर्यंत कार्यरत होते तोवर त्यांचा फिटनेस अद्भुत असा होता. आवाज जपत असत. त्यांचं व्यक्तिमत्व रुबाबदार असं होतं. भिडेसर निवेदन करत होते तेव्हा महाराष्ट्रात दुसरं कोणतंही चॅनेल नव्हतं. फक्त दूरदर्शन होतं. अख्ख्या राज्याला माहिती असलेलं असा त्यांचा चेहरा आणि आवाज होता. त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. त्यांच्या जाण्याने माध्यमविश्वाचं अपरिमित नुकसान झालं आहे", असंही ते पुढे म्हणाले.

सिंगल टेक ओकेवाला वृत्तनिवेदक

1974 मध्ये त्यांनी वृत्तनिवेदनाला सुरुवात केली होती. पहिले बातमीपत्र जेव्हा वाचलं तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला होता. आपण बातम्या वाचू की नाही अशी त्यांनी भीती वाटत होती. मात्र ते सुरळीत पडलं आणि मग ते 2016 पर्यंत दुरदर्शनसाठी बातमीपत्र वाचत राहिले.

ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ केशव साठ्ये यांनीही प्रदीप भिडे यांच्या आठवणीला उजाळा दिला. ते लिहितात, "आश्वासक अशा आवाजाच्या पाठबळावर यानी मराठी मधील किमान 60% रेडिओ जाहिराती आपल्याला 3 दशके ऐकवल्या. त्या वेळी मराठी साठी जाहिरातीची वेगळी संहिता लिहिली जायची कारण त्यावेळी भाषा समजणारे ,आणि आवाजावर मेहनत घेणारे याच्या सारखे निवेदक कार्यरत होते. 1975 ते 2005 असा सलग 3 दशकांचा काळ दूरदर्शनच्या मराठी बातमी पत्रावर निवेदक म्हणून याच नाव ठळकपणे नोंदलं गेलं.

प्रदीप भिडे

फोटो स्रोत, Facebook

कांदिवली ते चर्चगेट आणि अंधेरी ते कुलाबा असा स्टुडिओ चा प्रवास करताना ध्वनिमुद्रणाची वेळ त्यांनी कधी चुकवली असे ऐकले नाही. 'सिंगल टेक ओके' हे तर त्याच्याबाबत कायमच घडत आलं. आणि सर्वात घेण्यासारखा त्याचा गुण म्हणजे मिडिया क्षेत्रात असूनही कोणत्याही गॉसिपिंग मध्ये तो कधीच अडकला नाही . कुणाबद्दलही तो खाजगीतही वाईट बोलल्याचे मला आठवत नाही , सगळे छान आहेत ही भावना मनात असायला ते स्फटिकासारखं असावं लागतं ते आमच्या मित्राकडं होतं.

साठ्ये सांगतात, "भाषा ,आवाज ,उच्चार ,भावना आणि संहितेची गरज याचे उत्तम भान ठेवल्यामुळे इतक्या जाहिराती , बातम्या वाचूनही हा ओव्हर एक्झपोज कधी झाला नाही. बातम्या वाचता वाचत अनेक सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम यांनी रंगतदार केले. पुणे फेस्टिव्हलचा मुख्य सूत्रसंचालक ही जबाबदारी त्यानी दोन दशके उत्कृष्ट सांभाळली. सर्व महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमांना पहिली पसंती यालाच मिळायची. मग ते शरद पवार असोत विलासराव देशमुख असोत, नारायण राणे असोत, वा देवेन्द्र फडणवीस. सरकारी कार्यक्रमात डेकोरम सांभाळायचा असतो, प्रेक्षकांना हसवण्यासाठी अल्लड शेरेबाजी करायची नसते हे याला अचूक माहीत होतं."

भिडे यांनी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट आणि लघुपट यांना आवाज दिला होता. दोन हजारांहून अधिक कार्यक्रमांचं त्यांनी सूत्रसंचालन आणि निवेदन केलं.

'निवेदक जो बनला हिरो'

आजकाल अनेक हिरो किंवा अभिनेते हे निवेदन करताना दिसतात. पण प्रदीप भिडे असे निवेदक होते की जे प्रसिद्धी आणि करिष्म्याच्या बाबतीत एखाद्या हिरोसारखे होते, अशी भावना बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांनी व्यक्त केली.

बीबीसी मराठी प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांनीही प्रदीप भिडे यांच्याबरोबर काम केलं होतं. भिडेंच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणतात, "कणखर तरीही थेट मनाला भिडणारा आवाज ही प्रदीप भिडेंची ओळख. दूरदर्शनच्या न्यूजरुममध्ये पहिल्यांदा ते भेटले तेव्हा टिव्हीवरचा हिरो भेटल्यासारखं झालं होतं. उंच शरीरयष्टी, चेहऱ्यावर कायम स्मितहास्य, कमालीचा शांत चेहरा, कडक इस्त्रीचे कपडे... ते न्यूजरुममधले हिरोच होते.

प्रदीप भिडे

"मी ब्लँक अँड व्हाईट टिव्हीवर लहानपणापासून त्यांना पहात होते. दूरदर्शनच्या न्यूजरुममध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा सुरूवातीला वरळीच्या त्या उंच इमारतीत प्रवेश करताना पोटात खड्डा पडायचा. सातच्या बातमीपत्रांसाठी रिपोर्टर म्हणून काम करणारी माझ्यासारखी नवखी मंडळी तो खड्डा अनेकदा अनुभवायची. आपण लिहिलेली बातमी प्रदिप भिडे अँकर असलेल्या बातमीपत्रात जाणं, कसलं थोर वाटायचं.

जशीजशी न्यूजरुममध्ये त्यांची ओळख झाली तसतशी भीती कमी झाली पण दरारा कायम राहिला. आज कोणती बातमी आहे तुझी... हे शब्द कानावर पडले तर आणखीनच दडपण यायचं. माझ्यासारखी बरीच मंडळी काँन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायची. त्यांच्यासोबत आपली ड्युटी असावी असा योग जुळून येणं म्हणजे कामाचं सार्थकच झालं असं आम्ही समजायचो. तेव्हा बातमीमत्र टाईपरायटरवर तयार केलं जायचं, त्याच्या चार कॉपीज तयार व्हायच्या. त्यातली एक कॉपी अँकरच्या हातात असायची. ती वाचून भिडे सर न्यूज एडिटरसोबत बसून त्यावर आपल्या नोंदी करायचे."

"मला आठवतंय मी वीटभट्टीवरल्या मुलांवर एक रिपोर्ट केला होता. त्यातला नॅट साऊंड भिडे सरांना खूप भावला होता. मुलं कल्ला करतायत, गाणं गातायत हे कसं बातम्यांमध्ये गरजेचं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. बातम्या रुक्ष होऊ नयेत आणि आपल्या भावनाही त्यात दिसू नये असं निवेदन करण्याचा त्यांचा आग्रह असायचा. पण बातमीपत्रात फारसा ऐकू न येणारा आवाज आवर्जून यावा असं ते सांगायचे. अस्सल, खऱ्याखुऱ्या आवाजाची इतकी पारख असणारा माणूसच उत्तम आवाजाची जाण राखून ठेवू शकतो. तितकीच बारीक नजर रिपोर्ट्सवरूनही फिरवलेली असायची. कसदार बातम्यांचा आपल्या बातमीपत्रात आग्रह ठेवणारा निवेदक इतक्या जवळून पाहता आला, शिकता आलं." त्या पुढे सांगतात.

इतक्या दैवी आवाजाला घशाचा कॅन्सर होणं हा नियतीचा क्रूर न्याय आहे. प्रदीप भिडेंचा आवाज पुढचा अनेक काळ प्रेक्षकांच्या कानात घुमत राहील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)