गोव्यात ब्रिटिश महिलेवर बलात्कार, आरोपी अटकेत

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या एका ब्रिटिश महिलेवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी स्थानिक रहिवासी असलेल्या 32 वर्षीय जोएल डिसूजाला सोमवारी (6 जून) अटक केली आहे.
पेरणेम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे." मंगळवारी दुपारी आरोपीला कोर्टात हजर केलं जाईल.
ही घटना उत्तर गोव्यातील आरंबोल बीचवर घडली. मसाज देण्याचा बहाणा करून आरोपीने या महिलेवर बलात्कार केला. आरंबोल बीच परदेशी पर्यटकांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे.
गोव्यात परदेशी महिलेसोबत बलात्काराची ही पहिली घटना नाही. या आधीदेखील अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
कुठे घडली ही घटना?
गोवा पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 2 जून रोजी सकाळी 11 वाजता उत्तर गोव्यातील आरंबोल बीच जवळच्या स्वीट लेक परिसरात घडली.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितलं की, स्वीट लेक परिसरात ही महिला पतीसोबत बसली होती. त्यावेळी मसाज देण्याच्या बहाण्याने या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
यूकेतील कुटुंबीय आणि भारतातील ब्रिटिश दुतावासासोबत चर्चेनंतर या महिलेने गोव्यातील पेरणेम पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली.

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेबाबत बीबीसी मराठीशी बोलताना पेरणेमचे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक म्हणाले, "महिलेने तक्रार दिल्यानंतर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या सर्व सूचनांचं पालन करून पुढील कारवाई करण्यात येत आहे."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार प्रकरणातील आरोपी जोएल डिसूजा काही वर्षांपूर्वी एका शाळेत लायब्रेरियन म्हणून काम करत होता.
गोव्यात परदेशी पर्यटकांसोबत घडलेल्या बलात्काराच्या घटना
गोव्यात दरवर्षी हजारोंच्या संख्येने परदेशी पर्यटक फिरण्यासाठी येतात. गोव्यात परदेशी पर्यटकांसोबत घडलेली ही पहिली घटना नाहीये.
12 मे रोजी आरंबोल बीचजवळच्याच एका रिसॉर्टमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. रशियाहून भारतात पर्यटनासाठी आपल्या कुटुंबासोबत आलेल्या या मुलीवर रिसॉर्टमधील एका कामगाराने बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला कर्नाटकमधून अटक केली होती.
2018 मध्ये एका ब्रिटिश महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. रस्त्यावरून चालत असताना एका व्यक्तीने या महिलेवर बलात्कार केला होता. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती.
तर 2008 मध्ये 15 वर्षांच्या स्कारलेट क्निलिंगची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी 2019 मध्ये एका आरोपीला कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा ठोठावली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























