मुस्लिम असूनही अभिनय करते म्हणून या अभिनेत्रीवर स्टेजवरच गोळी झाडली तेव्हा...

फोटो स्रोत, CV LENIN
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
वर्ष होतं 1953. 18 वर्षांच्या निलांबूर आयशा स्टेजवरून डायलॉग बोलत असताना हवेतून एक गोळी आली.
"मी इकडे तिकडे फिरत संवाद म्हणत होते. त्यामुळे वाचले आणि गोळी रंगमंचाच्या पडद्यावर आदळली," आयशा ती आठवण सांगतात.
सध्या 87 वर्षांच्या असलेल्या आयशा दक्षिण भारतातील केरळच्या निलांबूर शहरात त्यांच्या घरी आहेत. (जे त्यांच्या रंगमंचाच्या नावाचा भाग बनले आहे.)
ज्या धार्मिक पुराणमतवाद्यांना मुस्लिम महिलेने अभिनय करू नये असं वाटायचं, त्यांच्याकडून केलेल्या गोळीबारांपैकी तो एक होता. आयशा यांना मंचावरून बाहेर पाडण्याचाही तो प्रयत्न होता.
पण ती अभिनय करत राहिली. लाठ्या, दगड आणि थप्पड यांच्याशी धाडसाने लढत राहिली. ती म्हणते, "आम्ही लोकांचा दृष्टिकोन बदलू शकलो."
गेल्या महिन्यात, केरळमधील नव्या पिढीतील काही कलाकारांनी त्यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा त्या करत असलेल्या नाटकाची पुनर्कल्पित आवृत्ती सादर केली. 'इज्जू नल्लोरू मानसनाकन नोक्कू' (तुम्ही एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा). तेव्हा आयशा पहिल्या रांगेत बसली होती.
नाटकाची नवीन आवृत्ती आयशावरील गोळीबाराच्या प्रयत्नाने उघडते आणि मुस्लिमांमधील धार्मिक रूढीवादावर लक्ष केंद्रित करते. पूर्वीच्या आवृत्तीप्रमाणेच यातही असहिष्णुता आणि धार्मिक कट्टरतेच्या अलीकडील अनेक घटनांचा समावेश आहे, विशेषत: स्त्रियांवर अत्याचाराच्या घटनांचा यात समावेश आहे.
काही आठवड्यांपूर्वी, केरळमधील एका ज्येष्ठ मुस्लिम नेत्याने एका कार्यक्रमाच्या आयोजकांना एका विद्यार्थिनीला स्टेजवर पुरस्कार स्वीकारण्यासाठी बोलावल्याबद्दल फटकारल्यानंतर वादाला तोंड फुटले.
2014 पासून, जेव्हा हिंदू राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष भारतात सत्तेवर आला तेव्हापासून देशात 200 दशलक्ष अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमांवर हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
दुसरीकडे देशातील अल्पसंख्याक समुदाय देखील एका राजकीय मंथनातून जात आहे. जेथे मध्यममार्गी विचारांना धार्मिक अस्मितेच्या नावाखाली पुराणमतवादी प्रथांचे समर्थन करणे कठीण होत आहे.
आयशा म्हणतात, की त्यांना काळजी वाटते. त्या आणि त्यांचे सहकारी कलाकार, त्यातले अनेक जण कम्युनिस्ट होते. 1950 आणि 60 च्या दशकात ज्या देशातील पुराणमतवादाच्या विरोधात लढले. ज्यात केरळ राज्य होते, जे राज्य भारतातील सर्वांत प्रगतीशील राज्य मानले जाते.
त्या सांगतात, "आम्ही हा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न केला होता. पण आता जेव्हा एका तरुण मुलीला स्टेजवर जाण्यास आक्षेप घेतला जातो, तेव्हा असे वाटते की आपण त्या भयानक दिवसांकडे परत जात आहोत."
सुरुवात एका ग्रामोफोनने झाली
आयशा यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला होता, पण वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.
त्या वेळेची आठवण सांगताना त्या म्हणतात, "या काळात जेव्हा त्या जगण्यासाठी संघर्ष करत होत्या, तेव्हा त्यांना समाजाच्या नेत्यांकडून फारशी मदत मिळाली नाही."
जगणं कठीण होते, पण तरीही घरी असल्याचा आनंद होता. त्या काही वर्षांपूर्वी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या 14 वर्षांच्या असताना त्यांचं लग्न एका 47 वर्षीय पुरुषाशी झाले होते. परंतु अवघ्या चार दिवसांनंतर त्या लग्नातून बाहेर पडल्या. त्यांना नंतर कळले की, त्या गरोदर आहेत. पण त्यांनी घटस्फोट घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
एके दिवशी त्या ग्रामोफोनवर सुरू असलेल्या एका रेकॉर्डसोबत गात होत्या. त्या सांगतात, "आमच्या घरात महागडी ती एकच वस्तू उरली होती."
आयशा गात असतानाच त्यांचा भाऊ आणि त्याचा मित्र, नाटककार ईके अयामू आत आले.
त्या वेळी कम्युनिस्टाचा पाठिंबा असलेले प्रोग्रेसिव्ह थिएटर ग्रुप नाटकं, ज्वलंत राजकीय गाणी आणि इतर कला प्रकारांद्वारे आपली भूमिका मांडत होते. त्यांनी अनेक लहान गटांना नाटक लिहिण्यासाठी आणि सादर करण्यासाठी प्रेरित केलं होतं.
परंतु यामध्ये बहुतांशी पुरुषच असत. स्त्री पात्रांच्या भूमिकाही पुरूषच करायचे.
जेव्हा इ. एम. एस. नंबुद्रीपाद 1957 मध्ये भारतातील पहिले कम्युनिस्ट मुख्यमंत्री बनले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार केरळमध्ये सत्तेवर आले. तेव्हा त्यांनी अशाच एका ग्रुपचे एक नाटक पाहिले. तेव्हा त्यांनी अयामू यांना सुचवले महिलांसाठी लिहिलेल्या भूमिकांमध्ये महिलांनी काम करावे.
जेव्हा अयामू यांनी आयशाला गाताना ऐकले तेव्हा त्यांनी विचारले की, त्या नाटकातील जमिला या गृहिणीची आव्हानात्मक भूमिका करणार का? जी त्या नाटकातील मुख्य भूमिका होती.

फोटो स्रोत, CV LENIN
आयशा तयार होत्या, पण त्यांच्या आईला भीती वाटत होती की, त्यांना धार्मिक नेत्यांकडून बहिष्कृत केले जाईल.
"मी तिला सांगितले की, आपण अडचणीत असताना ते कधीच मदतीसाठी आले नाहीत. मग आता शिक्षा कशी देऊ शकतात?" आयशा सांगतात.
हे नाटक प्रचंड गाजले, पण त्यावरून अनेक वादही निर्माण धाले.
"आमच्यावर खूप हल्ले झाले. मुस्लिम परंपरावाद्यांना समाजातील एक महिला रंगमंचावर दिसणे हे निंदनीय वाटले," असे नाटकात आयशाच्या मुलाची भूमिका करणारे व्ही.टी. गोपालकृष्णन म्हणतात.
आयशा अभिनय करत असताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावरही हल्ला झाला.
एकदा एक माणूस उडी मारून स्टेजवर आला. त्याने आयशा यांना इतक्या जोरात थोबाडीत मारली, की त्यांच्या कानाचा पडदा खराब झाला. त्यामुळे त्यांना कायमचं बहिरेपण आलं.
त्यांच्यावर गोळी झाडणारा माणूस कधीच पकडला गेला नाही.
या हल्ल्यांनी त्यांना घाबरवलं का?
"अजिबात नाही. फक्त माझी ताकद वाढली," आयशा सांगतात.
"माणसांमधील चांगुलपणा दाखवणारं आणि तुम्ही कोठून आलाय याचा विचार न करता दुसऱ्यावर प्रेम करायला शिकवणारं हे नाटक होतं. त्यामुळेच आमच्या गटाला अनेकदा लक्ष्य करण्यात आले," त्या सांगतात.

फोटो स्रोत, NILAMBUR AYISHA
आयशाच्या धाडसामुळे त्यांना केरळच्या इतिहासात निर्विवाद स्थान मिळाले आहे, असे ज्येष्ठ पत्रकार जॉनी ओके म्हणतात.
ते म्हणतात, "कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणणाऱ्या चळवळीचा त्या एक भाग होत्या."
आयशा यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केलं, पण काही काळानंतर ऑफर्स कमी होऊ लागल्या.
त्यानंतर त्या सौदी अरेबियाला घरगुती मदतनीस म्हणून काम करण्यासाठी गेल्या.
"किती दिवस, मला आठवत नाही".
जेव्हा त्या केरळला परतल्या. तेव्हा त्यांनी मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये पुन्हा अभिनय करण्यास सुरुवात केली आणि त्यांना अभिनयासाठी पुरस्कारही मिळाले. त्यांना कार्यशाळा आणि कार्यक्रमांमध्ये बोलण्यासाठी देखील आमंत्रित केलं जातं. अनेक जण त्यांना प्रेरणास्थान मानतात.
मागे वळून पाहताना त्या आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हणतात.
"शारीरिक हल्ल्यांसह मी सर्व काही सहन केले. आज वयाच्या 87 व्या वर्षी मी अभिमानाने जगासमोर उभी राहू शकते."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























