अजित पवार म्हणतात तसं पोलिसांनी 'बारीक' व्हायचं तरी कसं?

फोटो स्रोत, Getty Images
पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पोलीस उपायुक्तांना 'बारीक बारीक व्हा'... अशा शब्दात सुनावलं. हा व्हीडिओ व्हायरल झाला. थेट उपमुख्यमंत्र्यांनी एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला असं ऐकवल्याने त्याची स्वाभाविकपणे चर्चा झाली.
त्यावरून पोलिसांमध्ये वाढणारा लठ्ठपणा, त्यांच्या कामाचे तास हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
पोलिसांमध्ये लठ्ठपणा का वाढतो आहे याबद्दल बोलताना निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे म्हणाले, "लठ्ठपणाचे बरेच फॅक्टर असतात. काही जणांमध्ये आनुवंशिकता असते. काहींच्या शरीराची रचना हीच स्थूलपणाकडे झुकणारी असते. पण काहींचं वजन हे हळूहळू लाइफस्टाइलमुळे वाढत जातं. पोलीसही त्याला अपवाद नाहीत. कामाचा ताण, अनिश्चित कामांचे तास, नाईट ड्यूटी, सकस जेवणाची बरेच वेळा निर्माण होणारी अनुपलब्धता आणि प्रकृतीकडे दुर्लक्ष यामुळे बऱ्याच पोलिसांना स्थूलपणा येतो.
शिफ्ट मधलं काम असल्याने त्यांच्या शरीराला कुठल्या एका रुटीनची सवय राहत नाही. 10-6 नोकरीसारखी त्यांची निश्चित दिनचर्या नसते. घरचा डबा आणून तोच खाणंही त्यांना शक्य होत नाही. बंदोबस्त असेल 8 तास ते जागेवरून हलूही शकत नाहीत. मग बंदोबस्ताच्या ठिकाणी उपलब्ध असलेलं जंकफूडच त्यांना खावं लागतं.
या सगळ्या गोष्टी स्थूलपणासाठी कारणीभूत ठरतात." ते पुढे म्हणतात.
पण यातूनही मार्ग काढणं गरजेचं आहे. काम हे करावंच लागणार पण त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. रोज 30-45 मिनिटं व्यायामासाठी काढणं कठीण नाही. ते सहज साध्य होणं शक्य आहे. डिपार्टमेंटमध्ये काही वर्षांनंतर पोलिसांना परत ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. त्यात याची उजळणी होते.
शारिरिकदृष्ट्या फिट असणं आवश्यक आहे. त्याने आत्मविश्वास वाढतो. चपळता राहते. मुख्य म्हणजे स्थूलपणाशी जोडलेल्या इतर व्याधी जडत नाही. असंही ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनीही या विषयावर मत व्यक्त केलं.
"पोलीस कर्मचाऱ्यांना 14 तास काम करावं लागतं. यामुळे खाण्याच्या वेळा पाळणं कठीण होतं. त्यामुळे पोलिसांची 8 तासांची शिफ्ट करणं आवश्यक आहे. याशिवाय त्यांच्या आहाराकडेही लक्ष द्यायला हवं.
कोणता आहार किती प्रमाणात घ्यायचा हे माहिती असणं आवश्यक आहे. योग्य आहाराविषयी पोलीस दलातील समावेशापासूनच जागृती निर्माण होणं गरजेचं आहे. याचसोबत कोणते पौष्टिक घटक शरीरासाठी आवश्यक आहेत, काय खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे हे पण माहिती असणं गरजेचं आहे.
"बेसिक ट्रेनिंगपासून ते रिटायर होईपर्यंत यासंदर्भात वेळोवेळी माहिती असायली हवी. कारण वयाच्या टप्प्यांनुसार पौष्टिक घटकांच्या सेवनामध्येही बदल करावे लागतात. कोणत्या वयात कोणत्या गोष्टींचं जास्त प्रमाणात सेवन करावं हे माहिती असायला हवं. आहार, पौष्टिक घटक, नियमित आरोग्य तपासणी आणि व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत." त्या पुढे म्हणाल्या.
पोलीस दलात बऱ्याच वेळा मेडिकल कॅम्प घेतले जातात. पण प्रत्येक वर्षी सखोल आरोग्य तपासणी घेतली पाहिजे. कामांचे तासंही कमी करणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतं.
पोलीस दलातल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास जास्त असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखाची असते. त्यामुळे त्यांच्यासमोर बऱ्याच अडचणी असतात. पण अधिकाऱ्यांना मात्र या आरोग्यदायी सवयी अंगीकारणं सहज शक्य आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. घर कामात मदतीला कुणाला तरी ठेवू शकतात. त्यामुळे त्यांनी फिट राहणं सहज शक्य आहे.
पोलीस अधिकारी फिट असावेत असं नागरिकांना अपेक्षित असतं. सार्वजनिक ठिकाणी फिट नसल्याबद्दल अवमानित करणं योग्य नाही. पण पोलीस अधिकाऱ्यांना फिट राहण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.
पोलिसांनी आपल्या सेवेत व्यायामासाठी वेळ कसा काढावा?
पोलिसांच्या वेळा निश्चित नसतात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळांचा ठावठिकाणा नसतो. त्यात दारू, सिगरेटचं व्यसन, अशा अनेक गोष्टींनी त्यांचं वजन वाढतं. मग पोलिसी सेवेत असताना फिट राहणं शक्य आहे का? असा वेळ खरंच काढता येईल का हा कळीचा प्रश्न आहे.
संदीप पाटील सध्या नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक आहेत. ते नियमितपणे योगासनं आणि व्यायाम करतात.
हे सगळं ते कसं साध्य करतात याबद्दल बोलताना ते म्हणाले, "माझ्या मते डाएट हा महत्त्वाचा भाग आहे. पहिली ढेकर येण्याच्या आधी खाणं बंद करावं. व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. कामाचा ताण असतोच. पण ध्यानधारणा, योगा या गोष्टींनी वजन नियंत्रणात राहतं. जशी शरीराला अंघोळ घालतो तसंच मनालाही रोज अंघोळ घालायला हवी. ताण तणाव जास्त झाला की आपण जास्त खातो. पण खाणं हा ताण घालवायचा उपाय नाही."

फोटो स्रोत, Mumbai Police
"दररोज मेडिटेशन करणे असा माझा सल्ला आहे. पोलिसांना काँस्टेबल लेव्हल पासून वरपर्यंत महत्वाचा प्रश्न असा आहे की वेळेवर जेवण मिळत नाही आणि वेळेवर झोप मिळत नाही. त्यामुळे जेव्हा पोलीस कामावर असतात बंदोबस्तावर असतात तेव्हा जेवण न मिळाल्यामुळे खूप भूक लागते जास्त खाण होतं आणि वजन वाढतं. जर पोलिसांना कामामुळे झोप मिळाली नाही तर त्यांनी योगा किंवा मेडिटेशन करावे त्याने झोपेची गरज पूर्ण होते. त्यामुळे माझा सल्ला असा आहे की पोलिसांनी योगा ही लाईफस्टाईल बनवावी, त्यात सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि मेडिटेशन या तीन गोष्टींमुळे वजन नियंत्रित राहते. कारण आपण मनाने खात शरीराने नाही आपले मन जेवणाची लालसा करीत असते. पोलीस योगासनं कुठेही करू शकतात पोलीस स्टेशनमध्ये करू शकतात." ते पुढे म्हणाले.
पोलीस चपळ असावेत ही अपेक्षा योग्य आहे तरी..
पोलीस हे सामान्यांच्या संरक्षणासाठी असतात. कठीण प्रसंगात त्यांना शारीरिक चपळाई दाखवणं भाग आहे. त्यांच्या कामाचा तो भाग आहे. पण तरीही सार्वजनिकरित्या असं एखाद्या पोलिसाला बोलून अपमान करावा हाही मुद्दा आहे.
या विषयावर बोलताना एक महिला अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं, "पोलीस दलात फिटनेस महत्त्वाचा आहेच. अजित पवार यांचा सांगण्याचा हेतू चांगला होता, ते स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बोलण्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिलं पाहिजे, असं एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला सांगितलं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























