IPL 2022: गुजरात टायटन्सच्या आयपीएल विजेतेपदाची 5 कारणं

फोटो स्रोत, BCCI-IPL
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
दुखापतींमुळे खेळू शकण्याबाबत साशंकता असलेला कर्णधार आणि देशी वळणाचा प्रशिक्षक यामुळे गुजरात टायटन्स संघाचं नाव जेतेपदाचे दावेदार वगैरे शर्यतीत नव्हतं.
मोठं नाव नसलेला खेळाडू नसल्याने हा संघ कसा जिंकणार अशी थट्टाही सोशल मीडियावर उडवण्यात आली. पण गुजरात टायटन्स संघाने पहिल्याच हंगामात थेट जेतेपदावर नाव कोरलं. काय आहेत त्यांच्या विजयाची कारणं?
1. प्रत्येक मॅचला नवा नायक
आयपीएलचा हंगाम ही प्रदीर्घ काळ चालणारी स्पर्धा आहे. खेळाडूंचा फॉर्म वरखाली होऊ शकतो. दुखापती डोकं वर काढू शकतात. जिंकण्यासाठीच खेळायचं असतं, पण सगळेच सामने जिंकता येतीलच असं नाही.
एका खेळाडूभोवती रणनीती केंद्रित न ठेवता प्रत्येक लढतीत नवा नायक या पद्धतीनेच गुजरातचा संघ खेळला. संघाची नाव प्लेऑफ्समध्ये नेण्याची जबाबदारी गुजरातने एका खेळाडूवर टाकली नाही.
मोठ्या नावांऐवजी त्यांनी एकीच्या बळाला महत्त्व दिलं. गुजरातने जिंकलेले सामने पाहिले तर हे सूत्र लक्षात येतं. शुभमन गिल, वृद्धिमान साहा यांच्याकडे सलामीची जबाबदारी देण्यात आली. हार्दिकने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत इनिंग्ज रचली.
डेव्हिड मिलर, राहुल टेवाटिया यांनी फिनिशरची भूमिका चोख वठवली. रशीद खानने फलंदाजीवर मेहनत घेत असल्याचं त्याच्या खेळातून ठसठशीतपणे जाणवलं.

फोटो स्रोत, IPL/BCCI
गुजरातच्या खालील खेळाडूंनी सामनावीर पुरस्कार पटकावला.
मोहम्मद शमी (25/3), लॉकी फर्ग्युसन (28/4), शुबमन गिल (96), हार्दिक पंड्या (87 आणि 18/1), डेव्हिड मिलर (94), रशीद खान (22/2), राहुल टेवाटिया (43), शुबमन गिल (63), वृद्धिमान साहा (67), डेव्हिड मिलर (68), हार्दिक पंड्या (34 आणि 3/17)
2. ज्याला दिली संधी, त्याने केलं सोनं
गुजरातने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आवर्जून संधी दिली. गुजरातने ज्यांना ज्यांना खेळवलं त्या प्रत्येकाने संधीचं सोनं केलं. गुजरातने फलंदाजीत अभिनव मनोहर आणि साई सुदर्शन यांना खेळवलं. खणखणीत खेळासह या दोघांनी संघव्यवस्थापनाचा विश्वास जिंकला.
गोलंदाजीत गुजरातने यश दयाळ आणि प्रदीप संगवान या जोडगोळीवर विश्वास ठेवला. या दोघांना आलटून पालटून खेळवण्यात आलं. या दोघांनीही विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
डावखुरा वेगवान गोलंदाज संघात असणं ही कर्णधारासाठी चंगळ असते. कारण डावखुरा वेगवान गोलंदाज ज्या कोनातून चेंडू टाकतो, ज्या पद्धतीने स्विंग होतं ते वेगळं असतं. गुजरातच्या यशात यश आणि प्रदीपचा महत्त्वाचा वाटा आहे.
तामिळनाडूसाठी खेळताना दर्जेदार कामगिरी करणाऱ्या साईकिशोरला गुजरातने संधी दिली. काटक शरीरयष्टीच्या साईकिशोरने अंतिम लढतीत रवीचंद्रन अश्विनसारख्या मोठ्या फलंदाजांला बाद केलं.
मॅथ्यू वेड आणि विजय शंकर या दोघांनाही संपूर्ण हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण तरीही गुजरातने त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांना नियमितपणे खेळण्याची संधी दिली.
3. हार्दिकचं सुरेख नेतृत्व
आयपीएल कर्णधारपदाचा कोणताही अनुभव नसतानाही गुजरात संघव्यवस्थापनाने हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. युवा खेळाडूंना मार्गदर्शन, गोलंदाजीत बदल, क्षेत्ररक्षणाची सजावट, दडपणाच्या क्षणी स्वत:ची कामगिरी उंचावून संघासमोर उदाहरण ठेवणं या सगळ्या आघाड्यांवर हार्दिकने स्वत:ला सिद्ध केलं.
कोणत्याही सामन्यात, कोणत्याही परिस्थितीत हार्दिकच्या नेतृत्वात नवखेपण जाणवलं नाही. भारताकडून तसंच आयपीएलमध्ये खेळताना हार्दिक महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात खेळला आहे.
प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे, नेतृत्वाची पद्धतही निराळी आहे. हार्दिकने या तिघांकडूनही नेतृत्वगुण अंगीकारल्याचं दिसून आलं.
दडपणाच्या क्षणीही हार्दिकने शांत राहत योग्य निर्णय घेतले. नेताच शांत असल्याने गुजरातच्या खेळाडूंमध्ये गोंधळ उडाल्याचं कधीही पाहायला मिळालं नाही.
हार्दिक नसताना रशीद खाननेही त्याच्याप्रमाणेच शांत राहून परिस्थिती हाताळली. फेअरप्ले अवॉर्ड पटकावून गुजरातने 'जिंकण्यासाठी वाट्टेल ते' करणार नसल्याचं स्पष्ट केलं.
4. अंडरडॉग टॅगचा फायदा
गुजरातने लिलावाआधी हार्दिक पंड्या, शुभमन गिल आणि रशीद खान यांना संघात घेतलं. रशीद खान जगभरात ट्वेन्टी20 लीग खेळतो.
धावांना ब्रेक लावत हमखास विकेट काढून देणारा भिडू ही रशीद खानची ओळख. हार्दिक पंड्याचं नाव अव्वल फिनिशरमध्ये घेतलं जात असलं तरी तो 5 ते 7 क्रमांकावर खेळतो. शुबमन गिल भारताकडून खेळतो पण त्याचं वय लहान आहे.

फोटो स्रोत, BCCI/IPL
लिलावानंतरही गुजरातच्या संघात मोठ्या नावाचे खेळाडू नव्हते. गुजरातने विचारपूर्वक गुणी खेळाडूंची फौज उभारली पण ब्रँड म्हणावा असा मोठ्या नावाचा खेळाडू घेतला नाही. या संघात धावा कोण करणार अशी टीका झाली. गुजरातने लिलावाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत विकेटकीपरच घेतला नव्हता.
गुजरातने मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, यश दयाळ, प्रदीप संगवान हे वेगवान आक्रमण निवडलं. प्रतिस्पर्धी संघांचं वादळी आक्रमण ही मंडळी रोखू शकतील का याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली. हार्दिक गोलंदाजी करणार का याविषयी स्पष्टता नसल्याने गोलंदाज म्हणून त्याच्या नावाचा विचार अनेकांनी केला नाही.
लिलावानंतर गुजरात टायटन्सने निवडलेले खेळाडू पाहून अनेकांनी नाक मुरडलं. आयपीएलमध्ये उगाचच संघांची संख्या वाढवण्यात आली असंही म्हटलं गेलं. या सगळ्यामुळे गुजरात टायटन्स जेतेपद जिंकेल किंवा जेतेपदाचा दावेदार आहे असा विचारच झाला नाही. त्यांना अंडरडॉग्ज हा टॅग लागला. यामुळे त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं नव्हतं. गुजरातचे खेळाडू मुक्तपणे खेळू शकले.
5. चेसिंग मास्टर्स
आपली ताकद काय हे कळणं मर्म असतं. धावांचा पाठलाग करणं ही आपली ताकद आहे हे गुजरातने जाणलं. नैसर्गिक कारणांमुळे दव पडत असल्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या सत्रात चेंडू ग्रिप करणं गोलंदाजांना कठीण होऊन जातं. अशावेळी धावसंख्या मोठी असेल तरी तिचा पाठलाग करता येऊ शकतो हे गुजरातने समजून घेतलं.

फोटो स्रोत, BCCI/IPL
यामुळेच अनेकदा नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यानंतर गुजरातने गोलंदाजीचा निर्णय घेतला. आवश्यकता असेल तेव्हा दांडपट्टा फटकेबाजी करू शकतील असे हार्दिक पंड्या, राहुल टेवाटिया, डेव्हिड मिलर आणि रशीद खान अशी चौकडी असल्यामुळे धावांचा पाठलाग करणं गुजरातला शक्य होऊ शकलं.
दडपणाच्या अंतिम लढतीतही गुजरातला धावांचा पाठलाग करायचा होता. शिस्तबद्ध गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला दीडशेपर्यंतच्या टप्प्यात रोखायचं आणि नंतर संयमाने ते लक्ष्य गाठायचं अशी गुजरातची रणनीती पाहायला मिळाली.
गुजरातने यंदाच्या हंगामात 16 सामने खेळले. यापैकी गुजरातने 9 सामने धावांचा पाठलाग करताना जिंकल्या.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























