अकबरुद्दीन ओवेसींची राज ठाकरेंवर टीका, 'कुत्रा भुंकत आहेत. भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या'

ओवैसी

फोटो स्रोत, AIMIM

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा

1. कुत्रा भुंकत आहेत, त्यांना भुंकू द्या - अकबरुद्दीन ओवेसी

"कुत्रा भुंकत आहे, भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या. कुत्रे भुंकत असतात पण वाघ शांतपणे निघून जात असतो. ते जाळं विणत आहेत. त्यात तुम्ही फसायचं नाही. आपण कायदा हातात घ्यायचा नाही," असं वक्तव्य एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. औरंगाबाद मध्ये एका सभेत ते गुरुवारी बोलत होते.

लोकमतने दिलेल्या बातमीनुसार ओवेसी यांनी गुरुवारी खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटलं. एमआयएमच्या नेत्यांनी दर्शन घेऊन नवीन राजकारणाची पद्धत रुढ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

2. किधर छुप्या है अमित ठाकरे?- दीपाली सय्यद

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्याविषयी एक ट्वीट केलं आहे. दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको." या ट्वीटमध्ये त्यांनी राज ठाकरे, मनसे अधिकृत आणि शिवसेनेला मेंशन केले आहे. या ट्वीटला अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

दीपाली सय्यद

फोटो स्रोत, Facebook/Dipali Sayyad

न्यूज 18 लोकमत ने ही बातमी दिली आहे.

3. महागाईने गाठली चिंताजनक पातळी

किरकोळ किमतींवर आधारित महागाई दराने सरलेल्या एप्रिलमध्ये 7.79 टक्के हा आठ वर्षांतील उच्चांकी स्तर नोंदविला. मुख्यत: अन्नधान्याच्या किमतींतील भडक्यामुळे महागाई दराने ही चिंताजनक पातळी गाठली.

महागाई दर सलग चौथ्या महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेसाठी सहनशील पातळीच्या तुलनेत अधिक राहिला आहे. लोकसत्ता ने ही बातमी दिली आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सरलेल्या मार्चमध्ये 17 महिन्यांचं उच्चांकपद गाठत ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 6.95 टक्क्यांवर गेला होता.

हा दर चालू वर्षांत जानेवारीपासूनच 6 टक्क्यांच्या वर राहिला आहे. महागाईचा दर 4 टक्क्यांवर राहील हे पाहण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची आहे. एप्रिल मध्ये हा दर 4.23 इतका होता.

4. उत्तर प्रदेशात मदरशांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक

उत्तर प्रदेशात आता सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक करण्यात आलं आहे. वर्ग सुरु होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत गावं लागणार आहे.

आजपासूनच या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या रजिस्ट्रारने सर्व अल्पसंख्यांक कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत. सकाळने ही बातमी दिली आहे.

मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं जातंय की नाही याची पडताळणी देखील केली जाणार आहे. उत्तर प्रदेशांमध्ये सकाळी वर्ग सुरु होण्यापूर्वी दुआ पठण केलं जातं. पण आता दुआ पठणाबरोबरच राष्ट्रगीत म्हणणं हे देखील बंधनकारक असणार आहे.

5. राज्यसभेच्या निवडणुकांची घोषणा, महाराष्ट्रात 6 जागा

महाराष्ट्रातील राज्यसभेचे शिवसेना खासदार संजय राऊत, भाजपचे राज्यसभा खासदार पियूष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम यांच्या 6 जागांसह राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 57 जागांसाठीचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार येत्या 10 जून रोजी राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक 11, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून प्रत्येकी 6, बिहारमधून 5 आणि राजस्थान आणि कर्नाटकमधून 4-4 जागांवर निवडणूक होणार आहे. 24 मे रोजी 57 जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)