मध्यप्रदेशः लाईट गेले आणि नववधूंची झाली अदलाबदल

मध्य प्रदेश, उज्जैन

फोटो स्रोत, Shuraih Niazi/BBC

फोटो कॅप्शन, नववधू
    • Author, शुरेह नियाझी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी भोपाळधून
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

मध्य प्रदेशात विजेच्या खेळखंडोब्यामुळे लग्नात चक्क वधूंची अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर वधूंची अदलाबदल झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर ज्यांचं लग्न ज्या मुलीशी ठरलं आहे त्यांच्याशीच करण्यात आलं.

मध्य प्रदेशात उज्जैन जिल्ह्यात असलाना गावी तीन बहिणींचं लग्न होतं. लग्नसोहळा सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाला. त्यावेळी एका खोलीत मातृपूजन सुरू होतं.

वीजपुरवठा खंडित झाल्याने गोंधळ उडाला. या गडबडीत नववधूंची अदलाबदल झाली.

मातृपूजनाचा विधी करणाऱ्या नववधूंनी प्रत्यक्षात वेगळ्याच मुलाबरोबर पार पाडला. पण लग्नाच्या सप्तपदी विधीच्या आधी वीजपुरवठा पूर्ववत झाला. नेमका घोळ काय झाला आहे ते समजलं आणि मग ठरल्याप्रमाणे लग्नं पार पडली.

असलाना गावातल्या रमेशलाल रेलोत यांच्या घरी हे लग्न होतं. रमेशलाल यांच्या तीन मुलींचं आणि एका मुलाचं लग्न होतं.

मातृपूजनाचे विधी

रमेशलाल यांची मोठी मुलगी कोमलचं खीराखेडी गावातल्या देवीलाल मेवाडा यांचा मुलगा राहुलशी लग्न ठरलं होतं. दुसरी मुलगी निकिताचं दंगवाडाच्या रामेश्वर यांच्या मुलाशी होणार होतं. तिसरी मुलगी करिश्माचं लग्न दंगवाड्याच्याच बाबूलाल यांचा मुलगा गणेशशी होणार होतं.

खीराखेडी आणि दंगवाडा इथून 6 मे रोजी वरात असलाना गावी आल्या. लग्नसोहळ्यातला मातृपूजनाचा विधी सुरू होता आणि त्याचवेळी गावातला वीजपुरवठा खंडित झाला.

मध्य प्रदेश, उज्जैन, वीजपुरवठा, लोडशेडिंग

फोटो स्रोत, SHURAIH NIAZI/BBC

फोटो कॅप्शन, वऱ्हाडी

दिसायला एकसारखे असल्याने नवऱ्यामुलींना नवरामुलगा कळण्यात गडबड झाली. निकिताने गणेशशी तर करिश्माने भोलाबरोबर मातृपूजनाचा विधी केला. ज्या खोलीत हा विधी सुरू होता तिथे अंधार झाल्याने गोंधळ झाला. नववधू डोक्यावरून पदर घेऊन असल्याने नेमकी कुठली मुलगी आहे याचा गोंधळ उडाला.

रात्री 12.30 वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला त्यावेळी सगळा गोंधळ लक्षात आला. नववधूंची अदलाबदल झाल्याने मातृपूजनाचा सोहळा पुन्हा करावा लागला. पहाटे 5 वाजता निकिताने भोलाशी तर करिश्माने गणेशशी लग्न केलं.

संध्याकाळी होतं लोडशेडिंग

हा सगळा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला. रमेशलाल रेलोत यांनी या घोळाबाबत सविस्तर सांगितलं, "गावात संध्याकाळी वीजपुरवठा खंडित होतो. हे रोजचं आहे. एका विधीवेळी थोडी गडबड झाली. पण लग्न ठरल्याप्रमाणेच झालं".

मध्य प्रदेश, उज्जैन, वीजपुरवठा, लोडशेडिंग

फोटो स्रोत, SHURAIH NIAZI/BBC

फोटो कॅप्शन, वऱ्हाडी

या गोंधळामुळे गावात वादविवादाची स्थिती निर्माण झाल्याचं गावकरी सांगतात. पण चर्चेनंतर परिस्थिती निवळली. याप्रकरणावरून काँग्रेस नेते के.के. मिश्रा यांनी शिवराज सिंह चौहान सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटलं की, "उज्जैन जिल्ह्यात एका मंडपात तीन लग्नं होती. वीजपुरवठा खंडित झाल्याने नववधूंची अदलाबदल झाली. काय म्हणणं आहे यावर"?

मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचं संकट तीव्र झालं आहे. अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरू आहे. यामुळेच गावांमध्ये अनेक तास वीजपुरवठा खंडित असतो.

प्रचंड उन्हाळा

देशात अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटांचा प्रचंड फटका बसला आहे. प्रचंड उकाड्यामुळे वीजेची मागणी वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यांचं प्रमाण व्यस्त झाल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होतो आहे. वीजपुरवठा नसल्यानेच नववधूंची अदलाबदल होण्याचा प्रकार घडला.

ग्रामीण भागात दररोज चार ते सहा तास भारनियमन होतं. सरकारच्या दाव्यानुसार मागणी आणि पुरवठ्यात 600 मेगावॉट एवढी तफावत आहे. पण ही तफावत अधिक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

मध्य प्रदेशात दररोज 12 हजार 500 मेगावॉटहून जास्त वीजेचा पुरवठा केला जात आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही शिवराज सिंह चौहान सरकारवर टीका केली आहे. कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करून लिहिलं की, "खोटी आकडेवारी सादर करून वीज, पाणी आणि कोळशाचं संकट नाकारलं जात आहे. सरकारने याप्रश्नी तात्काळ उपाययोजना करून नागरिकांचा त्रास कमी करायला हवा. मध्य प्रदेशच्या नागरिकांना कोळसा, वीज आणि पाणी यासंदर्भात वास्तव परिस्थिती सांगायला हवी".

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)